Saturday, October 22, 2016

नाण्यांचे अनोखे संग्रहालय


     माणसाला छंद वेगवेगळ्या प्रकारचा असतो.कुणाला विविध प्रकारची वृत्तपत्रे गोळा करण्याचा छंद असतो.तर कुणाला काड्यापेट्यांचा सग्रह करण्यात रस असतो.कोणी टपाल तिकिटे गोळा करतो.कोणी चित्रांचा संग्रह करतो. काही माणसे नाण्यांचा संग्रह करतात. नाण्यांचा संग्रह करणारी माणसेही कमी नाहीत.आपल्या घरातल्या पेट्यांमध्ये ही नाणी ठेवतात आणि घरी येणार्या-जाणार्या पावण्या-रावळ्यांना दाखवत सुटतात. पण हा नाण्यांचा संग्रह फारच महागडा असतो.जितके जुने नाणे तितके त्याचे मूल्यही अधिक. ते खरेदी करण्यासाठी फारच मोठी किंमत चुकवावी लागते. अशा प्रकारचा महागडा आणि ऐतिहासिक छंद जोपासणार्यांमध्ये एक नाव पुढे आले आहे, ते म्हणजे राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील नोखा येथील ओमप्रकाश गट्टाणी यांचे. संग्रहात भारतीय उपखंडातील विविध राजघराण्यांसह जगभरातील 220 देशांची अधिकृत नाणी चलनाचा समावेश आहे. यात सोन्या-चांदी, तांबे,पितळ, ॅल्युमिनिअम अशा प्राचीन नाण्यांचा समावेश आहे. गट्टाणी यांनी ही नाणी एखाद्या पेटीमध्ये ठेवून दिली नाहीत, तर त्यांनी नोखा-नागोर रोडवर त्यासाठी एक संग्रहालयच उघडले आहे.
     ओमजी क्वाइन क्यूरीइ कलेक्शन बनवून काचेच्या  शोकेसमध्ये नाणी ठेवली आहेत आणि सजवलेल्या टेबलांवर मांडली आहेत.त्यांना ही नाणी ही एकाद्या पेटीत ठेवून देणं योग्य वाटलं नाही. त्यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील अनमोल नाण्यांचा समावेश आहे. आपण न पाहिलेल्या अडीच रुपयाच्या आणि चार रुपयाच्या नोटा इथे पाहायला मिळतील.आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एक असे संग्रहालय आहे, जिथे रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने प्रदर्शित केलेल्या दहा हजार आणि पाच हजाराच्या नोटाही आपल्याला पाहायला मिळतात. नाण्यांसाठी वेगळे असे दालन करण्यात आले आहे. नाणी तत्कालिन आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेचा आरसा आहेत.गट्टाणी यांनी या अगोदर नाण्यांचे मोठे संग्रहालय आसामातील जोराहट येथे ऐतिहासिक जिमखाना क्लबमध्येही आपल्या आईच्या नावाने सुरू केले आहे.याठिकाणी ब्रिटिश आणि राजेरजवाड्यांच्या काळातील दुर्लभ चित्रे,घड्याळे,कॅमेरे, वाद्ये इत्यादी अनेक वस्तूदेखील पाहायला मिळतात. या ठिकाणी असलेले जुन्या काळातील सर्वच प्रकारचे कार लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. गट्टाणी बनारस हिंदू विश्वविद्यालय,वाराणसी,दिल्ली क्वाइन सोसायटी, कोलकाता सोसायटीचे आजीव सभासद आहेत.त्यांच्या संग्रहालयात राजस्थानच्या राजा-महाराजांबरोबरच भारतातल्या अनेक शासकांच्या काळातील नाणी उपलब्ध आहेत.ब्रिटिश काळातील जवळजवळ सर्वच नाणी आणि विदेशातील बहुतांश नाणी आणि राज्यांचा इतिहास, नाण्यांचे मूल्य, कोणी बनवली,कुठल्या धातूचा आहे, अशा प्रकारची बरीच माहिती शोकेसमध्ये लावण्यात आली आहेत.
     जयपूरच्या राजस्थान विद्यापीठाने सहा वर्षांपूर्वी संग्रहालयात-विज्ञानमध्ये एमए अभ्यासक्रमाची सुरुवात केली. कित्येक सरकारी संग्रहालय त्यांच्या अध्ययन- अध्यापनासाठी कार्यक्षेत्र राहिले आहे.अनेक विद्यार्थी नाण्यांच्याबाबतीत, प्राचीन मुद्रांबाबतीत संशोधनसुद्धा करत आहेत. जुन्या पुस्तकांमधून इकडच्या-तिकडच्या साहित्याचे संकलनही केले जाते.संशोधकांसाठी हे संग्रहालय म्हणजे एक पर्वणीच आहे.त्यांना ते चांगलेच उपयोगाचे ठरत आहे.
     संशोधकांना शोधासाठी नोखाला आल्यावर मुक्काम करायचा असेल तर तशी सुविधाही या संग्रहालयात  उपलब्ध करून दिली जाते.गट्टाणी यांना राजस्थानातील जुन्या साहित्य, संस्कृती, कला, ग्रामीण औजारे आणि साधने  यांचे विशाल असे संग्रहालय विकसित करायचे आहे.यामुळे नोखा एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, अशी गट्टाणी यांची इच्छा आहे.यासाठी त्यांनी संग्रहालयासाठीची इमारतदेखील पूर्ण करून ठेवली आहे.त्यामुळे या संग्रहालयाचे भव्य रूप आपल्याला लवकरच पाहायला मिलणार आहे.हे ठिकाण धार्मिक पर्यटनस्थळापासून अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे.देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे.



No comments:

Post a Comment