चिन्नी फार गोड मुलगी होती. तिला कोणी बाहुली म्हणायचं, तर कोणी परी म्हणायचं. घरातले सगळेच तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. अशा चिन्नीकडे खेळणीही सुंदर सुंदर होती. डोळे मिचकावणारी बाहुली, डमरू वाजवणारे अस्वल, झुक-झुक करत शिट्टी वाजवणारी आगगाडी अशी भरपूर खेळणी तिच्याकडे होती. तिला ती सगळी खेळणी आवडायची. पण फक्त टाळ वाजवणारं माकड मात्र आवडत नसे.
टाळ वाजवणा-या त्या माकडाला पाहिलं की, तिचा संताप व्हायचा. ते माकड चावीवर चालायचं, पण त्याच्यात एक खोड होती. चिन्नी त्याला चावी द्यायची, तेव्हा ते टाळ वाजवायचं नाही. गप्प राहायचं. पण चिन्नी कसल्या तरी कामात असली किंवा झोपलेली असेल तर मात्र ते हमखास टाळ वाजवायला सुरुवात करायचं. त्यामुळे तिला माकडाचा मोठा राग यायचा. तिला वाटायचं, फेकून द्यावं कोठे तरी याला! पण ती फेकूनही देऊ शकत नव्हती. कारण ते तिला तिच्या आजीने मोठया प्रेमाने वाढदिवसाला दिलं होतं.
एक दिवस चिन्नी खेळण्यांशी खेळत बसली होती. तिने विचार केला, चला, माकडाला पुन्हा एकदा चावी देऊन पाहू. नाही तरी त्याचा त्रासच आहे नुसता! आता शेवटचा प्रयत्न करून पाहू. नाही तर अडगळीच्या खोलीत फेकून देऊ. असा विचार करून तिने माकडाला हातात घेतलं. त्याला चावी दिली आणि त्याला खाली सोडलं. पण कसलं काय! माकड मख्ख उभं. त्याने टाळ वाजवलंच नाही.
चिन्नी रागारागाने उठली आणि माकडाला उचललं. तरातरा जात त्याला अडगळीच्या खोलीत फेकून आली. सगळ्या खेळण्यांना माकडाविषयी चीड होतीच. ते माकड कधीही उठायचं आणि टाळ वाजवून सगळ्यांनाच त्रास द्यायचं. त्यामुळे बाकी खेळणीही त्याला वैतागलेली होती. त्याला चिन्नीने अडगळीच्या खोलीत फेकून दिल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. डोळे मिचकावणा-या बाहुलीने त्याच आनंदात अनेकदा डोळे मिचकावले. अस्वल डमरू वाजवत नाचू लागलं. झुक-झुक आगगाडीने शिट्टी वाजवली.
रात्री खाणं-पिणं झाल्यावर चिन्नी सगळ्या खेळण्यांना पुढय़ात घेऊन झोपी गेली. पण अडगळीच्या खोलीत पडलेल्या माकडाची झोप उडाली होती. आपण योग्य वेळेला टाळ वाजवू शकत नाही, म्हणून ते स्वत:ला दूषणं देत होतं. दु:खात ते उशिरापर्यंत जोरजोराने रडत राहिलं. पण त्याचं ते रडणं ऐकायला, तिथं कोणी नव्हतंच!
दु:ख आवरून माकड शांत झालं, तोच त्याच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्याने थोडं वाकून पाहिलं तर त्याला घरात दोन चोर घुसले असल्याचं दिसलं. घरातले सगळेच झोपलेले होते.
दु:ख आवरून माकड शांत झालं, तोच त्याच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्याने थोडं वाकून पाहिलं तर त्याला घरात दोन चोर घुसले असल्याचं दिसलं. घरातले सगळेच झोपलेले होते.
माकडाला आता काय करावं काही सुचेना. घरातल्यांना जागं करावं आणि चोरांना पकडून द्यावं, असं त्याला फार वाटत होतं, परंतु ते काहीच करू शकत नव्हतं. ते चिन्नीच्या खोलीपर्यंत जाऊनही आलं, पण तिचा दरवाजा आतून बंद होता. तेवढय़ात त्याला एक आयडिया सुचली. त्याने स्वत:ला एखाद्या बाटलीला हलवावं, तसं हलवलं. पुढं-मागं झुकवलं. हात हलवण्याचाही प्रयत्न केला. तरीही हात काही हलले नाहीत. पण त्याने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न करण्याचं ठरवलं. आता नाही तर कधीच नाही. कारण आता या लोकांना मदत केली नाही तर आपल्या जीवनाला मग कसलाच अर्थ राहणार नाही.
आपण निरुपयोगी ठरू, असा विचार करून त्याने पुन्हा हात हलवून टाळ वाजवण्याचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य! टाळ वाजू लागले. एवढंच नव्हे तर टाळ वाजणं थांबतच नव्हतं. मग काय! घरातले सगळे लहानथोर माकडाच्या दंग्याने जागे झाले. त्याला गप्प करण्यासाठी सगळेच त्याच्या दिशेने धावले. पण ते माकड चोर जिथे होते, तिथे घरंगळत जाऊन पोहोचलं. झालं, चोर आयते तावडीत सापडले. घरातल्या सगळ्या सदस्यांनी त्या चोरांना चांगलंच बदडून काढलं.शेवटी पोलिस आले. चोरांना त्यांच्या ताब्यात दिलं. पोलिस गेल्यावर माकड चुपचाप अडगळीच्या खोलीकडे जाऊ लागलं. तेवढय़ात चिन्नीने त्याला हाक मारली, ‘अरे हे काय? तुझी जागा अडगळीच्या खोलीत नाही, तर माझ्याजवळ आहे. सॉरी, मला माफ कर’.
माकडाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते म्हणालं, ‘मी नेहमीच चुकीच्या वेळी टाळ वाजवून तुला त्रास देत असतो. त्यामुळे माझी जागा तिथेच योग्य आहे’. चिन्नी म्हणाली, ‘अरे, प्रत्येकात काही ना काही खोड असते. तशी माझ्यात देखील आहे. पण तू तर आज कमालच केलीस. यामुळे तू मला आवडू लागला आहेस. आता यापुढे एक क्षणही तुला दूर लोटणार नाही. नेहमी तुला माझ्याजवळ ठेवीन’. असं म्हणत चिन्नीने त्याला उचलून कडेवर घेतलं आणि आपल्या खोलीत आली. त्याला एका खास जागेत ठेवलं. त्याला पाहिल्यावर बाकी सगळ्या खेळण्यांचा जळफळाट झाला, पण चिन्नीने त्याचा पराक्रम सांगितला. तेव्हा सगळेच कौतुक करायला त्याच्याकडे सरकले.
No comments:
Post a Comment