सांगली विश्रामबागमधलं जयहिंद कॉलनीतलं महाराष्ट्र रेसिडेंशील हायस्कूल आज देशभक्त नाथाजी लाड हायस्कूलमध्ये रूपांतरित झालं आहे. मात्र महाराष्ट्र रेसिडेंशील हायस्कूल (एमआर) ही माझी जुनी शाळा. सन 1986-87, 1987-88,1988-89,1989-90 या कालावधीत सातवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण या शाळेत झालं आहे. (माझं चौथीपर्यंतच शिक्षण जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 जत येथे आणि पाचवी-सहावीचं शिक्षण रामराव विद्यामंदिरमध्ये) एमआरमध्येच हॉस्टेल होते.तिथे राहत होतो.श्री.मुजावर सर वॉर्डन होते. अभ्यासाबाबत फार जागरूक होते.पहाटे पाच वाजता अभ्यासाला बसवत. मुले अभ्यास करतात की नाही हे पाहण्यासाठी हातात छडी (फोक)घेऊन मधी आधी फिरत. कुणी झोपला असेल तर छडी चा प्रसाद मिळत असे. सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत अभ्यासाला बसवले जाई. तिथे मोठा हॉल होता.( शाळेचे कार्यक्रमही इथेच होत.) मलाही याचा प्रसाद अनेकदा मिळाला आहे.
टीव्ही-सिनेमा पाहण्याचं आकर्षण मला इथेच लागलं. होस्टेलमध्ये याच कालावधीत कलर टीव्ही आला. शनिवार-रविवार सिनेमा आणि रामायण इथेच पाहिले. तेव्हा दूरदर्शनवर फार कार्यक्रम नव्हते. संध्याकाळी दोन तास कार्यक्रम पाहायला मिळायचे. सकाळी उठून गार पाण्याने अंघोळ करणे आणि स्वतःचे कपडे स्वतः धुणे हा इथला नवा अनुभव. रव्याची खीर, चपाती आणि बटाटे घालून केलेला फोडणीचा भात हे आमचे रविवारचे पक्वान्न होते. गणपतीच्या काळात सांगली गणेश दर्शन हा एक आवडीचा छंद होता. या काळात पोलीस लाईनमध्ये पडद्यावर सिनेमे पाहायला मिळायचे. तिथे जवळ एक व्हिडिओ सेंटर होता. तिथे हमखास सिनेमे पाहायचो. 'कयामत से कयामत तक' इथेच पाहिला होता.
परवा सहज विश्रामबागला जाण्याचा योग आला. माझी जुनी शाळा पाहिली.पडझड झालेली.काही भाग संपुष्टात आलेला. आता या शाळेचे स्थलांतर आणि नामांतर झाले आहे. कुल्लोळी हॉस्पिटल जवळ ही शाळा देशभक्त नाथाजी लाड या नावाने भरते.यालाही आता बरीच वर्षे झाली आहेत. श्री. वाघमारे सर जे इंग्रजी शिकवत ते आणि सौ.देशमुख मॅडम, पांढरे मॅडम यांची नाव आठवतात. नाथाजी लाड यांच्या सूनबाई सुद्धा आम्हाला शिक्षिका म्हणून होत्या,एवढं आठवतं. 65 टक्के गुण मिळून इथून दहावी उत्तीर्ण झालो होतो.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
छान
ReplyDelete