Wednesday, February 26, 2020

'गोष्टी स्मार्ट बालचमुंच्या' पुस्तकाच्यानिमित्ताने मनोगत...


'स्वभावयक्ष' नावाची माझी पहिली बालकथा 'दैनिक पुढारी'मध्ये 1994 मध्ये छापून आली होती. माझं नुकतंच डीएड पूर्ण झालं होतं. एके रविवारी माझी चुलती 'बाळू,तुझी गोष्ट छापून आलीय म्हणत पेपर घेऊन आली. मला पेपरमध्ये गोष्ट आलेली पाहून साहजिकच खूप आनंद झाला. खरं तर ती गोष्ट पेपरला पाठवून मी ती विसरूनही गेलो होतो. कारण काही रविवार वाट पाहिल्यानंतर त्याची आशा सोडली होती. पण वेळाने का असेना गोष्ट छापून आल्यानंतर मला पुन्हा हुरूप आला. मी पुन्हा गोष्टी लिहिण्याकडे वळलो. काही दिवसांनी दैनिक सकाळमध्ये 'मौलिक धन' नावाची कथा प्रसिद्ध झाली. तिथून कथा लिहिण्याचा सपाटा सुरू झाला. 'बेळगाव तरुण भारत'च्या 'अक्षरयात्रा' मध्ये काही बालकथा प्रसिद्ध झाल्या.
या दरम्यान मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो होतो. माझ्यासमोर आता विद्यार्थी होते आणि त्यांना गोष्टी सांगून त्यांचे ध्यान अभ्यासाकडे वळवण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होत होता. मी वर्गात गेल्यावर मुले पहिल्यांदा गोष्ट सांगा म्हणू लागले. मलाही आनंद व्हायचा. पण माझ्याकडे गोष्टींचा 'स्टॉक' नव्हता. मग इतरांच्या वाचलेल्या गोष्टी मुलांना सांगू लागलो. विनोदी आणि मनोरंजन कथा शोधून त्या सांगू लागल्याने मुलांनाही गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली.
माझ्याच शाळेतल्या एका खोडकर मुलाची कथा लिहिली. त्यात शेवटी त्याच्या वागण्यात परिवर्तन झाल्याचे लिहिले होते. ती 'सकाळ' मध्ये प्रसिध्द झाली. त्या मुलाला आणि वर्गातल्या मुलांना फार आनंद झाला. गोष्ट वाचून खरोखरच त्याच्या वागण्यात बदल झाला. आता तो शांत राहू लागला आणि अभ्यासही करू लागला. अशाप्रकारे माझा बालकथा लेखनाचा प्रवास  सुरू राहिला. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये माझ्या कथा येऊ लागल्या. याशिवाय किशोर, केसरी-छावा, मुलांचे मासिक या बाल नियातकालिकांमधूनही कथा प्रसिद्ध होत आहेत. माझ्या कथांसाठी मार्गदर्शक वृत्तपत्रेच होती.
        हा लेखन प्रवास सुरू असताना माझ्यासाठी आणखी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट घडली. ती म्हणजे 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व संशोधन मंडळाने आठवी इयत्तेच्या बालभारती पुस्तकात 'धाडसी कॅप्टन:राधिका मेनन' या मी लिहिलेल्या व्यक्तिचित्र लेखाचा समावेश केला. प्रत्येक लेखकाचं पाठ्यपुस्तकात आपल्या लेखनाचा समावेश व्हावा, हे स्वप्न असतं. तसं स्वप्न माझंही होतं आणि ते पाठ्यपुस्तक मंडळानं पूर्ण केलं. आपल्या लेखनाची दखल घेण्यात आली,यापेक्षा मोठा आनंद कोणता असेल? यामुळे माझ्या लिखानाला आणखी बळ मिळालं आहे.
2013 मध्ये माझा पहिला बालकथा संग्रह प्रसिद्ध झाला. आतापर्यंत दोन बालकथासंग्रह (जंगल एक्सप्रेस, मौलिक धन) , विनोदी कथासंग्रह (हसत जगावे) आणि व्यक्तिचित्रे असलेले 'सामान्यातील असामान्य' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आता हे पाचवे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. 'डीएड'ला असताना माझ्या लिखाणाला माझे त्यावेळचे सहकारी आणि आताचे प्रथितयश कवी दयासागर बन्ने यांचे सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत राहिले आहे. आता हे पुस्तकदेखील त्यांच्याच पुढाकाराने प्रसिद्ध होत आहे.अक्षरदीप प्रकाशनाचे प्रकाशक वसंत खोत यांनीही पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करण्याची तयारी दाखवली. चित्रकार सुमेध संजीव कुलकर्णी यानेही  चित्रे आणि मुखपृष्ठ लवकर उपलब्ध करून दिले. या सर्वांचे मनापासून आभार.
या कथासंग्रहातल्या कथांमधील मुलं-मुली ही आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शाळेत जाणारी आहेत. ही मुलं समजूतदार, स्मार्ट आहेत. दुसऱयांना मदत करणारी, आपल्या चुकांतून सावरणारी, वाचनाची गोडी लावणारी, असणारी आहेत. विज्ञानाची कास धरणारी, निसर्गावर प्रेम करणारी  आहेत. या कथा तुम्हाला नक्कीच आवडतील, यात शंका नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे

1 comment: