Sunday, June 12, 2022

गोपीनाथ बोरदोलोई: आधुनिक आसामचे शिल्पकार


गोपीनाथ बोरदोलोई हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर स्वातंत्र्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत आसामला चीन आणि पाकिस्तानपासून वाचवले आणि भारताचा भाग बनवले.  त्यांना आधुनिक आसामचे निर्मातेदेखील म्हटले जाते.  गोपीनाथ बोरदोलोई यांचा जन्म आसाममधील नौगाव जिल्ह्यातल्या  रोहा नावाच्या गावात 6 जून 1890 रोजी झाला. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातून स्थलांतरित होऊन आसाममध्ये स्थायिक झाले.  ते 1907 मध्ये मॅट्रिक आणि 1909 मध्ये इंटरमिजिएट उत्तीर्ण झाले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) येथे गेले.  तेथून त्यांनी बी.ए आणि 1914 मध्ये एमएची परीक्षा उत्तीर्ण केली.  त्यानंतर तीन वर्षे कायद्याचे शिक्षण घेऊन गुवाहाटीला आले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोनाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.  पुढे 1917 मध्ये वकिली सुरू केली.  त्या काळात गांधीजी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 'अहिंसा' आणि 'असहकार' या शस्त्रांचा वापर सुरू केला होता.  गांधीजींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.  1922 मध्ये जेव्हा आसाम काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा गोपीनाथ बोरदोलोई यांनीही आपली प्रस्थापित वकिली सोडून स्वयंसेवक म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि यातूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. या चळवळीत सक्रिय भूमिका घेऊन बोरदोलोई यांनी लोकांमध्ये देशभक्ती रुजवण्याचा उद्देशाने दक्षिण कामरूप आणि गोलपारा इत्यादी जिल्ह्यांचा पायी दौरा केला.  परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.  त्यामुळे ब्रिटिश सरकार त्यांच्याकडे बंडखोर म्हणून पाहू लागले.  त्यांना अटक करून एक वर्षाची शिक्षा झाली.
त्याच वेळी चौरीचौरा घटना घडली आणि गांधींनी 'असहकार आंदोलन' मागे घेतले.  यानंतर बोरदोलोई पुन्हा गुवाहाटीला आले आणि पुन्हा वकिली सुरू केली.  याच काळात 1932 मध्ये ते गुवाहाटी म्युनिसिपल बोर्डाचे चेअरमन झाले आणि त्यानंतर राजकीय कार्यांपासून दूर राहून ते सामाजिक कार्यात रमले.  त्याचबरोबर आसामच्या विकासासाठी उच्च न्यायालय आणि विद्यापीठाची मागणीही उचलून धरली. 1946 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळवून सरकार स्थापन केले, त्यानंतर गोपीनाथ बोरदोलोई आसामचे मुख्यमंत्री (पंतप्रधान) बनले.  तेव्हापासून ते आसामच्या लोकांसाठी पूर्णपणे एकनिष्ठ झाले.  भारताच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ब्रिटिश सरकारने 1946 मध्ये कॅबिनेट कमिशनची स्थापना केली, ज्यामध्ये भारताच्या विविध भागांना स्वतंत्रपणे विभागले गेले आणि 'ग्रुपिंग सिस्टम' अंतर्गत राज्ये तीन भागात ठेवण्यात आली.  काँग्रेसच्या नेत्यांना ही युक्ती समजू शकली नाही आणि त्यांनी या योजनेला मान्यता दिली, परंतु गोपीनाथ बोरदोलोई यांनी त्याला तीव्र विरोध केला.  त्यांच्या दूरदृष्टीमुळे आसाम इंग्रजांच्या कारस्थानाला बळी पडण्यापासून वाचला आणि भारताचा अविभाज्य भाग राहिला.
'शेर-ए-आसाम' या लोकप्रिय नावाने लोक त्यांचा आदर करतात.  वयाच्या साठव्या वर्षी गुवाहाटी येथे 5 ऑगस्ट 1950 रोजी त्यांचे निधन झाले.  1999 मध्ये भारत सरकारने त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न'  हा भारताचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले.  गोपीनाथ बोरदोलोई हे राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिभावान लेखक होते.  तुरुंगात असताना त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.  'अनासक्तियोग', 'श्रीरामचंद्र', 'हजरत मोहम्मद', 'बुद्धदेव' ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आसाममध्ये अनेक महत्त्वाच्या संस्था उभ्या राहिल्या.  त्यापैकी गुवाहाटी विद्यापीठ, आसाम उच्च न्यायालय, आसाम वैद्यकीय महाविद्यालय, आसाम पशुवैद्यकीय महाविद्यालय  प्रमुख आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment