तापमानवाढीमागे अनेक कारणे असली तरी भारतात परदेशी वृक्षांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे विदेशी झाडांना रामराम ठोकून यापुढे देशी वृक्ष लावण्यावर शासकीय आणि खासगी पातळीवर वेगाने प्रयत्न व्हायला हवेत. तापमानवाढीबरोबरच विदेशी झाडांच्या लागवडीमुळे आणखीही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या झाडांच्या मुळांची रचना ही उथळ स्वरूपाची असून आणि लाकूडही ठिसूळ असल्याने वादळ वाऱ्यात ही झाडे तग धरत नाहीत.नागरिकांच्या आरोग्याशी आणि अर्थकारणाशी ही बाब थेट जोडलेली असल्याने यापुढे शासकीय वृक्ष लागवड कार्यक्रमातून विदेशी वृक्ष प्रजातींना बाजूला ठेवून स्थानिक वृक्ष प्रजातींना प्राधान्य देतानाच शासनाच्या महसूल, वन,पर्यावरण सामाजिक वनीकरण या विभागांना शासनाने तशा सूचना द्यायला हव्यात.गेल्या तीन दशकात महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण व वनखात्याकडून मोठ्या प्रमाणावर केलेल्या विदेशी वृक्ष प्रजातींच्या लागवडीमुळे स्थानिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.जलद वाढणारी झाडे म्हणून या वृक्ष प्रजातींचे शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रमोशन करण्यात आले. गेल्या 30-40 वर्षात झालेल्या या विदेशी वृक्ष प्रजातींच्या लागवडीमुळे अनेक गंभीर परिणाम पर्यावरणावर आता दिसून येत आहेत. 40 वर्षांपूर्वी आयात केलेल्या या वृक्ष प्रजाती येथील निसर्गामध्ये ठाण मांडून बसल्याने स्थानिक वृक्ष प्रजाती मात्र धोक्यात आल्या आहेत.
परदेशी वृक्ष प्रजातींपैकी सुरु, निलगिरी, ऑस्ट्रेलियन ऑकेशिया यासारखे वृक्ष हे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. या झाडांच्या पानांचे आणि फांद्यांच्या अवशेषांचे लवकर विघटन होत नाही.परिणामी जमिनीवरील पानांचा थर बराच काळ राहिल्याने या झाडांखाली कोणतेही गवत उगवत नाही. अशा झाडांच्या खालील जमिनी आम्लयुक्त व नापिक होतात. या झाडांचे लाकूड ठिसूळ असल्याने इमारती लाकडासाठीही याचा उपयोग होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनाही अशी झाडे फायद्याची नाहीत.या झाडांवर पक्षी व प्राणी बसत नाहीत.पक्ष्यांचा अधिवास नष्ट होऊन पक्ष्यांचा वावर दुर्मिळ होत चालला आहे. स्थानिक वृक्ष प्रजाती या येथील परिसंस्थेतील असल्यामुळे निसर्ग नेहमीच समृद्ध ठेवतात.औषधी गुणधर्माबरोबरच अनेक स्थानिक वृक्ष प्रजातींकडून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीही होत असते.
एक झाड दरवर्षी 22 किलोग्रॅम कार्बन डायॉक्साईड शोषून घेते.एखाद्या वृक्षाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जर शंभर चौरस मीटर असेल तर ते ताशी सव्वाशे ते अडीचशे ग्रॅम कार्बन डायॉक्साईडचे शोषण करते. एक हेक्टर क्षेत्राच्या जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती कालांतराने वृक्ष होतात आणि 20 वर्षात 5 ते 45 लाख टन कार्बन डायॉक्साईडचे शोषण करतात. एवढंच नव्हे तर या प्रक्रियांमध्ये वनस्पती आपल्याला पाहिजे असलेला प्राणवायू वातावरणात सोडून देतात. पानांनी डवरलेले मोठे झाड दरवर्षी 10 व्यक्तींना वर्षभर पुरेल एवढा प्राणवायू हवेत सोडतात. पृथ्वीच्या वातावरणातील प्राणवायू बहुतांशी वनस्पतींनी प्राणिमात्रांना बहाल केलाय. एक वृक्ष सरासरी सव्वाशे किलोग्रॅम प्राणवायू हवेत सोडून देतो. अर्थात ही आकडेवारी जमिनीचा पोत, वनस्पतीचा प्रकार, भौगोलिक स्थान आदी अनेक घटकांवर अवलंबून असते.
वनस्पती त्यांची वाढ होताना कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात म्हणून हवा शुद्ध व्हायला मोठी मदत होते. पुरेसे वाढलेले वृक्ष वेगवेगळ्या प्रमाणात कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात. अशी झाडे शक्यतो स्थानिक जागेत लवकर वाढणारी, टिकावू, विस्तारित आणि मोठ्या पानांची असावीत. हे संशोधन गुजरात इकॉलॉजिकल एज्युकेशन अँड रिसर्च' या संस्थेने केले होते. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे भारतातील सागवृक्ष मोठ्या प्रमाणात हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात. त्यानंतर वटवृक्ष, निलगिरी (युकॅलिप्टस ग्लॉबुलस), सुरू, कडुनिंब आणि बाभूळ या वृक्षांचे क्रमांक लागतात. भारतातील पिंपळवृक्ष हवेत भरपूर ऑक्सिजन सोडतो. पिंपळवृक्ष रात्रीपेक्षा दिवसा जास्त ऑक्सिजन हवेत सोडतो. तुळसीचे रोप चांगल्या प्रमाणात कार्बन डायॉक्साईड शोषून घेते आणि प्रतिदिन 20 तास प्राणवायू सोडते. मात्र हे रोप आकाराने लहान असते. काही वनस्पती फोटॉन्स नसले (प्रकाश नसला) तरीही आजूबाजूला रात्रभर प्राणवायू सोडतात. त्यामध्ये कोरफड (घृतकुमारी), कुंडीत लावलेला मनी प्लॅन्ट, जरबेरा आदी सहभाग आहे. या शोभिवंत वनस्पती घरात परिसरात वाढतात.
रस्त्यांच्या दुतर्फा किंवा घराच्या बाजूला ताम्हन, बहावा, पळस,पांगाराकाटेसावर यांसारख्या स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड केल्यास सुंदर दिसण्याबरोबरच या झाडांच्या खोड,साल,पाने व फुले यांचा औषधी वापर करता येईलच या झाडांमुळे पक्षी ,फुलपाखरे व किटकही वृंद्धीगत होतील.त्यामुळे शासनाने आता देशी वृक्ष प्रजातींच्या लागवडीसाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात.
ऐन उन्हाळय़ात परदेशी झाडांची पानगळ होते. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यांत सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडतात. परिणामी, जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.देशातील एकूण वृक्षसंपदेच्या सुमारे 40 टक्के झाडे परदेशी असल्याचा ‘नेचर फॉरएव्हर’चा दावा आहे. देशातील परदेशी झाडांपैकी 55 टक्के अमेरिकेतील, 10 टक्के आफ्रिकेतील, 15 टक्के युरोपातील आणि 20 टक्के ऑस्ट्रेलियातील आहेत.
देशातील परदेशी झाडांच्या जातींची संख्या सुमारे 18 हजारांवर असून यांपैकी 25 टक्के पर्यावरणाला अधिक मारक आहेत. देशाचा विचार करता गुजरात, गोवा, केरळ आणि ईशान्येकडील राज्ये वगळता अन्य राज्यांत परदेशी झाडांची संख्या मोठी आहे.
‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ या पर्यावरणासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल दिलावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशी झाडांची पानगळ शिशिर ऋतूत (माघ, फाल्गुन) म्हणजे हिवाळय़ात होते. सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, त्यामुळे पानांतील हरितद्रव्य कमी होऊन पाने पिवळी पडून गळून पडतात. वसंत ऋतूत देशी झाडांना पालवी फुटते, झाडे हिरवीगार होतात. उन्हाळय़ात देशी झाडांची पाने सूर्याच्या प्रखर किरणांना जमिनीवर पोहोचण्यापासून अडवतात आणि जमिनीचे तापमान वाढण्यास प्रतिबंध होतो. देशी झाडे तापमानवाढ रोखण्यास मदत करतात.
परदेशी झाडांची पानगळ मात्र वसंत ऋतूत (चैत्र, वैशाख) म्हणजे ऐन उन्हाळय़ात होते. त्यामुळे उन्हाळय़ात सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडतात आणि जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते. परिणामी, स्थानिक पातळीवरील तापमान वाढ रोखण्यात परदेशी झाडे निरुपयोगी ठरतात, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे लावण्याची मोहीम राज्यात राबविली गेली. या मोहिमेत अनेक परदेशी झाडांची लागवड केली गेली. माळराने केवळ हिरवीगार व्हावीत, यासाठी आकेशिया जातीच्या झाडांची लागवड मोठय़ा प्रमाणात झाली. पण, ही झाडे जमिनीतील पाणी मोठय़ा प्रमाणावर शोषून घेतात, ती पर्यावरणास हानी पोहोचवतात. साहजिकच आता देशी वृक्ष लागवडीचा आग्रह वाढायला हवा. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment