Wednesday, October 12, 2016

सकारात्मक विचार



     21 वे शतक हे संधीचे आणि आव्हानाचे आहे. विज्ञानाने लावलेले शोध आणि तंत्रज्ञानात झालेल्या अदभूत बदलांमुळे मानवी जीवन पार ढवळून निघालं आहे. अर्थात तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुखकर झालं आहे. मात्र ते अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. संधी, आव्हान यामुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे नैराश्य माणसाला येऊन चिटकलं आहे. त्यातून ब्लडप्रेशर,हृदयविकार यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. किडनी,कॅन्सरसारखे जीवघेणे आजार बळावले आहेत.यात माणूस पार खचून जातो.त्याच्यातला जगण्याचा आनंद निघून जातो.
     पण सकारात्मक विचार अशा लोकांचं आयुष्य बदलू शकतो. त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवू शकतो. जीवनाविषयी एक आनंदी आणि आशावादी दृष्टिकोन तयार करू शकतो. सकारात्मक दृष्टीनं आपलं शरीर आणि मन आनंदी ठेवू शकतो. त्यांच्यातले आजार पळवून लावू शकतो.अशी कितीतरी उदाहरणं या जगात आहेत. सकारात्मक विचार आणि सतत सकारात्मक शब्दांचा वापर त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे.
     एका रुग्णाची कथा.त्याने सकारात्मक विचाराची अदभूत शक्ती जाणली होती.तो गेल्या पाच वर्षांपासून किडनी आणि हृदयरोगाने आजारी आहे. अचानक एक दिवस त्याने आपला विचार बदलला. आणि आपल्या आरोग्याविषयी तो स्वास्थ्यवर्द्धक शब्दांचा वापर करत उत्साहपूर्ण जीवन जगू लागला.विचार आपला स्वभावच नाही तर आपले आरोग्यदेखील सुधारतो आणि बिघडवतोही.याची त्याला प्रचिती आली.
     अमेरिकेचा प्रसिद्ध मनोवैज्ञानिक व मेडिसीन विशेषज्ञ जॉर्ज डब्लू क्रेन म्हणतो, आधुनिक उपचार पद्धतीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारानुसार मला असं वाटतं की,सकारात्मक विचारांचा शरीरिक अंगांवर चांगला प्रभाव पडतो.तर नकारात्मक विचार शरीरातल्या आंतरिक अंगांवर आणि स्वास्थ्यवर्धक हार्मोन्सच्या कार्यांमध्ये अडथळा निर्माण करतो.
     विन्सेंट पील एक प्रसिद्ध मनोविश्लेषक आहे.तोदेखील म्हणतो की, औषधे मस्तीष्क आणि ग्रंथींना प्रभावित करतात.पण निरंतर सकारात्मक विचार केल्याने शरीराला निरोगी ठेवणार्या हार्मोन्सचं उत्सर्जन होतं आणि आंतरिक अंग सुदृढ व्हायला लागतात. कॅन्सरवर विजय मिळवणार्या क्रिकेटपटू युवराजसिंगचं म्हणणं आहे की, जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि जिजीविषाचं फलस्वरुप यामुळेच तो या घातक रोगाचा सामना करू शकला आणि त्यात यशस्वी झाला.
     ॅकेडमिक ऑफ सायकोसोमेटिक मेडिसीनचे माजी अध्यक्ष अल्फ्रेड जे कँटर यांचं म्हणणं असं आहे की,सकारात्मक शब्दांचा सहजगत्या वापर केल्यानेदेखील आरोग्य सुदृढ बनतं. त्यांच्या मते, मी आजारी पडणार नाही, हे एक अर्ध-सकारात्मक कथन आहे. यापेक्षा सहजगत्या असं म्हणत चला की, आज मी छान राहीन. माझं संपूर्ण अस्तित्व स्वास्थ्यवर्धक राहील. के वाक्य पूर्ण सकारात्मक आहे. म्हणून अधिक क्रियाशील आहे.
   तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही होता, हा निसर्गनियम आहे.त्यामुळे नेहमी मुखात,मनात सकारात्मक विचार, शब्द असायला हवेत. सकारात्मक विचार, वाक्यांच्या सततच्या वापरामुळे शारीरिक आणि मानसिक स्थिती आरोग्यपूर्ण ठेवली जाऊ शकते.                                           




1 comment: