Wednesday, October 30, 2019

'धन्यवाद...' शब्द खूपच महत्त्वाचा


मराठी मध्ये 'धन्यवाद...' आणि इंग्रजीमध्ये थँक्स… हे दोन शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. हे शब्द आपल्या आयुष्याला  उन्नत करतात.  आपल्याला नेहमी सुखी ठेवतात. खरे तर एखाद्याला आपल्या यशाचे श्रेय देणे सोपे नसते. पण लक्षात ठेवा, जर आपण एखाद्याचे आभार मानत असाल तर याचा अर्थ असा की, तुम्ही यशाच्या मार्गावर आहात.
मानवी स्वभाव  असा आहे की, आपल्या हातून काही चुकले तर  त्याचे खापर आपण इतरांवर फोडायला लागतो. अशा आपल्या वागण्यामुळे आपलेच नुकसान होते. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडायची गरज नाही,पण माणूस स्वभाव आहे. कारण आपण आपली चूक मान्यच करत नाही.
दुसऱ्या बाजूला  आपले  काही चांगले घडले तरीसुद्धा आपण समोरच्याचे आभार मानायला तयार होत नाही.  यशाचे श्रेय आपण स्वतःकडे घेतो आणि अपयशाचे दूषणे दुसऱ्यावर फोडतो. परंतु जगातील सर्वात आनंदी  आणि सुखी लोकांवरील नव्या अध्ययनानुसार असे दिसून आले आहे की, आनंदी असणे आणि इतरांबद्दल कृतज्ञता दर्शविणे  आपल्याला आनंद देऊन जातात. सर्व काही आपल्या एकट्याने  होत नाही. इतरांचे हातभार लागलेले असतात. काही जणांची मदतीची भूमिका अदृश्य असते. त्यामुळे आपल्या यशाचे श्रेय दुसऱ्याला दिल्याने  आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. झोपेची तीव्रता, चिंता, तणाव आणि नैराश्य कमी होते. सर्वात महत्त्वाची  गोष्ट म्हणजे आपण स्वत: वर खूश राहतो. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याचे आभार मानते, तेव्हा त्याचा राग शांत होऊ लागतो.  जर आपणास असे वाटत असेल की, आपण सर्व काही स्वतःहून केले आहे आणि दुसऱ्याचे आपल्याला आभार मानायचे नसल्यास  तुम्ही अस्वस्थ व्हाल.  सर्वच गोष्टी आपल्याला अनुकूल होणार नाहीत. 
दुसऱ्या बाजूला, दररोजच्या जीवनात तुमच्याबरोबर  बर्‍याच चांगल्या घटना घडतात, तेव्हा त्या बदल्यात  इतरांचे आभार मानू शकता.  आपल्याला कोणत्याही मोठ्या मदतीबद्दल धन्यवाद म्हणायलाच पाहिजे असे नाही. पण  मुळात ही एक भावना आहे.  त्यामुळे समोरच्या व्यक्तीला चांगले वाटते, आपल्यालाही समाधान वाटते. आपल्यातही इतरांना मदत करण्याची उर्मी तयार होते.  प्रत्येकाच्या मदतीने तुम्ही  पुढे जात राहता, यासाठी आपण स्वत: ला तयार केले पाहिजे. बर्‍याच वेळा असे वाटते की आपण एकटे आहोत, आपण एकट्याने निभावून नेवू शकतो. पण प्रत्यक्षात तसे नसते. आपल्या यशात अनेक वाटेकरी असतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू कोणत्या स्वरूपात आपल्याला उपयुक्त ठरतात. आम्हाला निसर्गाकडून, कुटूंबाकडून, मित्रांकडून आणि वातावरणाकडून  भेटवस्तू स्वरूपात बरेच काही मिळाले आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला त्याबाबत कल्पनाही नसते.  आपण असा विचार केला पाहिजे की, आपण आज चांगले जीवन जगत आहोत तर त्यात कुणाचा ना कुणाचा हातभार आहे.  केवळ आपल्या स्वतःच्या बळावर या जगात काहीही शक्य नाही.   आनंदी असणे ,कृतज्ञ असणे खूप महत्वाचे आहे. दुसऱ्याच्या उपकाराची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे. -असते.मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment