Tuesday, October 25, 2016

बालसायबर गुन्ह्यांबाबत जागृतता महत्त्वाची


देशात इंटरनेट वापरणार्‍या 40 कोटी लोकांमध्ये मुलांची संख्या जवळपास दोन कोटी 80 हजार आहे.ही आकडेवारी इंटरनेटऐंड मोबाईल असोशिएशन ऑफ इंडियाच्या एका सर्व्हेक्षणावर आधारित आहे. तर एसोचॅमचा सर्वे सांगतो की, पहिल्या आणि दुसर्‍या श्रेणीतल्या शहरांमधील सात ते तेरा वयोगटातील 76 टक्के मुले रोज यू-ट्यूब पाहतात.13 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं सोशल मिडियाचा वापर करतात.बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अभ्यासानुसार 2017 मध्ये भारतातली जवळपास 10 कोटी मुलं ऑनलाइन असतील. तुम्ही ही बातमी चांगलीच आहे, असे म्हणाल.पण यात मुलांच्या विरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढण्याचा धोकाही लपला आहे. 
2004 मध्ये दिल्लीतल्या एका नामांकित विद्यालयातलं एमएमएस कांड उजेडात आलं होतं, तेव्हा बालसायबर गुन्ह्याची खुली चर्चा रंगली होती. पण आज 12 वर्षे उलटून गेली तरी नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो मुलांविरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांना स्वतंत्र अशा वेगळ्या मापदंडात तोलताना दिसत नाही. यामुळे मुलांच्याविरोधात किंवा त्यांच्याबाबतीत घडणार्‍या सायबर गुन्ह्यांचा खरा आकडा समजून येत नाही. पोलिस अधिकार्‍यांना सायबर गुन्ह्यांबाबत फारशी माहिती अथवा ज्ञान  नसल्याकारणाने नेहमीच पिडित मुलांना केस दाखल न करताच परत पाठवले जाते. असल्या प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाणदेखील कमी आहे. देशात ऑनलाइन चाइल्ड सेक्सुअल अब्युजमटीरिअलला तात्काळ रिपोर्ट करण्याची अथवा हटवण्यासाठी हॉटलाइनदेखील नाही. खूपच कमी लोकांना याबाबतचा रिपोर्ट करण्याचे ज्ञान आहे. अशी सामुग्री असलेल्या वेबसाइटची संख्या गेल्या बारा वर्षात 147 टक्क्यांनी वाढली आहे.
युनिसेफचा अलिकडेच प्रसिद्ध झालेला बाल ऑनलाइन सुरक्षा आणि भारत हा रिपोर्ट आपल्याला या धोक्यापासून सावध करतो आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरुपामुळे मुलांच्याविरोधात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांच्या पद्धतींमध्येही बदल होत आहेत.यात प्रामुख्याने सायबर बुलिंग,ऑनलाइन यौवन व्यभिचार, ऑनलाइन यौवनशोषण आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.देशात अशा पिडित मुलांसाठी ज्या काही थोड्या बहुत सोयी-सुविधा आहेत, त्या महानगरांपुरत्याच मर्यादित आहेत.मेमध्ये दिल्लीत झालेल्या सार्क देशांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाल यौवन व्यभिचार,हिंसा(ऑनलाइनसह) संपवण्याची विषय निघाला होता.पण त्यानंतर पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. स्मार्टफोनद्वारा इंटरनेटचा वापर करणार्‍या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अर्थात डिजिटल जमाना असल्याकारणाने मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. शिवाय मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यात किंवा त्यांच्या हातून स्मार्टफोन काढून घेण्यात कुठला शहाणपणा नाही. मात्र या मुद्द्याची चर्चा समाजस्तरावर घडण्याची आवश्यकता आहे आणि यातून मुलांना,पालकांना आणि शैक्षणिक संस्थांना जागृत करण्याची गरज आहे.

Monday, October 24, 2016

अपारंपारिक ऊर्जेची निर्मिती आणि वापर वाढायला हवा


     पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत.पाऊसमान होत चालल्याने जलविद्युत निर्मितीवर मर्यादा पडत आहेत. औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच कोळसा वैगेरे यांचे साठे संपत चालले आहेत.शिवाय यातून प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे साहजिकच पर्यायी ऊर्जा साधनांकडे आवश्यक ठरले आहे. पारंपारिक ऊर्जेची मर्यादा पाहता भविष्यात सौर ऊर्जेसारखे स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
     क्रूड तेल,कोळसा यांच्या ज्वलनाने प्रदूषण वाढवून आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत.शिवाय हे साठे आपल्याला फार काळ पुरणारे नाहीत.या सगळ्यांची कल्पना आपल्या सगळ्यांना असताना आणि समोर पर्याय उभे असतानाही आपण त्यांचा वापर अजून हवा तसा करताना दिसत नाही.सुदैवाने अन्य देशांपेक्षा सूर्यापासून आपल्या देशाला लख्ख आणि स्वच्छ प्रकाश मिळतो आहे, त्याचा लाभ अगदी मोठ्या प्रमाणात उठण्याची गरज आहे. सौर ऊर्जा प्रकार आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे.
शासकीय कार्यालये. शाळा, महाविद्यालये,खासगी संस्था, कंपन्या यांना सौर ऊर्जेची सक्ती करणे आवश्यक आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा कुटुंबांनादेखील सौर ऊर्जेची सक्ती देशासाठी हितकारक आहे.यासाठी या लोकांना सौर ऊर्जा संयंत्र खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात सवलत द्यायला हवे आहे. घराच्या मोकळ्या गच्चीचा उपयोग करून घरातील वापरासाठी स्वत:च वीज उत्पादन करणे सौरफलकामुळे शक्य झाले आहे.
     अर्थात याला भांडवली खर्च अधिक असल्यामुळे लोक मागे सरत आहेत.मात्र उंचच्या उंच इमारती उभे करणारे,त्यावर विद्युत झगमगाट करून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे आपल्या देशात कमी नाहीत.चकचकीत इमारतीत राहणार्यांना पैशाची अडचण भासत असेल, असे वाटत नाही. मात्र माशी शिंकते ती इच्छाशक्तीपुढे. इच्छाशक्तीच पार कोमेजून गेल्यामुळे देशाला तेलाच्या कच्च्या मालासाठी पैसे खर्चून दुसर्यांपुढे हात पसरावे लागत आहेत. आपल्या देशात अलिकडे मोठमोठे मॉल्स उभे राहत आहेत.मोठमोठी अलिशान इमारती, कार्यालये बांधली जात आहेत.फर्म हाऊसचा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. त्यामुळे काचेच्या तावदानाबरोबरच सौर फलके बसवणे फायद्याचे ठरणार आहे. सौरफलकाचा निळसर रंग, त्यावर असलेली धातूची जाळी यामुळे उलट इमारतींची शोभा वाढणार आहे. यात काही अडचण भासत असली तरी बांधकाम डिझायनर आपल्या कामाला येतील.
     सरकारी किंवा खासगी कार्यालये, औद्योगिक कंपन्या, बँका अशा दिवसभर चालणार्या संस्थांवर स्वत: सौर ऊर्जा तयार करून तीच वापरण्याचे बंधन टाकायले हवे. बांधकाम तज्ज्ञ, वास्तूविशारद यामंडळींनी गृहनिर्माणाची कामे घेत अस्ताना नकाशा बनवण्याच्या वेळेला घराची जागा,रस्ते, टेरेस आदींची रचना करताना सौर ऊर्जा संयंत्रण बसवण्याचा विचार करायला हवा. व्यक्तिगत किंवा सामूहिकरित्या सौर विद्युत उपकरणे खरेदी करताना शासनाने एकूण किंमतीच्या काही टक्के सूट अथवा अनुदान द्यायला सुरुवात केली आहे, मात्र त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.त्यामुळे नवमध्यम वर्ग किंवा सामान्य माणसाला इच्छा असेल तर यात गुंतवणूक करणे, शक्य होणार आहे.क्रूड तेलाच्या आयातीवर आपली परकीय गंगाजळी उधळण्यापेक्षा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतावर खर्च केल्यास त्यातून देशालाच अधिक लाभ होणार आहे. पण यामुळे भविष्यात फार मोठी बचत होणार आहे.सरकारने आणि या देशात राहणार्या सर्वच नागरिकांनी स्वत:च्या पायातले पाहण्याच्या वृत्तीला तिलांजली देऊन दूरदृष्टीचा विचार करायला शिकले पाहिजे. पवन ऊर्जा,समुद्रापासून विद्युतनिर्मिती,लघवीपासून विद्युत निर्मिती,पतंगापासून ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देऊन अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे



आता महिला न्यायाधीशसुद्धा असुरक्षित

     उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील महिला न्यायाधीश प्रतिभा गौतम यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार रोजच होत आहेत,पण यातून महिला न्यायाधीशदेखील सुटल्या नाहीत.ही फारच मोठी  गंभीर घटना म्हटली पाहिजे. या महिला न्यायाधीशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांच्या दोन्ही हातांच्या नसा कापलेल्या होत्या. या महिला न्यायाधीशचा प्रेमविवाह दिल्ली येथील एका वकिलाशी याचवर्षी जानेवारी महिन्यात झाला होता. या हत्येच्या प्रकरणाला सुरुवातीला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी पुराव्याच्या आधारावरून आरोपी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठविले.
     तसे पाहता देशात हत्येच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत. परंतु हे प्रकरण क्लेषदायक व तितकेच चिंताग्रस्त आहे. कारणहत्या झालेली महिला ही  न्यायाधीश  होती. या देशात महिला न्यायाधीश सुरक्षित राहू शकत नसेल तर इतर स्त्रियांची स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. शिक्षण महाग झाल्यामुळे महिलाच काय तर पुरुषही उच्च शिक्षण घेऊशकत नाही. मात्र, याबाबतीत प्रतिभा गौतम भाग्यशाली होत्या. कारण कुटुंबीयांनी त्यांना उच्चशिक्षणदिले. त्यांनीही शिक्षणक्षेत्रात प्रचंड मेहनत घेऊन न्यायिक मॅजिस्ट्रेटच्या पदापर्यंत मजल मारली. आजही समाजात जज लोकांना मानसन्मान दिला जातो. अशा व्यक्तींचा दराराही मोठा असतो. या हत्येप्रकरणी महिला जजच्या कुटुंबीयांनी वकील पती व त्याचे कुटुंब सतत हुंड्याची मागणी करीत असल्याचा आरोप लावला.

     तत्त्वहीन राजकारण, नैतिकतेचा अभाव, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती आदी कारणांमुळे झालेल्या सामाजिक अध:पतनामुळे सध्या महिला असुरक्षित आहेत.  परिस्थितीजन्य पुराव्यांवरून असे लक्षात येते की महिला जजने आत्महत्या केली नसून, कट रचून तिची हत्या करण्यात आली असावी. या प्रकरणात कदाचित तिच्या पतीचा हात नसला तरी कुणाकडून तरी तिची हत्या करण्यात आली, हे सत्य असावे. कारण तिच्या हाताच्या कटलेल्या नसा पाहून हेच सिद्ध होते. तिच्या पतीवर केवळ संशयाच्या आधारावरूनच नव्हे तर स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपवर होत असलेले त्यांचे भांडणतसेच त्याच्याकडून वारंवार धमक्या देण्याच्या आधारावर कारवाईकरण्यात आली. परंतु महिला न्यायाधीशसारख्या महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या प्रतिष्ठित महिलेचीही हुंड्याच्या मागणीसाठी हत्या होत असेल तर सर्वसामान्य महिलांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे माती गुंग होऊन जाते. आपल्या देशात काय चालले आहे,आणि आपला देश कुठे चालला आहे,हे कळायला मार्ग नाही.
     देशातील महिलांवरील अत्याचार असो किंवा अन्य प्रकारच्या गुन्ह्य़ातील सत्य बाहेर येणे, लवकर निकाल लागणे आणिन्यायालयाच्या लांबलचक प्रक्रियेमुळे फिर्यादीला जवळजवळ न्याय मिळणे मुश्किल झाले आहे. 
आता महिला न्यायाधीशच या सिस्टमची बळी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.

Saturday, October 22, 2016

नाण्यांचे अनोखे संग्रहालय


     माणसाला छंद वेगवेगळ्या प्रकारचा असतो.कुणाला विविध प्रकारची वृत्तपत्रे गोळा करण्याचा छंद असतो.तर कुणाला काड्यापेट्यांचा सग्रह करण्यात रस असतो.कोणी टपाल तिकिटे गोळा करतो.कोणी चित्रांचा संग्रह करतो. काही माणसे नाण्यांचा संग्रह करतात. नाण्यांचा संग्रह करणारी माणसेही कमी नाहीत.आपल्या घरातल्या पेट्यांमध्ये ही नाणी ठेवतात आणि घरी येणार्या-जाणार्या पावण्या-रावळ्यांना दाखवत सुटतात. पण हा नाण्यांचा संग्रह फारच महागडा असतो.जितके जुने नाणे तितके त्याचे मूल्यही अधिक. ते खरेदी करण्यासाठी फारच मोठी किंमत चुकवावी लागते. अशा प्रकारचा महागडा आणि ऐतिहासिक छंद जोपासणार्यांमध्ये एक नाव पुढे आले आहे, ते म्हणजे राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील नोखा येथील ओमप्रकाश गट्टाणी यांचे. संग्रहात भारतीय उपखंडातील विविध राजघराण्यांसह जगभरातील 220 देशांची अधिकृत नाणी चलनाचा समावेश आहे. यात सोन्या-चांदी, तांबे,पितळ, ॅल्युमिनिअम अशा प्राचीन नाण्यांचा समावेश आहे. गट्टाणी यांनी ही नाणी एखाद्या पेटीमध्ये ठेवून दिली नाहीत, तर त्यांनी नोखा-नागोर रोडवर त्यासाठी एक संग्रहालयच उघडले आहे.
     ओमजी क्वाइन क्यूरीइ कलेक्शन बनवून काचेच्या  शोकेसमध्ये नाणी ठेवली आहेत आणि सजवलेल्या टेबलांवर मांडली आहेत.त्यांना ही नाणी ही एकाद्या पेटीत ठेवून देणं योग्य वाटलं नाही. त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील अनमोल नाण्यांचा समावेश आहे. आपण न पाहिलेल्या अडीच रुपयाच्या आणि चार रुपयाच्या नोटा इथे पाहायला मिळतील.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एक असे संग्रहालय आहे, जिथे रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने प्रदर्शित केलेल्या दहा हजार आणि पाच हजाराच्या नोटाही आपल्याला पाहायला मिळतात. नाण्यांसाठी वेगळे असे दालन करण्यात आले आहे. नाणी तत्कालिन आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेचा आरसा आहेत.गट्टाणी यांनी या अगोदर नाण्यांचे मोठे संग्रहालय आसामातील जोराहट येथे ऐतिहासिक जिमखाना क्लबमध्येही आपल्या आईच्या नावाने सुरू केले आहे.याठिकाणी ब्रिटिश आणि राजेरजवाड्यांच्या काळातील दुर्लभ चित्रे,घड्याळे,कॅमेरे, वाद्ये इत्यादी अनेक वस्तूदेखील पाहायला मिळतात. या ठिकाणी असलेले जुन्या काळातील सर्वच प्रकारचे कार लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. गट्टाणी बनारस हिंदू विश्वविद्यालय,वाराणसी,दिल्ली क्वाइन सोसायटी, कोलकाता सोसायटीचे आजीव सभासद आहेत.त्यांच्या संग्रहालयात राजस्थानच्या राजा-महाराजांबरोबरच भारतातल्या अनेक शासकांच्या काळातील नाणी उपलब्ध आहेत.ब्रिटिश काळातील जवळजवळ सर्वच नाणी आणि विदेशातील बहुतांश नाणी आणि राज्यांचा इतिहास, नाण्यांचे मूल्य, कोणी बनवली,कुठल्या धातूचा आहे, अशा प्रकारची बरीच माहिती शोकेसमध्ये लावण्यात आली आहेत.
     जयपूरच्या राजस्थान विद्यापीठाने सहा वर्षांपूर्वी संग्रहालयात-विज्ञानमध्ये एमए अभ्यासक्रमाची सुरुवात केली. कित्येक सरकारी संग्रहालय त्यांच्या अध्ययन- अध्यापनासाठी कार्यक्षेत्र राहिले आहे.अनेक विद्यार्थी नाण्यांच्याबाबतीत, प्राचीन मुद्रांबाबतीत संशोधनसुद्धा करत आहेत. जुन्या पुस्तकांमधून इकडच्या-तिकडच्या साहित्याचे संकलनही केले जाते.संशोधकांसाठी हे संग्रहालय म्हणजे एक पर्वणीच आहे.त्यांना ते चांगलेच उपयोगाचे ठरत आहे.
     संशोधकांना शोधासाठी नोखाला आल्यावर मुक्काम करायचा असेल तर तशी सुविधाही या संग्रहालयात  उपलब्ध करून दिली जाते.गट्टाणी यांना राजस्थानातील जुन्या साहित्य, संस्कृती, कला, ग्रामीण औजारे आणि साधने  यांचे विशाल असे संग्रहालय विकसित करायचे आहे.यामुळे नोखा एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, अशी गट्टाणी यांची इच्छा आहे.यासाठी त्यांनी संग्रहालयासाठीची इमारतदेखील पूर्ण करून ठेवली आहे.त्यामुळे या संग्रहालयाचे भव्य रूप आपल्याला लवकरच पाहायला मिलणार आहे.हे ठिकाण धार्मिक पर्यटनस्थळापासून अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे.देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे.



Monday, October 17, 2016

शरीराला पाण्याची गरज


      काहीजण सांगतात की ,सकाळी उठल्यावर सगळ्यात अगोदर दोन ग्लास पाणी प्यायला पाहिजे.आणखी कोणी दुसरेच काही सांगतं.जगातल्या जलसंकटाबाबत ज्याला कसलीही  गंध वार्ता नाही ,अशी मंडळी सकाळी सकाळी दोन दोन लीटर पाणी प्यायचा सल्ला देतात. जितकं पाणी प्याल,तितकं चांगलं,असंही ठणकावून सांगतात. जादा पाणी पिल्याने शरीराला कोणताच अपाय होत नाही, कारण जादा झालेले  पाणी शरीर स्वतः बाहेर फेकते आणि त्याच्या बरोबर शरीरातील घाणदेखील बाहेर टाकते,असेही सांगितले जाते.हे असल्या सल्ल्यांनी  शरीराला कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही ,त्यामुळे लोक असे सल्ले स्वीकारतात किंवा  अजमावूनही पाहताना दिसतात.पण शास्त्रज्ञ सांगतात की ,अशा सल्ल्यांमध्ये  कसलाच दम नाही आणि या मागील विचाराच्या द्रुष्टीत  सत्यही नाही. आपल्याला माहीत आहेच,आवश्यकतेपेक्षा पाणी कमी पिल्याने  शरीरात डीहायड्रेशन होते.आणि जरूरतपेक्षा अधिक पाणी पिले तर हायपोहायड्रेशन होऊ शकतं. उलट  हायपोहायड्रेशन शरीराला नुकसान पोहचवू शकतं. जादा पाणी पिल्याने शरीरातील  सोडियमचे प्रमाण कमी होते आणि ते धोकादायक होऊ शकतं.शिवाय किडनीचे  कामदेखील वाढते. म्हणजे आपल्याला जीवन देणारे पाणी अधिक झाल्याने जीवावरसुद्धा उठू शकते.
    काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांच्या एका टिमने आपल्या शरीरात जादा झालेल्या पाण्याने काय होतं किंवा काय घडू शकतं ,याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.यांसाठी त्यांनी काही लोकांवर प्रयोगदेखील केले.त्यांनी त्या लोकांचे दोन गट केले.एका गटाकडून खूप उशीरापर्यंत कसरत करून घेतली.कारण व्यायाम केल्याने घाम निघाल्यानंतर  त्यांना पाण्याची गरज जास्त  लागते. दुसऱ्या गटाला अशा ठिकाणी ठेवलं गेलं की ,त्यांच्या शरीरातून घाम निघणार नाही.काम केल्यानेही त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही. यानंतर दोन्ही गटातील लोकांना एकाच वेळी पाणी प्यायला देण्यात आले. तसेच ते पाणी पीत असताना त्या सगळ्यांचे 'फंक्शनल एमआरआय'देखील करण्यात आला. या 'एमआरआय'मध्ये असे आढळून आले की ,ज्या  लोकांनी व्यायाम केला होता त्या लोकांच्या मेंदूने आरामात पाण्याचा स्वीकार केला.पण दुसऱ्या गटातील लोक जबरदस्तीने पाणी पिण्याचा प्रयत्न करत होते.वास्ताविक  त्यांना तहान लागलेली नव्हती. या गटातील लोकांच्या मेंदूतील कोशिकांमध्ये तणाव दिसत होता. कारण नसताना ते पाणी पीत होते.
शास्त्रज्ञांचे म्हणणे असे की ,जितकं आवश्यक आहे तितकंच खावे तसे,पाण्याच्याबाबतीतही आहे.तहान लागली असेल तेवढेच पाणी प्यावे. आपल्याला भूक लागते , याचा सरळ अर्थ असा की , आपल्या शरीराला  ऊर्जेची गरज आहे. त्याप्रकारे ज्यावेळेस आपल्याला तहान लागते,त्यावेळेस शरीराला पाण्याची गरज आहे. आवश्यकतेपेक्षा खाल्लेले अन्न आपल्याला नुकसान पोहचवते. तसेच जादा पाणी शरीराला धोका पोहोचवते.आपण जादा मीठ असलेले  भोजन खाल्ले की आपल्याला  अधिक तहान लागते. कारण शरीरातील किंवा रक्तातील सोडियमची मात्रा कमी करण्यासाठी जादा पाणी लागते .आपले आणि बाकीच्या जीव -जंतूचे शरीर अशा प्रकारे विकसित झाले आहे की ,त्याला स्वतः ला आपल्या पोषनांची गरज ठाऊक आहे.आपल्या शरीराला माहीत आहे ,त्याला केव्हा , आणि किती पाणी लागते .यांसाठी त्याला सोशल मिडियातील वैद्यांची गरज लागत नाही.सोशल मीडिया आपल्या सामाजिकतेशी निगडीत आहे.आमच्या आरोग्यासाठी नाही.

Sunday, October 16, 2016

मच्छिंद्र ऐनापुरे: मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !

मच्छिंद्र ऐनापुरे: मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !:       विशिष्ट दिवशीच बाळाला जन्म देण्याच्या आग्रहापायी दोन महिलांना आपला जीव गमवायला लागल्याच्या घटना पुणे जिल्ह्यात घटल्या आहेत. या घटन...

भारतात 25 टक्के क्षयरोगी


     क्षयरोग जगभरातल्या लोकांचा जीव घेत आहे.मिनिटाला तिघांचा मृत्यू होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, विविध देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी कायद्याने काहीच करायला तयार नाहीत,असं आरोग्य संघटनेच म्हणणं आहे.
     आकडेवारीनुसार गेल्यावर्षी जगभरातल्या क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या 1.04 कोटी होती.त्याच्या अगोदरच्या सालात म्हणजे 1914 मध्ये हीच संख्या 96 लाख होती.डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल डॉ. मार्गेट चॅन यांच्या म्हणण्यानुसार यासाठी खूप काही करण्याचं बाकी आहे. युएनने 2015 ते 2030 पर्यंत क्षयरोगाने मृत्यू होणार्या संख्येत 90 टक्के घट आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.याशिवाय क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये 80 टक्के घट आणण्याच्यादृष्टीने लक्ष्य निश्चित केले गेले आहे.मात्र रोगाच्या उपचारासाठीचे प्रयत्न कमी असल्याकारणाने निर्धारित लक्ष्य गाठणे अवघड असल्याचे म्हटले जात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि विकसित देशानेदेखील या रोगाकडे फारसे लक्ष दिले नाही. या रोगाच्या निर्मूलनासाठी फारच थोड्या निधीची तरतूद हा देश करीत आला आहे.मार्गेट म्हणतात की, अमेरिका क्षयरोगापेक्षा अधिक फंड एचआयव्ही आणि मलेरियासाठी उपलब्ध करून देते.युरोपीय युनिअनदेखील एचआयव्ही आणि मलेरियाच्या तुलनेत क्षयरोगासाठी कमीच तरतूद करते. जगातले बहुतांश सगळ्याच देशातील सरकारे या रोगाच्या अटकावासाठी निष्क्रिय आहेत.या रोगाच्या खात्म्यासाठी सगळ्यांनीच पावले उचलण्याची गरज असून तशी व्यवस्था न झाल्यास रोग आणखी वाढण्याचा धोका आहे.

     डब्ल्यूओने भारताल्या वाढत्या रोगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरातल्या क्षयरोगाच्या केसेसपैकी 25 टक्के केसेस भारतातील आहेत.गुजरातमध्ये सर्वाधिक क्षयरोगी आहेत.भारतात याबाबतीत अजूनही राष्त्रव्यापी सर्व्हे झालेला नाही.मात्र सरकार 2019 पर्यंत सर्व्हे करायला तयार आहे.यानंतर इंडोनेशिया आणि चीनमध्ये दहा-दहा टक्के रुग्ण आहेत.पाकिस्तानमध्ये पाच टक्के तर दक्षिण आफ्रिकेत पाच टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण आहेत.या सहा राष्ट्रांमध्येच 60 टक्के क्षयरुग्ण आहेत.