खेळावर आधारित चित्रपटांसाठी प्रेक्षकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना आकर्षित केले आहे आणि अशा अनेक चित्रपटांमधून खेळाडूंच्या संघर्षाची कहाणी लोकांनी पाहिली आणि समजून घेतली आहे. खेळावर चित्रपट बनवणे सोपे नसते, त्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांना खूप धाडस करावे लागते. 'मेरी कॉम' चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेक निर्माता -दिग्दर्शक महिला खेळाडूंवर अनेक चित्रपट बनवत आहेत. यामध्ये प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. देशासाठी महिला विभागातील प्रतिभावान खेळाडूंची नवीन पिढी तयार करण्यासाठी असे चित्रपट नक्कीच उपयुक्त ठरतील. आमिर खानचा 'लगान' असो किंवा 'जो जीता वो सिकंदर' असो किंवा शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' असो किंवा अक्षय कुमारचा हॉकीवर आधारित चित्रपट 'गोल्ड' असो, सलमान खानचा चित्रपट 'सुलतान'सुद्धा आहे. जवळपास प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे इतकेच नव्हे तर यातून प्रेरणा-प्रोत्साहनही मिळाले आहे. अशा चित्रपटांच्या यशाचे विशेष कारण म्हणजे ज्याप्रमाणे कलाकारांना पसंत केले जाते, त्याचप्रमाणे खेळाडूंकडेही आदराने पाहिले जाते. यामुळे जेव्हा जेव्हा खेळाडूवर चित्रपट बनतो तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना तो पाहायला नक्कीच आवडतो. क्रिकेटर धोनीवर आधारित 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' असो, किंवा मिल्खा सिंगवर आधारित 'भाग मिल्खा भाग', कपिल देववरील '83' नावाचा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे.
महिलांमध्ये चॅम्पियन असलेल्या 'मेरी कॉम' या चित्रपटात प्रियांका चोप्राने बॉक्सरची भूमिका साकारली तेव्हा प्रेक्षकांनी तिचे मनापासून कौतुक केले. त्याचप्रमाणे 'दंगल' फातिमा शेख आणि 'सांड की आंख'मध्ये तापसी पन्नू शूटरच्या भूमिकेत दिसली. खेळावर आधारित चित्रपटांना नेहमीच पसंती दिली गेली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.हीच परंपरा पुढे नेत आता आणखी स्पोर्ट्स चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे यातले बहुतांश चित्रपट महिला खेळाडूंवर केंद्रित आहेत. यात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री खेळाडू म्हणून दिसणार आहेत.
भविष्यात असे अनेक चित्रपट येत आहेत ज्यात अभिनेत्री सशक्त खेळाडू म्हणून दिसणार आहेत. 'छपरा एक्सप्रेस'मध्ये अनुष्का शर्मा भारतीय क्रिकेट महिला संघातील सर्वात वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. आर बाल्की यांचा चित्रपट 'घूमर' हा देखील खेळावर आधारित चित्रपट असून सैयामी खेर या चित्रपटात क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे.'घूमर'मध्ये सैयामी खेरसोबत अभिषेक बच्चन हिरो म्हणून दिसणार आहे. विशेष म्हणजे सैयामी ही क्रिकेटर राहिली आहे. तापसी पन्नूने याआधीच 'सांड की आंख'मध्ये तिचा परफॉर्मन्स दाखवला आहे आणि आता तीच तापसी तिच्या 'शाबाश मिठू' या नवीन चित्रपटातून तिची प्रतिभा दाखवण्यास सज्ज झाली आहे. 'शाबाश मिठू'मध्ये तापसी पन्नू क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे.
'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये जान्हवी कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये जान्हवीसोबत राजकुमार राव आहे. याशिवाय अभिनेत्री रसिका दुगलला आपण 'स्पाइक' या चित्रपटात व्हॉलीबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दपाहणार आहोत. ही भूमिका साकारण्यासाठी रसिकाने मुंबईत तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे.महिला खेळाडूंवर केंद्रित चित्रपटांशिवाय फुटबॉलवर आधारितही एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'मैदान'. हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम आणि मोहम्मद यांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगणने सय्यद अब्दुल रहीम या फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मैदान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment