पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यापेक्षा
वाढतच आहेत.पाऊसमान होत चालल्याने जलविद्युत निर्मितीवर मर्यादा
पडत आहेत. औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच
कोळसा वैगेरे यांचे साठे संपत चालले आहेत.शिवाय यातून प्रदूषणही
वाढत आहे. त्यामुळे साहजिकच पर्यायी ऊर्जा साधनांकडे आवश्यक ठरले
आहे. पारंपारिक ऊर्जेची मर्यादा पाहता भविष्यात सौर ऊर्जेसारखे
स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
क्रूड तेल,कोळसा यांच्या ज्वलनाने प्रदूषण
वाढवून आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत.शिवाय हे साठे
आपल्याला फार काळ पुरणारे नाहीत.या सगळ्यांची कल्पना आपल्या सगळ्यांना
असताना आणि समोर पर्याय उभे असतानाही आपण त्यांचा वापर अजून हवा तसा करताना दिसत नाही.सुदैवाने अन्य देशांपेक्षा सूर्यापासून आपल्या देशाला लख्ख आणि स्वच्छ प्रकाश
मिळतो आहे, त्याचा लाभ अगदी मोठ्या प्रमाणात उठण्याची गरज आहे.
सौर ऊर्जा प्रकार आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे.
शासकीय कार्यालये. शाळा, महाविद्यालये,खासगी संस्था, कंपन्या यांना सौर ऊर्जेची सक्ती करणे
आवश्यक आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे.
आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा
कुटुंबांनादेखील सौर ऊर्जेची सक्ती देशासाठी हितकारक आहे.यासाठी
या लोकांना सौर ऊर्जा संयंत्र खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात सवलत द्यायला हवे आहे.
घराच्या मोकळ्या गच्चीचा उपयोग करून घरातील वापरासाठी स्वत:च वीज उत्पादन करणे सौरफलकामुळे शक्य झाले आहे.
अर्थात याला भांडवली
खर्च अधिक असल्यामुळे लोक मागे सरत आहेत.मात्र उंचच्या उंच इमारती उभे करणारे,त्यावर
विद्युत झगमगाट करून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणारे आपल्या देशात कमी नाहीत.चकचकीत इमारतीत राहणार्यांना पैशाची अडचण भासत असेल,
असे वाटत नाही. मात्र माशी शिंकते ती इच्छाशक्तीपुढे.
इच्छाशक्तीच पार कोमेजून गेल्यामुळे देशाला तेलाच्या कच्च्या मालासाठी
पैसे खर्चून दुसर्यांपुढे हात पसरावे लागत आहेत. आपल्या देशात अलिकडे मोठमोठे मॉल्स उभे राहत आहेत.मोठमोठी
अलिशान इमारती, कार्यालये बांधली जात आहेत.फर्म हाऊसचा नवा प्रकार अस्तित्वात आला आहे. त्यामुळे
काचेच्या तावदानाबरोबरच सौर फलके बसवणे फायद्याचे ठरणार आहे. सौरफलकाचा निळसर रंग, त्यावर असलेली धातूची जाळी यामुळे
उलट इमारतींची शोभा वाढणार आहे. यात काही अडचण भासत असली तरी
बांधकाम डिझायनर आपल्या कामाला येतील.
सरकारी किंवा खासगी
कार्यालये, औद्योगिक कंपन्या,
बँका अशा दिवसभर चालणार्या संस्थांवर स्वत:
सौर ऊर्जा तयार करून तीच वापरण्याचे बंधन टाकायले हवे. बांधकाम तज्ज्ञ, वास्तूविशारद यामंडळींनी गृहनिर्माणाची
कामे घेत अस्ताना नकाशा बनवण्याच्या वेळेला घराची जागा,रस्ते,
टेरेस आदींची रचना करताना सौर ऊर्जा संयंत्रण बसवण्याचा विचार करायला
हवा. व्यक्तिगत किंवा सामूहिकरित्या सौर विद्युत उपकरणे खरेदी
करताना शासनाने एकूण किंमतीच्या काही टक्के सूट अथवा अनुदान द्यायला सुरुवात केली आहे,
मात्र त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.त्यामुळे नवमध्यम
वर्ग किंवा सामान्य माणसाला इच्छा असेल तर यात गुंतवणूक करणे, शक्य होणार आहे.क्रूड तेलाच्या आयातीवर आपली परकीय गंगाजळी
उधळण्यापेक्षा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतावर खर्च केल्यास त्यातून देशालाच अधिक लाभ
होणार आहे. पण यामुळे भविष्यात फार मोठी बचत होणार आहे.सरकारने आणि या देशात राहणार्या सर्वच नागरिकांनी स्वत:च्या पायातले पाहण्याच्या वृत्तीला तिलांजली देऊन दूरदृष्टीचा विचार करायला
शिकले पाहिजे. पवन ऊर्जा,समुद्रापासून विद्युतनिर्मिती,लघवीपासून विद्युत निर्मिती,पतंगापासून ऊर्जा निर्मितीला
प्रोत्साहन देऊन अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे.
No comments:
Post a Comment