बालकथा
एकदा राज्यात भयंकर थंडी पडली. राजा कृष्णदेवराय
मंत्र्यांना म्हणाले,’राज्यातल्या गरिबांना एक-एक रजई वाटून द्या.’
मंत्र्यांनी दवंडी पिटवली. गरिबांची रांग लागली.
मंत्री रजईचे वाटप करू लागले. रजईचे वाटप करता करता एका चतुर भिकार्याचा नंबर आला.
त्याच्यासोबत एक कुत्रादेखील होता. आपल्या वाट्याची रजई घेऊन भिकारी म्हणाला,’ हा कुत्रादेखील
याच राज्याचा रहिवाशी आहे. यालादेखील एक रजई द्या.’ मंत्रिमहोदय भडकले. जवळच तेनालीराम
उभा होता. तो हसून म्हणाला,’ बरोबर म्हणतो तो. राजाने कुत्रा आणि माणसात फरक ठेवला
नाही.’
मंत्र्याने कुत्र्यादेखील एक रजई दिली. नंतर
त्यांनी राजाच्या कानावर ही घटना घातली. मंत्री पुढे म्हणाले,’ महाराज, उद्यापासून
रजई वाटण्याचे काम तेनालीरामकडे सोपवा.’
दुसर्यादिवशी तेनालीराम रजई वाटायला तयार झाला.
पण समोरचे दृश्य पाहून चपापला. काय करावे आणि कसे करावे, असा प्रश्न त्याच्यापुढे
पडला. कारण पुढे जी रांग उभी होती, त्या रांगेत प्रत्येकाकडे एक-एक कुत्रा होता. मंत्रीदेखील
तेथेच उभा होता. तो मनातल्या मनात हसत होता. तेनालीराम समोर ओढवलेल्या बाक्या प्रसंगाला
कसा सामोरा जातो, याची त्याला उत्सुकता होती.
तेवढ्यात तेनालीरामने नोकराला जवळ बोलावून घेतले
आणि त्याच्या कानात काही तरी सांगितले. नोकर आत गेला. परत आला, तेव्हा त्याच्या बगलेला
दोन मांजरे होती. बाहेर आल्यावर त्याने ती दोन्ही मांजरे सोडून दिली. रांगेतली सगळी
कुत्री त्यांच्या मागे धावली. भुंकू लागली.तेनालीराम ओरडला, ‘राजांच्या मांजरांवर भुंकणार्या
कुत्र्यांबरोबर आलेल्या सगळ्या मालकांना अटक करा. आणि त्यांना तुरुंगात टाका.’
कुत्री सोबत घेऊन आलेली माणसे चपापली. ती माणसे
म्हणू लागली,’ ‘ ही कुत्री आमची नाहीत.मंत्र्यांनी आम्हाला दिली आहेत.’ मंत्र्यांची
मान शरमेने खाली गेली. तेनालीरामने मग कुत्र्यांना हाकलेले व गरिबांना रजईचे वाटप केले. ही वार्ता
राजाला समजली. राजा तेनालीरामच्या चतुराईवर
प्रसन्न हसला.
No comments:
Post a Comment