Saturday, April 13, 2013

कसदार अभिनयाचा प्राण

  
   शेवटी एकदाचा अभिजात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.  त्यांच्या चाहत्यांना कधीची या बातमीची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी प्राण यांच्या आजारपणाची बातमी आल्याने काहीशा व्यथित झालेल्या चाहत्यांना ही बातमी सुखावून गेली. हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल सात दशकाहूनही अधिक काळ खलनायकांचा बेताज बादशहा बनून राहिलेल्या प्राण यांच्या अभिनयाच्या उंचीपर्यंत आजदेखील कोणी पोहचला नाही. त्यांची खलनायकी नि:संशय  एकमेवाद्वितीय होती. प्राण यांच्यानंतर या चित्रपटसृष्टीत अनेक जाने-माने खलनायक हो ऊन गेले आणि आजही आहेत, पण प्राण यांच्या मुकाबल्यापर्यंत कोणी पोहचू शकला नाही. त्यांची उंची अबादित राहिली.

     प्राण १९३९ मध्ये पंजाबी भाषेत प्रदर्शित झालेल्या 'यमला जट' चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करते झाले. खरे तर प्राण यांना फोटोग्राफर बनायचं होतं, पण नशिबाने त्यांना अभिनेता बनवलं. 'यमला जट' मध्ये नूरजहाँदेखील भूमिका होती. ती त्यावेळी  अवघी दहा वर्षांची होती. नंतर १९४२ मध्ये प्राण यांचा पहिला हिंदी 'खानदान' चित्रपट आला, त्यात नूरजहाँ त्यांची नायिका बनली होती. नूरजहाँ त्यावेळीही काही मोठी प्रौढ नव्हती. ती केवळ बारा-तेरा वर्षांची असावी. क्लोज-अप दृश्यांमध्ये तिला दगड किंवा वीट यांवर उभारावं लागायचं. प्राण यांनी नायक म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यांना त्यात काही मजा आली नाही. नायिकेबरोबर गाणं गाताना त्यांना वेगळचं फिलिंग व्हायचं. पावसात गायचं, बर्फावर नाचायचं किंवा झाडांभोवती फिरायचं, असल्या गोष्टी त्यांना जमायच्या नाहीत. फाळणीनंतर ते आपल्या कुटुंबासह मुंबईला आले. त्यांना वाटलं होतं, इथं  त्यांच स्वागत होईल. पण तब्बल नऊ महिन्यांहून अधिक काळ  त्यांना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या संघर्षमय काळातदेखील त्यांची ऐट मोठी होती. ते  आपल्या कुटुंबासह अलिशान हॉटेलमध्ये राहत. जसजशी त्यांच्याजवळची पुंजी संपत आली, तसेतसे त्यांना स्वस्तातल्या हॉटेलमध्ये राहणं भाग पडलं. शेवटी त्यांना प्रसिद्ध लेखक साअदत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्या सहाय्याने 'जिद्दी' या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली. या चित्रपटाचा नायक होता, देव आनंद आणि त्याची नायिका होती कामिनी कौशल. 'जिद्दी' हिट झाला आणि प्राण यांना आणखी तीन चित्रपट मिळाले. त्यांची नावे होती. गृहस्थी, अपराधी आणि पुतली. मुंबईत आल्यावर प्राण यांचा सगळ्यात हिट चित्रपट राहिला तो बी आर चोप्रा यांचा 'अफसाना'. मग मात्र प्राण यांनी  मागे वळून कधी पाहिलेच नाही. यानंतर जो चित्रपटांचा  सिलसिला सुरू झाला तो एकेक हिट चित्रपटांचे झेंडे गाढूनच. दरम्यान प्राण अभिनयाच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले.
     'जिद्दी' नंतर 'बडी बहन', शीशमहल, अफसाना, आह, आंसू, अंगारे, मीनार, पहली झलक, बिरादरी, देवदास, कुंदन, मुनीमजी, मिस इंडिया, मि. एक्स, अदालत, चोरी चोरी, नया अंदाज, मधुमती, जालसाज, बेवकूफ, छ्लिया, जिस देश में गंगा बहती है, गुमनाम, शहीद, दिल दिया दर्द लिया, दस लाख, फिर वो ही दिल लाया हूं, सावन कि घटा, काश्मिर की कली, जब प्यार किसी से होता है, मिलन, राम और श्याम, उपकार, आदमी, हीर रांझा, जॉनी मेरा नाम, पूरब और पश्चिम, परिचय, विक्टोरिया नं. २०३, बॉबी, जंजीर, कसौटी, अमर अकबर अंथनी, अंधा कानून, नौकर बीवी का, नास्तिक, जागीर, शराबी, कर्मयुद्ध, सुहागन, आणि दान सारख्या कित्येक चित्रपटांमध्ये प्राण यांनी भूमिका केल्या आणि भूमिका अजरामर केल्या. जवळपास साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. यातल्या जवळ पास तीनशे चित्रपटांच्या कास्टिंग दरम्यान सगळ्यात शेवटी नाव यायचं 'अँड प्राण'.  हे नाव  त्यांचे महत्त्वच अधोरेखित करायचे. याने प्रेरित होऊनच त्यांची ओळख 'अँड प्राण' अशी ठेवली गेली.
     खासगी जीवनात अत्यंत सालस आणि सतत दुसर्‍याच्या मदतीसाठी तत्पर असणार्‍या प्राण यांचे पूर्ण नाव प्राण किशन सिकंद असे आहे. ते चित्रपटात जसे सतत सिगरेट ओढताना आणि धुर सोडताना दिसत,  तसे वास्तविक जीवनात देखील ते धुम्रपानाचे शौकीन राहिले आहेत. सिगरेट्च्या धुरांचे वेटोळे ही त्यांची ओळख बनली होती. त्यांच्या संवादातला 'बरखुरदार' हा शब्ददेखील मोठा लोकप्रिय झाला. त्यांनी वाईट माणसाला दरवेळेला नवनव्या अंदाजात पडद्यावर सादर केले. मॅनरिज्मबरोबरच ते प्राण आपल्या वेशभुषेकडेदेखील फार गांभिर्याने लक्ष द्यायचे. प्राण यांनी आपले डोळे, आपला आवाज आणि आपला मॅनरिज्म यांच्या जोरावरच खलनायकी साकारली. या कामाबाबत ते वाकबदार होते. ते कधी 'चिप' झाले नाहीत किंवा कधी त्यांनी विनाकारण आरडाओरडा केला नाही. एकदा प्राण आणि जॉय मुखर्जी 'फिर वही दिल लाया हूं' चित्रपटाचे शुटींग करत होते. शुटिंग पाहायला आलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात नासिर हुसेन यांना कठीण जात होते. तेव्हा त्यांनी प्राण यांची मदत घेतली. तेव्हा प्राण यांनी शांत राहायला सांगण्यासाठी व्हिलनच्या अंदाजातच गर्दीला सामोरे गेले आणि अक्षरशः गर्दी नियंत्रणात आली.   घाबरून गर्दी शांत झाली.
     एकेकाळचे प्रसिद्ध त्रिकुट म्हणजे देव-राज-दिलीप यांचा हमखास आवडीचा खलनायक प्राणच असायचे. या तिघांना अगोदरच फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या तिघांना प्राणसारख्या मुरलेल्या अभिनेत्यासोबत दोन हात करण्यात मजा यायची. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या त्रिकुटबरोबरच राजेंद्रकुमार यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नायकाला प्राणपेक्षा अधिक मेहनताना मिळत नव्हता.
     'जंजीर' चित्रपटात अमिताभला घेण्याची शिफारस स्वत; प्राण यांनी केली होती. अमिताभसोबत प्राण यांनी तब्बल १४ चित्रपट केले आहेत. यातल्या पहिल्या सहा चित्रपटात प्राण यांनी अमिताभपेक्षा अधिक पैसे घेतले होते. १९७० मध्ये प्राण यांना अमिताभपेक्षा अधिक पैसे मिळत होते. १९७० ते १९७५ पर्यंत प्राण भूमिकेच्या हिशोबाने पाच ते वीस लाखपर्यंत मेहनताना घ्यायचे. राजकपूर 'बॉबी' चित्रपटासाठी प्राण यांना 'कास्ट' करत होते, पण त्यावेळी राजकपूर यांची परिस्थिती तेवढे पैसे देण्याची नव्हती. शेवटी प्राण यांनी केवळ एक रुपयावर 'बॉबी' चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली. १९९० मध्ये वाढत्या वयाच्या समस्यांमुळे प्रान यांनी चित्रपट स्वीकारणे बंद केले. अमिताभ बच्चन यांचे करिअर डळमळीत झाले होते, तेव्हा प्राण यांनी अमिताभच्या विनंतीनुसार मृत्यूदाता आणि तेरे मेरे सपने मध्ये काम केले, ही त्यांची महानताच म्हणावी लागेल.     

2 comments:

  1. जन्म: 12 फ़रवरी 1920; मृत्यु: 12 जुलाई 2013

    ReplyDelete