राष्ट्रवादीने पराभवात विजय अनुभवला... शिवसेनेने वरळीच्या विजयात बांद्र्याचा पराभव अनुभवला...
इतरांनी दुसऱ्यांच्या पराभवात स्वत:चा विजय अनुभवला...आणि महाराष्ट्रातील जनतेने नेहमी प्रमाणेच ....हिवाळ्यात पावसाळा अनुभवला...
राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतरचे चित्र हे असे आहे. 220 जागांची मॅजिक फिगर भाजप-सेना युतीला गाठता आली नसली तरी युतीची सत्ता मात्र अबाधित राहिली आहे. या खेपेला भाजपच्या 20 जागा घटल्या तर शिवसेनेच्या सहा जागा कमी झाल्या.महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निवडणुकीत गेमचेंजर बनले.
राष्ट्रवादी काँग्रेसने जागांची पन्नाशी पार केली. आणो पक्षाला गळती लागूनही काँग्रेसची कामगिरी सुधारली. 46 ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून आले. इथे मोठी खंत व्यक्त केली जात आहे,ती म्हणजे राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात झंझावात दौरा केला असता तर आणखी दहा- बारा जागा सहज हाताला लागल्या असत्या. असो,हा जर तरचा प्रश्न झाला. पण ही निवडणूक सर्वच पक्षांना थोडी फार खुशी देऊन गेली. या निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर कोणी आक्षेप घेतला नाही, ही एक निवडणूक आयोगाच्या बाबतीत महत्त्वाची बाजू म्हटली पाहिजे.
महायुतीला 160 जागा, महाआघाडीला 103 आणि इतर 25 अशी राज्यातल्या पक्षांची स्थिती असली तरी 17 अपक्ष आमदारांनी भाजपशी संपर्क साधला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीचे आगामी पाच वर्षे आरामात वर्चस्व राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्याची भाषा केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही रिस्क घेणार नाहीत. कारण त्यांना शेजारच्या कर्नाटक चा अनुभव माहीत आहे. शिवाय केंद्रात मोदींची सत्ता असल्याने राज्य चालवताना अडचणी या राहणारच आहेच. त्यामुळे सेना भाजपवर दवाब टाकून 50-50 हा फार्म्युला किंवा उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेईल,यात शंका नाही. या निवडणुकीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उर्जितावस्था मिळाली आहे. त्यांना ती कायम पुढील पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
2019 ची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षात ठेवण्याजोगी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले यांना दारुण पराभव चाखावा लागला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस सरकारमधील चार कॅबिनेट आणि सहा मंत्र्याना मतदारांनी घराचा रस्ता दाखवला आहे. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, अनिल बोंडे, प्रा. राम शिंदे, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, मदन येरावर, अंबारिषराजे आत्राम, संजय भेगडे, परिणय फुके अशा या मंत्र्यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत 'आयाराम-गयाराम'ना लोकांनी नाकारले. राज्याच्या इतिहासात विरोधकांचे मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याने यंदाची निवडणूक चांगलीच गाजली. मात्र यातल्या सुमारे टक्के उमेदवारांना मतदारांनी घराचा रस्ता दाखवला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून भाजप आणि सेनेत गेलेल्या जवळपास सर्वच आयारामांना उमेदवारी देण्यात आली होती. 30 पैकी 13 जणांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. या निमित्ताने जुन्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने बंडखोरीही मोठ्या प्रमाणात झाली,याचाही फटका युतीला बसला.
या निवडणुकीत काही बड्या नेत्यांची मुले पहिल्यांदाच विधानसभेत पोहचली आहेत. त्यामुळे पारंपरिक वारसा जपणारी राजकीय संस्कृती पुढेही कायम राहिली आहे. शिवसेना संस्थापक आणि पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. मात्र ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीने निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा! यामुळे एक नवा प्रघात पडला आहे. या निवडणुकीत शरद पवार यांचा नातू रोहित पवार (कर्जत) ,सुनील तटकरे यांनी कन्या आदिती तटकरे( श्रीवर्धन), बीडचे क्षीरसागर कुटुंबातील संदीप क्षीरसागर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख (लातूर ग्रामीण), डी. वाय. पाटील यांचे नातू ऋतुराज पाटील ( कोल्हापूर दक्षिण), इंद्रनील नाईक (पुसद), दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा (पालघर) यांना मंत्रालयात जाण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
कल्याण मधून मनसे ने आपले खाते खोलले. मनसे ने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते, पण त्यांना यशाची चव चाखता आली नाही. डहाणूमधून 'माकप' चा लालबावटा फडकला. तुरुंगात असूनही रत्नाकर गुट्टे जिंकले आहेत. सांगोल्यात पाच दशके शेकापचा झेंडा फडकावणाऱ्या गणपतराव देशमुख यांच्या वारश्याला मात्र हा गड शाबूत ठेवता आला नाही. इथे लोकांनी वारसा हक्क नाकारला. शेकापचा अलिबाग किल्लाही ढासळला. 'एमआयएम'नेही तीन जागा पटकवाल्या. सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस मतदारसंघात विश्वजीत कदम हे विक्रमी दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनी निवडून आले असले तरी या ठिकाणी 20 हजारांहून अधिक मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे. ही राज्याच्या राजकारणात नोंद घेण्यासारखी परिस्थिती आहे. ऐनवेळी भाजपत गेलेल्या नितेश राणेंचे पुनर्वसन झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. अजित पवार राज्यात विक्रमी मतांनी निवडून आले आहेत. त्यांना एक लाख 65 हजार मताधिक्य मिळाले आहे. विक्रमी दुसऱ्या क्रमांकाची मते विश्वजीत कदम यांना मिळाली. त्यांचे मताधिक्य 1 लाख 62 इतके आहे. या निवडणुकीतही महिलांना नगण्य स्थान असल्याचे स्पष्ट दिसते आहे. नव्या विधानसभेत 288 पैकी अवघ्या 23 महिला आमदार झाल्या आहेत. यातल्या 11 विद्यमान आमदार आहेत. सर्वच पक्षांनी महिलांना डावलले होते. यानिमित्ताने विधानसभा आणि संसदेत 33 टक्के जागा महिलांना देण्याबाबत जागरूकता पाळण्याची गरज आहे.
या निवडणुकीत शरद पवार यांचा 'पॉवर फॅक्टर' चालला. त्यामुळे काँग्रेसलाही नवसंजीवनी मिळाली आहे. भाजपच्या चांगल्याच जागा घटल्याने त्यांना पुन्हा मोठ्या जोमाने काम करून आपला ठसा उमटवावा लागणार आहे. या निवडणुकीत भाजपला 'उतू नका ,मातू नका' हा संदेश मतदारांनी दिला आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 9423368970
👌👌👌
ReplyDelete