Thursday, February 4, 2016

चोराच्या घरात चोरी


बालकथा
 एक चोर होता. त्याचे नाव होते करणकुमार. तो चोरी काही आज करत नव्हता, पण बहाद्दर आजपर्यंत एकदाही सापडला नाही. करणकुमारची बायको मात्र साधी आणि देवभोळी होती. घरकाम आवरलं की, ती पूजापाठाला बसायची. ती देवापुढे एकच मागणं मागायची, त्यानं तिच्या नवर्‍याला सदबुद्धी द्यावी आणित्याचा चोरीचा धंदा सुटावा. करणकुमार  चोरीचा माल तिच्यासमोर आणून टाकायचा, पण ती कश्शालाही हात लावायची नाही. नव्हे त्याकडे ढुंकूनही पाहायची नाही. उलट डोळ्यांत आसवे आणून म्हणायची, ङ्क तुम्ही ज्यादिवशी चोरी करणं सोडाल आणि कष्टाचे पैसे घरी घेऊन याल, त्याचवेळी त्याचा स्वीकार करीन. या हरामच्या वस्तूंना स्पर्शदेखील करणार नाही. पापाच्या कमाईत मी तुम्हाला अजिबात साथ करणार नाही. असेल ते आणि मिळेल ते शिळं पाकं खाईन. फाटकं-तुटकं लुगडं नेसीन आणि दिवस काढीन. माझ्या मुलांवर तुमच्या या पापाची सावलीदेखील पडू देणार नाही.
      बायकोच्या निश्‍चयासमोर करणकुमार  हतबल व्हायचा. त्याला खूप वाटायचं, आपण हा पापाचा धंदा सोडावा आणि मेहनतीचं काम करावं. पण हा त्याचा संकल्प दुसर्‍यादिवसापर्यंतहीटिकायचा नाही. शेवटी वळणाचं पाणी वळणाला जाणारच, नाही का?
      लग्नाअगोदर त्याची चंगळ होती. चोरी करून मिळवलेल्या वस्तू, पैसे मित्रांमध्ये राहून उधळून टाकी. लग्नानंतर त्याचे मित्र सुटले, परंतु चोरीचा धंदा काही सुटला नाही. त्याच्यापत्नीला-अनीताला आपला नवरा चोर आहे कळल्यावर फार मोठा धक्का बसला होता. पण ती सावरली. तिने घर सोडून जाण्याचा वेडेपणा केला नाही. उलट आपल्या पतीला सुधारण्याचा चंग बांधला. अर्थात तिच्या प्रयत्नाला अद्याप यश आले नव्हते, पण तिने प्रयत्न काही सोडला नाही.
      एका रात्रीची गोष्ट. करणकुमार  चोरी करायला बाहेर पडला होता. ती अमावस्येची रात्र होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. डोळ्यांत बोटे घातल्यासारखी परिस्थिती होती. रात्रीच्या बारा वाजल्यापासून पहाटे तीनपर्यंत करण भटकतच होता. त्याला चोरी करण्याची संधीच मिळाली नाही. जिथं कुठं जावं तिथे कोणी ना कोणी जागा असे अथवा एखादा कुत्रा पहारा देत असे. शेवटी एका घरात त्याला संधी मिळाली आणि तो घरात घुसला. चोरी करण्यालायक असलेल्या वस्तूंची तो चाचपणी करू लागला. इतक्यात खोलीतल्या एका टेबलला जाऊन धडकला. टेबलावरच्या वस्तू खाली पडल्या आणि आवाज झाला. लगेच घरातले सगळे जागे झाले आणि तेबलाजवळ जमा झाले. ङ्कचोर चोरङ्ख म्हणून कोणी ओरडू लागले. करणकुमारने मात्र झटक्यात तिथून पळ काढला आणि रस्त्यावर आला. आज आपला दिवस वाया जाणार, असे करणला वाटू लागले.
      पुढे गेल्यावर तो दुसर्‍या एका गल्लीत घुसला. एका घरात तो अगदी काळजीपूर्वक शिरला. खोलीत दिवा जळत होता. एक व्यक्ती दु:खी मनाने मान खाली घालून चिंताग्रस्त बसला होता. त्याच्यासमोर एका कापडात देवाचा एक सोन्याचा मुकूट आणि दागदागिने पसरलेले होते.
      करणकुमार  माघारी फिरणार तोच आवाज आला,  मित्रा ये, आता परत चाललास कुठे? तू चोर ना! चोरी करण्याच्या इराद्यानेच आलाच ना?
      करणकुमार  जागच्या जागी थबकला. त्याला मोठं आश्‍चर्य वाटलं,तो त्याचा रागावला नव्हता. धावू न आला नव्हता. उलट  तो एखाद्या पाहुण्याने स्वागत करावे, तशाप्रकारे बोलत होता. त्याने इशार्‍यानेच करणला खाली बसायला सांगितले. 
      काहीसा घाबरलेला करणकुमार  मुकाट्याने त्याच्याजवळ जाऊन खाली बसला. ती व्यक्ती  म्हणाली, तुझ्यासारखाच मीदेखील चोर आहे.प्रत्येक वेळेला चोरी केल्यावर विचार करतो की आता हा चोरीचा धंदा सोडावा. चोरी म्हणजे पाप. अधर्म. कष्टानं कुणी तरी मिळवतं आणि आमच्यासारखे त्याच्याकडून लुबाडून नेतात. त्याला अडचणीत टाकतात. जरा विचार कर. किती लोकांचे शिव्याशाप आपल्याला मिळत असतील. म्हणूनच तर कुठलाही चोर सुखानं जगू शकत नाही.
      करणकुमार  म्हणाला,  मित्रा, तू म्हणतोयस ते खरं आहे. आपल्यातला आत्मा आतल्या आत आपला धिक्कार करतो. आपणच    आपल्या नजरेतून उतरलेले असतो. आणि घरच्या लोकांच्यातूनही. माझी बायको तर माझा आणि या नीच कामाचा तिरस्कार करते. चोरीच्या वस्तूंना स्पर्शदेखील करत नाही.
       मी तुझ्यापेक्षाही दुर्दैवी आहे. तुझी बायको तुझ्यासोबत राहते तरी पण माझी बायको तर मला कधीची सोडून गेली आहे. आणि जाताना तिने निक्षून सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही चोरीचा धंदा सोडत नाही, तोपर्यंत या घरात पायदेखील ठेवणार नाही. माझं नाव श्रावणकुमार . जरा विचार कर, तो एक श्रावणकुमार होता, ज्याने  आपल्या अंध माता-पित्यांची सेवा केली. त्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवून आणली. आणि मी एक असा श्रावणकुमार, जो नालायक आणि अधर्मी. मी मेल्यावर मला नरकातदेखील जागा मिळणार नाही.
      तू म्हणतोस ते बरोबर आहे, श्रावणकुमार. बरं तू हे समोर काय घेऊन बसला आहेस? हा सोन्याचा मुकूट आणि ही आभूषणं? करणकुमारने विचारले.
         अरे मित्रा, आज तर मी करंटेपणाचा कळस केला. मी एका मंदिरात गेलो होतो. काल कोणता तरी उत्सव होता. त्यामुळे देवाच्या मूर्तीवर सुवर्ण आभुषणं चढवली होती. मी मंदिराच्या दाराला लावलेले कुलूप तोडले आणि ही सगळी आभूषणं चोरून घेऊन आलो. आता माझा आत्मा माझा धिक्कार करतो आहे. अरे, देवादेखील सोडलंस नाहीसङ्ख अरे, हे शब्द घणासारखे माझ्या कानात आदळत आहेत. क्षणभरही माझं मन स्थिर नाही. भावनांचा नुसता कल्लोळ उठला आहे. काय करू आणि काय नाही, कळेनासम झालं आहे. आता तूच सांग, काय करू ते? श्रावणकुमार अतीव दु:खाने म्हणाला.
      करणकुमार म्हणाला,  माझ्यामते तू देवाची ही सगळी आभुषणं जिथे होती, तिथे ठेवून यावंस. सकाळी भक्तमंडळी मंदिरात जातील, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसेल. त्यामुळे तू आता घाई करावीस. कारण सकाळ व्हायला काही अवधीच राहिला आहे.
      पण मला मूर्तीचा शृंगार करता येत नाही. पहिल्यासारखी आभुषणं जिथल्या तिथे कशी बरं चढवता येतील मला? अरे, चोरी झाल्याचा संशयदेखील भक्तांना यायला नको. श्रावणकुमार म्हणाला.
      करणकुमार म्हणाला,  काळजी करू नकोस. या कामी मी तुला मदत करीन. मूर्तीचा शृंगार मला करता येतो. माझे आजोबा एका मंदिराचे पुजारी होते. पाहिलंस, त्यांचा हा नातू कसला पापी , चोर निघाला.
 बरं झालं बघ मित्रा, तुझ्या रुपानं देवच धावून आला. अरे पण, मी तुझं नावदेखील विचारलं नाही.
  मी करणकुमार
       दोघेही मुकुट आणि आभुषणं घेऊन मंदिराच्या दिशेने निघाले.
 ङ्ग आपल्याला लवकर जायला हवं. पाच वाजता मंदिराचा पुजारी पूजा-अर्चा करण्यासाठी उठत असतो. आता साडेतीन वाजले आहेत.चार-सव्वा चार वाजण्याच्या आत मूर्तीवर मुकूट आणि आभूषणं चढवायला हवीत. ङ्खङ्ख श्रावणकुमार म्हणाला.
 मंदिरात पोहचल्यावर दोघांनीही पाहिलं की सगळं काही ठीकठाक आहे. पुजारी अजून झोपलेला होता. मंदिरातल्या आभूषणांची चोरी झाल्याची वार्ता अजूनही कुणाला कळालेली नव्हती. करणकुमारच्यामदतीने श्रावणकुमारने देवाच्या मूर्तीवर मुकूट आणि आभूषणं चढवली.
      आता कुणीही म्हटलं नसतं की, मंदिरात चोरी झाली होती. दोघांनीही देवाला हात जोडले आणि आपल्या दुष्कर्माबद्दल क्षमा मागितली. आणि देवाला वचन दिलं की आता यापुढे कधीही चोरी करणार नाही. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीन.
 मंदिराबाहेर आल्यावर श्रावणकुमार म्हणाला,  माझ्यावर जे पापाचं ओझं होतं, ते आता दूर झालं आहे. आता मला फार म्हणजे फार समाधान लाभतं आहे.
       ...आणि मलादेखील फार बरं वाटतं आहे. कारण ही जी वाईट गोष्ट मी सोडू शकत नव्हतो, ती सोडण्यास माझं मन तयार झालं आहे.  परमेश्‍वराने आपल्याला सदबुद्धी दिली आहे. आता मी मेहनत करीन आणि भल्या कामासाठी वेळ देईन.
 खरंच, प्रामाणिक माणूस म्हणून जगण्यात फार मोठा आनंद आहे. श्रावणकुमार करणकुमारला अलिंगन देत म्हटलं. चोरीचा धंदा सोडून नवं जीवन जगण्याचा संकल्प करून दोघांनेही एकमेकांचा निरोप घेतला.
      त्यानंतर खरोखरच करणकुमार आणि श्रावणकुमार  दोघांनी चोरीचा धंदा सोडून दिला आणि छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला.परमेश्‍वराची कृपा म्हणा किंवा त्यांची अंगमेहनत म्हणा, पण दोघांच्याही धंद्याला चांगली बरखत आली. अल्पावधीतच ते शहरातले एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी बनले. आता त्यांना लोक शेठ करणकुमार आणि श्रावणकुमार म्हणून ओळखू लागले.         
                                                                                                                               - मच्छिंद्र ऐनापुरे, जत




1 comment: