Friday, April 26, 2013

बालकथा : पोपट, वाघ आणि गाढव

     बादशहा बिरबल दरबार्‍यांना विचित्र प्रश्न विचारत असे. त्याने एकदा बिरबलला विचारले," बिरबल, मला एकाच माणसाच्या अंगात तीन तर्‍हेचे तीन गुण दाखवू शकशील?"
     बिरबल म्हणाला," का नाही हुजूर! एकाच माणसाच्या अंगात पोपट, वाघ आणि गाढवाचे गुण दाखवू शकतो. पण आज नाही, उद्या. बादशहांनी परवानगी द्यावी."
     बादशहाने होकार भरला. दुसर्‍यादिवशी बिरबलाने एका माणसाला पालखीत बसवून आणले.त्याने नुकतेच नशापान केले होते. बादशहाला पाहताच त्याने हात जोडले आणि म्हटले, हुजूर माफी असावी. मी फार गरीब आहे हो, मला माफ करा."
     बिरबल बादशहाला म्हणाला," हुजूरयाचा अंगात पोपट शिरला आहे,  बरं का! म्हणून  हा पोपटाची बोली बोलतो आहे."
     त्या माणसाला आता आणखी नशा चढली. तो बादशहाकडे बोट करीत म्हणाला," तू दिल्लीचा बादशहा झालास म्हणून जास्त शहाणपट्टी मारू नकोस. शहाणपणा दाखवायचं काही काम नाही. आम्हीदेखील आमच्या घराचे बादशहा आहोत."
     बिरबल म्हणाला," बादशहा सलामत, या वेळेला हा वाघाची डरकाळी फोडतोय."
काही वेळाने मात्र त्यांना काहीच बोलता ये ईना. नशा आता त्याच्या अंगात चांगलीच भिनली होती. त्याला धड चालता ये ईना, ना बोलता ये ईना. बेलकांडे खात तो एका कोपर्‍याला जाऊन पडला.तोंडाने मात्र काहीबाही बरळत होता.
     बिरबल म्हणाला," आता या माणसाला लाथ मारली तरी ती खाईल. असाच लोळत राहिल. म्हणजे आता त्याच्यात आणि गाढवात काहीच फरक राहिलेला नाही."
यावर बादशहा जाम खूश झाला. हसतच तो बिरबलाकडे गेला. त्यावेळी  त्याचा हात कंठहारावर होता.

Saturday, April 13, 2013

कसदार अभिनयाचा प्राण

  
   शेवटी एकदाचा अभिजात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.  त्यांच्या चाहत्यांना कधीची या बातमीची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी प्राण यांच्या आजारपणाची बातमी आल्याने काहीशा व्यथित झालेल्या चाहत्यांना ही बातमी सुखावून गेली. हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल सात दशकाहूनही अधिक काळ खलनायकांचा बेताज बादशहा बनून राहिलेल्या प्राण यांच्या अभिनयाच्या उंचीपर्यंत आजदेखील कोणी पोहचला नाही. त्यांची खलनायकी नि:संशय  एकमेवाद्वितीय होती. प्राण यांच्यानंतर या चित्रपटसृष्टीत अनेक जाने-माने खलनायक हो ऊन गेले आणि आजही आहेत, पण प्राण यांच्या मुकाबल्यापर्यंत कोणी पोहचू शकला नाही. त्यांची उंची अबादित राहिली.

     प्राण १९३९ मध्ये पंजाबी भाषेत प्रदर्शित झालेल्या 'यमला जट' चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करते झाले. खरे तर प्राण यांना फोटोग्राफर बनायचं होतं, पण नशिबाने त्यांना अभिनेता बनवलं. 'यमला जट' मध्ये नूरजहाँदेखील भूमिका होती. ती त्यावेळी  अवघी दहा वर्षांची होती. नंतर १९४२ मध्ये प्राण यांचा पहिला हिंदी 'खानदान' चित्रपट आला, त्यात नूरजहाँ त्यांची नायिका बनली होती. नूरजहाँ त्यावेळीही काही मोठी प्रौढ नव्हती. ती केवळ बारा-तेरा वर्षांची असावी. क्लोज-अप दृश्यांमध्ये तिला दगड किंवा वीट यांवर उभारावं लागायचं. प्राण यांनी नायक म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यांना त्यात काही मजा आली नाही. नायिकेबरोबर गाणं गाताना त्यांना वेगळचं फिलिंग व्हायचं. पावसात गायचं, बर्फावर नाचायचं किंवा झाडांभोवती फिरायचं, असल्या गोष्टी त्यांना जमायच्या नाहीत. फाळणीनंतर ते आपल्या कुटुंबासह मुंबईला आले. त्यांना वाटलं होतं, इथं  त्यांच स्वागत होईल. पण तब्बल नऊ महिन्यांहून अधिक काळ  त्यांना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या संघर्षमय काळातदेखील त्यांची ऐट मोठी होती. ते  आपल्या कुटुंबासह अलिशान हॉटेलमध्ये राहत. जसजशी त्यांच्याजवळची पुंजी संपत आली, तसेतसे त्यांना स्वस्तातल्या हॉटेलमध्ये राहणं भाग पडलं. शेवटी त्यांना प्रसिद्ध लेखक साअदत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्या सहाय्याने 'जिद्दी' या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली. या चित्रपटाचा नायक होता, देव आनंद आणि त्याची नायिका होती कामिनी कौशल. 'जिद्दी' हिट झाला आणि प्राण यांना आणखी तीन चित्रपट मिळाले. त्यांची नावे होती. गृहस्थी, अपराधी आणि पुतली. मुंबईत आल्यावर प्राण यांचा सगळ्यात हिट चित्रपट राहिला तो बी आर चोप्रा यांचा 'अफसाना'. मग मात्र प्राण यांनी  मागे वळून कधी पाहिलेच नाही. यानंतर जो चित्रपटांचा  सिलसिला सुरू झाला तो एकेक हिट चित्रपटांचे झेंडे गाढूनच. दरम्यान प्राण अभिनयाच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले.
     'जिद्दी' नंतर 'बडी बहन', शीशमहल, अफसाना, आह, आंसू, अंगारे, मीनार, पहली झलक, बिरादरी, देवदास, कुंदन, मुनीमजी, मिस इंडिया, मि. एक्स, अदालत, चोरी चोरी, नया अंदाज, मधुमती, जालसाज, बेवकूफ, छ्लिया, जिस देश में गंगा बहती है, गुमनाम, शहीद, दिल दिया दर्द लिया, दस लाख, फिर वो ही दिल लाया हूं, सावन कि घटा, काश्मिर की कली, जब प्यार किसी से होता है, मिलन, राम और श्याम, उपकार, आदमी, हीर रांझा, जॉनी मेरा नाम, पूरब और पश्चिम, परिचय, विक्टोरिया नं. २०३, बॉबी, जंजीर, कसौटी, अमर अकबर अंथनी, अंधा कानून, नौकर बीवी का, नास्तिक, जागीर, शराबी, कर्मयुद्ध, सुहागन, आणि दान सारख्या कित्येक चित्रपटांमध्ये प्राण यांनी भूमिका केल्या आणि भूमिका अजरामर केल्या. जवळपास साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. यातल्या जवळ पास तीनशे चित्रपटांच्या कास्टिंग दरम्यान सगळ्यात शेवटी नाव यायचं 'अँड प्राण'.  हे नाव  त्यांचे महत्त्वच अधोरेखित करायचे. याने प्रेरित होऊनच त्यांची ओळख 'अँड प्राण' अशी ठेवली गेली.
     खासगी जीवनात अत्यंत सालस आणि सतत दुसर्‍याच्या मदतीसाठी तत्पर असणार्‍या प्राण यांचे पूर्ण नाव प्राण किशन सिकंद असे आहे. ते चित्रपटात जसे सतत सिगरेट ओढताना आणि धुर सोडताना दिसत,  तसे वास्तविक जीवनात देखील ते धुम्रपानाचे शौकीन राहिले आहेत. सिगरेट्च्या धुरांचे वेटोळे ही त्यांची ओळख बनली होती. त्यांच्या संवादातला 'बरखुरदार' हा शब्ददेखील मोठा लोकप्रिय झाला. त्यांनी वाईट माणसाला दरवेळेला नवनव्या अंदाजात पडद्यावर सादर केले. मॅनरिज्मबरोबरच ते प्राण आपल्या वेशभुषेकडेदेखील फार गांभिर्याने लक्ष द्यायचे. प्राण यांनी आपले डोळे, आपला आवाज आणि आपला मॅनरिज्म यांच्या जोरावरच खलनायकी साकारली. या कामाबाबत ते वाकबदार होते. ते कधी 'चिप' झाले नाहीत किंवा कधी त्यांनी विनाकारण आरडाओरडा केला नाही. एकदा प्राण आणि जॉय मुखर्जी 'फिर वही दिल लाया हूं' चित्रपटाचे शुटींग करत होते. शुटिंग पाहायला आलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात नासिर हुसेन यांना कठीण जात होते. तेव्हा त्यांनी प्राण यांची मदत घेतली. तेव्हा प्राण यांनी शांत राहायला सांगण्यासाठी व्हिलनच्या अंदाजातच गर्दीला सामोरे गेले आणि अक्षरशः गर्दी नियंत्रणात आली.   घाबरून गर्दी शांत झाली.
     एकेकाळचे प्रसिद्ध त्रिकुट म्हणजे देव-राज-दिलीप यांचा हमखास आवडीचा खलनायक प्राणच असायचे. या तिघांना अगोदरच फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या तिघांना प्राणसारख्या मुरलेल्या अभिनेत्यासोबत दोन हात करण्यात मजा यायची. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या त्रिकुटबरोबरच राजेंद्रकुमार यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नायकाला प्राणपेक्षा अधिक मेहनताना मिळत नव्हता.
     'जंजीर' चित्रपटात अमिताभला घेण्याची शिफारस स्वत; प्राण यांनी केली होती. अमिताभसोबत प्राण यांनी तब्बल १४ चित्रपट केले आहेत. यातल्या पहिल्या सहा चित्रपटात प्राण यांनी अमिताभपेक्षा अधिक पैसे घेतले होते. १९७० मध्ये प्राण यांना अमिताभपेक्षा अधिक पैसे मिळत होते. १९७० ते १९७५ पर्यंत प्राण भूमिकेच्या हिशोबाने पाच ते वीस लाखपर्यंत मेहनताना घ्यायचे. राजकपूर 'बॉबी' चित्रपटासाठी प्राण यांना 'कास्ट' करत होते, पण त्यावेळी राजकपूर यांची परिस्थिती तेवढे पैसे देण्याची नव्हती. शेवटी प्राण यांनी केवळ एक रुपयावर 'बॉबी' चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली. १९९० मध्ये वाढत्या वयाच्या समस्यांमुळे प्रान यांनी चित्रपट स्वीकारणे बंद केले. अमिताभ बच्चन यांचे करिअर डळमळीत झाले होते, तेव्हा प्राण यांनी अमिताभच्या विनंतीनुसार मृत्यूदाता आणि तेरे मेरे सपने मध्ये काम केले, ही त्यांची महानताच म्हणावी लागेल.     

Tuesday, April 9, 2013

विकासाच्या पोकळ बाता

     अलिकडेच सीबीआयच्या एका बैठकीत मनमोहनसिंह म्हणाले होते की, भारतीय अर्थव्यवस्थेला जर पूर्ण क्षमतेने काम करायचे असेल तर भ्रष्टाचार आणि नोकरशाहीची निष्क्रियता यासारखे घरचे अडथळे दूर करायला हवेत. पण प्रश्न असा आहे की, मनमोहनसिंह स्वतः पंतप्रधान आहेत आणि असे असताना ते या गोष्टी सांहताहेत कुणाला? युपीए सरकारचा कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांना काही करता येत नाही कात्यांनी यासंबंधी काही तरी करून दाखवावे, अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. सध्या जी भारतासमोर, अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेतती पार करण्यासाथी आपण कोणकोणत्या योजना राबवल्या, त्यांची अंमलबजावणी कशाप्रकारे केली, हे सगळे सांगण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेतून जात आहे, हे आता आकडे पुढे करून सांगण्याची आवश्यकता नाही. कारण महागाईने अगोदरच सामान्य माणसांचे जिणे मुश्किल करून ठेवले आहे. त्याच्यानेच देशात काही बरं चाललं नाही, याचा अंदाज यायला वेळ लागत नाही.
     औद्योगिक क्षेत्रात मंदी आली आहे. त्यामुळे रोजगाराचा धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेत सरकारी सुधारणांचा दावा केला जात असला तरी सुधारणांचे कसलेच संकेत मिळत नाहीत. आठ पायाभूत उद्योगांच्या उत्पादनांमध्ये वेगाने होत असलेली घसरण भविष्यात औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल, असे म्हणण्यासारखे चित्र आपल्यासमोर दिसत नाही. या क्षेत्रात तातडीने सुधारणा झाल्या नाहीत तर उद्योगांमध्ये कपातीचे धोरण स्वीकारले जाईल, आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकेल. सध्या या घसरणीमुळे सरकारबरोबरच औद्योगिक क्षेत्रदेखील मोठ्या चिंतेत आहे. ही घसरण देशाच्या भविष्य, रोजगार निर्मिती आणि सामाजिक स्थिरतेसाठी घातक ठरू शकते. सध्याची ही अवस्था पाहता युपीए सरकारातील नेत्यांच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करते.
     नऊ वर्षांपासून देशाचे सरकार चालवणारे पंतप्रधान मनमोहनसिंह आणि कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी देशाच्या वर्तमान समस्यांवर तोडगा कसा काढला जाणार आहे, हे अजूनही सांगू शकलेले नाहीत. देश आणि उद्योग क्षेत्रातील निराशा , त्याचबरोबर हतबलता हा जो मोहोल देशात निर्माण झाला आहे, तो दूर सारण्यासाठी त्यांनी कुठली पावले उचलली आहेत किंवा पुढे काय करणार आहे, हे काहीच त्यांनी सांगितलेले नाही. शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजिवनी देऊ, असा विश्वासदेखील ते देऊ शकलेले नाहीत.गेल्या महिन्यात कित्येक रेटिंग एजन्सींनी आणि आर्थिक संस्थांनी लागोपाठ अशा भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबत बर्‍याच विपरित टिपण्या केल्या आहेत.
     मूडीजने देशाचा संभाव्य विकास दर कमी केला आहे. इतकेच नव्हे तर याला त्यांनी थेट युपीए सरकारची नीती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. स्टँडर्ड अँड पुअर्स या आणखी एका रेटिंग एजन्सीने अगोदरच भारताचे रेटिंग खाली आणले आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ५.३ वर आला आहे. जो गेल्या नऊ वर्षातला सर्वात निच्चांकी आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०११-१२ मध्ये देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दरदेखील ६.५ टक्के होता. हा त्याच्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या विकास दरापेक्षा (८.४ टक्के) फारच कमी होता. देशाचा निर्यात व्यापारदेखील अडचणीत आहे. निर्यात घटल्याने निर्यातसंबंधी कर्मचार्‍यांच्या कपातीच्या बातम्याही आता येऊ लागल्या आहेत. मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातल्या स्थितीमध्ये सुधारणा होऊ न शकल्याने त्यातल्या रोजगाराच्या संधीही कमी होऊ शकतात.सीआयआयनुसार आता सगळं काही अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हातात आहे, ते राजकोषीय संतुलन स्थापित करण्यासाठी कोणती पावले उचलतात आणि दिलेल्या वचनानुसार अंमल करतात का, हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उद्योगजगतासाठी व्याज दराचे समाधान देण्याची घोषणा व्हावी, असम या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेशी बोलणी करून रेपो दरात घट करण्याची आवश्यकता आहे. यामुळे घरगुती मागणीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. फिक्कीचे अध्यक्ष आर. व्ही. कनोरिया यांच्या मतानुसार औद्योगिक उत्पादनाचे ताजे आकडे पाहता या क्षेत्रातली मंदी आगामी काळातदेखील लवकर दूर होऊ शकेल असे वाटत नाही. हे मोठे चिंतेचे कारण आहे. आपली देशांतर्गत मागणी सतत घटत चालली आहे. अशावेळी ठोस निर्णयच अर्थव्यवस्थेला उभारी देऊ शकतो. सध्या युपीए सरकारवर अनेक संकटाचे ढग जमा झालेले आहेत. अगोदरच भ्रष्टाचार-घोटाळ्यात सरकार शेंबाडतल्या माशीसारखे गुरफटले आहे. त्यातच २०१४ च्या लोकसभा निवडणुका समोर आहेत. पुन्हा सत्ता काबिज करण्यासाठी काही लोकार्षित योजना सरकार लागू करू इच्छित आहे. मात्र या योजना देशाच्या अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने घातकच ठरणार आहेत.
     आर्थिक पातळीवरच्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत, याला केंद्र सरकारातल्या विभिन्न मंत्रालयातल्या समन्वयाचा अभावदेखील कारणीभूत आहे. त्यांच्यात अजिबात ताळमेळ नाही. त्यांच्यामुळे जवळ जवळ दोनशेहून अधिक योजना लोंबकळत पडल्या असल्याचे सांगण्यात येते. आर्थिक पातळीवर कोठेच काही सरळ्याने चालत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे उद्योग क्षेत्रात कमालीची निराशा  पसरली आहे. सरकारने तातडीने काही सुधारणावादी पावले उचलली नाहीत तर या क्षेत्रातली गुंतवणूकदेखील स्तब्ध होईल. आणि त्याच बरोबर चालू वर्षातला आर्थिक विकास दर गेल्या वर्षापेक्षाही अधिक खराब असू शकेल.
     मूडीजचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ ग्लेन लेविन यांच्या म्हणण्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकार या दोहोंकडून अर्थव्यवस्थेच्या हिताच्यादृष्टीने योग्य पावले उचलली जात नाहीहेत. ग्लोबल आर्थिक संकटाने तर अगोदरच देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आपल्या जाळ्यात अडकून टाकले आहे. खाद्य वस्तूंच्या महागाईला आटोक्यात आणण्यावरचे उपायदेखील होत नाहीत.साखर आणि खाद्य तेलाच्या किंमती सरकारच्या नियंत्रणातून सुटल्या आहेत. आयात शुल्क अधिक असल्याने तेलाच्या किंअतीदेखील अधिक आहेत. त्यातच अमेरिकासह अन्य देशात पडलेला दुष्काळ आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे. साखर साठमारीच्या तावडीत सापडली आहे. त्यामुळेच सरकारच्या उपायांची मात्रा चालेनाशी झाली आहे. साखरेच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. महागाईच्या काळात किंमती कमी करण्यावरच्या उपायांवर भर देण्यापेक्षा सरकार खाद्यान्न उत्पादनाला प्रोत्साहन न देताच खाद्यान्न सुरक्षा विधेयक आणून संकट आणखी गडद करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या दिशाहिनतेमुळे परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. आपल्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याचा परिणाम म्हणजेच सामान्य लोकांना जीवन जगणं अवघड होऊन बसले आहे. 
     विकास दराची घसरगुंडी चालू असतानाच रोजगाराच्या पातळीवर तर अगोदरच संकटाचे ढग गडद होत चालले आहेत. युपीए सरकार विकास दर पुन्हा मार्गावर आणण्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात या दाव्यानुसार काही होताना दिसत नाही. त्यातच लोकसभेच्या निवडणुका कधी जाहीर होतील, सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. युपीए सरकारातील घटक पक्ष किंवा बाहेरून पाठिंबा दिलेल्या पक्षांमधील काँगेसचे संबंध बिघड्त चालले आहेत. ताणले जात आहेत. त्यामुळे सरकार याकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही. केंद्र सरकार अर्थात काँगेस या न त्या प्रकारचे २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नांना लागली आहे. त्यामुळे आगामी काळात काही लोकार्षित नीती किंवा योजना लोकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येण्याची शक्यता धुसरच आहे. याचे प्रतिकूल परिणाम या देशातल्या जनतेला आणि येणार्‍या नव्या सरकारला भोगावे लागणार आहेत.                                      

Friday, April 5, 2013

अदलाबदल

 
     एका छोट्याशा गावात चाओ येन नावाचा एक लहान मुलगा राहात होता. बालपणापासूनच तो मोठा समजूतदार आणि गावातल्या सगळ्यांचा आवडता होता. तो ज्या गावात राहत होता, त्या गावाच्या दक्षिणेला असलेल्या उंच पहाडावरील मंदिरात एक पवित्र ग्रंथ ठेवण्यात आला होता, ज्यात लोकांचं भविष्य?लिहिलेलं होतं. देवळात येणा-याला पुजारी ते वाचून दाखवत असे. जेव्हा चाओ येन अठरा वर्षाचा झाला, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला मंदिरात नेलं. वडिलांनी पुजा-याला चाओचे भविष्य वाचून दाखवण्याविषयी विनंती केली. पुजा-याने पहिल्यांदा त्याला त्याच्या शिक्षणाविषयी सांगितलं, नंतर कामाविषयी सांगितलं, पण पुढे तो अचानक बोलायचा थांबला. चाओच्या वडिलांचं काळीज इवलसं झालं. त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं, ‘‘काय झालं, असं अचानक का थांबलात?’’
पुजारी दु:खी स्वरात म्हणाला, ‘‘सांगताना मला फार दु:ख होतंय, पण..’’
‘‘काय झालं, महाराज?’’ चाओच्या वडिलांनी काळजीच्या आर्त स्वरात विचारलं.
‘‘या ग्रंथानुसार तुमच्या मुलाचे आयुष्य अवघं एकोणीस वर्षाचं आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे.’’
चाओ आणि त्याच्या वडिलांचा त्यावर विश्वासच बसला नाही. वडील पुन: पुन्हा म्हणाले, ‘‘नीट पहा, नक्कीच कुठे तरी चूक झाली असेल.’’
‘‘नाही, कुठेच चूक नाही. यात तर अगदी स्पष्ट दिसतं आहे.’’ पुजारी म्हणाला आणि त्याने ग्रंथ बंद करून ठेवला.
     चिंतेत बुडालेले पिता-पुत्र घरी परत आले. त्यांनी मनाला समजावलं, जे काही घडायचं आहे, ते चुकणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना करू. स्वत:चं भविष्य ऐकल्यापासून चाओ उदास राहू लागला, त्याचं मन कशातच रमेना. एकच चिंता त्याला सतावू लागली, ती म्हणजे आपल्या पश्चात आई-वडिलांचं कसं होणार? याच काळजीत असताना एक दिवस चाओ धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाता घेऊन शिकारीला गेला. चालत चालतच तो उंच डोंगरावर पोहोचला. तो मनाने उदास झाला होता आणि चिंतेने त्याला घेरलं होतं. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ कोण करणार? या एकाच प्रश्नाने तो अस्वस्थ होता. तो डोंगरावर चढतच राहिला. चढता चढता तो एका उंच छोटय़ा गवताळ प्रदेशात पोहोचला. तिथे चहुबाजूंनी रंगीबेरंगी टवटवीत फुले उमलली होती. तिथे छान ऊन पडलं होतं. थकलेला चाओ तिथल्या एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप येऊ लागली आणि तो तिथेच झोपला. चाओचे डोळे उघडले, तेव्हा अंधार झाला होता. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता, त्याचबरोबर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाजही ऐकू येत होता. तो पटकन उठला आणि आवाजाच्या दिशेने पुढे सरकला. तिथे त्याला दोन माणसं समोरासमोर एका दगडावर बसलेली दिसली.
     त्यांच्यात कवड्यांच्या खेळासारखा काहीतरी खेळ सुरू होता. या खेळातच मधे मधे ते कुठले कुठले तरी अंक उच्चारायचे.
     चाओ झाडाआड उभा राहिला. तेव्हा दोघांमधला एकटा रुंद कपाळाचा आणि वयस्क माणूस त्याला दिसला, ज्याने हिरव्या रंगाचा गाऊन घातला होता. त्याची चप्पलसुद्धा हिरव्या रंगाची होती, तर त्याच्या समोर बसलेल्या माणसाचे कपडे आकाशी रंगाचे होते. त्यावरील चांदण्यांचे टिपके चकाकत होते. त्याचे केस कुरळे आणि खांद्यापर्यंत लोंबणारे होते. तो अंक उच्चारायचा, तेव्हा वृद्ध डोक्याला हात लावून विचार करत राहायचा. अंक वाढायचे, कमी व्हायचे, मग शेवटी दोघेही एका अंकावर येऊन थांबायचे.
आता चाओला राहवलं नाही. तो तडक त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. ते दोघेही अजूनही कुठल्या तरी अंकावर विचार करत होते. इतक्यात आकाशी निळ्या कपडय़ातल्या मनुष्य म्हणाला, ‘‘व्वा, काय नशीब मिळवलंय या माणसानं! फारच छान!’’ ?
इतक्यात त्या दोघांचे लक्ष चाओकडे गेले. ‘‘तू कोण आणि इथे कसा आलास?’’ निळ्या गाऊनवाल्याने विचारले.
चाओ म्हणाला,‘‘मी तर इथेच झोपलो होतो. मला आता जाग आली, तेव्हा तुम्हाला पाहिलं. कृपया, तुम्ही कोण आहात सांगाल का?‘‘
‘‘कोणी नाही, तू जा इथून..’’ ते म्हणाले.
‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही कोणी सामान्य नाहीत. पण कृपा करून मला सांगा की तुम्ही कोण आहात?’’चाओ आदराने पुढे झुकत म्हणाला.
निळा गाऊनवाला म्हणाला,‘‘आकाशात ती ता-यांची झुंड दिसते का, ज्यांचा आकार अस्वलासारखा आहे?’’
‘‘हो, आजीने दाखवली होती. आजसुद्धा मी ओळखतो.’’ चाओ अगदी उत्साहित होऊन म्हणाला.
‘‘मी त्या ताऱ्यांचा राजा आहे, आणि हे दीर्घायुष्य देणारे देव, समजलं? आता जा घरी.’’
चाओ पटकन खाली बसला आणि त्याने दीर्घायुष्य देणा-या देवाचे पाय धरले, ‘‘मला तुम्हीच हवे होतात, आता तुम्हीच फक्त माझी मदत करू शकता.’’
’’ मदत? कसली मदत?’’ वृद्ध म्हणाला.
भाग्यग्रंथात माझे आयुष्य फक्त एकोणीस वर्षाचे आहे आणि मला एकोणीस वर्षे पूर्ण व्हायला केवळ काही दिवसच बाकी आहेत. मला मरणाची भीती नाही, पण माझ्या पश्चात माझ्या आईवडिलांचे कसे होणार, याचीच मला चिंता सतावत आहे. माझ्या हातून माझ्या वृद्ध आई-वडिलांची सेवा घडू द्या. कृपाकरून मला मदत करा.’’ चाओने अत्यंत कळवळून विनंती केली.
     निळा रंगाचा अंगरखा परिधान केलेल्या देवतेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,‘‘ हे बघ, नशीब एकदाच लिहिलं जातं. ते पुन्हा बदलता येत नाही. ग्रंथात लिहिलेलं काही पुसता येत नाही. आता जे काही आयुष्य उरलं आहे, ते तू आई-वडिलांच्या सेवेसाठी घालव. जा, घरी जा उशीर करू नकोस.’’
पण चाओ तेथून हलला नाही, तो वृद्ध व्यक्तीचे पाय धरून रडत राहिला.
दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. त्यांनाही काय करावं सुचत नव्हतं? काही वेळ विचार केल्यावर हिरव्या गाऊनमधला वृद्ध म्हणाला,‘‘आम्ही भाग्यग्रंथात लिहिलेले बदलू शकत नाही, पण अदलाबदली करू शकतो’’असे म्हणून वृद्ध देवता हसली. त्याचबरोबर निळ्या रंगाचा गाऊनवालादेखील हसला.
त्याच्या बोलण्याचा अर्थ न उमजल्याने चाओने आपली मान वर केली. पण तिथे कोणीच नव्हतं. त्याला रडू कोसळलं. आपल्या मदतीला आता कोणीच येणार नाही, याची त्याला खात्री झाली. आपला भाता आणि धनुष्य खांद्यावर घेऊन तो मोठय़ा जड अंत:करणाने डोंगर उतरू लागला.
      चाओने या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं नाही. आता तो दर आठवडय़ाला डोंगरावर जायचा आणि त्या दगडावर मेणबत्ती लावायचा. त्याचा हा नियम तो एक्याण्णव वर्षाचा होईपर्यंत चालत राहिला. शेवटी ती देवता कोणत्या अदलाबदलीविषयी बोलत होती, हे त्याच्या लक्षात आलं. दीर्घायुष्य देणा-या देवाने एकोणीस मधला सुरुवातीचा एक अंक काढून नऊच्या पुढे ठेवला होता. आजदेखील चीनच्या दक्षिण पर्वतावर एक मंदिर आहे, तिथे लोक आपल्याला दीर्घायुष्य लाभावं, यासाठी प्रार्थना करायला नियमित जातात. (चिनी लोककथा)

Monday, April 1, 2013

बालकथा गाढवाचा गाढवपणा

     एक धोब्याचं गाढव होतं. तो दिवसभर कपड्यांची गाठोडी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाहायचा. त्याचा मालक मोठा निर्दयी आणि कंजोष होता. गाढवाच्या पोटाची व्यवस्था न करताच त्याच्याकडून राबवून घ्यायचा. फक्त रात्री त्याला मोकळा सोडायचा. जवळपास चरून पोट भरावं असं काही नव्हतं. साहजिकच गाढव शारीरिकदृष्ट्या अतिशय दुर्बल बनले होते.
     एके रात्री भटकत असताना त्याची एका जंगली डुकराशी गाठ पडली. गाढवाचे कृश शरीर पाहून गिधाड म्हणाले," दोस्ता! काय तुझी ही अवस्था, काही खातो-पितोस की नाही? बघ बरं किती कमजोर दिसतो आहेस!"
मग गाढवाने आपले रडगाणे गायला सुरुवात केली. मालक किती निर्दयी आणि कंजूष आहे, याचा पाढाच वाचायला त्याने सुरुवात केली.
     डुक्कर म्हणाले," आता कसलीच काळजी करू नकोस. तुझे दिवस पालटले असे समज. अरे, इथे जवळच भाजीपाल्यांचा मोठा मळा आहे. तिथे काकडी, भोपळा, गाजर, मुळा, वांगी अशी किती तरी प्रकारची फळभाजी, भाजीपाला बहरला आहे. मी एका ठिकाणाहून आत जाण्याचा एक गुप्त मार्ग बनवला आहे. बस्स, रोज रात्री त्या मार्गाने आत घुसतो आणि मनसोक्त फळभाज्या- भाज्यांवर ताव मारतो. बघितलंस माझी तब्येत कशी गुटगुटीत झाली आहे! आता तूही येत जा माझ्याबरोबर..."
     लाळ गाळत गाढव त्याच्यासोबत निघाले. मळ्यात घुसला.  हिरवागार भाजीपाला, फळभाज्या पाहून तो अक्षरशः त्यावर तुटून पडला. खातच राहिला खातच राहिला. काय करणार बिच्चारा! त्याला कित्येक दिवसांतून असा खाना मिळत होता. त्यांनी भरपेट खावून ढेकर दिली. रात्र त्यांनी तिथेच काढली. पहाटे पहाटे ते बाहेर आले. जंगली डुक्कर जंगलाच्या दिशेने निघाला तर गाढव गाढव मालकाच्या घराच्या दिशेने ...!
     आता रोज रात्री ते दोघे एके ठिकाणी एकत्र येऊ लागले. रात्रभर भाजीपाला, फळभाज्यांवर ताव मारू लागले. थोड्याच दिवसांत गाढवाची तब्येत सुधारली. त्याच्या कातडीला एकप्रकारची सुखासिन चमक येऊ लागली. आता तो त्याच्या उपासमारीचे दिवस पार विसरून गेला.
     एके रात्री भरपेट खाल्ल्यावर गाढवाला गाण्याची हुक्की आली. स्वतः च्या आयुष्यावर तो जाम खूष होता. मग त्याने आपले कान सरळ केले. पाय झाडले. आणि वर तोंड करून गाण्याची पोझ घेतली, तोच डुक्कर काळजीच्या  स्वरात पण बारीक आवाजात म्हणाला," काय झाले रे बाबा, तुझी तब्येत तर बरी आहे ना?"
     गाढव डोळे बंद करून मस्त मजेत म्हणाला," मला गावंसं वाटतं... चांगले भोजन झाल्यावर गायलं पाहिजे. गर्दभ राग गाण्याचा विचार करतोय."
     गाढवाने लागलीच विनवणी स्वरात इशारा दिला," नको, नको, असं काही करू नकोस. गाण्याच्या भानगडीत पडलास तर माणसे आपल्याला चोर समजून बदसून काढतील." मग गाढवाने हळूच पापणी वर करून तिरक्या नजरेने डुकराकडे पाहिले आणि म्हटले," डुक्करदादा, तू जंगली म्हणजे जंगलीच आहेस. संगीतातलं तुला काहीच कळत नाही."
     डुक्कर हात जोडून म्हणाले," संगीतातलं मला काही कळो अथवा नको, पण मला माझा जीव प्यारा आहे. तू आपला बेसूर राग आळवण्याची जिद्द तेवढी सोडून दे. यातच आपलं भलं आहे."
     गाढवाला डुकराचं बोलणं जिवाशी लागलं. त्याने आपली शेपटी हवेत फिरवली आणि तक्रारीच्या स्वरात म्हणाला," तू माझ्या रागाला बेसूर म्हणून हिणवतोस? हा माझा अपमान आहे. अरे! आम्ही गाढव लोक शुद्ध शास्त्रीय लयीत रेकत असतो. तुझ्यासारख्या मूर्खांना कसं कळणार ते?"
     जंगली डुक्कर म्हणाले," गर्दभभाऊ, मी मूर्ख आणि जंगली असलो तरी मित्रत्वाच्या नात्याने माझे ऐक, तू तुझं तोंड तेवढ बंद कर. नाही तर माळी जागा होईल."
     गाढव हसले," अरे मूर्खा! माझा राग ऐकून माळीच काय, या मळ्याचा मालकदेखील फुलांचा हार घेऊन माझ्या स्वागताला ये ईल."
     डुकराने ओळखले, याला अधिक काही सांगण्यात अर्थ नाही. आपण आता इथून सटकले पाहिजे. तो गाढवाला हात जोडून म्हणाला," गर्दभभाऊ, मला माझी चूक कळली. तू फार मोठा गायक आहेस. मी मूर्ख गिधाड तुझ्या गळ्यात फुलांचा हार घालून सत्कार करू इच्छितो. मी ते पटकन जाऊन आणतो. मी इथून गेलो की दहा मिनिटांनी गायला सुरुवात कर. म्हणजे मी परत ये ईपर्यंत तुझे चालू राहिल."
     गाढवाने अभिमानाने त्याला संमती दिली. डुकराने तिथून थेट जंगलाच्या दिशेने पळ काढला.गाढवाने तो गेल्यावर काही वेळाने गायला सुरुवात केली. त्याच्या रेकण्याच्या आवाजाने माळी जागा झाला. तो हातात काठी घेऊन आवाजाच्या दिशेने धावू लागला. ठिकाणावर पोहताच त्याने गाढवाला पाहिले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडला," गाढवा, तूच का तो, रोज मळ्याची नासाडी करतो ते!"
     मग काय! माळ्याने आपल्या हातातल्या काठीने गाढवाला बदड बदड बदडायला सुरुवात केली. काही वेळातच गाढव अर्धमेले हो ऊन निपचिप पडले.