Tuesday, February 16, 2016

मुदतपूर्व बाळंतपण म्हणजे एक आघुरी प्रकारच !


      विशिष्ट दिवशीच बाळाला जन्म देण्याच्या आग्रहापायी दोन महिलांना आपला जीव गमवायला लागल्याच्या घटना पुणे जिल्ह्यात घटल्या आहेत. या घटना खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा फाडणार्‍या आहेत. अलिकडे लोकांच्या डोक्यात कसले कसले खूळ शिरतात, हे कळायला मार्ग नाही. अमूक दिवशी बाळाचा जन्म झाला पाहिजे, यासाठी लोक वाट्टेल ते करायला तयार होत आहेत.पाहिजे तेवढा पैसा ओतायला तयार आहेत. मात्र हे लोक बाळ आणि बाळाच्या आईचा विचार करताना दिसत नाहीत. एकादेवेळी नातेवाईकांचे ठीक आहे, पण आई म्हणून घेणारी बाईदेखील अशा प्रकाराचा हट्ट धरते तेव्हा त्या बाईला काय म्हणायचे असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही.
      पुण्याजवळच्या लोणी काळभोरखालील एका वस्तीवर एका विवाहितेच्या बाळंतपणाची अपेक्षित तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असताना तिच्या पतीसह नातेवाईकांनी अगोदरच म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातील विशिष्ट दिवसाचा आग्रह धरला. अपेक्षित तारखेपूर्वी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळंतपण केल्यास बाळासह मातेसही धोका असल्याचे सांगण्याचा प्रयत्न संबंधित महिलेवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी केला. मात्र तरीही संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी विशिष्ट तारखेचा आग्रह धरला. डॉक्टरांना त्यासाठी भाग पाडले व शस्त्रक्रिया करण्यात आली. पण शस्त्रक्रियेनंतर संबंधित खासगी रुग्णालयात महिलेकडे दुर्लक्ष झाल्याने तिला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी दोन मोठ्या खासगी रुग्णालयात नेवून लाखो रुपये खर्च करून उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या महिलेला शेवटी प्राण गमवावे लागले.
      उरुळी कांचनजवळील एका खेड्यात घडलेल्या अशाच एका दुसर्‍या घटनेत महिलेला प्राण गमवावा लागला आहे. याही महिलेच्या बाळंतपणाची अपेक्षित तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होती. केवळ पहिल्या मुलाच्या वाढदिवशीच याही बाळाचा वाढदिवस आला पाहिजे, या अट्टाहासापायी नातेवाईकांनी आग्रह धरून पाच दिवस आधीच शस्त्र्क्रिया करून बाळंतपण करून घेतले. याही प्रकरणात बाळंतपणानंतर रक्तस्त्राव न थांबल्याने संबंधित महिलेला प्राण गमवावे लागले.
      आता यातल्या एका घटनेतले नातेवाईक चूक डॉक्टरांवर ढकलत आहेत. बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेपूर्वी दहा दिवस आधी संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही इंजेक्शन दिल्यास बाळास व आईस कसलाही धोका पोहचणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यानेच आपण शस्त्रक्रिया करण्यास संमती दिल्याचे नातेवाईक सांगतात. शिवाय रक्तस्त्राव हो ऊ लागल्यावर तिच्यावर योग्य ते तेही वेळेत व्हायला पाहिजे होते, ते झाले नाहीत, त्यामुळेच तिला प्राण गमवावे लागले, असे नातेवाईक म्हणत सुटले आहेत. दुसर्‍या घटनेत नातेवाईकांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे संबंधित महिलेच्या पतीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      अपेक्षित तारखेपूर्वी बाळंतपण करणे बाळासह आईच्याही जिवाला धोका पोचवणारे असते, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी, विशिष्ट तारखेला बाळ जन्माला घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अपेक्षित तारखेपूर्वी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळंतपण करण्यासाठी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गर्भाशयाचा खालचा भाग (lower segment uterus ) तयार झालेला नसतो. त्यामुळे सत्तर टक्क्यांहून अधिक प्रकरणात रक्तस्त्राव हो ऊन माता दगावण्याचा धोका असतो. ही बाब बाळंतपण करणार्‍या सर्वच डॉक्टरांना माहित असते. पण नातेवाईकांचा आग्रह व जादा पैसे मिळणार असल्याने डॉक्टरांकडून असे प्रकार केले जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मातेबरोबरच बाळाच्या स्वास्थाच्या दृष्टीनेही मुदतपूर्व बाळंतपण धोक्याचे असते. बाळाच्या श्‍वासात अडथळा येण्याबरोबरच धाप लागणे, काविळासारख्या आजाराची बाधा पोचू शकते. पण तरीही अडेलतट्टू, खोट्या प्रतिष्ठेचा आव आणणार्‍या लोकांना कोण सांगणार? मात्र बाळ आणि बाळंतीण यांच्या जिवाशी खेळण्याचा त्यांना काय अधिकार आहे? हा प्रकार आघुरीच म्हटला पाहिजे.अशा घटनांना शासन पातळीवर प्रतिबंध घातला पाहिजे.

No comments:

Post a Comment