Monday, March 29, 2021

कोरोनाची दुसरी लाट थोपवा


कोरोना व्हायरस देशात पुन्हा धुमाकूळ घालत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही लाट पुढील 100 दिवस राहणार असल्याचे सांगितले जात असल्याने आपल्याला सावधानता बाळगावी लागणार आहे. मात्र अजूनही लोक कोरोनाला गंभीरपणे घ्यायला तयार नाहीत, हेच दुर्दैव आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहून राज्य सरकार लॉकडावूनचा गांभीर्याने विचार करत आहे. रात्रीची संचारबंदी महाराष्ट्रात लागू झाली आहे. यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये कडक संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आली आहे. कोरोनाची लाट अशीच वाढत राहिली तर आपल्यासमोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. मागील वर्षी लॉकडाऊन काळात जे हाल झाले, नुकसान झाले याचा भयानक अनुभव आपण घेतला आहे. त्याची आठवणही आता आपल्याला नको आहे. लोकांनी भविष्यासाठी जी पुंजी गोळा करून ठेवली होती, ती कामधंदा नसल्याने लोकांनी संपवून टाकली. ज्यांची हातावर पोटे होती, त्यांचे अन्नावाचून हाल झाले. केंद्राने या काळात मोफत धान्य वाटप केल्याने त्याची थोडी तीव्रता कमी झाली एवढेच. अनेकांची नोकरी, रोजगार सुटले. वेतन कपात झाली.त्यामुळे लोकांना आणखी काही वर्षे मागे जावे लागले आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर आपल्याला सावधानता बाळगावी लागणारच आहे. 45 वर्ष वयाच्या लोकांनी बिनधिक्कत लस घेतली पाहिजे आणि इतरांनाही ती घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. 

2021 या नव्या वर्षापासून आपण पुन्हा पूर्व पदावर येऊ लागलो , असे वाटत असतानाच मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. ही दुसरी लाट पूर्वीपेक्षा धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. दुसऱ्या देशातील दुसऱ्या लाटेचा सामना केलेल्या देशांकडून भारताने धडा घ्यायला हवा होता. पण आम्ही त्यावर फारसा विचारच केला नाही. खरं तर स्थानिक लॉकडाऊन कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अपयशी ठरला आहे. संक्रमित संख्या आणि मृत्यूदर लॉकडाऊन  किंवा प्रतिबंध घालणे याचा परिणाम दिसत नाही. नाहीतर कोरोना लवकरच आटोक्यात आला असता. बऱ्याच लोकांनी लॉकडाऊन गांभीर्याने घेतलाच नाही. 

कोरोना रोखण्यासाठी आपल्याला कमीतकमी वेळात अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण हा एकमेव पर्याय आहे, असे वाटते. मास्क घालणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतर ठेवणे याची काटेकोर अंमलबजावणी स्वयंस्फूर्तीने व्हायला हवी. आपल्या देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीनची दररोजची उत्पादन क्षमता 52 लाख आहे. भारतात दररोज डोसची संख्या 34 लाखावरून वाढवून एक कोटी करण्याची क्षमता आहे. जर अधिक नागरिक व्हॅक्सीन घेण्यासाठी तयार असतील तर डोसची संख्या 34 लाखावरून 40 ते 45 लाखापर्यंत नेता येऊ शकते. यामुळे 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण चार महिन्यात पूर्ण केले जाऊ शकते. या पद्धतीने पूर्ण लोकसंख्या एक वर्ष नऊ महिन्यात व्हॅक्सीन मिळू शकते. 

आपल्याला दुसरी लाट थोपवण्याबरोबरच तिसऱ्या लाटेचाही विचार करावा लागणार आहे. यासाठी 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना लस घेण्यास बंधनकारक करावे लागणार आहे. तिसरी लाट कशी असेल याची आपल्याला कल्पना नाही. दुसऱ्या लाटेबद्दल आपल्याला व्हायरसमध्ये झालेले बदल, त्याची तीव्रता किती आहे, याची कल्पना नव्हती. अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या देशात कोरोनाचे  वेगवेगळे स्वरूप दिसत आहे. 

काहीजण सांगतात की, सर्व महाविद्यालये आणि शाळा उघडायला हव्यात. सर्वांना आत येण्यापूर्वी लस घेण्यास बंधनकारक करायला हवे. मॉल्स, हॉटेल्स उघडून लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. तसेच लस घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करू द्यावा. लसीकरण केल्यानंतर दिलेले प्रमाणपत्र स्वतःजवळ ठेवणे बंधनकारक करायला हवे. ज्यामुळे मॉल्स, हॉटेल्स, चित्रपट थिएटर्स व इतर गर्दीची दुकाने, ठिकाणे, परिवहन सेवा, शाळा, महाविद्यालये येथे त्याचा वापर करता येईल आणि प्रवेश घेता येईल.

दुसऱ्या लाटेचा विचार करता सर्वांनी आपापली काळजी घ्यायला हवी. लोकांनी लसीबाबत भीती न बाळगता मोठ्या संख्येने लस घेतल्यास कमी कालावधीत लसीचा कार्यक्रम पूर्ण होईल आणि आपण कोरोना व्हायरसला थोपवू शकू. कोरोनाचे आक्रमण हे एकप्रकारे युद्धच आहे. जसे आपण 1965, 1971 आणि कारगिलच्या युद्धाला गंभीरपणे घेतले होते. तसेच कोरोनाच्या बाबतीतही घ्यायला हवे होते. त्यामुळे देशाचे इतके प्रचंड नुकसान झाले नसते. मृत्यू दर अधिक असताना कोरोना विरुद्धच्या लढाईत त्या युद्धासारखा उत्साह , जनतेचा सहभाग दिसला नाही. निदान आता तरी आपण गंभीर व्हायला हवे. शासनाने सांगण्यापेक्षा सर्वांनी स्वयंस्फूर्तीने कोरोनाला घालवण्यासाठी पुढे यायला हवे. मागील वर्षात याच काळात संक्रमण वाढत होते. सध्या इतर राज्यांत निवडणुकीचा काळ सुरू आहे. आपल्याकडेही स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत तर काही होऊ घातल्या आहेत. उन्हाळ्यात संक्रमणाचा धोका अधिक आहे काय,याची स्पष्टता नाही. संक्रमण वाढल्यास आर्थिक मंदीत आणखी भरडले जाणार आहोत. सध्या महागाई आणि रोजगाराचे संकट भयावह आहे. त्यामुळे मध्यम व अल्प उत्पन्न असलेली कुटुंबे दुसऱ्या लाटेत उपचार कसे पेलणार ,हा प्रश्न आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment