Tuesday, March 9, 2021

नव्या युगाच्या प्रणेत्या: सावित्रीबाई


१९ व्या शतकात समाजसुधारकांनी प्रतिकूल परिस्थिती असतानाही समाजासाठी आपले योगदान दिले. समाजात योग्य ते परिवर्तन घडवून आणले. त्याच परिवर्तनाचा आज आधुनिक समाज उपभोग घेत आहे. सत्य, न्याय, समता, बंधूता यांच्या पायावर उभा असलेला ज्ञानोमुख आणि कर्तव्यनिष्ठ असा एकात्म समाज निर्माण करणे हे भारतीय समाज सुधारकांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीसाठी समाज सुधारकांनी आपल्या जीवनाचा त्याग करून समाजासाठी स्वत:ला अर्पण केले. सावित्रीबाई फुले त्यातीलच एक. स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानी घातला.

महात्मा फुले यांनी शाळा निर्मिती केली. शाळेचा अभ्यासक्रम सावित्रीबाई यांच्या विचारविनिमयातून तयार केला. त्यांनी  वाचन, अर्थ सांगणे, व्याकरण शुद्ध लिहिणे, भूगोल, गणित, मोडी इत्यादी विषयावर अधिक भर दिला. अभ्यासक्रमासंदर्भात असे निदर्शनास आले की, अभ्यासक्रम हा शाळेनुसार तयार करण्यात आला होता. तिथल्या परिस्थितीनुसार राबवला. म्हणजे  अभ्यासक्रम तयार करताना जी तत्त्वे लक्षात घ्यावी लागतात ती या ठिकाणी लक्षात घेतली आहेत. मुलांचा परिसर लक्षात घेण्यात आला. आजही महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भातील विचारांची गरज आहे. अभ्यासक्रम हा त्या-त्या परिसरानुसार तयार करण्यात यावा. ग्रामीण भाग असेल तर ग्रामीण वातावरण तेथील मुलांची बौद्धिक क्षमता इत्यादी बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. शहरी भागाचा अभ्यासक्रम हा त्यानुसार असावा. अध्यापनासाठी लागणारा अभ्यासक्रम फुले दाम्पत्याने अतिशय विचारपूर्वक निर्माण केला होता हा अभ्यासक्रम तयार करीत असताना सावित्रीमाई फुलेचा सिंहाचा वाटा होता. अध्यापनात गुणवत्ता होती. अभ्यासक्रम तत्त्वानुसार विचारपूर्ण होता. तेव्हा निकालही योग्यच लागत असे. निकालासाठी परीक्षा या नियमानुसारच घेतल्या जात त्यासंदर्भात कोणतीही तडजोड केली जात नसे. 

१७ फेब्रुवारी १९५२ ला प्रकटपणे परीक्षा घेण्यात आली, तो प्रसंग पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. मुलांची परीक्षा घेतल्यानंतर त्याचे कौतुक करण्यात आले. २५ मार्च १८५३ रोजी एका साप्ताहिकाने एक इंग्रजी पत्र छापले. एका पत्रलेखकाने मागासवर्गीय मुलांच्या वार्षिक परीक्षेच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, हा प्रसंग म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ मानला पाहिजे. परीक्षेचा प्रसंग हा फुले दांपत्यांच्या शैक्षणिक कार्याचा विजय होता. यामुळे शिक्षणाचा प्रसार तर झालाच, मात्र फुले दांपत्य जन-मानसात प्रसिद्ध झाले. वास्तविक पाहता तत्कालिन परिस्थिती अनुकूल नसताना स्त्रियांसाठी व अस्पृशांसाठी शाळा सुरू करणे, समाजातील वाईट प्रथांना विरोध करणे अशा बाबीमुळे सावित्रीबाईंना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आजची पिढी सुखा-समाधानाने जगते हे सत्य नाकारून चालणार नाही. केवळ शाळा सुरू करून गप्प न बसता त्या शाळेचा अभ्यासक्रम तयार करून सावित्रीमाई फुल्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जे काम आजच्या आधुनिक युगात आजच्या शिक्षण व्यवस्थेला जमले नाही ते काम १९ व्या शतकात फुले दांपत्यांनी केले. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि.सांगली

No comments:

Post a Comment