Monday, June 20, 2022

अक्षयची लोकप्रियता घसरली?


बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अक्षयचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होतात, पण सध्या अक्षयचं स्टारडम संपलं की काय, अशी शंका यायला लागली आहे. सध्या अक्षयच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा हवा तसा  प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अक्षयचा 'बच्चन पांडे' बॉक्स आफिसवर फ्लॉप ठरला. त्यापाठोपाठ त्याचा 'सम्राट पृथ्वीराज'सारखा बिग बजेट सिनेमादेखील पडद्यावर काहीच कमाल करू शकला नाही. एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांनंतर अक्षयचे स्टारडम धोक्यात आल्याचे दिसते. आता असं म्हणे त्याच्या या घटत्या लोकप्रियतेचा परिणाम त्याच्या मानधनावरही दिसू लागला आहे. त्यामुळे अक्षयने त्याच्या फीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. अक्षयचा आगामी ‘बडे मियां, छोटे मियाँ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, या चित्रपटात अक्षयसोबत टायगर श्रॉफही दिसणार आहे. आता या बिग बजेट चित्रपटाला ब्रेक लागणार अंसल्याचेही दिसत आहे. कारण 'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप झाल्यानंतर 'बडे मियां, छोटे मियां' हा चित्रपट तूर्तास तरी थंडबस्त्यात गेल्याचं कळत आहे. त्यामुळे अक्षय कुमार आता या चित्रपटातून ब्रेक घेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

राजीव हरी ओम भाटिया असं खरं नाव असलेल्या अक्षयने व्यावसायिक दृष्टीने अक्षय कुमार हे नाव स्वीकारलं आहे. हा भारतीय वंशाचा कॅनेडियन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. 30 वर्षांच्या अभिनयात कुमारने जवळपास 100 हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून परिचित असलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. 9 सप्टेंबर1967 अशी जन्मतारीख असलेल्या या अभिनेत्याने आता 55 व्या वर्षात पर्दापण केले आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरकत्या आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत.नेमाने पहाटे चार वाजता उठून आपल्या कामाला सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याला पुढील काळ कठीण दिसतो आहे. गेल्या वर्षभरात बॉलिवूडचा कोणताच अभिनेता हिट झालेला नाही. उलट दक्षिण अभिनेत्यांनी आणि चित्रपटांनी यशाची शिखरे गाठली आहेत. बॉलीवूड अभिनेत्यांच्या त्याच त्याच पठडीतल्या चित्रपटांना प्रेक्षक कंटाळले आहेत. यात अक्षय कुमारचाही समावेश आहे.

सध्याच्या घडीला अक्षय कुमार या आघाडीच्या बॉलीवूडच्या स्टारचे  चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक कोसळत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अक्षय कुमारचे पाच चित्रपट ओळीने फ्लॉप झालेत. यात 'बेलबॉटम”, लक्ष्मी”, 'अतरंगी रे”, 'बच्चन पांडे आणि आता 'सम्राट पृथ्वीराज” या चित्रपटाची भर पडली. 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाच्या नावामुळे वादही निर्माण झाला होता. चित्रपट निर्मात्यांनी फार खळखळ न करता 'पृथ्वीराज चौहान' या चित्रपटाचे नाव बदलून 'सम्राट पृथ्वीराज' केले. बिग बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मात्र काहीच कमाल दाखवली नाही. 

 अक्षय कुमारचा विचार केला तर त्याने केलेल्या सहा चित्रपटांपैकी 'सूर्यवंशी' हिट हा एकमेव चित्रपट हिट झाला होता.  मात्र 'सूर्यवंशी"मध्ये अजय देवगण, रणवीर सिंगसारखे यशस्वी आणि कसलेले कलाकारही होते. त्यामुळे या चित्रपटाचे श्रेय एकट्या अक्षय कुमारला देता येणार नाही. 'पृथ्वीराज'च्या भूमिकेत अक्षय कुमारला लोकांनी मूळात स्वीकारले नाही. अलीकडच्या काळात अक्षयने गंभीर भूमिकांपेक्षा विनोदी भूमिकांवर भर दिला नव्हता. निव्वळ मनोरंजन म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.त्यामुळे या  कॉमेडी अक्षय कुमारची सिरीयस भूमिका लोकांच्या पचनी पडली नाही. याशिवाय अक्षयचे चित्रपट फ्लॉप व्हायला आणखीही काही कारणे आहेत.अक्षय कुमारची 'बच्चन पांडे’ ही फिल्म एका साऊथ सिनेमाची रिमेक होती. यात त्याचा प्रभाव दिसून आला नाही.'पृथ्वीराज ’ ची पटकथा सशक्त तर नव्हतीच, मात्र त्यात अनेक कच्चे दुवेही होते.  प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यासाठी जो वेगळेपणा लागतो, तो या सिनेमांमध्ये नव्हता. किंबहुना हा चित्रपट सामान्य श्रेणीतील होता, असे आपण म्हणू शकतो. 'सम्राट पृथ्वीराज'चे प्रमोशन जोरदार करण्यात आले. अक्षय कुमारने फिल्मच्या प्रमोशनसाठी गंगेत डुबकी लावली, महाआरती केली. अगदी गृहमंत्र्यांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसाठी विशेष शो ठेवला. आपल्या शालेय पाठ्यपुस्तकात हिंदू राजांबद्दल फार माहिती नाही, असे विधानही केले. माध्यमांमध्ये एवढी चर्चा झालेला 'पथ्वीराज चौहान" सिनेमा मात्र प्रत्यक्षात प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्यात अपयशी ठरला. साहजिकच त्याचे स्टारडम संपले की काय अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

2 comments:

  1. अक्षयचा 'रक्षाबंधन' देणार आमिरच्या 'लाल सिंग चड्डढा' शी टक्कर

    बा अभिनेता अक्षय कुमारचे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असल्यामुळे अनेक जण त्याला ट्रोल करत आहेत. त्याचा आगामी चित्रपट 'रक्षाबंधन' 19 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहात दाखल होतोय. 'रक्षाबंधन'ची रिलीज डेट समोर आल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या 'लाल सिंग चट्टा'ला टक्कर देणार असल्याचे समजते आहे. कारण आमिरचा'लालसिंग चड्डढा ' हा चित्रपटदेखील 19 ऑगस्टलाच रिलीज होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये जोरदार लढत होणार आहे. आता अक्षय आणि आमिर यांच्यापैकी कोण बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

    ReplyDelete
  2. अक्षयचे यावर्षी 'बच्चन पांडे’, 'पृथ्वीराज', 'रक्षाबंधन', 'कठपुतली', राम सेतू! हे चित्रपट प्रदर्शित झाले; परंतु दुर्देवाने त्याच्या कोणत्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही. तरीही अक्षयचे लागोपाठ बरेच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने अक्षय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर होता. असे असतानाच अक्षय आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची बातमीदेखील समोर आली. “वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात अक्षय शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे; “ परंतु अक्षयला महाराजांची भूमिका दिली या गोष्टीचा का अनेकांनी निषेध दर्शवला. त्याने त्याच्या महाराजांच्या लूकमधील फोटो सोडल मिडियावर शेअर करताच तो नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे गेला.

    ReplyDelete