एका वृद्ध शेतकर्याला तीन मुलगे होते. ते खूप
कष्ट करायचे, तरीही घरातली गरिबी हटत नव्हती. मोठ्या मुश्किलीने घराचा गाडा चालला होता. एक दिवस वृद्ध शेतकर्याने
आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, मी ऐकलंय की, शेजारच्या गावातील जमीनदाराला
एका चाकरी माणसाची गरज आहे.तुमच्यापैकी कुणी तरी ती चाकरी मिळवावी, त्यामुळे आपले दैन्य मिटण्यास थोडी फार मदत होईल.
बराच विचारविनिमय केल्यावर थोरल्या मुलानं जायचं
ठरलं. थोरला मुलगा गेलाही, पण काही दिवसांतच उदासवाणा चेहरा घेऊन माघारी आला. त्यानं
सांगितलं की, जमीनदाराने मजुरी तर दिली नाहीच, शिवाय काम येत नाही म्हणून परत हाकलून
लावलं. नंतर मधला मुलगा मोठ्या आत्मविश्वासानं
जायला तयार झाला. सगळ्यांनी त्याला अनुमती दिली.पण तोही काही दिवसांतच परत आला.जमीनदाराने त्याचीही थोरल्याप्रमाणेच बोळवण
केली.
हे पाहून धाकट्या मुलाला भयंकर राग आला. तो
आपल्या वडिलांजवळ जमीनदाराकडे जाण्याचा हट्ट धरू लागला. धाकटा वृद्ध शेतकर्याचा लाडका होता. परंतु, त्याच्या
हट्टापुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याने परवानगी दिली.
धाकटा मुलगा जमीनदाराकडे गेला. त्याला जमीनदारने
अपादमस्तक न्याहळले. मग म्हणाला, अच्छा! म्हणजे तू आता माझ्याकडे काम करणार ? मोठे
भाऊ तर बिनकामाचे होते, आता तू तरी काय करणार आहेस?
धाकटा म्हणाला, मला एक संधी द्या. मी मोठी मेहनत
करून दाखवीन.
जमीनदार म्हणाला, सांगितलेलं काम केलं नाहीस तर तुला
मजुरीही मिळणार नाही, समजलास.
मला मंजूर आहे, मालक, तरुण म्हणाला.
काही दिवस जमीनदारने त्याला शेताच्या कामाला
जुंपले. मग एक दिवस जमीनदार त्याला म्हणाला, इकडे लक्ष दे, घरामागच्या पहाडावर वेळूचं
बन आहे. त्याची पालवी चारवायला बैलाला घेऊन ये. आणि लक्षात ठेव, पान तोडायची नाहीत.
बैलाला झाडावर चढवून चारायचं.
जमीनदार मनातल्या मनात आनंदला होता. विचार करत
होता, याच्याने काही काम होणार नाही आणि आपल्याला इतक्या दिवसांची मजुरीही द्यावी लागणार
नाही. तिकडे धाकट्याने वेळूच्या बुंध्याला बैल बांधला आणि चाबूक घेऊन बैलाला फटकारू
लागला. वर मोठ्याने म्हणू लागला, अरे बैला, शेंड्यावर चढ... अरे बैला, शेंड्यावर चढ.
बिचारा बैल वर चढणार कसा? तिथून जाणारे-येणारे
लोक ती गंमत पाहायचे आणि हसत हसत निघून जायचे. ही
बातमी जमीनदाराला लागली. तो धावतच तिथे आला.म्हणाला, मूर्खा, त्या बैलाला मारून
टाकतोस की काय?
बघा ना मालक, हा निर्बुद्ध बैल झाडावर चढेनाच झालाय...!
जमीनदार वरमला. त्याने आपला आदेश मागे घेतला.पण तो मनातल्या मनात कुढत राहिला. तरुणही
मनातल्या मनात म्हणाला, या कपटी राक्षसाला अशी अद्दल घडवतो की, सात जन्मात विसणार नाही.
आता जमीनदारने दुसरी चाल खेळली. तो म्हणाला,
हे बघ, भाजीपाल्याची लागवड करायची आहे. पण ही लागवड माझ्या घरावर करायची. थंड हवा आहे,
तू कोबी लावण्याची तयारी कर.
जमीनदारने विचार केला होता की, कौलारू घरावर
कोबी लावता येणार नाही आणि मग आपली मजुरी वाचेल. दुसर्या दिवशी तरुण कुदळ घेऊन घरावर
चढला. तो खुदाईसाठी कुदळीचे घाव घालू लागला.कौले
फुटून खाली पडू लागले. बर्याच उशीराने झोप
झाल्यावर जमीनदार उठला. पाहतो तर घरात कौलांच्या तुकड्यांचा ढिग पडलेला. तो किंचाळून
म्हणाला, अरे ये दुष्ट माणसा, तुला कौलं फोडायला कुणी सांगितली होती?
तरुण अगदी नम्रतेने म्हणाला, मालक, कोबी लावायची
असतील तर पहिल्यांदा खुदाई तर केली पाहिजे. आणि खुदाई करताना कौलं फुटणारच.
जमीनदारने रागाने आपले दात-ओठ चावले. त्याचा हा डावसुद्धा
उलटला. त्याने आपला आदेश मागे घेतला.तरुण खाली आला.
जमीनदार त्याची मजुरी हडपण्यासाठी नवी युक्ती शोधू लागला. काही दिवसांनंतर अचानक त्याच्या चेहर्यावर
स्मित झळकले. तो तरुणाला म्हणाला, हे बघ, दुष्काळ पडला आहे. कडक ऊन्हामुळे धान्याचं शेत
वाळून चाललं आहे. त्यासाठी तू त्याला उद्या घरी घेऊन ये. म्हणजे सावलीत सुखणार
नाही.
तरुण नेहमीप्रमाणे निश्चिंत होऊन म्हणाला, ठीक आहे
मालक, जशी आपली आज्ञा.
दुसर्यादिवशी पहाटेच तरुणाने जमीनदाराच्या
घराचे दरवाजे तोडले. नंतर चौकट उखडून टाकली. मग कुदळ घेऊन भिंत पाडू लागला. जमीनदारच्या
बायकोची झोप या खटखटीच्या आवाजाने मोडली. पाहिल्यावर
ती दंगच झाली. तिने त्याला खूप सांगितले, पण तो ऐकायला तयार नव्हता. भिंतींवर घाव घालतच
सुटला. शेवटी ती भयभयीत होऊन जमीनदारला उठवायला गेली.
जमीनदार घाबरून धावतच बाहेर आला. त्यानं पाहिलं की,
दारं-खिडक्या आणि चौकट जमीनदोस्त झाली आहेत. भिंतीला भलं मोठं भगदाड पडलं आहे.तरुण
कुदळ घेऊन भिंतीवर घाव घालत होता. जमीनदाराचा पारा चढला. तो अक्षरश: जीव तोडून किंचाळला.अरे
देवा, काय रे केलंस तू हे? तुला दरवाजा-भिंत तोडायला कोणी सांगितलं होतं?
तरुणानं न ऐकल्यासारखं केलं आणि आपलं काम सुरूच
ठेवलं. हे पाहून जमीनदाराची सटकली. तो आरडत -ओरडत नाचू लागला. अरे, तुझा हात चालवायचा
थांबव. हे काय करतो आहेस तू?
तरुण शेतकरी त्याला म्हणाला, इतके ओरडता का
आहात. तुम्हीच म्हणाला होतात ना की, शेत घरात
आण म्हणून. आता इतके मोठे शेत एवढ्याशा दरवाजातून
कसे बरं येणार? म्हणून...
तरुणाने पुन्हा कुदळ हातात घेतली. तशी जमीनदाराच्या
छातीतून कळ निघाली. तो काकुळतीला आला हात जोडून म्हणाला, अरे, बास्स कर बाबा! माझं
घर नको तोडूस. यापुढं असली काम तुला सांगणार नाही.
तीन वेळा हारल्यावर जमीनदाराला अक्कल आली. तरुण
त्याच्या विचार-बुद्धीपेक्षाही पुढचा निघाला. त्या दिवसापासून पुन्हा म्हणून कधी त्याने कुणाला धोका दिला नाही. आणि वर्षाच्या
शेवटी तरुणाचा त्याची झालेली सगळा मजुरीही देऊन टाकली. (चिनी कथेवर आधारित)
No comments:
Post a Comment