Wednesday, March 24, 2021

समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या घटना वाढल्या


तरुण मुला- मुलींच्या आत्महत्या, तरुणांची गुंडागिरी, व्यसनाधिनता, एकतर्फी प्रेम यांचे वाढते प्रकार आणि शिक्षक -पालकांची हतबलता यामुळे  सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. आजकाल मुलांना काही उपदेशाचे ठोस द्यायचे म्हटले तरी  नस्ती आफत ओढवून घेतल्यासारखी परिस्थिती होऊन बसली आहे. कॉलेजवयीन तर सोडूनच द्या अगदी चिमुरडी पोरेदेखील आजकाल अपमान सहन करून घ्यायला तयार नाहीत. सुडाने पेटून उठलेली ही मुले बदला घ्यायला तत्पर असतात. यातून भलताच प्रकार घडल्याने पालकांनाच साऱ्या गोष्टी निस्ताराव्या लागतात. काहींना  अपमान सहन होत नाही आणि ते स्वतःला संपवून टाकतात. अशा टोकाच्या भूमिकांमुळे शिक्षक- पालकांचेही मानसिक स्वास्थ्य बिघडून गेले आहे. 'सांगावं तरी एक , नाही सांगावे तर एक' अशी द्विधावस्था त्यांची झाली आहे. चुकीचे असल्याचे समजून सांगावे, शिक्षा करावी, तर दुसरेच काही तरी बालंट अंगावर येते. त्यामुळे शिक्षक- पालक या कोणत्याच गोष्टी करायला आता धजावत नाही. दुर्लक्ष केल्यानेही काही तरी उपटतेच, त्यामुळे एखाद्या प्रकरणात कोणता निर्णय घ्यावा, हे त्यांना कळेनासे झाले आहे.  

परीक्षेत कॉपी प्रवृत्ती रोखावी म्हणून प्रयत्न करणार्‍या शिक्षकाला भोसकण्याचे , मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत.  मुलीची छेड करणार्‍या युवकास शिक्षा करणार्‍या पालकाला, शिक्षकालाही अंगावर धावून जाण्याचा, मारहाण करण्याचा प्रकार वाढू लागला आहे. 'आरे'ला 'कारे' म्हटले जात आहे. संयम संपला आहे. चूक मान्य केली जात नाहीए. माणसातील सहनशीलताच संपली आहे. आजची ही पिढी इतकी टोकाची भूमिका का घेत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.  आजकाल पैशाच्या, राजकीय आणि वशिल्याच्या  जिवावर अनेक प्रकार घडत आहेत. खून, बलात्कार, चोर्या-माऱ्या केल्या तरी आपल्या केसालाही धक्का लागत नाही, हा माजोरीपणा पालक, राजकारण, पैसा या मागच्या यांच्या स्पोर्टमुळे पाहायला मिळत आहे. काही केले तरी आपल्याला काही होत नाही बिनधास्त जगा, बिनधास्त वागा, असा संदेश  मुलांना मिळत आहे. आणि ज्यांना असा कुठला आधार नाही , असे स्वतः ला असुरक्षित वाटून घेऊन जीवनयात्रा संपवताना दिसत आहेत. 

     वास्तविक जीवन म्हणजे यशापयश, संघर्ष, अपमान  यांचा मेळच आहे. जीवनात या सार्‍या गोष्टी वाट्याला येत राहणार. देवाला,कुबेरालासुद्धा या गोष्टी चुकलेल्या नाहीत. म्हणून काय, जीवनयात्रा संपवायची? समोरच्याचा बदला घ्यायचा? एखादी वस्तू मिळाली नाही, प्रेम मिळाले नाही म्हणून हिरावून घ्यायची का? त्याच्याने सारे प्रश्न सुटणारे आहेत का? सहनशीलता,संयम राखल्यास अपमानाचा, यशापयशाचा त्रास वाटणार नाही. पण सहनशीलताच संपली आहे. ही बाब मोठी धोकादायक असून समाज कुठल्या स्तराला जाणार यांची चिंता लागून राहिली आहे.  याला खरे तर स्वतः समाजच कारणीभूत आहे. संस्कारात कमी पडत चालल्याची ही लक्षणे आहेत. आपल्या मुलांना संस्कारशील बनवण्यात पालक कुठेतरी कमी पडत आहेत. वास्तविक मुले अनुकरणशील असतात. ती आपल्या आजूबाजूची माणसे (समाज),पालक यांच्या बर्‍यावाईट गोष्टींचे अनुकरण करत असतात. मात्र आपल्या मुलांना चांगल्या-वाइटाची समज करून देणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्यच असते. लहानपणापासूनच संस्काराचे धडे गिरवायला हवेत. परंतु याकडे कर्तव्यापासूनच समाज दूर चालला आहे. 

एका बँकेतील एक कर्मचारी साधा मोबाईल वापरतो. त्याला मी स्मार्टफोन का वापरत नाही,हे विचारले. त्याने दिलेले उत्तर मला फार भावले. आपणच स्मार्टफोन वापरला आणि आपणच त्याच्याशी तासनतास खेळत बसलो तर मुलांना काय सांगणार? स्मार्टफोन आज मूलभूत गरज झाला असला तरी त्याला आपली गरज आहे असे नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक घातकच आहे. त्याचा उपयोग झाला की, त्याला बाजूला ठेवून देणे हितकारक आहे.

 आपला  समाज वंशाचा दिवा हवा म्हणून स्त्री भ्रूणहत्या घडवित आला आहे.  सध्याच्या आकडेवारीत सहज दिसून येणारी धक्कादायक गोष्ट म्हणजे समाजातील मुलींची संख्या कमी होत चालली आहे.

मात्र यामुळे सामाजिक अस्वास्थ्य कुठल्या थराला जात आहे, याची कल्पना येत असतानासुद्धा माणसे आंधळी होऊन 'मागचा पाढा सत्तावनच' म्हणत आहेत.  हे असेच होत राहिले तर पुढच्या काळात आणखी कोणती बिकट सामाजिक स्थिती ओढवेल हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलींना मुलगा समजून त्यांच्यावर संस्कार करा, त्यांना त्यांच्या पायावर उभे करा. मुले वृद्ध आईबापांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत, हेही पालकांनी उघड्या डोळ्यांनी पाहायला हवे. मुलांसाठी कमवून ठेवून त्यांना जीवन जगण्यासाठी पंगू बनवत आहोत. त्यामुळे  तरुण काम करायला तयार नाही. सामाजात तो आपला वेगळा ठसा उमटव्यात असमर्थ ठरत आहे.

सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून प्रत्येकानेच उत्तम संस्कारांचे संचित भावी पिढीपर्यंत पोचवण्याचे काम मनापासून करायला हवे. सध्या  वाढलेला अनागोंदी कारभार  समाजस्वास्थ्य बिघडवत आहे. घरादारात मेळ राहिला नाही, शासन -प्रशासनातला घोळ संपला नाही. प्रशासनातील हलगर्जीपणाही वाढला आहे. राजकारणी, नोकरशहा, जनतेतील काही घटक यांनी संगनमताने चालवलेल्या भ्रष्टाचारामुळे सामाजिक स्वाथ्य पार बिघडून गेले आहे. आज चांगल्या संस्कारावर भर देण्याची आवश्यकता आहे. आपल्या पाल्याच्या चुकीचे खापर दुसर्‍यावर फोडून मोकळे होण्याने प्रश्न मिटणार अथवा संपणार नाहीत. सामाजिक संस्थांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढे येऊन स्वत:ला खर्‍या अर्थाने समाजप्रबोधनाच्या कामात झोकून दिले पाहिजे. त्यातूनच भावी पिढयांना सकारात्मक व संस्कारशील विचार मिळू शकतील. पिढी संस्कारशील घडण्यास मदत होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment