Thursday, October 24, 2019

फटाके फोडा पण जपून


हल्ली फटाके फोडायला कोणतेही निमित्त पुरेसे असते. लग्नापासून तर निवडणुकांपर्यंत. वाढदिवसापासून निवडीपर्यंत काहीही कारण पुरेसं आहे. फटाके हवेच. त्यात दिवाळी म्हटली तर विचारुच नका.  हा सणच फटाक्यांचा आहे. आपल्याकडे दिवाळी हा सण फटाके फोडून पारंपरिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. लहान मुले या सणाची उत्सुकतेने वाट पाहतात. कारण त्यांना फटाके वाजवून मजा करायची असते. मोठ्यांनाही यानिमित्ताने आपली हौस भागवता येते.  परंतु, बरेच लोक फटाके फोडल्याने होणारे आजार याबाबतीत अनभिज्ञ असतात. फटाके फोडताना इजा होते, नाकातोंडात धूर जातो. मात्र फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतल्यास दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करता येतो.

फटाके फोडल्याने दमाग्रस्तांना अतिशय जोखीम असते. तर फटाके फोडल्याने होणार्‍या धुराने ३0 टक्के लोकांना खोकला, छातीमध्ये घरघर आणि धाप लागण्याच्या तक्रारी नोंदवल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. फटाक्यांमुळे भाजण्याची, डोळा किंवा कानाला इजा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जायाला हवी. फटाक्यांमधून सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, मॅंग्नीज आणि काही वेळा कॅडमियम (कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारा अत्यंत विषारी धातू), अशी प्रदूषके बाहेर पडतात. याकडे कोणाचेही लक्ष नाही. ही प्रदूषके संवेदनशील मार्ग असलेल्या श्‍वसन मार्गावरच आघात करतात. दमा असलेल्या व्यक्तींना याचा त्रास होतो. त्यांना दम्याचा अटॅक येण्याची भीती असते. फटाक्यांमध्ये ७५ टक्के पोटॅशियम नायट्रेट, १५ टक्के कार्बन आणि १0 टक्के सल्फर असते. फटाक्याच्या वातीला आग लावताच सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, मॅंगनीज आणि कॅडमियमसुद्धा हवेत सोडले जाते. त्याचा फुप्फुसाकडे जाणार्‍या वायुमार्गाला त्रास होतो व दमा तसेच श्‍वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींना याचा त्रास सुरू होतो. त्यामुळे फटाके फोडताना काळजी घ्यायला हवी. दमेकारी लोकांनी फटाक्यांपासून लांबच राहायला हवे. फटाक्यांच्या धुराच्या संपर्कात यायला नको.
फटाक्यामुळे  छातीत घरघर करणे, श्‍वसन संबंधित आजार, ब्रॉंकायटल अस्थमाची स्थिती खालावणे, फटाक्यामुळे प्रदूषकांशी संबंध येताच काही तासांत फुप्फुसाला त्रास होतो. दम्याचा झटका येऊ शकतो. दम्याचा अटॅक नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्हेलेशन थेरपी प्रभावी ठरते. इन्हेलर्सच्या वापराविषयी समाजात गैरसमज आहेत. मात्र, इनहेल्ड कॉर्टिकोस्टेराइड्स ही दम्यावरची परिणामकारक उपचारपद्धती आहे. महत्त्वाचे म्हणजे फटाके फोडताना पुरेसी काळजी घेतल्यास होणाऱ्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते.
मुख्यत्वे मोकळया जागेत फटाके फोडावे. शहरात फटाके फोडायला जागा असत नाही. त्यामुळे फटाके फुटून कुणाच्या घरात घुसणे, कपड्यांवर जाऊन पडणे असे प्रकार घडतात. त्यामुळे  शक्यतो फटाके मैदानातच फोडावे. फटाके फोडताना डोळे, हात यांची काळजी घ्यावी. लहान मुले फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्या सोबत राहावे. शक्यतो पाण्याची बादली जवळ ठेवावी. तसेच शहरातील दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने धूर करणारे व मोठया आवाजाचे फटाके फोडण्याला पायबंद घालायला हवा. अलीकडे इकोफ्रेंडली फटाके बाजारात उपलब्ध होत आहेत, अशा फटाक्यांचा वापर करायला हवा. गेल्या काही वर्षापासून फटाक्यांमुळे होणा-या दुर्घटनांमध्ये जखमी होणा-यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे चेह-यावर, हातावर, डोळ्यांच्या पापण्यांवर प्लॅस्टिक सर्जरी कराव्या लागतात. त्यामुळे फटाके फोडताना काळजी घ्यावी, हेच महत्त्वाचे आहे. मोठया आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याने त्याची दखल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतली पाहिजे. रस्त्यावर आणि मध्यरात्री फोडल्या जाणा-या फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले पाहिजे. दिवाळी सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. शहरात याबाबतीत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीसारखी शहरे प्रदूषणाने बेहाल झाली आहेत. सर्वांनीच आपापली जबाबदारी समजून वागल्यास त्याचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक 7038121012

No comments:

Post a Comment