Monday, February 15, 2021

शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात ग्रामीण भाग मागेच!


कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचा प्रसार वाढत असून त्याचा परिणाम म्हणून सरलेल्या वर्षामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान (एज्यु टेक) क्षेत्रामध्ये दशकातील सर्वाधिक गुंतवणूक भारतात झाली आहे. गतवर्षामध्ये या क्षेत्रात 2.1अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक झाली आहे. कोरोनाकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हिंडण्याफिरण्यावर  आलेले निर्बंध यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढले, इंटरनेटचा वापर वाढला, ई-लर्निंगचे प्रमाण वाढले. या पार्श्वभूमीवर नुकत्याच सरलेल्या (सन 2020) वर्षात शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तब्बल 2.1 अब्ज डॉलर एवढी प्रचंड गुंतवणूक झाली. गेल्या दशकभरात या क्षेत्रात केवळ 1.7 अब्ज डॉलर एवढीच गुंतवणूक झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेली ही वाढ निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल. सन 2025 पर्यंत या क्षेत्रामध्ये 12 अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र यात देशातला ग्रामीण भाग कुठे आहे हा प्रश्न आहे. कारण ग्रामीण अजून नीटपणे इंटरनेट पोहोचलं नाही, इतर सेवा साधनांचा तर पत्ताच नाही. केंद्राने याकडे अधिक लक्ष देऊन ग्रामीण भागात इंटरनेट आणि अन्य साधन सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. आगामी काळात हे क्षेत्र रोजगाराच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याने सरकारने याकडे अधिक लक्ष दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही 'स्मार्ट' होतील.

आगामी काळात शैक्षणिक तंत्रज्ञान अर्थात एज्यु-टेक क्षेत्र अधिक वाढीस लागणार असल्याचे लक्षात आल्याने कंपन्या शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात उतरत आहेत. मात्र याचा ग्रामीण क्षेत्राला लाभ होत नाही. पुन्हा यातही संगणक साक्षर आणि साधा साक्षर अशी तुलना वाढण्याची भीती आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुले मागे शिक्षणात मागे राहण्याची शक्यता आहे. या शैक्षणिक तंत्रज्ञानामुळे  गणिताच्या शिकवणीसाठी साध्या संगणकाच्या वापरापासून ते गृहपाठ ऑनलाइन सादर करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांचा समावेश होतो. ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉपचा आणि मोबादलचा वापर हे या क्षेत्रातील पुढचे पाऊल आहे.

भारतासंदर्भात आधीच अनेक  प्रश्न उपस्थित होत आहेत. साधन, संसाधन आणि व्यापकतेच्यादृष्टीने ऑनलाईन शिक्षणासाठी देश वास्तवात तयार आहे का  हे पाहणं गरजेचं आहे. या वास्तवापासून तोंड फिरवून चालणार नाही. कारण देशातील एक मोठी लोकसंख्या अजूनही इंटरनेट सेवेपासून दूर आहे. अशा लोकांच्या मुलांची एक मोठी संख्या आहे, ज्यांच्याजवळ ना टीव्ही आहे, ना स्मार्टफोन. बहुतांश क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान सुविधा नाही. देशात सध्याच्या घडीला 31 टक्के म्हणजे जवळपास 45 कोटी लोकांपर्यंत इंटरनेट पोहचले आहे. या संख्येत वाढ जरी झाली तरी 2021 पर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर कोटीच्या आसपास ही संख्या जाईल. परंतु, ही संख्यादेखील देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी आहे.वर्तमान काळात देशात स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास एकोणतीस कोटी आहे. जर यात वाढ होत राहिली तर 2021 पर्यंत सत्तेचाळीस कोटीच्या आसपास जाईल. एका अभ्यासानुसार विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त साडे बारा टक्के विद्यार्थ्याच्या घरात इंटरनेट सुविधा आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या एकूण ग्रामीण विद्यार्थ्यांपैकी केवळ अठ्ठावीस टक्के घरांमध्ये इंटरनेट आहे. देशाच्या विविध राज्यांमध्येही इंटरनेटची परिस्थिती पोषक नाही. पश्चिम बंगाल आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये तर सात ते आठ टक्के ग्रामीण घरांमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे. या सगळ्या परिस्थितीवरून देशात आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची अवस्था काय आहे, हे समजून घेता येते. 

मुळात आपल्या ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. इंटरनेट, संगणक,लॅपटॉप अथवा यासंबंधीत अनेक गोष्टी अजूनही बहुतांश शिक्षकांना हाताळता येत नाहीत. शाळांमध्ये तशा सोयी नाहीत. शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. शिक्षक ही यंत्रे, उपकरणे सराईतपणे हाताळू लागले तरच ते मुलांना व्यवस्थितरित्या शिकवू शकतील. काही शाळांमध्ये गणित पेट्या, विज्ञान पेट्या उपलब्ध आहेत,पण या वस्तू मुले हाताळून फुटतील आणि त्याचा भुर्दंड शिक्षकांना भरावा लागेल म्हणून शिक्षक या वस्तू पेटीच्या बाहेर काढत नाहीत. संगणक आणि लॅपटॉपबाबत असेच घडणार असेल तर मुले *स्मार्ट* कशी बनतील. आज देशात आधुनिक तंत्रज्ञानाची मोठी गरज आहे. याचे धडे आपल्याकडे प्राथमिक स्तरापासूनच द्यावे लागणार आहेत. आजही आपल्या देशात संवाद माध्यमे, काही महत्त्वाचे ऍप्स तयार होत नाहीत, कारण तितके तंत्रज्ञान, ज्ञान इथल्या युवकांना नाही. त्याप्रकारचे शिक्षण आपल्या देशात दिले जात नाही. सरकारने याबाबत काहीच व्यवस्था किंवा तशा संध्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. मग देशातील तरुण पुढे कसे जातील? भारतात अगोदरच शिक्षणाबाबतीत अनेक समस्या आणि उदासीनता आहेत. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचे ओझे आहे. अनेक कारणांनी वर्षभरातल्या संपूर्ण शैक्षणिक सत्रांमध्ये वर्गांचा अभ्यासक्रमदेखील शिक्षक पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे ते आधुनिक तंत्रज्ञान शिकतील कसे आणि मुलांना ते देतील कसे? विशेष म्हणजे  ही परिस्थिती शाळा-कॉलेज सर्वत्र एकसारखी आहे.

या सगळ्यामुळे देशात अजूनही ऑनलाईन शिक्षण प्रणाली व्यावहारिक नाही. ती साधन सुविधेच्या अभावामुळे! वास्तविक या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना आज ऑनलाईन शिक्षण गरजेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकप्रकारची स्पर्धाच लागली आहे. जर संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच ऑनलाईन झाली तर शिक्षण आणि विद्यार्थ्यांना कोणत्या दिशेला घेऊन जाईल, हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे. सध्या देशात आभासी अनुशिक्षण केंद्र बनवण्याच्या स्पर्धाच लागल्या आहेत. अल्पावधीतच असे शिक्षणाचे 'अड्डे' मोठ्या प्रमाणात बनले आहेत. अजूनही सुरूच आहेत. देशात असे वातावरण बनवण्यात आले आहे की, यापुढे शिक्षण विद्यालय आणि वर्गाबाहेर असणार असून ते अधिक प्रमाणात ऑनलाईन अनुशिक्षण संस्थांमध्ये आणि ऑनलाईन वर्गांमध्येच असणार आहे. त्यामुळे शाळांचे, शिक्षकांचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या तरी शिक्षण सामान्य पातळीवर आणणं खूप महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिक्षण व्यावहारिक बनवण्यासाठी अजून बराच पल्ला गाठावा लागणार आहे. सध्याच्या घडीला यथोचित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून हा आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाचा पर्याय होऊ शकत नाही.अशा वेळेला एक समन्वयकारी  आणि सर्वसमावेशक रचना स्थापित करण्याची आवश्यकता आहे, ज्यात आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण प्रणाली पारंपरिक शिक्षण पद्धतीला फक्त  आवश्यकता पूर्ण करण्यास सहाय्यभूत ठरेल. पारंपरिक शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाकडे पाहिले जाऊ नये. शिक्षण आणि यावर आधारित अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजेत, अशी शिक्षण व्यवस्था उभी राहिली पाहिजे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment