Friday, September 13, 2019

किमती हास्य


हसायला पैसे पडत नाहीत, असं म्हटलं जातं. या छोट्याशा वा़क्याचे विश्लेषण केल्यास खरोखरच याचा विस्तृत आणि खोल दडलेला अर्थ निघून आपल्यासमोर येईल. माणसाचे शरीर संवेदनांनी भरलेले आहे. हास्यगाणे-रडगाणे, सुख-दु:,आनंदाचे आसू- दु:खाचे आसू या माणसाला आतर्बाह्य हेलावून सोडणार्या गोष्टी आपल्या जीवनातले विविध रंग आहेत. या पृथ्वीवर मनुष्य असा एकमेव प्राणी आहे, जो हसतो, रडतो, गातो आणि गुणगुणतो. प्राणी आणि पक्ष्यांमध्येदेखील हसण्या-रडण्याचे त्यांचे भाव असतील आणि त्यांची एक भाषाही असेल पण ज्या अर्थाने आणि भावनेमध्ये आपण मनुष्याला हसताना पाहतो, तसे हसताना कोणत्या पशू- पक्ष्यांना आपण पाहिले आहे काय? आपल्या चेहर्यावर ज्या भावमुद्रा उमटतात, तशा भावमुद्रा इतर प्राण्यांमध्ये-पक्ष्यांमध्ये पाहायला मिळत नाही. हेच आपल्या मनुष्य प्राण्याचे वैशिष्ट्य आहे.

आपण आपल्या चोहोबाजूला असलेल्या वातावरणात आपल्या हास्याने इतकी प्रसन्नता घोळू शकतो की, त्याच्या प्रभाव क्षेत्रात येणारा प्रत्येक व्यक्ती आनंदाने तरंगू शकेल.जर आपण हास्य आणि आनंद सोबत घेऊन एकमेकांना पूरक ठरल्यास मानव प्राण्यासारखा दुसरा सुखी प्राणी नाही. ही गोष्ट अतिशयोक्ती नाही. हास्य हा चेहर्याचा असा भाव आहे, जो कुठल्याही बाजारभावाशिवाय विकत घेतला जाऊ शकतो. हसण्यासाठी आपल्या एक पैसाही खर्च करावा लागत नाही.
खरे तर हास्य हीच आपली खरी धनदौलत आहे. ही दौलत मोठमोठ्या लोकांना मोठा प्रयत्न करूनही मिळत नाही. कसलीही चिंता नसलेला माणूस निवांत झोप घेऊ शकतो. आपल्याकडे गरीब माणूस सर्वात सुखी असतो, असे म्हणतात. आणि श्रीमंत माणूस सतत दु:खी असतो. सुखाच्या मागे लागलेला माणूस खरेच सुखी नसतो. सुख त्याच्याजवळच असते, पण त्याला ते समजत नाही. ज्याला समजलेले असते, त्याचा इतका सुखी प्राणी कोणी नाही. म्हणजे सुख मानण्यावर आहे. आज मनुष्य प्राणी भौतिक सुविधांच्या मागे लागला आहे. त्यामुळे माणूस राबराब राबतो आहे. उद्योगपती अंबानी यांचा आशियाना पाहिल्यावर आपल्याला घेरी यायला होतं. संपूर्ण दुनियेतल्या सगळ्या सोयी तिथे आहे, पण या सगळ्या सोयी ते उपभोगतात का? आपल्याकडेही चार-पाच खोल्यांचा प्लॅट, घर बांधले जाते, घरात सगळ्या सुखसोयी असतात. मात्र त्याचा उपभोग घ्यायला कोणीच नसतं. आईवडील पैसे मिळवण्यासाठी दिवसभर घराबाहेर असतात. संध्याकाळी दमूनभागून घरी येतात. काही तरी जंकफूड खावून झोपी जातात. शाळेला जाणारी मुलं क्लास, शाळा, ॅकॅडमी यात गुंतलेली असतात. बाकीचा वेळ मोबाईल, लॅपटॉपमध्ये गेम खेळण्यात घुसून बसतात.मग या भौतिक सुविधांचा काय उपयोग?
माणसं हसणं विसरली आहेत, म्हणून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हास्य क्लब उघडली जात आहेत. इथे माणसांना जबरदस्तीने हसायला भाग पाडलं जातं. म्हणजे आपण हसल्याशिवाय जीवन घालवू शकत नाही काय? असा प्रश्न आपल्या डोक्यात येतो. आपण कित्येक वर्षांपासून या प्रश्नाचे उत्तर शोधतो आहे की, आपल्याला हसण्याची आवश्यकता का आहे ?
आपल्या मनुष्यामध्ये खूप सार्या इच्छा- आकांक्षा असतात. जर आपल्या इच्छा यशामध्ये परावर्तीत होत नाहीत, तेव्हा आपल्या मनात निराशेच्या भावना उत्पन्न व्हायला लागतात. अपयशाच्या कारणामुळे निर्माण झालेली निराशा तणावांना आमंत्रण देते. तणावाचे अधिकतेचे प्रमाण आपला रक्तदाब वाढवते. आणि आपल्याला चिडका बनवते. यामुळेच आपण स्वत:ला इतरांमधून बाजूला काढतो. या जीवनापासून दूर जाण्याचा विचार करायला लागतो. याची परिणती कित्येकदा आत्महत्येच्या रुपाने बाहेर येते. तणावापासून सुटका करून घेण्यासाठी दारूचा आधार घेतला जातो. याची सवय आपला तणाव कमी तर करत नाहीच,पण उलट आपले चांगले आयुष्यदेखील बरबाद करून टाकते.
अर्थात तणाव कमी करण्याचा सहजसोपा उपाय आहे, हास्य. हसण्याने  आपल्या तोंडाचा जबडा ढिला होतो. त्याचबरोबर सगळ्या मांसपेशी ढिल्या होतात. त्यामुळे आपण तणावमुक्त जीवन जगत असल्याचा अनुभव घ्यायला लागतो. तणावामुळे चेहरा अकसला जातो, आणि तो कसातरी विचित्र दिसायला लागतो. हसरा चेहरा कधीही सुंदर दिसतो. आपण हसण्याचा मार्ग सोडून आपण निसर्गाने दिलेल्या सुंदर चेहर्यावर अन्याय करत असतो. हसण्याबाबतच्या दोन मौल्यवान गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात- हसण्यासाठी आपल्याला कसलीही किंमत मोजावी लागत नाही. दुसरे म्हणजे हास्य एक अशी गोष्ट आहे की, ते कोणत्याही आकाराच्या ओठांना सहज चिपकून बसते.
एकाद्या व्यक्तीचा चेहरा कितीही रागीट दिसत असला तरी त्याच्या चेहर्यावरचे हास्य लोकांना आकर्षित करायला भाग पाडते. हसण्याच्या आधारावरच क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल हसत हसत सहज फासावर चढला. महात्मा गांधीजींच्या हसण्याच्या अद्वितीय शक्तीने इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले. एकादा प्रेमवीर कितीही तणावात असला तरी त्याची प्रियेशी त्याच्याशी हसत हसत गप्पा मारत असेल तर त्याचा सगळा तणाव काही मिनिटात् पळून जातो. चीनमध्ये एक म्हण आहे, ज्याचा चेहरा हसरा नसेल त्याने कोणत्याही वस्तूच्या विक्रीचे दुकान काढू नये.
एक संशोधन सांगते की, ज्या दुकानदाराचा चेहरा हसतमुख नसेल, त्या दुकानाकडे जायला ग्राहक तयार होत नाहीत. एकादा डॉक्टर चेहर्यावर हास्य घेऊन रुग्णावर उपचार करत असेल तर त्या रुग्णाचा निम्मा आजार त्यामुळे कमी होतो. होमर नावाचा प्रसिद्ध युनानी कवीने लिहिले आहे की, हास्य प्रेमाची भाषा आहे. जे आपण देऊ, तेच आपण मिळवू. आपण प्रेमाची भाषा बोलू, आपण प्रेमाची भाषा ऐकू. जी व्यक्ती हसणे जाणते, ती जीवन जगण्याची कला जाणते. जर आपल्याला आनंद, स्वास्थ्य आणि तणावमुक्त जीवन पाहिजे असेल तर हसायला सुरू करा. एक हास्य आपल्या व्याधिंचा शेवट करून आपल्याला नेहमी आनंदी ठेवते. म्हणून दु:ख वास्तवात असले तरी हास्य आपला प्रत्येक क्षण सहज निभावून नेते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012    



No comments:

Post a Comment