Thursday, June 2, 2022

ड्रोन तंत्रज्ञान आणि धोके


सुशासन आणि सरकारी कामाचा वेग वाढवण्यासाठी आता ड्रोनही उपयुक्त ठरू लागले आहेत.  याच्या जोरावर लवकरच भारत ड्रोनची निर्मिती आणि वापराचे केंद्र बनू शकेल, असे मोठे स्वप्न पाहिले जाऊ लागले आहे.  याचा फायदा देशाच्या रोजगार क्षेत्रालाही होईल, ज्याप्रमाणे ऐंशी-नव्वदच्या दशकात देशात संगणक आले, तेव्हा ही यंत्रे केवळ आपल्या व्यवस्थेचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या नाहीत, तर रोजगाराची संपूर्ण परिस्थितीच बदलून गेली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, अनेकदा असे म्हटले गेले आहे की जर ते वरदान असेल तर त्याच्याशी काही शाप देखील जोडलेले आहेत.  डायनामाइट, अणुऊर्जेपासून ते इंटरनेटच्या आविष्कारापर्यंत हे सत्य सिद्ध झाले आहे.  इथे जेव्हापासून जगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आयई) मदतीने शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू झाली, तेव्हापासून धोका अधिकच वाढला आहे.  तंत्रज्ञानाची ही स्पर्धा केवळ देशांच्या लष्करांमध्येच नाही, तर त्याचा परिणाम नागरी जीवनातही दिसू लागला आहे.  तंत्रज्ञान दिवसेंदिवस स्वस्त होत असल्याने ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे.  पण धोका असा आहे की तो दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या हाती लागू नये.  ड्रोन तंत्रज्ञानाच्या बाबतीतही असेच झाले आहे.

तथापि आतापर्यंत बहुतेक संदर्भांमध्ये ड्रोनच्या वापराच्या केवळ सकारात्मक बाबीच समोर आल्या आहेत.  उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणाचे निरीक्षण करणे, विकासाशी संबंधित गोष्टी शोधणे, नकाशे तयार करणे, माल किंवा वैद्यकीय वस्तू पोहचवणे आणि गुन्हेगारांना पकडणे यासारख्या कामांमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे.  समस्याग्रस्त भागात ड्रोनचे निरीक्षण करण्याचे काम अनेक देशांतील पोलिसांच्या कार्यशैलीचा एक भाग बनले आहे.  पण ड्रोनचे महत्त्व त्याहून अधिक असू शकते.  खरे तर पाळत ठेवण्याच्या कामासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरात झपाट्याने होणारी वाढ अधिक महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ पीएम स्वामीत्व योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गावातील मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जात आहे.  यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे लोकांना डिजिटल संपत्ती कार्ड दिले जात आहेत.  म्हणजेच सुशासन आणि सरकारी कामांचा वेग वाढवण्यासाठी ड्रोनही उपयुक्त ठरत आहेत.  याच्या जोरावर लवकरच भारत ड्रोनची निर्मिती आणि वापराचा केंद्र बनू शकेल, असे मोठे स्वप्न पाहिले जात आहे.  याचा फायदा देशाच्या रोजगार क्षेत्रालाही होईल, ज्याप्रमाणे ऐंशी-नव्वदच्या दशकात देशात संगणक आले, तेव्हा ही यंत्रे केवळ आपल्या व्यवस्थेचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या नाहीत, तर संपूर्ण रोजगाराची परिस्थितीच बदलून गेली.

 विविध क्षेत्रातील ड्रोनच्या वापराची यादी करायची म्हटलं, तर अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथे ड्रोनचा वापर आधीच केला जात आहे.  पोलीस आणि लष्करासाठी पाळत ठेवणे, गोदामांचा मागोवा घेणे, अतिक्रमण शोधणे आणि जमिनीवरील सर्वेक्षणाची माहिती, खोल बोगदे किंवा उंच टॉवर्समधील परिस्थितीचे निरीक्षण करणे, व्हिडिओ किंवा फिल्म्सचे शूटिंग इ. विविध प्रकारचे ड्रोन उपलब्ध आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी वन्यजीव अभयारण्यातील शिकारींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर पहिल्यांदा 2013 मध्ये सुरू केला होता.  शेती वाचवण्यासाठी ड्रोन कसे उपयुक्त ठरू शकतात याचे उदाहरण प्रथम फ्रान्समध्ये पाहायला मिळाले.  असे म्हटले जाते की फ्रेंच शहरातील बोर्डेक्स येथील एका वाइन निर्मात्याने द्राक्षांना रोग संसर्गापासून वाचवण्यासाठी कॅमेरा-माउंट ड्रोनचा वापर केला.  हे ड्रोन त्यांच्या उड्डाणाच्या वेळी द्राक्षाच्या वेलींची अगदी जवळून छायाचित्रे घेतात.  यावरून पिके खराब होऊ लागली आहेत किंवा नाही हे दिसून येते.

जर खेळांच्या थेट प्रक्षेपणाबद्दल बोलायचं झालं तर 2012 मध्ये रुपर्ट मर्डोकच्या  फॉक्स स्पोर्ट्स ऑस्ट्रेलिया या कंपनीने प्रथमच एका क्रिकेट सामन्याचे प्रसारण करण्यासाठी कॅमेरा ड्रोनचा वापर केला होता.  2013 मध्ये रग्बी सामन्यातही याचा वापर करण्यात आला होता.  या एरिअल मशिन्सच्या अशा प्रकारच्या वापरामुळे लोकांना त्यांचा आवडता खेळ ज्या कोनातून पाहण्यापासून ते आतापर्यंत वंचित होते त्या कोनातून पाहणे देखील शक्य झाले.एवढेच नाही तर आठ वर्षांपूर्वी पेट्रोलियम कंपनी बीपीने अलास्का येथे ड्रोनचा वापर करून दुर्गम ओसाड भागात पसरलेल्या पाइपलाइनमध्ये काही दोष आहे का हे शोधले होते.  कडाक्याच्या थंडीमुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे पाइपलाइनचे सतत निरीक्षण करता येत नव्हते.  अशा परिस्थितीत ड्रोन उपयोगी पडतात.  नैसर्गिक आपत्तींमध्येही ड्रोनचा चांगला वापर केला जातो.  2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानंतर पर्वत, जंगल आणि निर्जन ठिकाणी अडकलेल्या लोकांचा ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला.  हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणीही ड्रोन जाण्यास सक्षम आहेत.

पण या सर्व उदाहरणांव्यतिरिक्त ड्रोनच्या वापराबाबत काही धोकेही समोर आले आहेत.  ड्रोन तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती लागल्यामुळे आणि शत्रू देशांकडून त्यांचा वापर झाल्याने धोका अधिक आहे.  गेल्या वर्षी 27 जून रोजी जम्मूतील हवाई दलाच्या स्टेशनवर झालेल्या ड्रोन हल्ल्याने आपली लष्करी प्रतिष्ठाने पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे दिसून आले. अतिरेक्यांनी अत्यंत कमी किमतीच्या हलक्या वजनाच्या ड्रोनमधून स्फोटके टाकून लष्कराच्या महागड्या उपायांवर पाणी फिरले आहे. आता असे सिद्ध  होते की, लष्करी यंत्रणेत घुसण्यासाठी जास्त खर्चाची व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही.  दहशतवादी ड्रोनचा वापर करू लागल्याने  त्यांच्या हातात अणुबॉम्बच लागला आहे, असे म्हणायला हरकत नाही. यापूर्वी लष्कराने घेतलेल्या सावधगिरीचा, खबरदारीचा परिणाम म्हणून दहशतवादी कोणत्याही ठिकाणी हल्ले करण्यापूर्वी  शंभरदा विचार करत.  राष्ट्रीय महत्त्वाच्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाच्या किंवा सरकारी अथवा लष्करी आस्थापनांच्या सुरक्षेमध्ये घुसणे दहशतवाद्यांसाठी तितकेसे  सोपे राहिलेले नव्हते.  असे करताना त्यांना मोठी जोखीम पत्करावी लागे आणि जीव जाण्याचाही धोका असतो.  पण ड्रोनने आता त्यांना असे हात आणि पाय दिले आहेत की, ज्यांच्या मदतीने ते सुरक्षा कवच भेदून  आणि जास्त धोका न पत्करता हल्ले करू शकतात.

आजच्या परिस्थितीत कोणतेही ठिकाण दहशतवाद्यांच्या कक्षेबाहेर आहे, असे मानले जाऊ शकत नाही. शिवाय  ड्रोन हल्ल्यात दहशतवाद्यांना मारले जाण्याची किंवा पकडले जाण्याची भीती नसते.  त्यातही हा उपायही कमी खर्चिक आहे.  या हल्ल्यांमध्ये सीमेपलीकडील दहशतवादी संघटनांचा सहभाग उघड करणेही थोडे कठीण झाले आहे.  ड्रोन खूप कमी उंचीवर उडत असल्याने ते रडारच्या कक्षेत येत नाहीत.  अशा स्थितीत भविष्यात ड्रोन हल्ल्यांची संख्या वाढू शकते, हे तज्ज्ञांचे आकलन निराधार नाही. दहशतवाद्यांनी पाठवलेल्या ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर काही लहान आकाराचे इस्त्रायली ड्रोन (स्मॅश-200 प्लस) आयात करत आहे.  या बंदुका किंवा रायफलवर बसवता येतात.  याच्या मदतीने हमला केलेल्या छोट्या ड्रोनवर हल्ला करून त्यांना सहज लक्ष्य करता येते.  सध्या आपला देश अशा धोक्यांना तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम नाही.  मात्र या घटनांमधून धडा घेऊन अतिशय कडक बंदोबस्त करून दहशतवादी कारवाया मोडीत काढल्या तरच  लोकांना दिलासा  मिळेल.  धोरणात्मक स्तरावर ड्रोन तंत्रज्ञानाला चालना देऊन आणि सरकारी यंत्रणेच्या गांभीर्याने प्रयत्न करण्याने हे काम नक्कीच पूर्ण होईल.  मात्र त्यासाठी ड्रोन फेस्टिव्हल्सच्या पलीकडे जाऊन ही बाब लक्षात घेऊन योजना वेगाने राबविण्याची गरज आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

1 comment:

  1. भारत डोन तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर होत आहे. 27 मे 2022 रोजी पंतप्रधान मोदींनी दिल्लीत ड्रोन महोत्सवाची सुरुवातही केली होती, त्यावेळी त्यांनी ड्रोन तंत्रज्ञान हे भारताचे भविष्य असल्याचे सांगितले होते. आता बंगळुरूची एक कंपनी ड्रोनच्या सह्याने वैद्यकीय सेवा देण्याची तयारी करत आहे. बेंगळुरू स्थित स्टार्ट अपने अरुणाचल प्रदेशातील आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यासाठी पायलट प्रकल्प सुरू केला आहे.

    ReplyDelete