हरियाणाच्या सोनीपतची मानुषी छिल्लर हिने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला. लागलीच तिला बॉलिवूडची ऑफर आली. आता ती पहिल्यांदाच 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात तिने राजकुमारी संयोगीता यांची भूमिका साकारली आहे. 'सम्राट पृथ्वीराज' हा बाराव्या शतकातील कथा आहे. आपल्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणं ही त्यावेळची मोठी आव्हानात्मक गोष्ट होती. पण राजकुमारी संयोगीता हिंमत न हारता आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून प्रेम सिद्ध करते. या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी चित्रपटातील मानुषीच्या कामाचे कौतुक होत आहे. ती आता या चित्रपट सृष्टीत स्थिरावू शकते, असे म्हणायला हरकत नाही. मानुषीचा जीवनपट प्रेरणादायी आहे.
ती अशा राज्यातून आली आहे की, जिथे मुलींच्याबाबतीत अजूनही पारंपारिक विचारांना थारा दिला जातो. तिथे स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे साहजिकच मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या बरीच कमी आहे. मात्र मुलींना संधी मिळाली तर त्या आपले घरदार, समाजच नव्हे तर गाव,शहर, प्रदेश आणि आपल्या देशाचेही नाव संपूर्ण जगात रोशन करू शकतात. मानुषी सोनीपतच्या भगतफूल सिंह महिला मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी आहे. ती मूळची झज्जर जिल्ह्यातल्या बामडोली गावची राहणारी आहे. तिचे वडील मित्रवसु आणि आई नीलम दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. मानुषीने मे 2017 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. लागलीच 118 देशांमधल्या सौंदर्यवतींना मागे टाकून तिने मिस वर्ल्डचा किताब पटकवला. पहिल्यांदा ती टॉप 40 मध्ये आली.मग टॉप 15. त्यानंतर टॉप 10 आणि 5. पुढे टॉप तीनमध्ये आली आणि मिस वर्ल्ड बनली. तिने भारताचे नाव संपूर्ण जगात केले.
मिस वर्ल्डच्या शेवटच्या फेरीत तिला विचारलेल्या प्रश्नाला तिने दिलेले आईचा महिमा गाणारे उत्तर ऐकून संयोजकांनी तिला हा ताज बहाल केला होता. तिच्या उत्तराने तिने स्वत:ला आणि आईच्या जगण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.तिला प्रश्न विचारण्यात आला होता की, तुझ्या दृष्टीने सगळ्यात अधिक पगार मिळवणारा व्यवसाय कोणता आहे? त्यावर ती म्हणाली होती की, जगात एक आई आपल्या कुटुंबासाठी जी सेवा देते, त्यापेक्षा आणखी कोणता दुसरा व्यवसाय नाही. त्यामुळे आईच जगात सगळ्यात अधिक पगार मिळवण्यासाठी सक्षम आहे. मात्र हा पगार तिला पैशाच्या स्वरुपात नव्हे तर प्रेम आणि सन्मानाच्या स्वरुपात मिळायला हवा. या तिच्या उत्तराने तिला अन्य मिस वर्ल्ड स्पर्धकांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
मनुषीने लहानपणापासूनच मिस वर्ल्ड बनण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते साकार करून भारताला 17 वर्षानंतर हा गौरव मिळवून दिला आहे. या स्पर्धेसाठी तिने जीव तोडून मेहनत केली होती. तंदरुस्तीबाबत ती फारच सावध होती. कुचिपुडी या शास्त्रीय नृत्यात प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ती चांगली नर्तक आहे. जो माणूस आत्मविश्वासाने सांगतो की, तो सुंदर आहे. सुंदर आहे तर आहेच. त्यामुळे प्रत्येक माणसांत पहिल्यांदा आत्मविश्वास येणं महत्त्वाचं आहे. तिने नववीला असतानाच डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी तिने डॉक्टरी शिक्षणात ब्रेक घेतला होता.पण ही तिची इच्छा अपूर्ण राहिली आहे. इतर देशातील भ्रमण आणि सिनेमा शूटिंग त्याचबरोबर कोरोना काळ यामुळे तिला डॉक्टरकी पूर्ण करता आली नाही. आता ती डॉक्टर होणार की अभिनेत्री यासाठी तिला काही कालावधी द्यावा लागेल.
कुचिपुडी नर्तक असलेल्या मनुषीने या स्पर्धेत बॉलीवूड स्टाईल नगारा नृत्य सादर केला होता.यात आपल्या देशाचे क्लचर आणि मॉडर्न स्टाईलची ओळख करून देण्यात ती यशस्वी झाली होती. हे नृत्य पसंद केले गेले. मनुषी छिल्लर शक्ती प्रोजेक्ट नावाचे एक अभियान चालवत आहे. महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेच्याबाबतीत जागरूक करण्याचे काम ही संस्था करते. हा प्रोजेक्ट तिच्या मनाच्या अगदी जवळचा आहे.या माध्यमातून तिने आतापर्यंत हजारो महिलांच्या आयुष्यात परिवर्तन आणले आहे. यापूर्वीच्या मिस वर्ल्ड, मिस युनिवर्ससारखे किताब पटकावलेल्या सौंदर्यवतींनी बॉलीवूडचा मार्ग पत्करला. बॉलीवूडचा झगमगाट त्यांना आकर्षित करतो. मानुषीही आता याच क्षेत्रात आली आहे. 'सम्राट पृथ्वीराज' नंतर ही तिला काही ऑफर आल्या आहेत. मिस वर्ल्ड किताब मिळाल्यानंतर तिने अमिरखानसोबत सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमिर तिची इच्छा पूर्ण करेल का,हे पाहावे लागेल.
राणी संयोगीताचे आयुष्य तिच्यासाठी प्रेरणादायी असल्याचं तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. राणी संयोगीता आपलं मत मांडायला घाबरायची नाही.नेहमीच सत्याची साथ देणं, बिनधास्त आणि निर्भीड राहणं, कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करत राहणं, नेहमी सकारात्मक विचार करणं यां सारख्या गोष्टी ती राणी संयोगीताच्या भूमिकेतून शिकली, असं मानुषी म्हणते. यशस्वी होणं म्हणजे काय? यावर बोलताना ती सांगते की, प्रत्येक छोट्या छोट्या कामामध्ये आपण स्वतःला दिवसागणिक उत्तम करत जातो. नेहमी कोणतीही मोठी गोष्ट केली की, आपण यशस्वी झालो असे नसते. दिवसातील छोट्या छोट्या गोष्टीही खूप काही देऊन जातात. त्यामुळे मिळणारं यश आपण मोजू शकत नाही. मी जी गोष्ट काल केली,ती मी आज आणखी कशी चांगली करू शकेन,याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे.
सौंदर्याची व्याख्या सांगताना ती म्हणते की, सौंदर्याची व्याख्या वेगवेगळी असते. ज्या लोकांमध्ये आत्मविश्वास आहे.जे लोक स्वतःचा आणि इतरांचा आदर करतात, त्यांच्याकडेच खरी ब्युटी असते. जेव्हा आपण काहीतरी चांगलं काम करतो,तेव्हा आपण मनापासून आनंदी असतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि आनंद असतो. याला आपण खरं सौंदर्य म्हणू शकतो. ती मिस वर्ल्ड झाल्यावर म्हणाली होती की, मिस वर्ल्ड ही स्पर्धा चेहर्याच्या सुंदरतेची असल्याचे मानले जात असले तरी यात मनाची सुंदरता महत्त्वाची आहे. इथे मनाच्या सौंदर्याला प्राधान्य दिले जाते.
मानुषीने आणखी काही चित्रपट साइन केल्याचे सांगण्यात येते.तिच्या करिअरबद्दल आताच काही सांगणं कठीण आहे. तिला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मात्र या सगळ्यात तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहणार असं दिसतं.बॉलिवूडच्या झगमगाटाचे आकर्षणच तसे आहे. इथे आल्यावर कुणी स्वतः हून बाहेर पडत नाही.इतर सौंदर्यवतींप्रमाणे तीही यात मिसळून जाईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment