Thursday, October 24, 2019

प्रांतोप्रांतीची दिवाळी


भारतातील सर्वच प्रांतात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. मात्र प्रांतात त्याची रूपं विविध आहेत. त्यातल्या विधींत वैविध्य आढळते. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत थोड्या फार वेगळ्या आहेत. या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
जम्मू-काश्मीर: काश्मिरात दोन दिवसांची दिवाळी असते. जे हिद आहेत, ते नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीत इथे पुरुषांच्या कपाळावर शंकराच्या तिसऱ्या डोळ्याप्रमाणे लाल कुंकवाचा डोळा काढतात. या लालभडक तिलकामुळे सर्व दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यापासून दूर राहतात, असा समज प्रचलित आहे.

उत्तर प्रदेश : कार्तिक शुद्ध द्वितीयेला इथे यमद्वितीया- 'भाई-बूज' म्हणतात. व्यापारीवर्ग भाऊबीजेला यम, यमदूत, चित्रगुप्त व यमुना नदी यांची पूजा करतात. तसेच पेन, शाई व धंद्यात वापरण्याचा शिक्का
यांचीही पूजा केली जाते. उत्तर प्रदेश व हरियाणात शेवयांची पेस्ट व तांदूळ भावाच्या कपाळावर लावतात. पूर्वी या दिवशी बहीण यमुना नदीच्या तीरावर भावाला जेवू घालत असे. यम द्वितीयेच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यात यम, यमी, सूर्य व त्याची पत्नी सम्जना यांचा समावेश आहे.
पंजाब : पंजाबातही भाऊबीजेचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाला इथे 'टिक्का' म्हणतात. पूर्वी या दिवसास ‘भात्री द्वितीया' म्हटले जाई. या दिवशी मुली आणि स्त्रिया केशर व तांदूळ भावाच्या
कपाळाला लावून त्याला ओवाळतात. इथे दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, या घटनेशी जोडला जातो. म्हणून रावणाची प्रतिमा करून जाळली जाते.
राजस्थान : राजस्थानातही रामकथेशी दिवाळीचा संबंध जोडला जात असल्याने रावणाची प्रतिमा जाळतात. लक्ष्मीपूजनाला मांजरीला लक्ष्मी मानतात. या दिवशी तिचे खूप लाड करतात. नरक चतुर्दशीला इथे 'रूपचौरस' म्हणतात. स्त्रिया व मुली नटूनथटून, उत्तम वस्त्रे नेसून, डोक्यावर आत दिवे असलेले सच्छिद्र घडे घेऊन फिरतात. या घड्यांना 'धुडत्या' असे म्हणतात. या धुडत्यांबद्ल एक लोककथा आहे. ती अशी- धुडके खाँ नावाचा एक मुसलमान सरदार होता. तो महिलांवर
फार अत्याचार करत असे. मारवाडी लोकांनी एकदा चिडून त्याची हत्या केली. त्याचे शिर कापून आपला राग व्यक्त करण्यासाठी बाणाने त्या शिराला अनेक छिद्रे पाडली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आजही
अनेक स्त्रिया अशा सच्छिद्र धुडत्या डोक्यावर घेऊन गावभर फिरतात. बलिप्रतिपदेस ते 'खेरखरा' म्हणतात. याच दिवशी नाथद्वारा येथे अनेक  पक्वान्नांचे अन्नकोट करतात. देवाला नैवेद्य दाखवून सर्व अन्न लोकांना प्रसाद म्हणून वाटतात.
सिंध : सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर तलावाकाठी किंवा नदीकाठी नृत्य करून दिवाळी साजरी करतात. नंतर पाण्याकाठी मातीचा एक चबुतरा तयार करतात. त्यावर एक काटेरी झाडाची
फांदी लावून तिची पूजा करतात. घरी जाताना या चबुतऱ्याची थोडीशी माती ते घरी घेऊन जातात. यासंदर्भात असा समज प्रचलित आहे की, या मातीचे दुसऱ्या दिवशी सोने होते.  गुजरात : साधारणत: महाराष्ट्राप्रमाणेच गुतरातेतही दिवाळी साजरी करतात. नरक चतुर्थीला ते 'रूप चतुर्दशी' म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करतात. त्या दिवसाच्या रात्रीला 'काळरात्र' म्हणतात. त्या रात्री भुताखेतांचा संचार असतो, अशी लोकभावना प्रचलित आहे. म्हणून कोणीही त्या रात्री घराबाहेर पडत नाहीत. काही लोक या दिवशी हनुमानाची पूजा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांची पूजा करतात. चोपडीपूजनही करतात. बलिप्रतिपदेला काळभैरवाची पजा करतात. लहान मले 'छगन' या नांवाने मीठ विकतात. हे मीठ विकत घेणे हा शुभशकुन मानला जातो.
बंगाल : अश्विनी अमावस्येला रात्री लक्ष्मीपूजन न करता बंगाली लोक कालीपूजन करतात. बंगाली लोकांचे कालीमाता हेच सर्वस्व आहे. ती त्यांची एकमेव देवी आहे. ती त्यांची शक्ती आहे. लक्ष्मीही तीच व सरस्वतीही तीच आहे. त्या अमावास्येच्या रात्रीला बंगाली लोक 'महानिज्ञा' म्हणतात. या शुभ दिवसात घरात कोणाचाही मृत्यू झाला तरी ते पाच दिवे तरी लावतातच.
आंध्र प्रदेश- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंध्रात घरासमोर मोठे मचाण बांधतात. ते दिव्यांनी सुशोभित करतात. या मचाणांवर बसून स्त्रिया व मुली लक्ष्मीदेवीची स्तुतीपर गाणी गातात. बलिप्रतिपदेला बळीराजाचे
स्मरण करून त्याची प्रतिमा तयार करतात व ती गोठ्यात ठेवून तिची पूजा करतात. तर काही लोक बळीराजाची घोड्यावर बसलेली प्रतिमा करतात. ही प्रतिमा उंच जागी ठेवून तिला २१ दिव्यांची आरास केली जाते. गाई-बैलांची शिंगे रंगवतात. त्यांना फुलांच्या माळा घालतात. त्यांची मिरवणूक काढून त्यांच्यासमवेत मशाली घेऊन नाचतात.
बिहार- पावपुरी या शहरात महावीरांचे निर्वाण झाले. या त्यांच्या जाण्याने प्रकाशच नष्ट झाला, असे जैन लोक मानतात. त्यांचे निर्वाण मध्यरात्री झाले म्हणून मध्यरात्री महावीरांची पूजा करतात व सर्वत्र दिवे
लावतात. जैन लोक दिवाळीनंतर दहा दिवसांनी 'देवदिवाळी' साजरी करतात.
ओरिसा- मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला ओरिसात दिवाळी साजरी केली जाते. नवीन पीक आल्याने शेतकऱ्याच्या हातात पैसा असतो व शेतातही फारसे काम नसते. त्यावेळी ते दिवाळी साजरी करतात. दिवाळीनिमित्त लोक घरे झाडून स्वच्छ करतात. ती रंगवतात. नवीन आलेल्या भाताची पेस्ट बनवून घरात चित्रे काढतात. लक्ष्मीची पावले, जनावरांची चित्रे, झाडे इत्यादी पेस्टने काढतात. तांदळाचीच लक्ष्मीची मूर्ती बनवतात व तिची पूजा करतात. याच तांदळाचा नैवेद्य दाखवितात. अगदी पूर्वी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला 'यूत प्रतिपदा' म्हणतात. त्या रात्री सर्वजण द्यूत खेळतात. या दिवशी जो जिकेल त्याचे संपूर्ण वर्ष आनंदाचे, भरभराटीचे जाईल अशी समजूत आहे.
कोकण: 'देवदिवाळी' हा मुख्यत: कोकणातील सण, त्याला फारसा दिमाख नाही, देखावा नाही. डामडौल तर नाहीच नाही. पण परंपरागत आलेले कुलाचार कोकणी माणूस मोठ्या श्रद्धेने जपतो. त्यात तार्किकता शोधत नाही. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला ही देवदिवाळी कोकणात मोठ्या उत्साहात साजरी करतात. मळणीचा हंगाम संपलेला असतो. शेतकरी जरा निवांत झालेला असतो. घरात धान्याच्या राशी असतात. चार पैसे हातात खुळखुळत असतात. अशा प्रसन्न वातावरणात देवदिवाळी साजरी होते. देवदिवाळीच्या आदल्या रात्री गावकरी गावदेवीच्या देवळात भजनाने आणि टाळ-मृदंगाच्या गजरात या सणाची सुरुवात करतो. कोकणात दुसऱ्या दिवशी- म्हणजे देवदिवाळीला भल्या पहाटे गाव जागे होते. सडासंमार्जन, आंघोळी, देवपूजा यात दिवस उजाडतो. विडे भरणे' हा या दिवशीचा मुख्य कार्यक्रम असतो. प्रत्येक आळीचा स्वतंत्र कार्यक्रम असतो. दिवाणखान्यात किंवा मोठ्या माजघरात शुभ्र धोतर अंथरले जाते. तादळाचे चौक मांडले जातात. मध्यभागी पाच-पाच पानांचे विडे ठेवले जातात. एक चौक कुलदेवतेचा, तर दुसरा चौक भाजीपाल्याचा. कोकणातील प्रत्येक कुलाचारात निसर्गाला खूप मान देतात. भाजीपाल्याचा विडा-चौक हे त्याचेच प्रतीक. काळ्या आईचे स्मरण ठेवणे- हाही निसर्गाबद्दलच्या कृतज्ञतेचा एक भाग आहे. या विड्यांच्या साक्षीने नवस बोलतात. गावच्या मुख्याचा नवस मनसन- मनसुन घसा बसतो. 'सर्वांचे चांगले कर. चुकभूल झाली तर पोटात घाल. सर्वांना सुखात  ठेव. पुढच्या वर्षी तुझा असाच विडा भरतो. बघ- तुझ्या पायावर डोकं ठेवतो.' अशा प्रकारे ते नवस बोलतात. गावकरी 'व्हय महाराजा व्हय' अशा त-हेने त्यांना साथ देतात. पाच पानाचा विडा पिशवीत जमा करतात. त्यानंतर एकमेकांना विडे भेटवले- म्हणजे दिले जातात. रात्री हेच विडे कुलदेवतेचा प्रसाद म्हणून खाल्ले जातात.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत 9423368970




No comments:

Post a Comment