Monday, October 24, 2016

आता महिला न्यायाधीशसुद्धा असुरक्षित

     उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील महिला न्यायाधीश प्रतिभा गौतम यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. महिलांवर अत्याचार रोजच होत आहेत,पण यातून महिला न्यायाधीशदेखील सुटल्या नाहीत.ही फारच मोठी  गंभीर घटना म्हटली पाहिजे. या महिला न्यायाधीशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांच्या दोन्ही हातांच्या नसा कापलेल्या होत्या. या महिला न्यायाधीशचा प्रेमविवाह दिल्ली येथील एका वकिलाशी याचवर्षी जानेवारी महिन्यात झाला होता. या हत्येच्या प्रकरणाला सुरुवातीला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी पुराव्याच्या आधारावरून आरोपी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठविले.
     तसे पाहता देशात हत्येच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत. परंतु हे प्रकरण क्लेषदायक व तितकेच चिंताग्रस्त आहे. कारणहत्या झालेली महिला ही  न्यायाधीश  होती. या देशात महिला न्यायाधीश सुरक्षित राहू शकत नसेल तर इतर स्त्रियांची स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. शिक्षण महाग झाल्यामुळे महिलाच काय तर पुरुषही उच्च शिक्षण घेऊशकत नाही. मात्र, याबाबतीत प्रतिभा गौतम भाग्यशाली होत्या. कारण कुटुंबीयांनी त्यांना उच्चशिक्षणदिले. त्यांनीही शिक्षणक्षेत्रात प्रचंड मेहनत घेऊन न्यायिक मॅजिस्ट्रेटच्या पदापर्यंत मजल मारली. आजही समाजात जज लोकांना मानसन्मान दिला जातो. अशा व्यक्तींचा दराराही मोठा असतो. या हत्येप्रकरणी महिला जजच्या कुटुंबीयांनी वकील पती व त्याचे कुटुंब सतत हुंड्याची मागणी करीत असल्याचा आरोप लावला.

     तत्त्वहीन राजकारण, नैतिकतेचा अभाव, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती आदी कारणांमुळे झालेल्या सामाजिक अध:पतनामुळे सध्या महिला असुरक्षित आहेत.  परिस्थितीजन्य पुराव्यांवरून असे लक्षात येते की महिला जजने आत्महत्या केली नसून, कट रचून तिची हत्या करण्यात आली असावी. या प्रकरणात कदाचित तिच्या पतीचा हात नसला तरी कुणाकडून तरी तिची हत्या करण्यात आली, हे सत्य असावे. कारण तिच्या हाताच्या कटलेल्या नसा पाहून हेच सिद्ध होते. तिच्या पतीवर केवळ संशयाच्या आधारावरूनच नव्हे तर स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपवर होत असलेले त्यांचे भांडणतसेच त्याच्याकडून वारंवार धमक्या देण्याच्या आधारावर कारवाईकरण्यात आली. परंतु महिला न्यायाधीशसारख्या महत्त्वाच्या पदावर पोहोचलेल्या प्रतिष्ठित महिलेचीही हुंड्याच्या मागणीसाठी हत्या होत असेल तर सर्वसामान्य महिलांचे काय, असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे माती गुंग होऊन जाते. आपल्या देशात काय चालले आहे,आणि आपला देश कुठे चालला आहे,हे कळायला मार्ग नाही.
     देशातील महिलांवरील अत्याचार असो किंवा अन्य प्रकारच्या गुन्ह्य़ातील सत्य बाहेर येणे, लवकर निकाल लागणे आणिन्यायालयाच्या लांबलचक प्रक्रियेमुळे फिर्यादीला जवळजवळ न्याय मिळणे मुश्किल झाले आहे. 
आता महिला न्यायाधीशच या सिस्टमची बळी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.

No comments:

Post a Comment