क्रिकेटची काशी म्हणून ओळखल्या
जाणार्या लॉडर्स मैदानावर एक फलक लावलेला आहे. त्या फलकावर ज्या ज्या विदेशी गोलंदाजांनी डावात पाच- पाच बळी मिळवले आहेत किंवा फलंदाजांनी 100- 100 धावा
कुटल्या आहेत, त्या सगळ्यांची नावे लिहिलेली आहेत. एखाद्या फलंदाजाने काढलेल्या 100 धावा किंवा गोलंदाजाने
घेतलेले पाच बळी क्रिकेटमध्ये इक्वल किंवा समसमान समजले जातात.हीच गोष्ट इंदोरमधल्या कसोटी सामन्यावेळी आर. अश्विनच्या डोक्यात होती. त्यामुळेच तो म्हणाला होता,
मला भारतीय गोलंदाजांचा विराट कोहली व्हायचं आहे.याचा अर्थ असा की, विराट कोहलीला प्रत्येक डावात शतक
ठोकायचं असतं.तसंच आर. अश्विनला प्रत्येक डावात पाच विकेट मिळवायचे असतात. इंदोर
कसोटीत स्थीरस्थावर झालेल्या न्युझिलंडच्याबाबतीत आश्विनने हेच
केले. त्याने टॉम लॅथमला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन बाद केले
आणि त्याच्या पुढची फळी त्याने सपासप कापून काढली.118 धावांवर
पहिली विकेट गमावलेल्या न्युझिलंडची पुरी टिमच्या टिम 299 धावांत
गारद झाली. या पहिल्या डावात अश्विनने
सहा गडी बाद केले. तर दुसर्या डावात सात
विकेट घेऊन त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वात चांगलं प्रदर्शन केलं.
आर. अश्विनने एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी 20 वेळा
केली आहे.20 वेळा एकाच डावात पाच वेळा गडी बाद करण्याच्या विक्रमात
आर. अश्विन शेन वॉर्न,मुथय्या मुरलीधारन,अनिल कुंबळे आणि हरभन सिंह अशा दिग्गज
गोलंदाजांच्या पुढे आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरवातीला
39 कसोटी सामन्यात शेन वॉर्न याने 167, मुथय्या
मुरलीधरनने 177 आणि हरभजसिंहने 172 बळी
मिळवले होते. हरभजसिंहने 59 कसोटी सामन्यांमधून
ही संधी मिळवली होती. त्यांच्यापेक्षा कमी कसोटी सामन्यात ही
कामगिरी करणारे जगात दोघेच गोलंदाज आहेत. सिडनी बार्न्स आणि कॅलरी ग्रिमेट ही ती दोन गोलंदाज.
दोन्हीही गोलंदाज 19व्या शतकाच्या प्रारंभी क्रिकेट
खेळत होते. आजच्या आधुनिक क्रिकेटचा विचार केला तर अश्विनने ही कामगिरी कमी कालावधीत केली आहे, असे म्हणायला
हरकत नाही. तो सव्वा दोनशे बळी घेण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे.त्याने आतापर्यंत मिळवलेल्या 213 बळींपैकी निम्म्यापेक्षा
जास्त बळी विरोधी संघाच्या टॉप फलंदाजांचे घेतलेले आहेत. यापैकी
15 टक्के बळी तर त्याने अशा फलंदाजांचे घेतले आहेत, जे मैदानावर स्थिरावलेले होते. म्हणजेच त्यांनी पन्नासपेक्षा अधिक
धाव्या काढलेल्या होत्या.
फलंदाजाला चकवा देऊन बाद करण्याची
अश्विनची खासियत आहे. आपल्या लाईन,
लेंथ आणि टर्न यावर अधिक विश्वास ठेवणार्या अश्विनने इंदोरमध्ये फलंदाजांना फ्रंटफुट किंवा बॅकफुटवर खेळवून संभ्रमात टाकत बळी मिळवले
आहेत.ही कुठल्याही गोलंदाजासाठी मोठी उपलब्धी आहे. ती आर. अश्विनला साधली आहे.
गोलंदाजीबरोबरच अश्विनने फलंदाजीतही चमकदार कामगिरी
केली आहे.चार कसोटी शतकांसह सहा अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत.
विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी भारत संकटात असताना केली आहे.तो संघात दाखल झाला तेव्हा तो अष्टपैलूच होता, पण त्याच्यावर
लोकांची दृष्टी उशिराने पडली, असं त्याचं म्हणणं आहे.
No comments:
Post a Comment