Monday, May 30, 2022

बदलता दृष्टीकोन, बदलते जीवन


विधवांसाठीची सनातनी परंपरा मोडीत काढून महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक प्रगतीशील पाऊल उचलले आहे.  एकविसाव्या शतकातील भारतात मूल्ये आणि नैतिकता याविषयाच्या गोष्टी प्रत्येक क्षणी होत असतात, त्यामुळे आता समाजात विधवा व्यवस्था बाळगण्याची अजिबात गरज नाही.  घटनेत महिला आणि पुरुषांना समान अधिकार दिले आहेत, असे असतानाही समाजात धार्मिक-सामाजिक प्रथांच्या नावाखाली महिलांवर बंदी घालण्यासारख्या अनेक वाईट प्रथा अस्तित्वात आहेत. आता त्या संपवायला हव्या आहेत.  एकोणिसाव्या शतकातच राजा राममोहन रॉय यांनी स्त्री मुक्ती आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा सुरू केला होता.  पण आजही स्त्रीची उपेक्षाच केली जात आहे.  याच गोष्टी लक्षात घेऊन आता महाराष्ट्रातील विधवा महिलांना बांगड्या फोडण्याची, कपाळावरील कुंकू पुसण्याची आणि मंगळसूत्र काढण्याची प्रथा पाळावी लागणार नाही.  कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने गावातील विधवांसाठी पहिल्यांदा ही अमानुष प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील गावेही पुढे सरसावली आहेत.

बदल हा जीवनाचा नियम आहे.  अशा स्थितीत मानवी समाजाने बदल स्वीकारला नाही, तर मानवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे.  अशा परिस्थितीत बदल सहजतेने स्वीकारले पाहिजेत.  समाजाचा विधवांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे हे नाकारता येणार नाही. अलिकडे बरेच काही बदलले आहे.  विधवांना सासरचे अधिक अधिकार मिळू लागले आहेत, पुनर्विवाहही होऊ लागला आहे आणि या दिशेने नवे वारेही वाहू लागले आहे. पण हेही खरे की, असा बदल एका दिवसात होत नाही. सामाजिक आणि राजकीय पातळीवर विधवांबद्दलची विचारसरणी बदलत आहे.  हा बदल काही कुटुंबे आणि काही समाजांपुरता मर्यादित न राहता तो मोठ्या प्रमाणावर दिसून येईल अशी अपेक्षा करता येईल.  काही समाजांमध्ये विधवा-विधुर परिचय मेळावेही सुरू झाले आहेत.  अशी पावले उचलली गेली, तरच विधवांनाही त्यांचे जीवन जगण्याचा अधिकार मिळेल.  समाजात अनेकदा बोलले जाते की, सून ही मुलीसारखीच असते. मुलीची लग्नानंतर पाठवणी केली जाते, पण सून मात्र घरीच राहते.पण, अनेकवेळा परिस्थिती अशी निर्माण होते की, घराची शोभा असलेल्या सुनेचे सौंदर्यच उतरते.  कपड्यांचा रंग उडतो आणि त्याच्या जागी तिला विधवेचे वस्त्र परिधान करावे लागते. हे जीवनातील एक अतिशय दुःखद सत्य आहे.  तरीही जीवन जगायचे आहे.  जेव्हा कुटुंब आणि समाज जीवनातील हे दुःख वाटून घेतात, तेव्हा जीवन सोपे होते.  काही वर्षांपूर्वीपर्यंत असा विचार करणेही अवघड होते, पण आता समाजातील रूढी-परंपरा मोडकळीस येत आहेत.  श्रद्धा ढासळू लागल्या आहेत आणि विधवांच्या वेदना वाटू घेतल्या जाऊ लागल्या आहेत.  आता त्यांचाही विवाह लावून दिला जात आहे , जेणेकरून त्यांना नवीन आयुष्य सुरू करता येईल. यासाठी सासरकडील मंडळी पुढाकार घेताना दिसत आहेत.

मध्य प्रदेशातील धारमध्ये याच अखातीजला एका कुटुंबाने ज्या प्रकारे सामाजिक बंधने तोडली ते समाजाच्या बदलत्या विचारसरणीचे जिवंत उदाहरण आहे.  सासरच्या घरात सुनेला मुलीसारखा मान दिला पाहिजे, याचे उदाहरण धार या कुटुंबात पाहायला मिळाले.  कोरोनाच्या काळात त्यांनी आपला मुलगा गमावला होता.  ही अशी भयंकर वेदना होती, जी भरून काढणे सोपे नव्हते.पण, मुलाच्या मृत्यूनंतरही सासूने सुनेला मुलीप्रमाणे जपले.  मुलगा आणि सुनेला एक मुलगीही होती.  बराच विचारविनिमय करून विधवा सुनेचा पुनर्विवाह करायचा असे ठरले.  त्या कुटुंबाने आपल्या विधवा सुनेचे या अक्षय्य तृतीयेला दुसरे लग्न लावून दिले आणि तिला मुलीप्रमाणे निरोप दिला.  आपल्या सुनेला लग्नात भेट म्हणून साठ लाख रुपयांचे घरही दिले.ही काही रचलेली कथा नाही, ही एक सत्य घटना आहे, ज्याचे अनेक लोक साक्षीदार आहेत.  धार शहरातील प्रकाश नगर येथे राहणारे युगप्रकाश हे स्टेट बँकेचे निवृत्त एजीएम आहेत.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी आपला मुलगा गमावला.  यानंतर त्यांनी कसेबसे स्वत:ला आणि कुटुंबाला सावरले.  मग त्यांना विधवा सुनेच्या भवितव्याची चिंता सतावू लागली.  त्यांनी सुनेचा दुसरे लग्न करण्याचा विचार केला, पण सुनेला ते मान्य नव्हते.खूप समजावून सांगितल्यावर तिने दुसऱ्या लग्नाला होकार दिला.  काही दिवसांनी तिचे नागपुरातील एका तरुणाशी नाते पक्के झाले.  मग लग्नही या आखातीजला पार पडले.  तिची मुलगीही नवीन कुटुंबात स्थायिक होण्यासाठी आईसोबत नागपुरला गेली.  तिचा माजी पती भोपाळच्या एका कंपनीत वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता होता.  त्यांच्या मृत्यूनंतर सुनेला कंपनीने नोकरी दिली.  नागपुरात मुलाने विकत घेतलेले घरही सासू-सासऱ्याने सुनेला भेट म्हणून दिले.

अशा आणि इतर घटनांवरून हेच ​​दिसून येते की आता सासरच्या लोकांचा सुनेबद्दलचा विचार बदलू लागला आहे.  आता पांढरे कपडे तिच्यासाठी नेहमीचा पोशाख राहिला नाही.  हळूहळू का होईना अशी सामाजिक विचारधारा वाढू लागली आहे.  विधवांचे पुनर्विवाह होऊ लागले आहेत.  काही समाजांमध्ये विधवा-विधुर विवाह परिचय मेळावेही आयोजित होऊ लागले आहेत.  एक काळ असा होता की असे बोलणेही पाप मानले जात होते. समाजात आलेल्या या जाणिवेने विधवा होणे हा अपघात आहे, जो आयुष्यभर अनुभवता येत नाही याची जाणीव करून दिली.  होय, या बदलत्या परिस्थितीतही भारतीय समाजात सुमारे सात कोटी विधवा आहेत.  या विधवा मथुरा, वृंदावन, काशी आणि बनारस सारख्या ठिकाणी आपले उर्वरित आयुष्य कोणत्याही ओळखीशिवाय घालवताना दिसतात.  त्यामुळे राजकीय पक्षही त्यांना आपली व्होट बँक मानत नाहीत.  त्यांच्यासाठी कधीच जनआंदोलन झाले नाही.

विधवांच्या वेदना समजून घेण्यासाठी स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच मार्टी चेन आणि जीन ड्रेझ यांनी 1995 मध्ये मोठे संशोधन केले.  त्यांनी त्यांच्या संशोधनाचे परिणाम शेअर करण्यासाठी एक मोठी कार्यशाळाही आयोजित केली होती, ज्यामध्ये देशाच्या विविध भागांतील विधवा सहभागी झाल्या होत्या.  अनेक विधवांनी सांगितलं की कायद्याने त्यांना त्यांच्या दिवंगत पती आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना दिलेल्या जमिनीची मालकीण होण्याचा अधिकार आहे, परंतु तरीही त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर कधी कधी त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवते की त्यांना 'चेटकीण' म्हणून घोषित केले जाते तर कधी त्यांचा जीवही घेतला जातो.  हे सर्व लोकशाही वातावरणात घडते जिथे संविधान कायद्यासमोर समानता आणि मुक्त जीवन जगण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते.  मग ती स्त्री असो वा पुरुष.  हिंदू मान्यतेनुसार अर्धनारीश्वराचे रूप सर्वांनाच परिचित आहे.  जिथे शिव नराचे तर पार्वती स्त्रीचे प्रतिनिधित्व करते आणि हे रूप कुठे ना कुठे असे दर्शवते की या दोघांशिवाय ही सृष्टी आणि जग दोन्ही अपूर्ण आहे.  मग समाजात महिलांबद्दल द्वेषाची भावना येते कुठून? स्त्री विवाहित असो वा विधवा, तिचे समाजातील स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.  अशा परिस्थितीत केवळ एका राज्यात किंवा एका क्षेत्रातील विधवांविषयीचा विचार बदलून समाजातील ही परंपरा पूर्णपणे बदलणार नाही.  त्यासाठी आता संपूर्ण देशात राजकीय आणि सामाजिक जाणीव जागृत करण्याची गरज आहे, कारण सात कोटी लोकसंख्या काही कमी नाही.  या हक्कासाठी आपण एकत्र यायला हवे, कारण चांगले जीवन जगणे हा प्रत्येकाचा हक्क आहे.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment