Monday, January 2, 2017

चला चला अमेरिकेला


(विदेशी कथा: स्लोवाक)

पहाटेचा जोराचा गार वारा सुटला होता.छपाराखाली शेळीची तीन पिल्लं आपसात बोलत होती."किती मस्त ना, आपले छोटे मालक उशिरापर्यंत झोपालेत ते. नाही तर असल्या गारव्यात आपल्याला चरायला घेऊन गेले असते." त्यांची नावं होती-व्रादा,कपुस्ता आणि यामा.
थोड्या वेळानं ऊन्हं पडली. सूर्याने गवताळ रानाकडं, शेताकडं आणि बागेच्या चोहोबाजूला पाहिलं.पण शेळीचं पिल्लं त्याला कुठंच दृष्टीस पडली नाहीत.
" शेळीच्या हुशार कोकरानों,कुठं आहात तुम्ही? मी तुम्हाला कुठं कुठं पाहिलं नाही? तुम्ही कुठंच दिसत नाहीए...?"सूर्याने आवाज दिला.
सूर्याची आरोळी बेकार गेली,कारण छोटे मालक आले नसल्यानं शेळीची पिल्लं छपराबाहेर आलीच नाहीत.
हळूहळू दुपार झाली. छोटे मालक न आल्याने शेळीची पिल्लं दु:खी-कष्टी झाली. आपापसात बोलू लागली." आज आपले मालक का आले नाहीत? खरं ते इतका उशीर झोपतच नाहीत.कदाचित आज त्यांचे डोळे उघडले नसतील. आम्हाला विसरले तर नसतील? का आजारी-बिजारी पडले?"
गप्पा मारता मारता त्यांना झोप यायला लागली. पण काही घडलं नाही. संध्याकाळपर्यंत कोणीच आलं नाही. मग एका अनोळख्या माणसानं दार उघडलं. त्यानं ना त्यांच्याशी संवाद साधला, ना त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्याशी तो खेळलादेखील नाही. थोड्या वेळानं तो निघून गेला. मोका साधून तिघांनीही तेथून पळ काढला.पळता-पळता ते फार दूर आले.अंधार पडायला लागला होता. अचानक एका चिमणीनं त्यांना थांबवलं."तुम्ही तिघं कुठं पळून चालला आहात?काय भानगड आहे,घरी का जात नाही आहात...?"
शेळीची पिल्लं म्हणाली," आम्हाला तर घरीच जायचं आहे, पण आमचे छोटे मालक अचानक कुठे निघून गेले आहेत.ते आमच्यावर खूप प्रेम करतात. वाईट मालक आम्हाला नको आहे. आता तूच सांग, आम्ही काय करावं, कुठं जावं?"
चिमणी म्हणाली,"काल संध्याकाळी त्यांच्या आईसोबत जाताना मी पाहिलं आहे.ते रडत होते.त्यांना जायचं नव्हतं. त्यांच्या बोलण्यावरून ते कदाचित अमेरिकेला गेले असावेत.त्यांचे बाबा अमेरिकेत राहतात."
शेळीची पिल्लं घाबरली.ती सकाळ होण्याची प्रतीक्षा करू लागली. सकाळ उजेडताच त्यांना एक कोंबडी भेटली.त्यांनी तिला अमेरिकेचा रस्ता विचारला. त्यावर कोंबडी म्हणाली," हीच अमेरिका आहे."
" आमचे छोटे मालक कुठे आहेत?"तिघांनी विचारलं.
"हे तर माहीत नाही."कोंबडी उत्तरली
" तुम्हाला माहीत नाही, म्हणजे ही अमेरिका नाही." असे म्हणत कोंबडीची पिल्लं पुढच्या गावाच्या दिशेनं निघाली.
इथे त्यांना एक मांजर भेटले. शेळीच्या पिल्लांनी त्याला अमेरिकेविषयी विचारले. पण मांजराला त्या गावाचं नावदेखील माहित नव्हतं.मग तो अमेरिकेविषयी काय सांगणार. तेवढ्यात त्यांना वाटेत एक पोपट भेटला.त्यांनी त्याला तोच प्रश्‍न केला.
पोपट म्हणाला,"मला अमेरिकेविषयी काही माहित नाही. पण अमेरिकेविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला शाळेत जावं लागेल. तिथं सगळं काही शिकवलं जातं."
शाळेचे नाव ऐकून त्यांना जरादेखील आश्‍चर्य वाटलं नाही. भीतीसुद्धा वाटली नाही.त्यांचे छोटे मालक रोज शाळेला जायचे. ते नेहमी त्यांच्या शाळेवरून परतण्याची वाट पाहायचे.मग ते चौघे खेळायचे.धमाल करायचे. तिघेही मोठ्या आनंदानं शाळेच्या दिशेने निघाले.वाटेत त्यांनी विचार केला,कदाचित आपल्याला गणवेश नाही म्हणून शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.त्यांना एका घराच्या बाहेर खूप सारी कापडे टांगलेली दिसली.
शेळीच्या पिल्लांनी घरमालकाला विचारलं," आम्हाला शिकायचं आहे.शाळेत जायचं आहे.पण आमच्याकडे कपडे नाहीत. आम्हाला यातले काही कपडे द्याल का?"
" तुम्हाला कुठली छान वाटतील, ती बिनधास्त घेऊन जा." घरमालक म्हणाला.शेळीच्या पिल्लांना पँट, शर्ट आणि टाय घातल्यावर फार आनंद झाला.मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन ते वर्गात विद्यार्थ्यांसोबत बसले. त्यांना खूप भारी वाटलं.अमेरिका खूप लांब आहे, हे त्यांना कळून चुकलं. तिथे पोहचायला पहिल्यांदा रेल्वे पकडावी लागेल.मग जहाज. त्यांना अख्खा आठवडा जहाजात काढावा लागणार होता. कारण समुद्र पार करावा लागणार होता.
तिघेही रेल्वे स्टेशनवर पोहचले.तिथे त्यांना बहुतांश प्रवाशी पिशव्या, सुटकेस घेऊन फिरताना दिसत होते.त्यांना वाटलं, आपल्यादेखील पिशव्या, सुटकेसशिवाय रेल्वे प्रवास करायला दिला जाणार नाही.त्यांनी मग खूप विचार केला आणि कोणा माळ्याकडे काम करायचं ठरवलं.
योगायोगानं त्यांना एका माळ्याकडे नोकरी मिळाली. तिघे मिळून रोपांची, झाडांची निगा राखू लागले. त्यांना खत-पाणी घालू लागले.नवीन रोपं लावायसाठी खड्डे खोदू लागले. त्यांच्या कामावर माळी जाम खूश झाला.त्याने त्यांना चांगला पगार दिला.त्यांनी त्यातून सुटकेस आणि पिशव्या  विकत घेतल्या. आता ते सहज अमेरिकेला जाऊ शकत होते.
शेळीच्या पिल्लांना पहिल्या श्रेणीच्या डब्यात माणसं कमी असल्याचे दिसले.ते लगेच धावत धावत गेले आणि पहिल्या श्रेणीच्या डब्यात चढले. म्हणाले," माणसं तर किती विचित्र! कुणास ठाऊक,इतक्या आरामशीर आणि मऊमऊ सिटांवर का बसले नाहीत?"
आपलं सामान त्यांनी एका बाजूला ठेवून दिलं. आरामात हसत हसत सिटांवर बसले. मग आपल्या छोट्या मालकांच्या गोष्टी करण्यात तिघे व्यस्त झाले.
अचानक टीसीने दरवाजा उघडला. "कृपया, आपापली तिकिटे दाखवा."टीसी म्हणाला.
त्यांनी आपल्या सुटकेस खोलून दाखवल्या.पण त्यात कोबी, गाजर आणि अन्य काही साहित्य होतं. तिकिटं नव्हती. टीसीने त्यांना पुढच्या स्टेशनवर उतरवलं.
" आता आपण कधीच आपल्या छोट्या मलकांना भेटू शकणार नाही."यामा आणि कपुस्ता रडत रडतच म्हणाले.
"तुम्ही काळजी करू नका. ती रेल्वे चांगली नव्हती. आपण आपल्या छोट्या मालकांना नक्की भेटू. आपण दुसर्‍या गाडीने जाऊ."व्रादा त्यांना समजावत म्हणाला. ते स्टेशनवरच इकडे-तिकडे फिरू लागले.तेवढ्यात त्यांना एक रेल्वे दिसली. त्यात कुणीच नव्हतं.डब्यात कोळसा, लाकडे आणि वाळू भरलेली होती. त्यांना खूप आनंद झाला."हीच आपली रेल्वेगाडी. आपण यातून प्रवास करायचा." तिघेही उड्या मारून डब्यात जाऊन बसले.
"बाबानों, आता आपण सगळे झोपून टाकू या." व्रादा म्हणाला. रेल्वे तेवढ्यात एका बोगद्यातून निघाली.अंधारामुळे त्यांना लगेच झोप लागली.सकाळी समुद्राजवळ पोहचल्यावर त्यांना जाग आली.
समुद्रात खूप मोठमोठी जहाजं उभी होती. ती जहाजं पाहून तिघंही चकीत झाली.त्याचवेळी एका वृद्ध नाविकांनं येऊन विचारलं,"तुम्ही कोण आहात? कोठून आलात आणि इथं काय करता आहात?"
"आम्हीदेखील नाविक आहोत. आम्ही  या अगोदरही जहाजावर काम केलं आहे." यामा आणि व्रादा म्हणाले.
"असं का, मग चला. आमच्या कॅप्टनला भेटा."वृद्ध नाविक म्हणाला.
"तुम्हाला काय काय कामं करता येतात?" कॅप्टनने भेटल्यावर विचारलं.
" मला स्वयंपाक करता येतो.मस्त असं शॅलेड बनवता येतं." कपुस्ता म्हणाला. त्याला लगेच किचनमध्ये पाठवलं गेलं.यामाने वर्तमानपत्रे वाटण्याचं काम घेतलं. आणि व्रादाने केस कापण्याचे!
दुसर्‍या दिवशी सगळे प्रवाशी जहाजावर आले.यामा, व्रादा आणि कपुस्ता आपापली कामं सावधपणे करू लागले.सगळेच प्रवाशी त्यांच्या कामावर जाम खुश होते. ते गाऊन,नाचून आणि वाद्ये वाजवून सगळ्यांची करमणूकही करत होते.
एकदा व्रादाने पीटर नावाच्या प्रवाशाची दाढी केली.पीटर म्हणाला," तुला खूप छान शेव करता येतं. माझ्या डाव्या बाजूची मिशी जरा बारीक कर. ही उजव्या मिशीपेक्षा मोठी दिसतेय."
व्रादाही प्रशंसा ऐकून खूश झाला.मिशी बारीक करण्यासाठी त्याने कात्री हातात घेतली. कात्री मिशीला लावली आणि... तेवढ्यात जहाज समुद्राच्या लाटांनी हिंदोळ्या खाऊ लागले. मिशी सगळीच कापली गेली. ज्यावेळेला पीटरने आपला चेहरा आरशात पाहिला तेव्हा त्याला राग अनावर झाला. पण नंतर हसूही फुटल. व्रादाने त्याची क्षमा मागितली.
जहाज अमेरिकेत पोहचताच, तिघांनाही मोठा आनंद झाला. अचानक कपुस्ता म्हणाला,"आपल्याजवळ छोट्या मालकांचा पत्ताच नाही, मग ते आपल्याला कसे आणि कुठे भेटणार?"
यामा म्हणाला,"आपण अमेरिकेत पोहोचलोच आहोत.मालकांचा पत्तादेखील लवकरच लागेल."
अंडरग्राऊंड रेल्वेजवळ पोहचल्यावर यामा म्हणाला,"बंधुनों, आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. आपले छोटे मालक जमिनीच्या खाली कसे बरं राहतील? चला परत वर जाऊ." तिघे पुन्हा प्रवाशांच्या मदतीने सिडीने वर आले.व्रादा म्हणाला, "आपले छोटे मालक आपल्याला शोधून काढतील"
" कसे काय?" त्यांना आपण अमेरिकेत आल्याचे माहितदेखील नाही. हे ऐकून व्रादा म्हणाला," जे स्लोवाक गाणे छोटे मालक गात होते, ते आपण सगळ्या अमेरिकेला ऐकवू या.गाणे ऐकून ते आपल्याला नक्की ओळखतील."
दोन दिवस ती शेळीची पिल्ले इकडे-तिकडे फिरत राहिली.वाद्ये वाजवत, गाणे गात राहिली. अचानक तिसर्‍या दिवशी कुणी तरी येऊन त्यांना जोरात मिठी मारली. आवाज ऐकू आला," बाळानों, हे गाणे तर माझे आहे. हे तुम्ही  कोठून शिकलात?" शेळीच्या पिलांना विश्‍वासच बसला नाही की, त्यांचे छोटे मालक समोर उभे आहेत. एकमेकांना पाहून छोटे मालक आणि शेळीच्या तिघा पिल्लांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहू लागले. छोट्या मालकाने त्यांना घरी आणले. त्यांच्या  आई-बाबांना भेटून पिल्लांना फार आनंद झाला. -मच्छिंद्र ऐनापुरे
(मूळ लेखक - योसेफ सिगर हरोसकी)



टिंकी बनली डॉक्टरीण

बालकथा                                                            
 टिंकी माकडीण सर्कसमध्ये काम करायची. उंच-उंच उडया मारणं, पेटत्या टायरमधून आरपार होणं, कमरेवर हात ठेवून ठुमकत चालणं, अशा गोष्टी करायला तिला भारी आवडायच्या. एकदा तिच्या सर्कशीचा तंबू एका नदीकाठी लागला होता. अचानक नदीला मोठा पूर आला आणि त्यात तंबू वाहून गेला. सर्कशीतले सगळे प्राणी आपापला जीव मुठीत धरून पळाले. टिंकी मात्र एका पिंज-यात अडकली होती. डंपू अस्वलाला तिची दया आली. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याने तिची सुटका केली. सुटका झाल्यासरशी टिंकी वाट दिसेल तिकडे पळाली. पळता पळता जंगलात आली. 
जंगलातलं जीवन टिंकीसाठी अगदीच नवं होतं. केव्हा वाट्टेल तेव्हा उठायचं, कुठं वाट्टेल तिकडे हुंदडायचं. कोणी कोणावर रागावणारं नव्हतं की, कोणी मारणारं! बस्स. फक्त एकचं समस्या होती, ती म्हणजे खाण्याची! तिला सर्कशीत वेळच्या वेळी नेमानं खायला मिळायचं. पोटासाठी कुठली कटकट नव्हती. इथे मात्र स्वत:च्या भोजनाची व्यवस्था स्वत:लाच करावी लागायची. सुरुवातीला टिंकीला त्याचा फार त्रास झाला. तिला झाडाच्या अगदी शेंडयावर चढून कोलांटया उडया मारता येत होत्या. पण तिथली जांभळं किंवा आंबे तोडून खाणं मात्र जमत नव्हतं.
असं असलं तरी तिला एक काम मात्र छानपैकी जमत होतं. तिला स्वच्छ आणि टापटीप राहायला भारी आवडायचं. टिंकीला सर्कशीतल्या शिस्तीची सवय होती. ती रोज सकाळी उठून आपल्या घरादाराची साफसफाई करायची. मग नदीवर जाऊन स्वच्छ घासून-पुसून अंघोळ करायची. रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरायची. तिला पाहून तिच्या शेजारी राहणारी अंची माकडीण चेष्टेने हसत तिची टिंगलटवाळी करायची. अंची आणि तिची तिन्ही पिल्लं दिवसभर घाणीत लोळायची. फळं आणि भाजीपाला न धुता, न साफ करताच खायची. अंघोळीचं तर नावच नव्हतं.
पुरानंतर जंगलातला प्रत्येक प्राणी आजारी पडत होता. अंचीच्या घरातला तर कोणी ना कोणी नेहमी आजारी असायचा. ज्या वेळेला प्रदेशातला दादा?चिंडया वाघ स्वत: आजारी पडला, त्या वेळेला मात्र त्याने शहरातून डॉक्टर गज्जा हत्तीला बोलावून घेतलं. गज्जा हत्तीने जंगलात पाय ठेवताच त्याच्या नाकाला भप्पकन दरुगधीनं भरलेला वास झोंबला. त्याने पटकन रुमाल काढून नाकाला बांधला. जंगलात सगळीकडं घाणीचे साम्राज्य पसरलं होतं. बघावं तिकडे घाणच घाण! या जंगलातले प्राणी घाणीतच झोपायचे. तिथेच खायचे आणि पाणी प्यायचे. गज्जा हत्तीला चालता चालताच उंचबळून येऊ लागलं. रस्त्याच्या कडेला बल्लू?चित्याचा ढाबा होता. तिथे जाऊन गज्जा बसला. बल्लूने त्याला एका भांडयात पाणी दिलं. पण गज्जाने ते साफ नाकारलं. कारण ग्लास धुळीने पार माखला होता तर त्यातलं पाणी हिरवंगार होतं. गज्जानं त्याकडे तिरस्कृत नजरेने पाहत म्हटलं, ‘तुम्ही हे असलं पाणी पिता? मग आजारी पडणार तर काय होणार?’
बल्लू चित्याने थोडा वेळ विचार केला, मग म्हणाला, ‘हो, समजलं, म्हणजे तुम्हाला टिंकीकडूनच पाणी मागवावं लागेल.’ बल्लूच्या बोलावण्यावरून टिंकी आली. येताना तिने एक मोठी वॉटर बॅग आणली होती. टिंकीला स्वच्छ कपडयामध्ये पाहून गज्जा डॉक्टरला आनंद झाला. पहिल्यांदा तिने आपला हात स्वच्छ घुतला मग ग्लास! आणि त्यात गज्जा डॉक्टरला पाणी दिलं. पाणी पिताच डॉक्टरने ओळखलं, पाणी उकळून घेतलं आहे. गज्जा तिच्याकडे पाहत म्हणाला, ‘जिथे?टिंकी आहे, तिथे कसला आलाय आजार!’
गज्जा डॉक्टरला ?चिंडया वाघाकडे नेण्यात आलं. चिंडयाला औषध-गोळ्या दिल्यावर गज्जाने घोषणा केली,‘आजपासून जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी टिंकी सांगेल तसं वागायचं. टिंकीसारखं स्वच्छ, टापटीप राहिलं की, आजार तुम्हाला कधीच शिवणार नाही.’
आता जंगलातले प्राणी टिंकीजवळ येऊन स्वच्छतेच्या टिप्स घेऊ लागले. सगळ्यात अगोदर तर अंची आली आणि म्हणाली, ‘आजपासून तू तुझ्या खाण्या-पिण्याची ?चिंता सोडून दे. बस्स! फक्त आमच्या आरोग्याची काळजी घे. आम्ही तुझी काळजी घेऊ.’ त्यानंतर जंगलात कधीच कोणी प्राणी आजारी पडला नाही.

कुठं जातात बालकलाकार?


     बर्‍याच अवधीनंतर बजरंगी भाईजान मधून एका बालकलाकाराचा दमदार अभिनय आपल्याला पाहायला मिळाला. खास मुलीसाठी ती व्यक्तिरेखा लिहिली गेल्यानं त्या चित्रपटाला तितकंच महत्त्वही आहे. जवळजवळ दहा वर्षांपूर्वी बालमानसिकतेवर आधारित तारें जमीं पर हा अमिरखानचा चित्रपट आला होता.त्यात बालकलाकाराचा वाखानण्यासारखा अभिनय पाहायला मिळाला होता. या दरम्यानच्या काळात अमोल गुप्ते,विशाल भारद्वाज,प्रियदर्शन आदींनी बालकलाकारांना घेऊन चित्रपट केले होते. परंतु, त्यांचा व्यापक असा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला नाही.कदाचित हा काळाचा आणि परिस्थितीच्या संक्रमणाचा परिणाम असू शकेल.गेल्या दोन दशकात चित्रपट आणि टीव्ही यांच्या भूमिकांमध्ये आदलाबदली झाली आहे.टीव्ही मालिकांमध्ये बालकलाकार मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत तर चित्रपटांमध्ये त्यांचे अस्तित्व नगण्य दिसत आहे. मुलांची मानसिकता आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्ती टीव्ही मालिका किंवा टीव्ही शोमधून होत असावी.
     सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितींचा प्रभाव नेहमीच चित्रपटांवर राहिला आहे.फक्त त्याचा अंदाज बदलत आला आहे.अलिकडे जे काही चित्रपट बनवले जात आहेत,त्यात अ‍ॅक्शन आणि भव्यता याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अशा चित्रपटांमध्ये बालकलाकारांना काम करण्यासारखं काही शिल्लक राहिलंच नाही. काही चित्रपटांमध्ये मात्र मुलांना आत्मा, भूतबाधा यांच्या प्रभावाखाली दाखवून त्यांना तेवढ्यापुरतं सिमित करून टाकलं गेलं. अथवा नवरा-बायकोच्या नातेसंबंधात तिसर्‍याची एन्ट्री दाखवून परिस्थिती तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला.त्यात त्याला परिस्थितीचा मूकदर्शक दाखवला गेला. मुलांच्या मानसशास्त्रावर आधारित किंवा त्यांच्या स्वाभाविक आयुष्यावर आधारित फारच थोडे चित्रपट निघाले. आता तर ही परंपरा आणखीणच संकुचित झाली आहे. शंभर वर्षाच्या चित्रपट प्रवासात बालपण हा अविभाज्य भाग राहिला आहे.प्लॅशबॅकदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडत आला आहे. 1913 मध्ये बनलेला दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्‍चंद्र या चित्रपटापासून ही नाळ जोडली गेलेली आहे.ती आजही कायम आहे. त्यावेळच्या चित्रपटात राजा हरिश्‍चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेब यांच्या मुलीने केली होती.1950 च्या दशकात तर कौटुंबिक चित्रपटांच एक वावटळच सुटलं होतं.त्यात नात्यांच्या कलहाचा नाटकीपणा एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत असे की, त्यामुळे नायिकेच्या डोळ्ंयात अश्रूंचा पूर यायचा. त्या काळात भावनिक आणि मार्मिक अंदाजात चित्रपट बनवले गेले. नवरा-बायकोंमधला बेबनाव, बायकोच्या चारित्रावर संशय, त्यासाठी कुटील डावाची पेरणी, तसेच सासू-सुनेचा कलहाचा, अथवा जिव्हाळ्याचा विषय अशा चित्रपटांमध्ये मुलांच्या भूमिकांना अधिक महत्त्व आसायचे.त्यामुळे साहजिक बालकलाकारांचे महत्त्वही वाढले.लोकप्रियता वाढली. आपोआप मागणीही सुधारली.पण ही प्रथा-परंपरा फार काळ चालली नाही. पुढे रोमांटिक चित्रपटांचा काळ आला, त्यात मुलांच्या अस्तित्वाला थाराच राहिला नाही.चहावाला किंवा घरातला नोकर असल्या सटरफटर भूमिकांमध्येच बालकलाकार अडकले.मात्र त्यात कॉमेडीचे कारंजे उडायचे.शोले आणि जंजीरसारख्या मारझाड चित्रपटांमुळे बालकलाकारांची उपस्थिती औपचारिकच राहिली. यादों की बारात या चित्रपटाने याची सुरुवात केली होती. पण अमिताभ बच्चन यांच्या उदयानंतर त्यात आणखी वाढ होतच गेली. चमाणिक पोलिस अधिकारी,सरकारी अधिकारी, नैतिकतेचा पाठ शिकवणारा खेड्यातला शिक्षक, गावातला जमीनदार किंवा मील-मालक यांच्या शोषणाविरोधात आवाज उठवणारा मजदूर आपल्या कुटुंबासह चित्रपटांमध्ये दाखवला जाऊ लागला. अशा बुराई आणि अन्यायाला वाचा फोडणार्‍या प्रामाणिक माणसाला  आपली किंमत आपला जीव देऊन चुकवावा लागे.पुढे कित्येक वर्षे असाच पॅटर्न येत राहिला. अशा चित्रपटांचा रतीब काही काळ घातला गेला. अशा चित्रपटांमध्ये बालकलाकारचे अस्तित्व चार-पाच मिनिटापुरतेच असायचे. अख्ख्या कुटुंबाची राख रांगोळी व्हायची त्यात एकादा मुलगा जिवंत राहायचा आणि तो मोठेपणी त्यांचा बदला घ्यायचा.तेवढीच बालकलाकाराची भूमिका पडद्यावर दिसायची.काही मोजक्याच चित्रपटात बालकलाकारांना व्यापक आणि मजबूत अशी भूमिका मिळायची,पण असे चित्रपट हाताच्या बोटावरच असायचे.
     रस्त्यावर आयुष्य काढणार्‍या अनाथ मुलांच्या संघर्षावर आधारित 1954 मध्ये प्रकाश अरोरा यांनी दिग्दर्शित केलेला राजकपूर यांचा बुट पॉलिश नावाचा चित्रपट आला होता. त्यात नाझ आणि रतनकुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कितीही अडर्चीी आल्या तरी दु:खपिडा यांचा अंगिकार करून आनंदी जीवन कसं जगायचं, असा संदेश देणारा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. कब से बैठे आस लगाए,हम मतवाले पालिसवाले किंवा नन्हें मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है... ही गाणीदेखील सहारणीय होती.
     मुलांना केंद्रस्थानी ठेवून बचपन (1970),बालक (1969), बिन मां के बच्चे (1983), नैनिहाल (1967),विद्यार्थी (1968) सारखे काही चित्रपट आले, पण यातले बरेच चित्रपट अतिनाटकीयतेचे बळी ठरले. मुलांच्या स्वाभाविक समस्यांपर्यंत ते पोहचू शकले नाहीत.उद्देशपूर्ण बनणार्‍या चित्रपटांसाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने 1960 मध्ये फिल्म वित्त निगमची स्थापना करण्यात आली. त्याच्याही अगोदर म्हणजे पाच वर्षांपूर्वी सरकारने बालचित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी बाल चलचित्र मंडळाची स्थापना झाली होती.याचवर्षी सत्यजीत रॉय यांचा पथेर पंचोली प्रदर्शित झाला होता.नंतर या मंडळाचे नाव बदलून चिल्ड्रन फिल्म सोसायटी असे ठेवण्यात आले.या फिल्म सोसायटीच्या आर्थिक सहाय्यावर काही चित्रपट तयार झाले.मात्र अशा चित्रपटांमधील विशुद्ध मनोरंजनाची जागा ज्ञानवर्धक व प्रेरणादायी विषयांनी घेतली. 55 वर्षात चिल्ड्रन फिल्म सोसायटीच्या अर्थसहाय्यावर जवळपास साडेचारशे चित्रपटांची निर्मिती झाली, पण अशा चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात न आल्याने हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचलेच नाहीत. आता तर आर्थिक लाभाचे गणित बदलले असल्याने सरकारी मदतीवर चित्रपट बनायचे बंदच झाले. अलिकडे केव्हा तरी क्वचितच बालचित्रपट बनवले जातात. यातला सगळ्यात उल्लेखनिय चित्रपट म्हणजे तारें जमीं पर! या निमित्ताने अमिरखान पहिल्यांदाच दिदगदर्शक बनला. याच चित्रपटाच्या धर्तीवर पाठशाला नावाच चित्रपट निघाला, पण तो हास्यास्पद अधिक ठरला. भूतनाथ,तारा रम पम पम, चिल्लर पार्टी अशा काही चित्रपटांमध्ये आजच्या पिढीतल्या मुलांच्या मानसिकतेला हात घालण्यात आला होता. प्रियदर्शन यांनी बम बम भोले मध्ये बालभावनांना मार्मिकपणे टिपण्याचा प्रयत्न केला. पण एक तर हा चित्रपट म्हणजे इराणी चित्रपटाची सही सही नक्कल होती आणि दुसरंम्हणजे विषयानुरुप वातावरण आणि परिस्थिती तयार करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला नाही. आणखी काही चित्रपटांमध्ये आयएम कलाम, नन्हा जैसलमेर, मकडी,ब्लू, अंब्रेला आंइ स्टेनले का डिब्बा सारख्या चित्रपटांनी रुचिपूर्ण प्रवाह कायम ठेवण्याचा जरूर प्रयत्न केला, पण हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊ शकले नाहीत.
     एक काळ असा होता की,  बालकलाकाराच्या रुपात करिअरची सुरुवात करणारे काही कलाकार पुढे जाऊन मोठेपणी चांगली ख्याती मिळवली. नरगीस, मीनाकुमारी, मधुबाला,सुरैया, राजकपूर, शशीकपूर, अमिरखान, हृत्विक रोशन यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. पण यापैकी नरगीस आणि मीनाकुमारी सोडल्यास बालाभिनयात कोणीही प्रतिष्ठा मिळवू शकले नाही. त्यांनी त्यावेळी अभिनयाचे करिअर गंभीरपणे घेतले नाही किंवा तेवढी त्यांची बौद्धिक कुवत नव्हती. त्यामुळे छंद, शौक या अर्थानेच त्यांची पडद्यावर आपला चेहरा दाखवला.शशी कपूर यांना सोडल्यास आंअळी कोणालाही बालकलाकाराच्या रुपात दमदार आणि महत्त्वपूर्ण भूमिका मिळाल्या नाहीत.
     अर्थात हे एकादृष्टीने बरेच म्हणायला हवे. नाही तर त्यांची बालकलाकार म्हणून एखादी छबी निर्माण झाली असती तर मोठेपणी त्यांना त्यातून बाहेर पडता आले नसते आणि तीच त्यांची छबी यशाला अडसर ठरली असती.जे बालकलाकाराच्या रुपात प्रतिष्ठा मिळाली, लोकप्रियता लाभली, त्यांना शेवटी एका मर्यादेपर्यंतच यश मिळाले. त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले,पण जसे त्यांचे बालपण संपुष्टात आले, तसे त्यांच्या मागणीलाही ब्रेक लागत गेला. बालकलाकार म्हणून काम केलेल्या मुलींना तर फारच मोठ्या अडचणी आल्या.मुलगी ते युवती या प्रक्रियेत देजी इराणी, हनी इराणी, बेबी फरिदा, तबस्सुमसारख्या कित्येक अभिनेत्री पुढे गायबच झाल्या. बालसुलभतेचे जे रंग त्यांनी उधळले, तेच रंग त्यांच्या मोठेपणी कमजोरीचे ठरले. चिराग कहां, रोशनी कहां यासह डझनभर चित्रपटांमध्ये आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी जादू बिखेरली आणि मासूमपणा उधळला, त्याच डेजी इराणीला मोठेपणी बहिणीच्या छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. आणि त्याही मोजक्याच. काही दिवसांपूर्वी एका चॉकलेटच्या जाहिरातीत आणि एका टीव्ही मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून ती दिसली. तिची बहीण हनी इराणी बालकलाकारापर्यंतच मर्यादित राहिली. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी अमानत आणि लम्हेंसारख्या चित्रपटांचे लिखाण केले. बालपणीच्या तबस्सुमची अखंड बडबड सगळ्यांनाच भावली पण किशोर अवस्थेत पोहोचेपर्यंत ती तिच्यासाठी अयोग्य बनली. पण त्यांनी आपल्या गुणांचा वापर मंचावर चुटके ऐकवण्यासाठी व रेडिओवर कार्यक्रम करताना बेखुबीने केला. फिल्मी हस्तींबरोबरचा त्यांचा गप्पागोष्टींवरचा फुल खिले गुलशन गुलशन हा कार्यक्रम मात्र चांगला चालला. पण तिच्या अभिनयाची गाडी पुढे सरकली नाही.काही वर्षांपूर्वी आलेल्या चमेली की शादी या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत त्या दिसल्या.
     आखरी खत या चित्रपटात अवघ्या एक वर्षाच्या बॉबीला पुढे बालकलाकर म्हणून मान्यता मिळाली नाही. महेश बाल अभिनयानंतर राजा और रंकमध्ये दुहेरी नायकाच्या भूमिकेत दिसला, पण पुढे त्याचं नाणं चाललं नाही. अलंकारचीही अवस्था अशीच होती. त्याची बहीण पल्लवी, तिचा बालपणातला मासूमपणा पुढे युवावस्थेत तिच्यासाठी अवगुण ठरला. अनुरागमुळे चर्चेत आलेल्या सत्यजीतला पुढे पहेलीमध्ये नायक बनण्याची संधी मिळाली. पण त्यानंतर त्यांच्या अभिनयाची गाडी शोला और शबनम आणि दुलाराच्या चरित्र भूमिकांमध्येच अडकली.
     सचिन, सारिका, सोनिया, राजू श्रेष्ठ आदी 1970 च्या दशकातले सर्वात यशस्वी आणि लोकप्रियता पावलेले बालकलाकार. यातल्या राजूने सगळ्यात जास्त चित्रपट केले. पण त्याला नायक बनण्याची संधी मिळाली नाही.चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यकाच्याच भूमिका त्याच्या वाट्याला आल्या. सचिन मात्र मोठेपणी अपेक्षेपेक्षा अधिक चालला. मराठी चित्रपटात तर तो यशस्वी नायक, यशस्वी दिग्दर्शक,गायक आणि अशा बर्‍याच भूमिकेत यशस्वीरित्या वावरला. सोनियाचे बालकलाकार म्हणूनचे करिअर दो कलियां,वारिससारख्या तीन-चार चित्रपटांपुरते मर्यादित राहिले.  बालपणी त्यांनी आपली प्रतिभा दाखवूनही त्या बालकलाकारांना पुढे तीच प्रतिभा मोठी अडथळ्याची ठरली. आणि ते लहानाचा मोठा होईपर्यंतच्या प्रक्रियेत सगळे हरवून गेले. -

Sunday, January 1, 2017

गजीनृत्य लोककलेचे संवर्धन व्हायला हवे

    
गजीनृत्य ही लोककला लोप पावत चालली आहे.या संस्कृतीचे संवर्धन आणि जोपासना आवश्यक आहे.शासनाने आणि लोककला उपासकांनी यात अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
 गजीनृत्य प्रामुख्याने धनगर समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला आहे. धनगर समाजाची बोरोबा,धुळोबा,सतोबा, नागोबा,भिवाडी, आयाक्का,बाळूमामा, सिदोबा आदी दैवते आहेत.त्यांची भक्ती आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठीलोकनृत्याद्वारे लोकजागर केला जातो. हे नृत्य प्रामुख्याने धनगर बहुल गावात खेळले जाते.गजीनृत्य करणारी व्यक्ती व त्यांच्या समुदायास गजी मंडख असे संबोधले जाते.गजी मंडळामध्ये ढोल वाजवणारे दोन ढोले, झांज वाजवणारा झांज्या, दोन सनईवादक व एक सरवादक, शिंगवादक व 40 ते 50 युवकांचा मंडळाचा समावेश असतो.या  समुहासग्जीपथकदेखील म्हणतात.
      देवदेवतांच्या यात्रांमध्ये रात्रभर या गजीनृत्याचा देवाची पालखी व रात्रभर तेलाची वात आरतीमध्ये जाळून जागर केला जातो. त्सेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विविध मान्यवरांचे स्वागत समारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ व आयोजलेल्या विविध महोत्सवामध्ये गजीनृत्याचे सादरीकरण केले जाते.अलिकडे गजी मंडळांचा ड्रेसकोड बदलत असून, सध्या पायात घट्ट चोळणा,डोक्यावर मखमली रुमाल व दोन्ही हातात दोन भरजरी रुमाल एकसारखा असा पोशाख केलेला असतो. गजी मंडळातील मोहर्‍या व ढोल्यायांचा ड्रेसकोड हे गजी मंडळाचे विशेष आकर्षण असते.
      पश्‍चिम महाराष्ट्रात जत, कवठेमहांकाळ, आटपाडी,खानापूर, माण,खटाव,फलटण, कर्‍हाड,माळशिरस, सांगोला, मंग़ळवेढा या तालुक्यांमधल्या बहुसंख्य गावात हा खेळ खेळला जातो. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला गजीनृत्य सादर करायला बोलावले होते. त्यावेळी हे लोकनृत्य दिल्लीकरांचे मोठे आकर्षण ठरले होते. नंतरदेखील लाल किल्ल्यावर हे नृत्य सादर करायला संधी मिळाली होती. गजी मंडख ही लोककला म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. वारसा आहे. पण नव्या पिढीला त्याच्याबाबत जास्त आकर्षण नाही. त्यामुळे काही भागातील ही लोककला लोप पावत चालली आहे. या संस्कृतीचे जतन करून त्याची जोपासना व्हायला हवी आहे. सभा, समारंभातून, यात्रांमधून ही कला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

मित्र



बालकथा                            
     एक खूप घनदाट जंगल होतं. इतकं घनदाट होतं की, सूर्याची किरणंही खालीपर्यंत पोहोचत नव्हती. या जंगलात नाना तर्हेचे भयंकर प्राणी होते.सगळे सुखा-समाधाने राहात होते.
     एक दिवस त्या घनदाट आणि भयंकर जंगलात एक हत्ती आला.दिसायला डोंगराएवढा आणि शक्तीशाली. यापूर्वी या जंगलात असा भयंकर प्राणी कुणी पाहिला नव्हता. त्याला पाहून सारे घाबरून घट्ट झाले. तो चालायला लागला की, सगळे त्याला लपून पाहात.त्याच्या चित्काराने तर जंगलात मोठी पळापळच व्हायची. मोठे प्राणी लपून बसायचे तर छोटे छोटे प्राणी आपल्या बिळात जाऊन दडायचे. हत्ती आल्यापासून जंगलातल्या प्राण्यांची झोपच उडाली होती.
     हे पाहून हत्ती मात्र खूप अस्वस्थ झाला होता. त्याला काय चाललं आहे, कळत नव्हतं.तो तर त्यांना मित्र बनवायला अतुर होता,त्यासाठी तो त्यांना प्रेमाने बोलावत होता. पण घडत होतं उलटच! त्याला कळतं नव्हतं की त्याच्यात असं काय वाईट आहे, ज्याच्याने त्याला पाहून सगळे पळ काढताहेत? तो रात्रंदिवस हाच विचार करत होता.
     एक दिवस हत्ती दु:खी-कष्टी मनाने हळूहळू फिरत निघाला होता.तो जंगलातल्या एका जुन्या वडाच्या झाडाखाली आला. एवढ्यात त्याला एक किंचाळी ऐकू आली. कुणी तरी मोठ्यानं ओरडत होतं, ‘वाचवा वाचवा!’
     हत्तीने वर मान करून पाहिले. एक छोटुकला उंदीर झाडाच्या फांदीत अडकला होता आणि ओरडत होता. हत्ती म्हणाला, ‘घाबरू नकोस, मी आत्ता तुला वाचवतो.’ हत्तीला पाहून पहिल्यांदा तर उंदीर घाबरलाच होता. पण करतोय काय? हत्तीने आपली सोंड वर केली. आणि उंदराला त्यावर बसवून खाली घेऊन आला. खाली येताच उंदराने धूम ठोकली.त्याने मागे वळून पाहिलेदेखील नाही. बिचार्या हत्तीने विचार केला होता की, आता उंदीर तरी त्याचा मित्र बनेल. पण तोही पळाला. आता हत्तीची खात्री झाली की, त्याचा कुणी मित्र नाही बनु शकत.हा विचार करता करता त्याला रडू कोसळले.
     पण थोड्याच वेळात त्याला पक्ष्यांच्या मंजुळ गाण्याचा आवाज ऐकायला आला. असे सुरेख गाणे त्याने या जंगलात अगोदर कधी ऐकले नव्हते. बघता बघता जंगलातले सगळे प्राणी हत्तीच्या चोहोबाजूंनी फेर धरून नाचू-गाऊ लागले.कोणी शिट्टी वाजवत होते,तर माकड ढोल वाजवत होतं.सिंहदेखील आपल्या गोड आवाजात गात होता. हत्तीला हे सगळं एका स्वप्नासारखं भासत होतं. समोर पाहिल्यावर तर मोठा धक्काच बसला. उंदीर, ज्याला त्यानं वाचवलं होतं,तो गर्दीत सगळ्यांच्या पुढे होता.
त्याला छोटासा उंदीर म्हणाला, ‘ आज तू माझे प्राण वाचवले आहेस. तू खूप चांगला आहेस.शरीराने कितीही मोठा असशील,पण तुझं मन खूप मोठं आहे.प्रेम आणि दयेने भरलेलं आहे. आजपासून तू आम्हां सगळ्यांचा मित्र आहेस आणि आम्ही सगळे तुझे...!’
     हत्तीने त्यांना सांगितले की, मी तुम्हां सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मला तुम्हाला घाबरावयाचं किंवा कुठलं नुकसान पोहचवायचं नव्हतं तर मित्र बनवायचं होतं. आता हत्तीदेखील त्या नाच-गाण्यात सामिल झाला आणि सगळे आणखी सैराट होऊन नाचू लागले.
हत्ती पुन्हा कधी म्हणून इतक्या मोठ्याने ओरडला नाही.