Friday, June 3, 2022

तुम्ही तुमच्या देशासाठी काय करू शकता?


इतकं मोठं युद्ध होतं, की मृत्यू पुन्हा पुन्हा स्पर्श करून जात होता. जमिनीवरही तीच परिस्थिती, आकाशातही तीच आणि पाण्यावरही तीच.  सर्वत्र माणूस माणसाच्या विरोधात कारस्थान करण्यात गढून गेला होता, माणूस हा माणसाचा पारधी बनला होता.  वैर निभावत काहीजण  आपली भूमी, आकाश आणि पाण्यापासून दूर निघून गेले होते, तर काहीजण आपली भूमी, आकाश आणि पाण्याच्या रक्षणात मग्न होते.  जपानचे शूर सैनिक वारंवार अमेरिकनांना लक्ष्य करत होते आणि अमेरिकन सैनिक स्वतःच्या बचावात व्यस्त होते. आताच्या जगात युद्धाला काही नियम नाहीत. पूर्वज खूप श्रेष्ठ होते,ते रात्रीच्या वेळी युद्ध करत नव्हते.  सायंकाळ झाली की,सैन्य छावणीत परतायचे, पण आता रात्रीच जास्त धोका आहे. माणसाने काळाबरोबर प्रगती केली आहे असे म्हटले जाते,पण  शत्रूंना माणूस समजू नका हे प्रगतीने शिकवले आहे का? असा प्रश्न पडतो.

2 ऑगस्ट 1943 ची ती रात्र सुरू झाली होती, रात्र उतरणीला लागली होती. चंद्राशिवायची रात्र मोठी गडद होती आणि समुद्रात भरती-ओहोटी नव्हती.  काही जहाज तरंगताना आणि लुकलुकताना दिसत होते, ते शत्रूचे जहाज आहे की मित्र जहाज आहे ,हेच कळत नव्हते. पीटी 109 नावाच्या या लहान जहाजात 12 अमेरिकन नवसैनिक स्वार होते.  सतर्क होते.  तेवढ्यात त्यांना  जवळजवळ चौपट आकाराची एक जपानी युद्धनौका वेगाने त्यांच्या जवळ येताना दिसली. वाटत होतं,मृत्यू हे भयंकर रूप घेऊन येत आहे. बघता बघता ते  जपानी जहाज खूप जवळ आले.  

असं वाटत होतं की, मृत्यू भयंकर रूपाने जवळ येत आहे. बघता बघता जपानी जहाज अगदी जवळ आले.  पीटी 109 च्या कमांडरने खूप प्रयत्न केले, जपानी जहाजाच्या मार्गातून बाजूला होण्याचे! अतिशय मजबूत जपानी जहाज त्यांना धडकण्याच्या इराद्यानेच पुढे येत होते आणि तसेच झाले.  एक जोरदार टक्कर बसली. ते भयंकर विनाशकारी दृश्य.  अमेरिकन पीटी 109 मध्यभागी दोन भागात विभागले.  काही अमेरिकन सैनिकांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या, तर काहीजण टक्कर होऊन फेकले गेले.

त्या जहाजाच्या कमांडरलाही पाठीवर जबर मार लागला होता.  त्याचे शरीर सडपातळ होते, पण पाठीला आधीच दुखापत झाली होती, त्यात ही धडक. त्यामुळे त्याला आता मृत्यू आला असे वाटू लागले.  क्षणभर डोळे मिटले.  काहीही ऐकू येत नव्हते, बघताही येत नव्हते. काही काळ तसाच गेला. हळूच डोळे उघडून त्याने आजूबाजूला पाहिले. समुद्राच्या खार्‍या पाण्यात, नानाविध वस्तूंची टक्कर  होऊन त्याच्या अंगाला दुखापत झाली होती.  काही क्षण तसेच गेले, मग वाटलं की मरण आलं नाही. जपानी जहाज जसे आले होते तितक्याच वेगाने ते माघारी फिरले.

जपान्यांना वाटलं असेल की, एवढ्या मोठ्या तगड्या टकरीनंतर  कोण वाचले असेल? पण ज्याच्या नशिबात आयुष्य लिहिलेलं असतं, त्याला काही ना काही सपोर्टला मिळतोच.  जिवंत आहे याची खात्री झाल्यावर समुद्रात पोहत असताना मग त्याने त्याच्या साथीदारांना आवाज देण्याचं काम सुरू झालं. कोणी उरले असेल तर आवाज द्या.  कोणाला मदत हवी असेल तर आवाज द्या म्हणत मदतीला जाणं,हे देखील सेनापतीचेच काम आहे.  तेव्हा असे दिसले की काही सैनिक जहाजाचा तुटलेला पण तरंगणाऱ्या तुकड्याला धरून सुरक्षितपणे  पाण्यात उभे होते. एका साथीदाराचा आक्रोश ऐकू आला.

त्याने जवळ जाऊन पाहिले तर तो जबर जखमी झाला होता. जहाजाला लागलेल्या आगीमुळे तो पुरता भाजला होता आणि जखमीही झाला होता.  कमांडरने त्याला त्याच्या जवळचे लाइफ जॅकेट दिले आणि त्याला दोरीने बांधले. दोरीचे एक टोक दातांनी धरून बाकीच्या सोबत्यांच्या दिशेने पोहत निघाला.  थोड्या वेळाने जिवंत असलेल्या सगळ्यांना मोजल्यावर कळलं की, दोन साथीदार कमी झाले आहेत.  बाकीच्यांपैकी काहींनी हिंमत गमावली आणि त्यांनी शेवटच्या घटका मोजायला सुरुवात केली, पण कमांडर मात्र अजिबात खचला नाही.

तेवढ्यात सकाळचा प्रकाश उजळू लागला होता,तेव्हा कमांडर मोठ्या उत्साहाने म्हणाला, 'आम्ही आमचे प्राण वाचवले आहेत आणि आम्हाला आता सुरक्षित ठिकाणी पोहोचायचे आहे.  हिम्मत ठेवा.  खरा सैनिक कधीही हार मानत नाही.'

 सर्वजण एकमेकांना आधार देत पोहत पोहत एका छोट्या बेटावर पोहोचले, पण ते निर्जन होते, मदतीसाठी तिथे कोणीच उपलब्ध नव्हते. म्हणून मग सर्वजण दुसऱ्या बेटावर पोहोचले.  त्या बेटावर नारळ तरी मिळाले, त्यामुळे खाण्यापिण्याची थोडीफार व्यवस्था झाली.

दोन स्थानिक लोक दिसल्यावर कमांडरने कच्च्या नारळावर लिहून आपल्या सैन्याला संदेश पाठवला. तब्बल सहा दिवसांनंतर सर्वांचा बचाव झाला.  राजधानीत परतल्यावर, कमांडर लेफ्टनंट जॉन एफ. केनेडी यांना सर्वोच्च लष्करी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.  संपूर्ण देश त्यांच्याकडे 'हिरो' म्हणून पाहू लागला.  तीन वर्षांनंतर ते खरा हिरो म्हणून अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आले.  1952 मध्ये त्यांनी यूएस सिनेटमध्ये प्रवेश केला आणि 20 जानेवारी 1961 रोजी अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.  29 मे 1917 रोजी जन्मलेले केनेडी आपल्या पहिल्याच भाषणात म्हणाले होते, 'तुमचा देश तुमच्यासाठी काय करू शकतो हे विचारू नका, तुम्ही तुमच्या देशासाठी काय करू शकता? हे पहा.' -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


1 comment: