आजची तरुण पिढी तंत्रज्ञान, वेगवान जीवनशैली आणि आधुनिक सुविधांनी समृद्ध आहे. मात्र, या सुखसुविधांच्या मागे आरोग्याच्या गंभीर समस्या दडल्या आहेत. तणावपूर्ण जीवनशैली, फास्ट फूडचा वाढता वापर आणि गॅजेट्सशी असलेले अतिव्यग्रतेचे नाते यामुळे तरुणांमध्ये उच्च रक्तदाब (हाय बीपी) या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा आजार पूर्वी प्रौढ आणि वृद्धांमध्ये सामान्य होता, मात्र आता १८ ते ३५ वयोगटातील तरुण देखील याला बळी पडत आहेत.
तणाव आणि जीवनशैलीतील बदल: आधुनिक जीवनशैलीमुळे तणाव हा तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शैक्षणिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील ताणतणावांमुळे तरुण सतत मानसिक दडपणाखाली वावरत आहेत. झोपेचा अभाव, कामाचे वाढलेले तास आणि विश्रांतीसाठी कमी वेळ या गोष्टींनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
फास्ट फूडची सवय:फास्ट फूड आणि जंक फूडच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आरोग्याची हानी होत आहे. या पदार्थांमध्ये सोडियम, साखर आणि चरबीयुक्त घटक जास्त प्रमाणात असल्याने रक्तदाब वाढतो. नियमित आणि संतुलित आहाराऐवजी तयार अन्नपदार्थ खाण्याच्या सवयीमुळे तरुणांमध्ये वजनवाढ, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आणि हृदयविकाराचे धोके निर्माण झाले आहेत.
गॅजेट्स आणि शारीरिक हालचालींचा अभाव:
गॅजेट्सचा अतिवापर ही देखील एक महत्त्वाची समस्या बनली आहे. सतत स्क्रीनसमोर बसणे, खेळण्यासाठी मैदानी जागेऐवजी व्हर्च्युअल माध्यमांचा अवलंब करणे आणि शारीरिक हालचालींना फाटा देणे यामुळे तरुणांचे आरोग्य बिघडत आहे. गॅजेट्समुळे व्यायामाच्या सवयी कमी झाल्या असून यामुळे लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
तरुण पिढीवर होणारे परिणाम:
उच्च रक्तदाबामुळे तरुणांमध्ये अनेक गंभीर आजार निर्माण होत आहेत, ज्यामध्ये ब्रेन स्ट्रोक, हायपरटेंशन, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज, किडनी संक्रमण आणि हृदयविकाराच्या झटक्यांचा समावेश होतो. महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण जास्त असून, तीव्र डोकेदुखीमुळे त्यांचे दैनंदिन आयुष्य बाधित होत आहे.
डब्ल्यूएचओचा अहवाल:
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, भारतातील ३१ टक्के लोकसंख्या (१८८.३ दशलक्ष) उच्च रक्तदाबाने त्रस्त आहे. या आजारावर नियंत्रण मिळवले, तर २०४० पर्यंत ४६ लाख मृत्यू टाळता येऊ शकतील. दरवर्षी जगभरात ७५ लाख लोक उच्च रक्तदाबामुळे मृत्युमुखी पडतात, जे एकूण मृत्यूंच्या १२.८ टक्के आहेत. भारतात यामुळे दरवर्षी १.१ दशलक्ष मृत्यू होतात.
सुधारणा आणि उपाययोजना:
उच्च रक्तदाब रोखण्यासाठी जीवनशैलीत मूलभूत बदल आवश्यक आहेत. यामध्ये तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, नियमित व्यायाम, संतुलित आहार, फास्ट फूडपासून दूर राहणे आणि गॅजेट्सचा मर्यादित वापर यांचा समावेश होतो.
1. नियमित आरोग्य तपासणी: रक्तदाबाची वेळोवेळी तपासणी केल्याने समस्या लवकर ओळखता येते.
2. आहारात सुधारणा: जास्त प्रमाणात फळे, भाज्या, पूर्ण धान्य आणि कमी सोडियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे.
3. तणावमुक्त राहणे: तणाव कमी करण्यासाठी योगासने, ध्यान आणि इतर ताण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अवलंब करावा.
4. शारीरिक हालचाली: रोज किमान ३० मिनिटे व्यायाम, चालणे किंवा मैदानी खेळ यांचा समावेश करावा.
उच्च रक्तदाब ही आजची एक गंभीर समस्या आहे, जी तरुण पिढीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. जीवनशैलीतील बदल, आरोग्यविषयक जागरूकता आणि तणाव व्यवस्थापनाद्वारे या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करूनच या आजाराचे परिणाम टाळता येऊ शकतात. तरुणांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली