Sunday, June 5, 2022

छबी यांच्यावर चित्रपट निर्मात्यांचा विश्वास


एकाद्या गोष्टीचा नाद लागला की काही खरं नाही. सतत त्याचाच विचार डोक्यात घोळत असतो. असाच नाद छबी विश्वास यांना लागला होता. अगदी ऐन तारुण्यात त्यांना नाटकाचा नाद लागला होता. अर्थात हा संगतीचा परिणाम होता. दिग्दर्शक आणि अभिनेता शिशिर विश्वास याला कारणीभूत होते. 1924 मध्ये 'सीता' हे नाटक मंचावर आल्यानंतर शिशिर विश्वास यांचा दबदबा इतका वाढला की, त्यांना आधुनिक रंगमंचावर उत्स्फूर्तता आणणारा क्रांतिकारक म्हटलं जाऊ लागलं.शिशिरच्या संपर्कात आल्यावर छबी यांनादेखील 

एक्टिंगचा जाम नाद लागला. त्यांना वाटायचं की, रंगमंचावरच खिळून राहावं. ‘नादेर निमाई’ या नाटकामुळं त्यांचं नाव झालं. नंतर त्यांनी कधी विमा कंपनीत काम केलं, कधी कुठं धंदा केला. रोजगाराची अनेक कामं केली,पण नाटकाचा नाद काही सुटला नाही. शेवटी नाद वरचढ ठरला आणि त्यांनी सगळं सोडून थिएटरवर उतरले. आणि यावेळी कंबर कसून असे काही या क्षेत्रात उतरले की,सत्यजित राय आणि राज कपूर यांची मनं जिंकली. राज कपूर यांना तर नेहमी वाटत असे की, असा अभिनेता कलाकार हिंदीत का जन्माला आला नाही. छबींच्या अभिनयावर राज कपूर यांचा पक्का विश्वास बसला होता. त्यांनी 'जागते रहो' (1956) हा त्यांचा चित्रपट बंगाली भाषेत 'एकदिन रात्रे' या नावाने केला तेव्हा त्यातील मुख्य भूमिका छबी विश्वास यांनाच दिली.

40 आणि 50 च्या दशकात बंगाली चित्रपटांचा देश-परदेशात डंका वाजत होता. गेल्या दहा-पंधरा वर्षात बंगाली चित्रपटांनी सर्वश्रेष्ठ चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला नसेल,पण पन्नासच्या दशकात बांगला चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बोलबाला होता. हा सुवर्णकाळ 'पथेर पांचाली' (1955) पासून सुरू झाला होता. छबी विश्वास यांची मुख्य भूमिका असलेला 'काबुलीवाला' या चित्रपटाने 1957 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता आणि याच वर्षी त्यांच्या 'एकदिन रात्रे' ला 'सर्टिफिकेट ऑफ मेरिट' दिला गेला होता. याशिवाय त्यांना 1960 मध्ये संगीत नाटक अकादमी अवार्ड मिळाला होता.

छबी विश्वास नाटक क्षेत्रातून चित्रपट दुनियेत आले ते 1936 मध्ये.'अन्नपूर्णार मंदिर' हा त्यांचा पहिला चित्रपट. न्यू थिएटर्सच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नजमुल हसन देविका रानीला घेऊन पळून गेले,तेव्हा हसन यांना बॉम्बे टॉकीजमधून काढून टाकण्यात आले. मग ते मुंबईतून कोलकात्याला आले आणि न्यू थिएटर्समध्ये काम करू लागले.

छबी विश्वास यांचा 'काबुलीवाला', 'जलसाघर', 'देवी', 'कंचनजंगा', 'दादा ठाकूर' सारख्या बांगला चित्रपटांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण झाला होता. सत्यजित राय तर त्यांच्यावर इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी 'जलसाघर’, ‘देवी’ आणि ‘कंचनजंगा’ हे तीनही चित्रपट छबी यांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिले होते.राय यांनी पहिल्यांदा स्वतः 'कंचनजंगा'ची पटकथा लिहिली तेव्हा, त्याची प्रमुख भूमिका छबी विश्वास यांनाच दिली होती. 13 जुलै 1900 रोजी जन्मलेल्या छबी यांचे 11 जून  1962 मध्ये एका रस्ता अपघातात  निधन झाले ,तेव्हापासून त्यांनी मध्यमवयीन  भूमिकाच लिहिणं बंद करून टाकलं. छबी नंतर तसा अभिनेता राय यांनाच काय कुणाच फिल्म निर्मात्याला मिळाला नाही.

छबी विश्वास यांच्या योग्यतेवर सत्यजित रायसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फिल्मकाराचा अतुट विश्वास होता. दोघे फक्त चारच वर्षे एकत्र होते.या कालावधीत दोघांनी मिळून चार चित्रपट केले. राज कपूरदेखील छबी विश्वास यांचे प्रसंशक होते. 'जलसाघर'चे विश्वंभर राय, 'देवी'चे कालिकिंकर चौधरी, 'कंचनजंगा' चे इंद्रनाथ राय आणि 'दादा ठाकूर' चे दादा ठाकूर ही पात्रे बांगला प्रेक्षकांची एक पिढी अजूनही विसरलेली नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment