Thursday, July 1, 2021

वायू प्रदूषणाचा वाढता धोका


हवेच्या गुणवत्तेबाबत वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या  जागतिक निर्देशांकांमधील भारताची स्थिती फारच दयनीय आहे. गेल्या काही वर्षांत, जगातल्या ज्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे, अशा बहुतेक पहिल्या वीस-तीस शहरांमध्ये सर्वाधिक शहरे भारतातील आहेत. स्वित्झर्लंडच्या 'आयक्यू एअर' संस्थेने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एअर क्वालिटी इंडेक्स -२०२० च्या अहवालानुसार जगातील तीस सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी बावीस शहरे भारतातील आहेत. या निर्देशांकात चीनचे खोतान शहर अव्वल स्थानावर आहे, तर भारतातील उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे प्रदूषित शहर असल्याचे आढळले आहे.

दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे, परंतु ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून उदयास आली आहे.  उत्तर प्रदेशमधील दहा आणि हरियाणामधील नऊ शहरांचा तीस प्रदूषित शहरांच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे.  त्याचबरोबर एकशे सहा देशांच्या या निर्देशांकात भारत हा बांगलादेश व पाकिस्ताननंतर जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश आहे.  याउलट, पोर्तो रिको, न्यू कॅलेडोनिया, स्वीडन, फिनलँड, नॉर्वे आणि आइसलँड यांची जगातील सर्वात स्वच्छ देशांमध्ये गणना केली जाते.

 एक प्रस्थापित सत्य असे की विकसित व श्रीमंत देश प्रदूषण करण्यात तुलनेने पुढे आहेत आणि कमी व मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांना याचा त्रास सहन करावा लागतो.  श्रीमंत देशांचे गट पर्यावरणीय आणि हवामानाच्या संकटाला तोंड देण्याच्या मोठमोठ्या बाता मारताना दिसतात,पण प्रत्यक्षात समस्यांचे समाधान निघेल, अशी कुठलीच कार्यवाही करताना दिसत नाहीत. उलट गरीब आणि विकसनशील देशांवर प्रदूषण आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांवर दोषारोप ठेवण्याचा दबाव टाकताना दिसतात. वायू प्रदूषणाचा परिणाम केवळ सार्वजनिक आरोग्यावर आणि वातावरणावर होत नाही तर आयुर्मान, अर्थव्यवस्था, पर्यटन आणि समाज यावरही त्याचा वाईट परिणाम होतो.  वायू प्रदूषणाची तीव्रतेची समस्या सध्याच्या आणि भविष्यातील दोन्ही पिढ्यांसाठी त्रासदायक आहे.

ब्रिटीश आरोग्य नियतकालिका- 'द लान्सेट'च्या' प्लॅनेटरी हेल्थ रिपोर्ट -2020 'नुसार 2019 मध्ये भारतातील वायू प्रदूषणामुळे सतरा लाख लोकांचा मृत्यू झाला होता, जे त्यावर्षी देशात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी अठरा टक्के होते.  म्हणजे 1990 च्या तुलनेत सन 2019 मध्ये वायू प्रदूषणामुळे मृत्यूच्या प्रमाणात एकशे पंधरा टक्के वाढ झाली आहे.  एवढेच नव्हे तर देशात वायू प्रदूषणामुळे होणा-या आजारांच्या उपचारांमध्येही मोठी रक्कम खर्च केली जाते.

महत्त्वाचे म्हणजे सन 2019 मध्ये वायू प्रदूषण आणि रोगांवर होणारा खर्च यामुळे मानव संसाधन म्हणून नागरिकांच्या अकाली मृत्यूमुळे भारताच्या जीडीपीमध्ये दोन लाख साठ हजार कोटी रुपयांची घट झाली.  या अहवालात असा अंदाज लावला गेला आहे की 2024 पर्यंत वायू प्रदूषणामुळे उत्तर प्रदेशातील जीडीपीच्या 2.15 टक्के, बिहारमध्ये 1.95 टक्के, मध्य प्रदेशात 1.70 टक्के, राजस्थानमध्ये 1.70 टक्के आणि छत्तीसगडमधील 1.55 टक्के आर्थिक नुकसान होऊ शकतं.  अर्थात, वायू प्रदूषणाचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होत आहे.

वास्तविक वायू प्रदूषणाचा प्रश्न आपल्या जीवनशैलीमध्ये अशा प्रकारे समावेश झाला आहे की आपण त्याकडे एक समस्या म्हणून पाहत नाही.  देशातील अनेक शहरे एक प्रकारे 'गॅस चेंबर' मध्ये रूपांतरित झाली आहेत.  या शहरांमध्ये आधुनिक जीवनाचा झगमगाट आहे, परंतु मानवी जीवनशैली अधिकच खतरनाक बनली आहे.  वायू प्रदूषण हा सार्वजनिक आरोग्याचा एक मोठा धोका म्हणून उदयास आला आहे.  बर्‍याच संशोधनात असे तथ्य समोर आले आहे की प्रदूषित भागात सातत्याने राहिल्यामुळे रोग वाढतात आणि आयुर्मान कमी होत आहे. असेच आणखी एक संशोधन 'कार्डिओव्हस्कुलर रिसर्च' जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.  संशोधकांचे म्हणणे आहे की वायू प्रदूषणामुळे जगभरातील सरासरी आयुर्मान  तीन वर्षांनी कमी होत आहे, जे इतर आजारांमुळे आयुर्मानाच्या परिणामापेक्षा जास्त आहे.  उदाहरणार्थ, तंबाखूच्या वापरामुळे आयुष्यमान अंदाजे 2.2 वर्षाने, एड्स 0.7 वर्षांनी, मलेरिया 0.6 वर्षांनी आणि युद्धामुळे 0.3 वर्षे कमी होते.  वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या रोग, युद्ध आणि कोणत्याही हिंसाचारापेक्षा जास्त आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे या गुन्ह्यासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला जबाबदार धरता येत नाही.

वायू प्रदूषण विषासारखे मानवी आरोग्य आणि संसाधनांना हानी पोहचवत आहे.  गेल्या दोन दशकांत भारतातील वायू प्रदूषणात चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.  जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ) च्या म्हणण्यानुसार, डब्ल्यूएचओच्या मानदंडांपेक्षा वायू प्रदूषण ज्या प्रदेशात जास्त आहे अशा ठिकाणी 84 टक्के भारतीय राहत आहेत.  दुसरीकडे एअर क्वालिटी लाइफ इंडेक्सच्या अहवालानुसार प्रदूषित भागात राहणारे भारतीय पूर्वीपेक्षा सरासरी पाच वर्षे कमीच जगत आहेत.एका अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे आयुष्य प्रत्यक्षात दिल्लीत नऊ वर्षे, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये आठ वर्षे, बिहार आणि बंगालमध्ये सात वर्षांपर्यंत कमी झाले आहे.  वायू प्रदूषण हृदय आणि फुफ्फुसांचे रोग आणि कर्करोग सारख्या रोगांना जन्म देते.  धक्कादायक तथ्य असे आहे की भारतात, साठ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांच्या मृत्यूंपैकी पंच्याहत्तर टक्के मृत्यू एकट्या वायू प्रदूषणामुळे होणा-या आजारांमुळे होतात.  आयुर्मान कमी होण्यामुळे लोक पूर्वीपेक्षा कमी आणि अस्वस्थ जीवन व्यतीत करत आहेत.

सामान्यत: आपण वायू प्रदूषणाबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त शहरांचा विचार करतो, कारण तेथे बरेच उद्योग व वाहने आहेत. परंतु घराच्या  चौकटीच्या आत पसरणाऱ्या प्रदूषणाकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते.  तथापि, या प्रकरणात शहरे आणि खेड्यांमध्ये परिस्थिती जवळजवळ सारखीच आहे.  परंतु पारंपारिक ज्वलनाच्या स्त्रोतांवर अवलंबून असण्याने खेड्यांमधील घरगुती प्रदूषणाची परिस्थिती अधिक बिकट आहे.  लाकूड, शेण, कोळसा, केरोसीन, पीकांचे अवशेष,पालापाचोळा यामुळे मिथेन, कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन इत्यादी उत्सर्जित होतात, जे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणाला हानिकारक आहेत.

चुलीमधून निघणारा धूर शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासही हानिकारक आहे, या ज्ञानाबद्दल ग्रामीण महिलांना माहिती नाही.  डब्ल्यूएचओच्या मते, एका तासामध्ये पारंपारिक चुलीमधून निघणारा धूर तितक्याच वेळेत 400 सिगारेट जाळण्याइतकेच नुकसान करते!  याचा अर्थ असा आहे की पारंपारिक चुलीवर स्वयंपाक करणे मृत्यूबरोबरच अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे.  स्त्रियांमध्ये धुराच्या संपर्कात आल्यामुळे श्वसनाच्या समस्या आणि डोकेदुखी या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. घरगुती प्रदूषणामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.  त्याचा परिणाम स्त्रियांवरही सर्वाधिक होतो कारण त्यांना खुल्या चुलीच्या समोर कित्येक तास वावरावे लागते. जगातील एक तृतीयांश लोक अद्याप इंधनासाठी जीवाश्म इंधन वापरतात.

खरं तर, शहरांमध्ये मुक्त, स्वच्छ आणि प्रेरक वातावरणाचा पूर्ण अभाव आहे.  कालांतराने, आपल्या पुढच्या पिढ्यांना नैसर्गिक संसाधने आणि स्वच्छ वातावरणाच्या अनुपस्थितीतच दमछाक करणारे जीवन जगण्यास भाग पाडले जाईल.  वस्तुतः औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या वेगवान गतीमुळे आधुनिक जीवनाचा पर्यावरणीय चेतनेचा अभाव दिसून येत आहे.त्यामुळे पर्यावरणाचा श्वास गुदमरला आहे.  जर आपण वेळेत वायू प्रदूषणाच्या समस्येपासून मुक्त झालो नाही किंवा त्यात घट करण्यात यशस्वी झालो नाही तर आपण पुढील काळात शुद्ध हवेसाठी कासावीस होऊन जाऊ.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment