Thursday, July 1, 2021

लग्नापूर्वी बनवा मुलीला आत्मनिर्भर


आपल्या समाजातील लोकांकडून युवकांच्या आई-वडिलांना नेहमी एक प्रश्न विचारला जातो,"काय मग तुमची मुलं 'सेटल' झाली का?' यातून तुम्हाला वाटेल की, यात स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहण्यासारखं काय आहे? तर ध्यानात घ्या, या 'सेटल' शब्दाचा आशय 'जेंडर' ने निश्चित होतो. मुलगा असेल तर त्याच्या 'सेटल' होण्याचे तात्पर्य आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होणे आणि मुलगी असेल तर लग्न वगैरे होणं. हे खरं की, आजच्या काळात मुलींचे शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचे आकडे पहिल्यापेक्षा समाधानकारक पाहायला मिळताहेत. शिवाय समाजात सकारात्मक बदलही दिसून येतोय.

शहरी उच्च वर्ग आणि मध्यमवर्गीय कुटुंबात जरी काहीअंशी समाधानकारक चित्र दिसत असले तरी ग्रामीण भागात- खेड्यात आणि शहरातील निम्न मध्यमवर्गात अजूनही मुलींच्या शिक्षणावर अधिक खर्च करण्यापेक्षा तिच्या लग्नाच्या खर्चावर अधिक लक्ष दिलं जातं. सामान्य स्तरावरदेखील आर्थिक परिस्थितीनुसार अजूनही मुलाच्या शिक्षणाकडे अधिक आणि जाणीवपूर्वक महत्त्व दिले जाते आणि त्याला करिअरच्या हिशोबाने शिक्षणाच्या सुविधा मिळतात, कारण त्याला चांगले काम मिळावे, हाच दृष्टिकोन त्यामागे असतो. जर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्यांपेक्षा चांगली असली तरीही त्या दोघांना एकसमानच सुविधा मिळतात. हे मागील सालांपासूनचे एक पारंपरिक सत्य आहे. आजही यात काहीच फरक पडलेला नाही. याचा परिणाम असा होतो की, बहुतांश मुली कामचलाऊ बीए उत्तीर्ण होऊन लग्न करतात आणि कमाई करणाऱ्या नवऱ्याचे घर सांभाळत बसतात. कायद्यानं या व्यवस्थेत कुणाला कसलीच गडबड दिसत नाहीत, पण विचार करा दुर्दैवाने एकाद्या वेळेला ती आर्थिक आत्मनिर्भरतेपासून वंचित होऊन जीवन व्यतीत करत असेल आणि तिला सांभाळणारा हयात नसेल किंवा त्याने दुसरे लग्न केले तर काय? कुटुंबाचा नेहमीचा हजारोंचा खर्च, दोन किंवा तीन अल्पवयीन मुलं आणि आश्रय नसेल तर काय? ती स्वतःचा सांभाळ कसा करणार?
या कोरोना महामारीने उद्धभवलेल्या परिस्थितीमुळे कित्येक कुटुंबांची अवस्था अशीच झाली आहे. उदाहरण म्हणून घ्यायचे झाले तर एका चार सदस्यांच्या कुटुंबाचे घेऊन पाहू. यातील दोन मुलं 8 ते 17 वर्षांदरम्यानची आहेत. नवरा कुठल्या तरी ठिकाणी चांगल्या पगारावर काम करतो आणि त्याची बायको गृहिणी आहे. अचानक महामारीच्या काळात जर नवऱ्याचा मृत्यू झाला तर, कुटुंबातील तीन सदस्य जे आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर निर्भर आहेत, ते भावात्मकदृष्ट्या तर प्रभावित होतीलच,पण आर्थिकदृष्ट्यादेखील संकटात सापडतील. विश्वास ठेवा, ही गोष्ट कुठल्या एका कुटुंबाची नाही,तर असे हजारो कुटुंबं आपल्या आजूबाजूला आहेत. फक्त महामारीच्या काळातीलच ही परिस्थिती नाही तर अपघात, घटस्फोटसारख्या घटनांनंतरही अशीच अवस्था होते स्त्रीची. नंतर स्त्री आई-वडील किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून राहते. कित्येकदा घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या स्त्रिया किंवा त्यांचे कुटुंबीय आर्थिक अवलंबित्वमुळे विभक्त होण्याचा पर्याय निवडण्यास असमर्थ असतात.
अशावेळी आपल्या समाजाला 'सेटल' होण्याची पुन्हा व्याख्या करण्याची गरज वाटत नाही काय? एक समाज म्हणून आपल्याला हे समजले पाहिजे की महिलांच्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या घरात दिले किंवा चांगला मुलगा पाहून लग्न करून देणे पुरेसे नसते, तर मुलींना शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात समान संधी उपलब्ध करुन देणेदेखील आवश्यक आहे. मुलाला आपल्या घरात पैसे कमवून आणायचे आहे आणि मुलीला शेवटी परक्या घरात जायचं आहे. मग तिच्या शिक्षणाची आणि आर्थिक स्वावलंबनाची गरज काय आहे? असे म्हणण्याची ही जी मानसिकता आहे, ती बदलण्याची गरज आहे. आपल्याला समजले पाहिजे की मुलगी 'सेटल' होणे म्हणजे फक्त तिचे लग्न करून देणे नव्हे, तर ती स्वतःच्या पायावर उभी राहणे, असा अर्थ घ्यायला हवा, जसा मुलाच्याबाबतीत घेतला जातो तसा.  हेच चांगले सामाजिक संतुलन आणि महिलांची स्थिती सुधारण्यासाठीदेखील हे आवश्यक आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 9423368970

No comments:

Post a Comment