बालकथा
फार
वर्षांपूर्वीची ही
गोष्ट आहे. मा चाए
नावाचा एक बुद्धिमान माणूस चीनमध्ये राहात होता. त्याच्या गावातला
जमीनदार फारच क्रूर होता. शेतसारा वसूल करण्याचे दिवस होते.जमीनदार शेतसारा गोळा करण्यात गुंतला होता.मा चाएलादेखील
शेतसारा द्यायचा होता. पण त्याने याखेपेला सारा द्यायचा नाही,
असा पक्का निर्धार केला होता.त्याला जमीनदाराला
जन्माची अद्दल घडवायची होती. कारणही तसंच होत. जमीनदाराने मा चाएच्या आई-वडिलांचा फार छख केला होता.
आणि त्यातच त्यांचा अंत झाला होता
त्याने
एक युक्ती योजली. त्याला दोन पोती धान्य झाले होते.
त्यातले एक पोते विकून त्याने एकसारखे दिसणारे दोन लांडगे विकत घेतले.
तर दुसरे पोते विकून मिळेल तेवढ्या धष्टपुष्ट कोंबड्या खरेदी केल्या.
मग त्याने त्यातला एक लांडगा घरात लपवला आणि दुसर्याच्या गळ्याला दोरी बांधून गावातून फिरू लागला.
जमीनदार
गावातून हिंडत शेतसारा गोळा करीत होता. त्याला गाठून मा चाए म्हणाला,
मालक, या खेपेला खूपच चांगलं पीक आलं आहे.
तेव्हा केव्हाही येऊन शेतसारा घेऊन जा.
जमीनदाराची दृष्टी दोरीने बांधलेल्या लांडग्यावर गेली. तो म्हणाला, अरे, लांडग्याला असा बांधून कुठं हिंडतोयस? चावेल ना कुणाला तरी!
मा
चाए अगदी बेफिकिरीने म्हणाला, मालक, हा
पाळीव आहे. माझ्यासाठी शिकार करतो. मग मा
चाएने लांडग्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला म्हणाला, जा आणि आज रात्रीच्या मेजवानीला मस्तपैकी कोंबड्या पकडून आण. हां, पण कोंबड्या अगदी धष्टपुष्ट हव्यात बरं का?
दोरी
सोडताच लांडग्याने धूम ठोकली. जमीनदार पाहतच राहिला. मा चाए म्हणाला, मालक, आज रात्री माझ्या घरी जेवायला या. हा नक्कीच मोठमोठ्या कोंबड्या पकडून आणील.तुम्हाला छानपैकी
मेजवानी द्यावी, अशी माझी बर्याच दिवसांपासूनची इच्छा आहे,
ती सफल होईल.जमीनदारानेही लगेच होकार भरला.
मा
चाएने लागलीच तयारी सुरू केली. जमीनदार रात्र होण्याआधीच हजर
झाला. मटणाचा
दरवळ सुटला होता. वासाने जमीनदाराच्या तोंडाला पाणी सुटले
होते.मा चाएने
मांसाहारी पदार्थाचे विविध प्रकारचे मेनू बनवले होते. खमंग
भाजलेले मटण, उखडलेले, तळलेले, वाफेवर शिजवलेले मटण असे अनेक प्रकारचे मांसाहारी व्यंजन बनविण्यात आले होते.
जमीनदार
म्हणाला, तो लांडगा कुठे आहे? दाखव तरी
त्याला? मग आपण सगळे मिळून भोजन करू.
मा चाएने दोरीला बांधून दुसरा लांडगा जमीनदारापुढे उभा
केला. लांडग्याची
चर्चा करीत दोघांनी भरपेट भोजन केले. जमीनदार तृप्त झाला.त्याने मनातल्या
मनात लांडग्याला विकत
घेण्याचा इरादा केला.
जमीनदार म्हणाला, गड्या, मला शेतसारा काही नको, पण हा लांडगा मला दे. त्या बदल्यात मी तुला वर 200 चांदीची
नाणी देतो.
मा
चाएने शेवटी 300 नाण्याला सौदा पक्का केला. जमीनदार गेल्यावर ते सर्व पैसे त्याने गरिबांमध्ये वाटून टाकले.
तिकडे जमीनदार लांडग्याला घेऊन घरी आला. बायको-पोरांना लांडग्याच्या
करामती सांगू लागला. त्यांना त्यावर विश्वास बसला नाही. मग त्याने लांडग्याच्या पाठीवरून हात
फिरवला. म्हणाला, जा, आणि माझ्यासाठी चांगल्या धष्टपुष्ट कोंबड्या पकडून आण. असे म्हणून त्याने दोरी सोडली. बंधनमुक्त झाल्यामुळे
लांडग्याने धूम ठोकली. बराच उशीर झाला तरी लांडगा परतला नाही,
तेव्हा तो आपली फसवणूक झाली असल्याचे समजून चुकला. रागाने त्याच्या अंगाचा तीळपापड झाला.
मा चाएला खाऊ का गिळू, असे त्याला झाले.
त्याला यमसदनी पाठवण्याचा विढा त्याने उचलला.
नोकराने
मा चाएला पकडून आणले. त्याला एका पोत्यात बांधले गेले. नंतर त्याला समुद्राच्या
किनारी असलेल्या एका झाडाला लटकविण्यात आले. आणि जमीनदाराने नोकराला झाड तोडण्याचा हुकूम सोडला, मा चाए पाण्यात बुडून मरावा,
अशी योजना त्याने आखली होती.
झाड खूप मोठे होते. त्याला तोडता तोडता नोकर पार थकून
गेला. शिवाय कडाक्याची भूकही लागली. जमीनदार आणि नोकर जेवायला घरी गेले. इकडे मा चाए हात-पाय हलवत राहिला. जमीनदारचा कुबडा सासरा तिथून निघाला
होता. त्याच्या पाठीला पोक आले होते. त्याने
हलणारे पोते पाहिले. विचारल्यावर आतून मा चाए म्हणाला,
मी माझ्या कुबड्या शरीरावर उपचार करून घेतो आहे. थोड्या वेळातच माझे कुबडेपण
जाईल. मी माझ्या घरच्यांची वाट पाहतो आहे.
ते लवकर आले तर बरे होईल. कारण या अद्भूत पोत्याचे
भाडे म्हणून तासाला दोनशे
चांदीचीे नाणी द्यावी लागणार आहेत. वेळ वाढेल, तसा भाव जास्त
द्यावा लागेल.
कुबडा
म्हणाला, अस्सं, मग मीसुद्धा कुबडाच आहे.
मलासुद्धा पोत्यात लटकू दे. त्याबदल्यात मी तुला
शंभर चांदीची नाणी देईन. त्यांचा सौदा पक्का होणार तेवढ्यात तिकडून
दोन माणसे आली. मा चाएचा आवाज ऐकून त्यांनी त्याला खाली उतरवले.
मा चाए बाहेर आल्यावर अगदी आनंदाने ओरडला, अरे
व्वा, मी तर खडखडीत बरा झालो. ही बघा,
माझी पाठ!
जमीनदारच्या
सासर्याने फारच विणवणी केल्यावर त्याने दीडशे चांदीच्या नाण्यांना
सौदा ठरवला. त्याला पोत्यात बांधले, आणि झाडावर लटकावून मा चाए निघून गेला.
जेवण
करून जमीनदार आणि नोकर परत आले. जमीनदारने आता नोकराला झाड लवकर तोडण्याचे
आदेश दिले. झाडाला कुर्हाडीचे घाव बसू
लागले तसा, पोत्यातून
मोठमोठ्याने आवाज येऊ लागला, अरे नालायका, मी तुझा सासरा आहे. मला बाहेर काढ, नाही तर मी मरून जाईन.
ऐकून जमीनदार आणखी संतापला. त्याने नोकराला झटपट झाड तोडण्याचा हुकूम सोडला.
झाड तुटले आणि समुद्रात बुडाले आणि त्याबरोबर त्याचा सासराही बुडाला.
काही
दिवसांनी मा चाए बाजारात गेला. त्याने दीडशे चांदीच्या नाण्यातून
खुपशी मोठमोठी पांढरी
बदके खरेदी केली.
आणि जाणून-बुझून तो जमीनदाराच्या वाड्यासमोरून
बदके हाकत निघाला. त्याच्या हातात काठी होती. तो अगदी एकाद्या गुराख्यासारखा
दिसत होता. जमीनदाराने त्याला पाहिलं. आणि त्याची घाबरगुंडी उडाली.
भीत-भीतच त्याने विचारलं, अरे तू,
तर मेलायंस ना? मग जिवंत कसा?
मा
चाए म्हणाला, प्रामाणिक, सच्चा माणसाला कधी मरण नसतं. त्या दिवशी समुद्रात पडताच, तिथल्या राजाने मला त्याच्या
राजमहालात नेले. माझ्या स्वागतासाठी त्यांनी सेनापती पाठवून दिला. विविध प्रकारचे स्वादिष्ट भोजन खाऊ
घातले. अमरत्व देणारे फळही खायला दिलं. तोंडाला पाणी सुटेल, असं भोजन होतं. पण दु:खाची बाब म्हणजे तुम्ही तिथे नव्हतात.
मी दोन दिवसांतच तिथे कंटाळलो, कारण मी तर साधासुधा, अडाणी माणूस.
मला कशाला द्रव्याचा हव्यास? मी यायला निघालो तेव्हा
समुद्रातला राजा मला
किंमती वस्तू देऊ इच्छित होता. पण मी त्या साफ नाकारल्या.
शेवटी खूपच जिद्द केल्यावर राजा नाराज व्हायला नको म्हणून ही बदकं तेथून
घेऊन आलो.
मग
मा चाए स्मितहास्य करत म्हणाला, राजाने पुन्हा यायला सांगितलं
आहे. राजाने सांगितलंय की, नऊ वेळा मोठ्याने
दरवाजा ठोठावून म्हणायचे, मी आहे मा चाए. एक साधा, प्रामाणिक माणूस. मग दरवाजा
उघडेल.
हे सर्व ऐकून जमीनदार भलताच चकीत झाला. त्याच्या तोंडातून सहज बाहेर पडले, मी जर का तुला माझी सर्व संपत्ती
लिहून दिली तर ? तू मला तिथे घेऊन जाशील का?
मा
चाए रागाने म्हणाला, राजमहालातल्या अमूल्य वस्तू घेण्याचा मोह
मला अजिबात झाला नाही, मग तुझी ही क्षुल्लक संपत्ती का घेऊ?
जमीनदार गुडघे टेकून खाली बसला आणि मा चाएचे पाय धरले. त्याची क्षमा मागू लागला. मा चाए म्हणाला, मला तुझी दया येतेय. मी तुला एकदा तिथे नक्की घेऊन जाईन. पण माझ्या काही अटी मानाव्या लागतील. पहिलं
म्हणजे, तू कुठे जाणार आहेस ते कुणाला सांगायचं नाही.
दुसरं, तू माझ्यासाठी एका लाकडी पिंपाची आणि तुझ्यासाठी
एक मातीच्या घमेल्याची व्यवस्था कर.
जमीनदाराने सगळी तयारी केली.
मग ते घेऊन समुद्राच्या काठी घेऊन गेला. मा चाए
पिंपात तर जमीनदार पातेल्यात बसून खोल पाण्यात गेले.
मा
चाएचे पिंप लाकडाचे होते., त्यामुळे ते तरंगत राहिले आणि जमीनदाराचे
पातेले मातीचे होते. त्यामुळे ते भिजले नी तळाला गेले.
जमीनदार समुद्रात बुडाला आणि कायमचा तळाला जाऊन पोहचला. मा चाए परत आला. पण कुणालाच कळले नाही की जमीनदार गेला कुठे तो? (चिनी लोककथा)
.
No comments:
Post a Comment