सर्व त्या दक्षता घेतल्या जात असताना, काटेकोरपणा पाळला जात असताना आणि शोधमोहीम राबवण्यात येत असूनही काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे त्याची काही कारणे आता स्पष्ट होऊ लागली आहेत. काश्मीर विद्यापीठाचा एक प्राध्यापक, सरकारी शाळेतील शिक्षक आणि काश्मीर पोलिसांतील एका कर्मचाऱ्याच्या अटकेमुळे दहशतवाद्यांना कुठून कुठून खतपाणी घातले जात आहे, हे आता उघड झाले आहे. काश्मीर विद्यापीठातील रसायनशास्त्राचा प्राध्यापक विद्यार्थ्यांमध्ये फुटीरतावादी विष पेरत होताच पण अनेक वेळा निदर्शने आणि दगडफेकीतही त्याचा सहभाग होता. अशाच प्रकारे सरकारी शाळेतील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या मनात दहशतीचे बीज पेरत होता. अनेक प्रसंगी तो हल्लेखोरांमध्येही सामील होता. याशिवाय अटक करण्यात आलेला हा पोलीस कर्मचारीदेखील दहशतवाद्यांचा भूमिगत समर्थक म्हणून काम करत होता. या तिघांच्या अटकेमुळे दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या इतरही स्रोतांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न होतील आणि त्यांचा खात्मा करण्याच्या दिशेने पुढेही जाता येईल, यात शंका नाही. तसं पाहायला गेलं तर ही काही पहिली घटना नाही. याआधीही काश्मीर विद्यापीठातील काही प्राध्यापक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. तसेच देशातील इतर विद्यापीठांमध्येही अशा लोकांची ओळख पटली, जे दहशतवादी संघटनांना माहिती पुरवणे, कट रचणे आदी कामात मदत करत होते.
दहशतवादी संघटना आपल्या लोकांना विविध सरकारी खात्यांमध्ये घुसवण्याचा किंवा त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. लष्कर आणि पोलिसांमध्येही ते आपल्या लोकांना घुसवण्याचा प्रयत्न करत आले आहेत. अशा प्रकारे त्यांना माहिती सहज मिळते आणि त्यांचे षडयंत्र यशस्वी करणे सोपे जाते. त्यांना पाठबळ देणारे शाळा आणि विद्यापीठातील शिक्षक त्यांच्या हाताला लागले तर दहशतवाद्यांची नवी पिढी तयार करण्यात त्यांना त्यांची चांगली मदत होते. यामुळेच काश्मीरमधील दहशतवादी संघटनांचा नायनाट करणे कठीण झाले आहे कारण त्यात तरुणांची भरती थांबलेली नाही. ती अव्याहतपणे चालू आहे. शाळा- विद्यापीठ- कॉलेजांतील काही शिक्षक त्या तरुणांच्या मनामध्ये दहशतवाद पसरवण्याचे काम करतात. कुठलीही विचारधारा पसरवायची असेल आणि कायमस्वरूपी पेरायची असेल तर ती शैक्षणिक संस्थांमध्ये लावावी, असे म्हणतात. दहशतवादीही हेच तत्व पाळतात. अनेक मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे,यात आश्चर्य नाही. त्याचप्रमाणे पोलिसांमध्ये दहशतवाद्यांचे समर्थक असल्याने त्यांना त्यांचे कारस्थान पार पाडण्यास आणि सुरक्षितपणे पळून जाण्यास मदत होते.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्यांना आत्मसमर्पण करायचे आहे, त्यांना पोलिसात नोकरी दिली जाईल, अशी योजना आखण्यात आली होती. या योजनेंतर्गत अनेक दहशतवादी पोलिसातही भरती झाले. कदाचित यामुळे सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या कारवायांची माहिती मिळण्यास मदत होत असावी. पण या योजनेंतर्गत दहशतवाद्यांना आपल्या लोकांना पोलीस दलात सामावून घेण्याचा सोपा मार्गही मिळाला. अनेक ठिकाणी पोलीस छापे टाकण्यासाठी पोहोचले की तेथून आधीच दहशतवादी सुरक्षित ठिकाणी पोहोचतात यात नवल नाही. सुरक्षा दलांच्या ताफ्यांवर झालेल्या हल्ल्यांमध्येही माहिती वगैरे पुरवण्यात अशा जवानांची भूमिका नाकारता येत नाही. त्यामुळे आता अशा लोकांना ओळखण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलांनी स्वतंत्र योजना तयार करण्याची गरज आहे. बरीच सावधानताही बाळगावी लागणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment