एका जंगलामध्ये सिंहाची खूप दहशत होती. तो रोज जंगलातल्या प्राण्यांना मारू खात असे. सर्व विचलित झालेल्या प्राण्यांनी एक दिवस परिषद घेतली आणि त्यामध्ये सिंहाला बोलावले. सिंहाने प्राण्यांना या परिषदेचा हेतू विचारला. प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणाला," महाराज,तुम्ही आम्हाला मारून खाणे स्वाभाविक आहे हे आम्हास ठाऊक आहे. परंतु रोज एकापेक्षा अधिक प्राणी मारणे योग्य नाही. आमचा असा प्रस्ताव आहे की, आम्ही रोज एक प्राणी तुमच्या गुहेपर्यंत पाठवून देऊ. तुम्ही त्याला मारून आपली भूक भागवत जा.शिवाय तुम्हाला शिकार करण्यासाठी भटकावेही लागणार नाही. सिंहाला हा प्रस्ताव पसंद पडला. तो म्हणाला,"मी हा प्रस्ताव मान्य करतो पण माझी शिकार वेळेवर पोहोचली नाही तर मी तुम्हा सगळ्यांना ठार करीन."
दुसर्या दिवसापासून सिंहाच्या गुहेत एक प्राणी पाठवला जाऊ लागला. काही दिवसांनी एका सशाची पाळी आली. सश्याला इतक्यात मरायचे नव्हते. तो त्या दिवशी मुद्दाम उशीरा सिंहाजवळ पोहोचला. सिंह क्रोधीत झालेला होता. त्यातच एवढासा ससा पाहून तो आणखी भडकला. तो डरकाळी फोडत गरजला," मी आज सर्वांना ठार मारणार." ससा म्हणाला," महाराज, मी वेळेवरच निघालो होतो आणि माझ्याबरोबर आणखी पाच ससे होते. वाटेत त्यांना एका सिंहाने मारुन खाल्ले. तो म्हणत होता की, मीच या जंगलाचा राजा आहे." हे ऐकून सिंह रागाने वेडापिसा झाला. त्याने ससाला त्या सिंहाकडे नेण्यास सांगितले. विहिरीजवळ पोहोचल्यावर ससा म्हणाला,' सिंह यात राहतो.' सिंहाने विहिरीत डोकावले. पाण्यात त्याचे प्रतिबिंब पडले होते. त्याला वाटले हा दुसराच सिंह आहे. त्याने मोठ्याने गर्जना केली. लगेच विहिरीतून त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू आला. रागाच्या भरात सिंहाने दुसर्या सिंहाचा नाश करण्यासाठी विहिरीत उडी घेतली. पण त्याचाच पाण्यात बुडून मृत्यू झाला. लहान ससाच्या बुद्धिमत्तेने प्राण्यांचा जीव वाचला आणि जंगल सिंहाच्या दहशतीपासून मुक्त झाले.
मंत्र: खरी शक्ती बुद्धीमध्ये असते.मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
No comments:
Post a Comment