दोन दिवे खास मित्र होते. एकत्र राहायचे. त्यातील एक दिवा थोडा मोठ्या आकाराचा होता. दिवाळीच्या रात्री घराचा मालक आला. त्याने मोठा दिवा पेटवला.
दिव्याने परिसर उजळून निघाला. मोठ्या दिव्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने विचार केला
की,आपण रात्रभर उजळत राहू आणि मालकाला आनंदित करून टाकू. कोणताही दुसरा दिवा माझ्याशी स्पर्धा करू शकणार नाही. मी माझ्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून टाकेन. मग त्याचा मित्र त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.
छोटा दिवा म्हणाला, 'मित्रा, मला पण प्रकाश दे, जेणेकरून मलादेखील अंधार कमी करण्यास हातभार लावता येईल. मीही यासाठी योगदान देऊ शकतो. मोठा दिवा बढाई मारत म्हणाला, ' तू काय प्रकाश देशील? यासाठी मी एकटा पुरेसा आहे.' लहान दिवा गप्प राहिला. मोठा दिवा एकट्याने घर उजळून टाकण्याचा प्रयत्न करू लागला. पण संपूर्ण घर उजळून टाकण्यास तो असमर्थ ठरला.
एक वयोवृद्ध दिवा त्याच्याजवळ आला आणि
म्हणाला, 'मुला, तू एकटाच संपूर्ण घर प्रकाशाने उजळून टाकण्याचा प्रयत्न करत आहेस,पण ते शक्य आहे का? तुझं काम उदात्त आहे, परंतु तू हे काम करण्यासाठी कुणालाच आपल्याबरोबर घेत नाहीस, हे योग्य नाही. कोणतेही दिवे लहान मोठे नसतात. सगळे दिवे प्रकाश देण्यासाठीच जन्माला आले आहेत. त्यामुळे प्रथम सर्व सहकाऱयांची ज्योत पेटव आणि मग एकत्र येऊन घर प्रकाशमान करा.' वृद्ध दिवा समाजावून सांगू लागला. मोठ्या दिव्याने सहमती दर्शविली आणि त्याने सर्व सहकारी मित्रांच्या ज्योती पेटवल्या. दिवाळीची रात्र संपूर्ण घर दिव्यांच्या प्रकाशांनी उजळून निघालं.
मंत्र: समाजाचा अंधार दूर करण्यासाठी
एकत्र येणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment