Friday, January 18, 2019

मोबाईलवर स्मार्टशिक्षण द्या


ओडिसातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमांच्या शाळांमध्ये स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन अध्यापन प्रणाली यासाठी विकसित केली असून यथावकाश अशा प्रकारचे शिक्षण संपूर्ण राज्यात दिले जाणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण देण्याची ही कल्पना मोठी भन्नाट असून याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांनी घेतलेल्या शिकवणीचे रेकॉर्डिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यूट्युब आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून शिक्षकांचे अध्यापन उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. एखाद्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिला तरी त्याला स्मार्टफोनच्या माध्यमातून मागे काय शिकवले, याची माहिती मिळू शकते.या स्मार्टफोन शिक्षणाचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. खरे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने याबाबतीत आघाडी घ्यायला हवी होती. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र हे शब्द फक्त नावालाच आहेत, असेच शिक्षणाच्याबाबतीत जाणवते.

महाराष्ट्र राज्यात डिजिटल शिक्षणाचे वारे वाहायला लागून आता दहाएक वर्षे झाली असतील,मात्र याबाबतीत राज्य अजूनही मागासलेच आहे. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातला किमान शंभरदेखील शाळा डिजिटल झालेल्या नाहीत. याला राज्य सरकारच्या नाकर्तेपणा कारणीभूत आहे. ज्या काही शाळा डिजिटल झाल्या, या शाळांमधल्या शिक्षकांनी स्वत: कष्ट करून अध्ययन- अध्यापनाच्या व्हिडिओ बनवल्या. त्या आपल्या शाळेसाठी तर वापरात आणल्याच पण युट्यूबवर टाकून त्या सर्वांसाठीही खुल्या केल्या. राज्यातल्या अनेक शाळांमधील शिक्षकांनी याचा उपयोग आपल्या अध्यापनात केला आणि त्याचा लाभही विद्यार्थ्यांना झाला. पण यात फारसा दर्जा दिसून आलेला नाही. काही अपवादात्मक शिक्षकांनी चांगल्या व्हिडिओज बनवल्या, अध्यापन प्रभावी करण्याचा प्रयत्न केला.आणि त्याचा मुलांना उपयोगही झाला. पण हाच उपक्रम राज्य शासनाने राबवला असता तर आज अगदी उत्तमप्रकारे व्हिडिओज निर्माण झाले असते आणि राज्यातल्या अगदी त्या त्या विषयांत तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांना घेऊन दर्जेदार व्हिडिओज बनवले गेले असते तर त्याचा चांगला उपयोग राज्यातल्या शाळांना झाला असता,पण प्रगतशील राज्य म्हणून स्वतंची पाठ थोपटणार्या राज्यातल्या सत्ताधार्यांना हा असला उपक्रम का दिसला नाही,याचे नवल वाटते.
मुळात राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता आहे. गेल्या दहा वर्षात शिक्षक भरती केलेली नाही. त्यामुळे आजच्या घडीला एकेका शिक्षकाला दोन-तीन वर्ग सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. अजूनही मिटिंगा,कागदी घोडे थांबलेले नाहीत. अशैक्षणिक कामांचे ओझे अजूनही शिक्षकांच्या खांद्यावरून उतरलेले नाही. साधन सुविधांचा अभाव दिसून येतो. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या शिक्षणाचा चांगला उपयोग विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना झाला असता. आज प्रत्येकाच्या घरात स्मार्टफोन आहे. कमीत कमी दोन-तीन हजार रुपयांनाही आज स्मार्टफोन बाजारात मिळत आअहे. त्यामुळे प्रत्येक पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम चांगल्याप्रकारे राज्यात राबवला जाऊ शकतो. जे विद्यार्थी अत्यंत गरीब आहेत, त्यांच्यासाठी शाळांमध्ये तशी व्यवस्था करता येऊ शकते. पण मुळात शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायला निघालेल्या सरकारला शाळांमध्ये डिजिटल व्यवस्था करण्यासाठी विजेची सोय करावी लागते,याची कल्पना यायला हवी आहे. व्यापारीदृष्टीने वीज आकारणी करून आणि ते भरण्याची कोणतीच व्यवस्था न ठेवून सरकार कसला तीर मारायला निघाले आहे,कळायला मार्ग नाही. आज राज्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक शाळा या विजेविना आंधारात आहेत. याठिकाणी कसले डिजिटल शिक्षण घेऊन बसला आहात? आधुनिक शिक्षणाची जोड दिली आहे,म्हणायचे आणि याच शाळांना विजेपासून वंचित ठेवायचे, ही कसली शैक्षणिक प्रगती म्हणायची?
शिक्षक भरती आणि सुविधांचे काय व्हायचे ते व्होवो,पण स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण घराघरात पोहचवण्याची नामी संधी आहे, ती तरी दवडली जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. पालक, दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून मोबाईलवर स्मार्टशिक्षण प्रभावीपणे राबवता येऊ शकते.सरकारने यासाठी ठोस पावले उचलायला हवी आहेत. मराठी,हिंदी,इंग्रजी या भाषा विषयांसह अन्य विषयांतील राज्यातील तज्ज्ञ मंडळी एकत्र आणून प्रभावी अध्यापन प्रकल्प उभारला जाऊ शकतो आणि तो प्रत्येक शाळांबरोबरच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या स्मार्ट मोबाईलपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. विद्यार्थी,पालक यांच्यातील दुवा म्हणून शिक्षक आपली भूमिका चांगल्याप्रकारे पार पाडू शकतात. आज प्रत्येक विषयांवर अॅप उपलब्ध झाले आहेत. यांचाही आज पालक मुलांसाठी उपयोग करताना दिसत आहेत. खरे तर मोबाईल शाप राहिलेला नाही,तो वरदान ठरत आहे. फक्त त्याचा उपयोग कशासाठी करायचा याचे मूल्यशिक्षण देण्याची गरज आहे. वास्तविक आजची पिढी फार पुढे गेली आहे. त्यांना त्याचपद्धतीने शिक्षण देण्याची गरज आहे. आज संवाद,लेखन यात शॉर्टपणा आला आहे. याचेही शिक्षण मुलांना मिळायला हवे. अचूकतेवर अधिक भर द्यायला हवे. सरकारने पारंपारिक शिक्षणपद्धती मोडीत काढून आधुनिकतेची कास धरायला हवी आहे.

No comments:

Post a Comment