जपानमधल्या एका गावात मोसाकू नावाचा एक गरीब मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत एका लहानशा झोपडीत राहत होता. ते छान छान टोप्या बनवत. मोसाकू त्या टोप्या बाजारात नेऊन विकत असे.
दुसऱ्या दिवशी सण होता. त्या दोघांनी रंगीत, आकर्षक टोप्या बनवल्या. मोसाकु ते बाजारात नेऊन विकणार होता, पण दुर्दैवाने अचानक हवामान बदलले.जोराचा वारा वाहू लागला. बर्फ पडू लागला. बाहेर पडणं अशक्य झालं. पण अशाही परिस्थितीत ,कडाक्याच्या थंडीत मोसाकू टोप्या घेऊन बाजारात पोहचला.पण बाजारात चिटपाखरूही नव्हतं. पण त्याने बाजारात एका कोपऱ्यात आपले दुकान मांडले आणि टोप्या घेण्याविषयी ओरडू लागला.
आज टोप्या विकल्या जाणं गरजेचं होतं, नाहीतर त्याला आणि आईवडिलांना उपाशी पोटीच झोपावं लागणार होतं.
उद्या सण होता. पाहुणे-राऊळे, नातेवाईक येणार होते. त्यांचा पाहुणचार करावा लागणार होता. टोप्याच विकल्या नाहीतर हे सगळं कसं घडणार होतं. मोसाकू काळजीत पडला. दिवसभर थांबून एकही टोपी विकली गेली नाही. शेवटी संध्याकाळी हताश होऊन तो आपले दुकान आटपून घरी चालू लागला. काही अंतरावर त्याला काही मुलं लाल रंगाचे कपडे परिधान केलेलं दिसले. त्यांची सोबत होईल, म्हणून तो घाईघाईने त्यांच्याजवळ पोहचला.पण पाहतो काय तर ते जिझो देवतांचे पुतळे होते. जिझो देवता लहान मुलांचे रक्षण करत.
जिझो पुतळे थंडीने कुडकुडत असल्याचे दिसले. मोसाकू प्रेमळ, संवेदनशील मनाचा होता. त्याने लगेच त्याच्या जवळच्या टोप्या झिजो पुतळ्यांवर घातल्या. पण पुतळे होते दहा आणि टोप्या होत्या नऊ. आता काय करायचं? दहाव्या पुतळ्याला सर्दी होईल. तो आजारी पडेल. मग भावूक मनाच्या मोसाकूने लगेच आपल्या डोक्यावरची टोपी त्या पुतळ्याच्या डोक्यावर घातली. तो धावतच आनंदाने घरी आला.
मोसाकूने घडलेला सगळा प्रकार आईवडिलांना सांगितला. पण आज त्यांना उपाशीपोटीच झोपावं लागलं. अचानक मध्यरात्री कुणीतरी दार ठोठावलं. मोसाकूच्या आईने दार उघडलं. पाहते तर काय! दहा मुले दारात ओळीने प्रसन्न चेहऱ्याने उभी होती. त्यांच्या हातात भेटवस्तू होत्या. दहाव्या मुलाच्या हातात एक मोठी पेटी होती. त्यात मौल्यवान वस्तू होत्या. त्या सगळ्या वस्तू दारात ठेवत ती मुलं म्हणाली," मोसाकूने आम्हाला टोप्या दिल्या,तेच आम्ही सर्वजण." ती मुलं लगेच अदृश्य झाली.
त्यानंतर मात्र मोसाकुला आणि त्याच्या कुटुंबाला कधीच कसली कमतरता पडली नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment