Wednesday, January 4, 2017

अशी ही मैत्री


बालकथा                                             
     एक फार मोठा समुद्र होता. त्याचं पाणीदेखील फार  सुंदर होतं. आभाळासारखं  निळं निळशार होतं. त्यात खूप प्रकारचे रंगीबेरंगी मासे होते. त्यात काही डॉल्फिनही होते. एक डॉल्फिन तर फारच सुंदर होता, पांढर्‍याशुभ्र  रंगाचा! तिथेच जवळ असलेल्या एका  गावात एक सुंदर, गोड  मुलगी राहात होती. तिचं नाव पार्वती! पार्वती डॉल्फिनला पाहायला रोज समुद्रकाठी यायची. त्याला रोज काही ना काही खाऊ घालायची. दोघांमध्ये दाट मैत्री झाली होती. पार्वतीने आपल्या मित्राचे नाव चिकप्पा ठेवले होते. चिकप्पादेखील रोज पार्वतीची  वाट पाहायचा.तिला रोज पाण्यातला नानाविध कसरती दाखवून तिचे मनोरंजन करायचा. पार्वती ते पाहून फार आनंदून जायची. हळूहळू पार्वतीला चिकप्पाची भाषादेखील समजू लागली होती. त्यामुळे त्यांच्यांमधली मैत्री आणखी घट्ट झाली होती.
     एक दिवस अचानक समुद्रात मोठं वादळ आलं. चिकप्पा पाण्यात निघून गेला, पण पार्वती समुद्रात कुठे वाहून गेली. ती वाहत- वाहत एका दुसर्‍या किनार्‍याला लागली. तो किनारा निर्जन होता. तिला खूप भिती वाटू लागली. भितीने रडू लागली. चिकप्पाचा धावा करू लागली. चिकप्पा पार्वतीला शोधत शोधत तिथे पोहचला. दोघांनाही फार आनंद झाला. तेवढ्यात कुठूनसे समुद्रीचाचे आले आणि त्यांनी पार्वतीला पकडले. चिकप्पा  त्यांच्याजवळ गेला. ते त्याला पकडणार, तोच तो सुळ्ळकन पाण्यात निघून गेला. अशाप्रकारे तो त्यांना चकवत राहिला, दमवत राहिला. त्याने त्यांना उशीरापर्यंत दमवून दमवून बेजार करून टाकले आणि संधी मिळताच पार्वतीला आपल्या पाठीवर बसवून तिथून पसार झाला. थोड्या वेळातच ते  पहिल्या किनारी पोहचले. आता दोघेही पहिल्यासारखे आनंदात राहू लागले. 

Tuesday, January 3, 2017

शत्रू झाले मित्र!

एक म्हातारा उंदीर होता. वयोमानामुळे तो कित्येक दिवस आजारी होता. त्यामुळे एक दिवस त्यानं आपला नातू सनीला जवळ बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाला, ‘‘सनी, आज मी तुला फार महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या मी तुला कधी सांगितल्या नव्हत्या. आता ऐक, मी आजपर्यंत तुला खोटं सांगत आलो की, या बिळाशिवाय जगात दुस-या कुठल्याही ठिकाणी बीळ नाही, पण तसं नाहीय.
या जगात वेगवेगळ्या प्राण्यांची असंख्य बिळं आहेत. तू या बिळातून बाहेर पडलास की मला सोडून निघून जाशील, या भीतीपोटीच मी तुला हे वास्तव सांगितलं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे उंदरांना फक्त पळताच येतं, असं मी तुला सांगायचो, पण खरी गोष्ट अशी की, आपल्याला पोहतादेखील येतं. हे सगळं तुला यासाठी सांगतो, की आता मी फार काळ जगेन, असं वाटत नाही. माझ्यानंतर तुला एकटयालाच येणा-या संकटाचा सामना करावा लागणार आहे, म्हणून तुला आधीच सावध केलेलं बरं!’’ ..आणि थोडय़ा दिवसांनी त्याच्या आजोबांचं निधन झालं.
त्यानंतर सनी काही दिवस बिळात एकटाच राहिला. आजोबांनी आणून ठेवलेले काही पदार्थ खाऊन त्यानं आपली भूक भागवली. पण आता जमा केलेलं अन्न संपत आल्यामुळे तो काळजीत पडला. कारण त्याच्यासाठी अन्नाची व्यवस्था त्याचे आजोबाच करत असल्यामुळे चिमुकल्या सनीला अन्न कसं मिळवतात, याची थोडीसुद्धा माहिती नव्हती. सनीने अजूनपर्यंत बाहेरचं जगसुद्धा नीट पाहिलं नव्हतं.
चिंतातूर परिस्थितीतच सनी एके दिवशी बिळाबाहेर पडला. सनीला तेव्हा आजोबा हयात असताना नेहमी जी गोष्ट सांगायचे, त्याची आठवण झाली, ती म्हणजे बाहेर आपले असंख्य शत्रू आहेत, ज्यात सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मांजर! हिच्यापासून खूप सावध राहावं लागतं. पण सनीनं आजपर्यंत मांजराला प्रत्यक्षात वा चित्रात कधीच पाहिलं नव्हतं. अन्न संपल्यावर तो एके दिवशी बिळाबाहेर पडला आणि अन्नाच्या शोधात इकडे-तिकडे तुरुतुरु धावू लागला. थोडा वेळ फिरल्यानंतर त्याला रामलालशेठचं मिठाईचं दुकान दिसलं. त्याने दुकानात चोरपावलाने प्रवेश केला आणि मग तिथे ठेवलेल्या लाडवावर ताव मारायला सुरुवात केली.
लाडवानंतर त्याची नजर एका तबकात ठेवलेल्या बालुशाहीवर पडली आणि त्याने तीसुद्धा गट्टम केली. लाडू-बालुशाही खाऊन त्याचं पोट तट्ट भरलं. यामुळे त्याला इतकी सुस्ती चढली होती की, बिळापर्यंत जाणंसुद्धा शक्य नव्हतं. मग तो झोपण्यासाठी जागा शोधू लागला, तेव्हा त्याला जवळच पांढ-या रंगाची रजई पडलेली दिसली. सनी कसाबसा तिथपर्यंत पोहोचला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की, ती रजई नसून पांढ-या रंगाचा कुठला तरी प्राणी आहे. रामलालशेठनं पाळलेल्या या मांजरीनं भरपेट खाल्यामुळे तीसुद्धा सुस्तावलीच होती. दुकानातच पाय पसरून झोपली होती. पोट टम्म भरल्यामुळे सनीला चालणं शक्य नसल्याने तो तिच्या शेपटीचा आधार घेऊन तिथेच झोपला. या आधी मांजराला पाहिलं नसल्यामुळे ती मांजर असल्याचं त्याला माहीत नव्हतं.
गाढ झोपेत असलेल्या मांजरीला आपल्या शेपटीवर उंदीर झोपला आहे, याची जाणीवच झाली नाही. थोडय़ा वेळाने रामलालशेठ दुकानात आल्यावर त्याने मोना आणि सनीला झोपलेलं पाहिलं. तो मोठय़ाने ओरडला, ‘‘मोना, ऊठ उंदीर आलाय!’’ आणि मोना जागी झाली. अचानक झालेल्या या हालचालीमुळे सनीचीसुद्धा झोपमोड झाली. कुठलातरी प्राणी आपल्यामागे लागला आहे, याची जाणीव झाल्यामुळे सनीही धावायला सुरुवात केली. थोडं अंतरानंतर मोनाने सनीला पकडलं. ती त्याला खाणार, तेवढयात त्याने तिच्याकडे विनंती केली, ‘‘गेले दोन-चार दिवस मी उपाशी होतो.
माझे आजोबापण मला सोडून गेले आणि त्यांच्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही.’’ मोनाने त्याच्याकडे तुच्छतेनेच बघितलं. तसं सनीनं आणखी घाबरत विचारलं, ‘‘तुम्ही कोण आहात आणि मला का पकडलं?’’ मोना त्याच्या अंगावर फिस्सकन ओरडली,‘‘मी मोना नावाची एक मांजर आहे.’’ मांजर कशी दिसते, हे सनीला तेव्हा पहिल्यांदा कळलं, पण त्याची कहाणी ऐकून मोनाला त्याची दया आली आणि तिनं सनीला सोडून दिलं. जाताना तिनं सनीला, ‘‘माझ्यातलं थोडं जेवण तुझ्यासाठी राखून ठेवेन. तू एवढंच करायचं, दुकानात कोणी नसेल तेव्हा येऊन ते घेऊन जायचं,’’ असंही सांगितलं.
मोना दुकानात परतल्यावर ‘‘तू असताना उंदीर कसा आत आला?’’ तुला कसं कळलं नाही, असे प्रश्न रामलालशेठ तिला विचारू लागला. पण मोनाने या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तेव्हा कंटाळून तो जिलेबी काढायच्या कामाला निघून गेला. थोडय़ा वेळाने मोनाने एक बर्फीचा तुकडा उचलून सनीला दुकानाबाहेर आणून दिला आणि तो घेऊन सनी बिळाच्या दिशेने पळाला.

अतिघाई संकटात नेई

एक गरीब लाकूडतोडया आपली पत्नी आणि सात मुलांसोबत एका छोटय़ा गावात राहत होता. घरात अठराविश्व दारिद्रय़ असल्यानं त्याचे दिवस मोठय़ा हलाखीत जात होते. दिवसरात्र काबाडकष्ट करूनही तो मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकत नव्हता. मुलं मोठी होत होती, तशी त्याची परिस्थिती आणखीच बिकट होत चालली होती. कधी कधी त्यांना अन्नही मिळत नव्हतं. त्यामुळे ती वाळलेल्या काटक्यांसारखी दिसू लागली होती. लाकूडतोडय़ाला त्यांची दशा पाहावत नव्हती.
त्यानं एक दिवस आपल्या पत्नीला सांगितलं, ‘आपली परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी आपण अपुरे पडत आहोत. त्यामुळे त्यांची परवड होण्यापेक्षा सगळ्या मुलांना जंगलात सोडून येऊ. तिथे ते आपल्या जगण्याचा काहीतरी मार्ग शोधतील.’ लाकूडतोडय़ाच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पोटच्या पोरांना आपल्यापासून वेगळं करण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तिनं त्याला खूप विरोध दर्शवला. पण शेवटी लाकूडतोडय़ाच्या समजावण्यानं ती तयार झाली. शेवटी ती बिचारी तरी काय करणार? तिचा नाईलाज होता. भुकेनं तडफडून आपल्या डोळ्यांदेखत मुलांचा मृत्यू पाहण्यापेक्षा ती मुलं जंगलात काहीतरी खाऊन जगतील, असं तिला वाटलं.
लाकूडतोडय़ाचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं थोरला मुलगा सोमनाथ लपून ऐकत होता. सकाळी लाकूडतोडय़ा सातही मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. तेव्हा सोमनाथनं आपल्या खिशात पुष्कळसे लाल खडे ठेवले. जंगलात जात असताना सोमनाथ खिशातून एकेक खडा काढून रस्त्यावर टाकू लागला. काही वेळानं लाकूडतोडय़ा दाट जंगलात आला. ‘मी पाणी शोधून आणतो’ असं सांगून त्यानं सातही मुलांना एका ठिकाणी थांबायला सांगितलं आणि तो घरी निघून गेला. मात्र तो मनोमनी खूप दु:खी होता. जगण्याचा दुसरा काहीच मार्ग समोर दिसत नसल्यानं अगदी नाखुशीनं तो हे सगळं करत होता.
सोमनाथ काही वेळानं आपल्या भावंडांबरोबर रस्त्यावर टाकलेल्या लाल खडय़ांच्या मदतीनं पुन्हा घरी आला. लाकूडतोडय़ाला मुलं घरी आलेली पाहून खूप आष्टद्धr(155)र्य वाटलं. शिवाय खूप दु:खही झालं. त्याला काय करावं हे समजेना! त्यानं दुस-या दिवशी पुन्हा मुलांसह जंगलाचा रस्ता धरला. या खेपेला सोमनाथ घाईगडबडीत खिशात लाल खडे ठेवायचं विसरला. त्याला वाटेत एक भाकरीचा तुकडा दिसला. तो त्याचेच तुकडे करून रस्त्यात टाकू लागला. सातही मुलांना जंगलात सोडून लाकूडतोडय़ा माघारी परत आला.
मागच्या वेळेसारखंच सोमनाथ पुन्हा भावंडांना घेऊन घरचा रस्ता शोधत शोधत माघारी येऊ लागला, पण अचानक तो रस्ता चुकला. कारण रस्त्यात टाकलेले भाकरीचे तुकडे पक्ष्यांनी वेचले होते, त्यामुळे त्याला घरी जाण्याचा रस्ता सापडेना. अशा प्रकारे सातही भावंडं जंगलातच हरवली. पण काही दिवसांनी अचानक एक व्यक्ती लाकूडतोडय़ाच्या घरी आली. त्यानं फार पूर्वी घेतलेलं पुष्कळ धन लाकूडतोडय़ाला परत केलं. शिवाय इतके दिवसांचं व्याजही दिलं. आता लाकूडतोडय़ाच्या घरात सगळं काही होतं, पण त्या पैशांचा आनंद घेण्यासाठी लाकूडतोडय़ाची मुलं त्याच्यासोबत नव्हती. आता मात्र लाकूडतोडय़ाला आणि त्याच्या बायकोला आपल्या मुलांची खूप आठवण येऊ लागली. त्यांची उणीव भासू लागली. आपण केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होऊ लागला. लाकूडतोडय़ा आणि त्याच्या पत्नीनं आपल्या सातही मुलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जंगल पालथं घातलं. खूप हिंडले. त्यांना खूप चिंता वाटत होती. पण मुलं काही सापडेनात. शेवटी हताश होऊन ते एका जागी बसले. तोच ‘बाबा तुम्ही कुठे आहात?’ अशी आरोळी त्यांना ऐकू आली. आपल्या मुलांचा आवाज त्यांनी लगेचच ओळखला. धावतच लाकूडतोडय़ा आणि त्याची बायको त्या आवाजाचा मागोवा घेत जाऊ लागले. आणि अखेरीस त्यांची त्यांच्या मुलांशी भेट झाली. लाकूडतोडय़ाने आपल्या मुलांची माफी मागितली. यापुढे कितीही मोठं संकट आलं तरी तुम्हाला सोडून जाणार नाही, असं वचन दिलं आणि?आता सगळं कुटूंब सुखासमाधानाने एकत्र राहू लागलं.
म्हणूनच मित्रांनो, अतिघाई संकटात नेई असं म्हटलं जातं. आपली सहनशक्ती थोडी वाढवली तर थोडं उशिरा का होईना, पण चांगलं फळ नक्कीच मिळतं.

अदलाबदल

एका छोट्याशा गावात चाओ येन नावाचा एक लहान मुलगा राहात होता. बालपणापासूनच तो मोठा समजूतदार आणि गावातल्या सगळ्यांचा आवडता होता. तो ज्या गावात राहत होता, त्या गावाच्या दक्षिणेला असलेल्या उंच पहाडावरील मंदिरात एक पवित्र ग्रंथ ठेवण्यात आला होता, ज्यात लोकांचं भविष्य?लिहिलेलं होतं. देवळात येणा-याला पुजारी ते वाचून दाखवत असे. जेव्हा चाओ येन अठरा वर्षाचा झाला, तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला मंदिरात नेलं. वडिलांनी पुजा-याला चाओचे भविष्य वाचून दाखवण्याविषयी विनंती केली. पुजा-याने पहिल्यांदा त्याला त्याच्या शिक्षणाविषयी सांगितलं, नंतर कामाविषयी सांगितलं, पण पुढे तो अचानक बोलायचा थांबला. चाओच्या वडिलांचं काळीज इवलसं झालं. त्यांनी काळजीच्या स्वरात विचारलं, ‘‘काय झालं, असं अचानक का थांबलात?’’
पुजारी दु:खी स्वरात म्हणाला, ‘‘सांगताना मला फार दु:ख होतंय, पण..’’
‘‘काय झालं, महाराज?’’ चाओच्या वडिलांनी काळजीच्या आर्त स्वरात विचारलं.
‘‘या ग्रंथानुसार तुमच्या मुलाचे आयुष्य अवघं एकोणीस वर्षाचं आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे.’’
चाओ आणि त्याच्या वडिलांचा त्यावर विश्वासच बसला नाही. वडील पुन: पुन्हा म्हणाले, ‘‘नीट पहा, नक्कीच कुठे तरी चूक झाली असेल.’’
‘‘नाही, कुठेच चूक नाही. यात तर अगदी स्पष्ट दिसतं आहे.’’ पुजारी म्हणाला आणि त्याने ग्रंथ बंद करून ठेवला.
चिंतेत बुडालेले पिता-पुत्र घरी परत आले. त्यांनी मनाला समजावलं, जे काही घडायचं आहे, ते चुकणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना करू. स्वत:चं भविष्य ऐकल्यापासून चाओ उदास राहू लागला, त्याचं मन कशातच रमेना. एकच चिंता त्याला सतावू लागली, ती म्हणजे आपल्या पश्चात आई-वडिलांचं कसं होणार? याच काळजीत असताना एक दिवस चाओ धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाता घेऊन शिकारीला गेला. चालत चालतच तो उंच डोंगरावर पोहोचला. तो मनाने उदास झाला होता आणि चिंतेने त्याला घेरलं होतं. आपल्या आई-वडिलांचा सांभाळ कोण करणार? या एकाच प्रश्नाने तो अस्वस्थ होता. तो डोंगरावर चढतच राहिला. चढता चढता तो एका उंच छोटय़ा गवताळ प्रदेशात पोहोचला. तिथे चहुबाजूंनी रंगीबेरंगी टवटवीत फुले उमलली होती. तिथे छान ऊन पडलं होतं. थकलेला चाओ तिथल्या एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप येऊ लागली आणि तो तिथेच झोपला. चाओचे डोळे उघडले, तेव्हा अंधार झाला होता. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता, त्याचबरोबर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाजही ऐकू येत होता. तो पटकन उठला आणि आवाजाच्या दिशेने पुढे सरकला. तिथे त्याला दोन माणसं समोरासमोर एका दगडावर बसलेली दिसली.
त्यांच्यात कवड्यांच्या खेळासारखा काहीतरी खेळ सुरू होता. या खेळातच मधे मधे ते कुठले कुठले तरी अंक उच्चारायचे.
चाओ झाडाआड उभा राहिला. तेव्हा दोघांमधला एकटा रुंद कपाळाचा आणि वयस्क माणूस त्याला दिसला, ज्याने हिरव्या रंगाचा गाऊन घातला होता. त्याची चप्पलसुद्धा हिरव्या रंगाची होती, तर त्याच्या समोर बसलेल्या माणसाचे कपडे आकाशी रंगाचे होते. त्यावरील चांदण्यांचे टिपके चकाकत होते. त्याचे केस कुरळे आणि खांद्यापर्यंत लोंबणारे होते. तो अंक उच्चारायचा, तेव्हा वृद्ध डोक्याला हात लावून विचार करत राहायचा. अंक वाढायचे, कमी व्हायचे, मग शेवटी दोघेही एका अंकावर येऊन थांबायचे.
आता चाओला राहवलं नाही. तो तडक त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. ते दोघेही अजूनही कुठल्या तरी अंकावर विचार करत होते. इतक्यात आकाशी निळ्या कपडय़ातल्या मनुष्य म्हणाला, ‘‘व्वा, काय नशीब मिळवलंय या माणसानं! फारच छान!’’ ?
इतक्यात त्या दोघांचे लक्ष चाओकडे गेले. ‘‘तू कोण आणि इथे कसा आलास?’’ निळ्या गाऊनवाल्याने विचारले.
चाओ म्हणाला,‘‘मी तर इथेच झोपलो होतो. मला आता जाग आली, तेव्हा तुम्हाला पाहिलं. कृपया, तुम्ही कोण आहात सांगाल का?‘‘
‘‘कोणी नाही, तू जा इथून..’’ ते म्हणाले.
‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही कोणी सामान्य नाहीत. पण कृपा करून मला सांगा की तुम्ही कोण आहात?’’चाओ आदराने पुढे झुकत म्हणाला.
निळा गाऊनवाला म्हणाला,‘‘आकाशात ती ता-यांची झुंड दिसते का, ज्यांचा आकार अस्वलासारखा आहे?’’
‘‘हो, आजीने दाखवली होती. आजसुद्धा मी ओळखतो.’’ चाओ अगदी उत्साहित होऊन म्हणाला.
‘‘मी त्या ताऱ्यांचा राजा आहे, आणि हे दीर्घायुष्य देणारे देव, समजलं? आता जा घरी.’’
चाओ पटकन खाली बसला आणि त्याने दीर्घायुष्य देणा-या देवाचे पाय धरले, ‘‘मला तुम्हीच हवे होतात, आता तुम्हीच फक्त माझी मदत करू शकता.’’
’’ मदत? कसली मदत?’’ वृद्ध म्हणाला.
भाग्यग्रंथात माझे आयुष्य फक्त एकोणीस वर्षाचे आहे आणि मला एकोणीस वर्षे पूर्ण व्हायला केवळ काही दिवसच बाकी आहेत. मला मरणाची भीती नाही, पण माझ्या पश्चात माझ्या आईवडिलांचे कसे होणार, याचीच मला चिंता सतावत आहे. माझ्या हातून माझ्या वृद्ध आई-वडिलांची सेवा घडू द्या. कृपाकरून मला मदत करा.’’ चाओने अत्यंत कळवळून विनंती केली.
निळा रंगाचा अंगरखा परिधान केलेल्या देवतेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,‘‘ हे बघ, नशीब एकदाच लिहिलं जातं. ते पुन्हा बदलता येत नाही. ग्रंथात लिहिलेलं काही पुसता येत नाही. आता जे काही आयुष्य उरलं आहे, ते तू आई-वडिलांच्या सेवेसाठी घालव. जा, घरी जा उशीर करू नकोस.’’
पण चाओ तेथून हलला नाही, तो वृद्ध व्यक्तीचे पाय धरून रडत राहिला.
दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. त्यांनाही काय करावं सुचत नव्हतं? काही वेळ विचार केल्यावर हिरव्या गाऊनमधला वृद्ध म्हणाला,‘‘आम्ही भाग्यग्रंथात लिहिलेले बदलू शकत नाही, पण अदलाबदली करू शकतो’’असे म्हणून वृद्ध देवता हसली. त्याचबरोबर निळ्या रंगाचा गाऊनवालादेखील हसला.
त्याच्या बोलण्याचा अर्थ न उमजल्याने चाओने आपली मान वर केली. पण तिथे कोणीच नव्हतं. त्याला रडू कोसळलं. आपल्या मदतीला आता कोणीच येणार नाही, याची त्याला खात्री झाली. आपला भाता आणि धनुष्य खांद्यावर घेऊन तो मोठय़ा जड अंत:करणाने डोंगर उतरू लागला.
चाओने या घटनेबद्दल कोणालाही सांगितलं नाही. आता तो दर आठवडय़ाला डोंगरावर जायचा आणि त्या दगडावर मेणबत्ती लावायचा. त्याचा हा नियम तो एक्याण्णव वर्षाचा होईपर्यंत चालत राहिला. शेवटी ती देवता कोणत्या अदलाबदलीविषयी बोलत होती, हे त्याच्या लक्षात आलं. दीर्घायुष्य देणा-या देवाने एकोणीस मधला सुरुवातीचा एक अंक काढून नऊच्या पुढे ठेवला होता. आजदेखील चीनच्या दक्षिण पर्वतावर एक मंदिर आहे, तिथे लोक आपल्याला दीर्घायुष्य लाभावं, यासाठी प्रार्थना करायला नियमित जातात. (चिनी लोककथा) (dainik prahaar.2013)

Monday, January 2, 2017

फुटकी घागर

बालकथा

ही गोष्ट आहे आपल्या  हिंदुस्थानातली. खूप खूप वर्षांपूर्वीची. एक होता भिवा. त्याच्याजवळ दोन घागरी होत्या. तो त्या घागरी एका लांब काठीला बांधायचा. त्यातली एक घागर होती चांगली आणि दुसरी होती फुटकी.
 भिवा रोज सकाळी नदीवर जायचा. दोन्ही घागरींमध्ये  पाणी भरायचा आणि कावड खांद्यावर घेऊन चालत राहायचा. हा त्याचा प्रवास उंच पहाडावर  असलेल्या त्याच्या मालकाच्या घरापर्यंत असायचा. तो मालकाच्या घरी जाईपर्यंत फुटलेल्या घागरीतलं पाणी  अर्धभर गळून जायचं. भिवा घागर पाण्यानं फुल्ल भरायचा, पण पाणी वाटेत  सांडत राहायचं. असे  कित्येक दिवस चालले होते. मालकाच्या घरी मात्र दीड घागर पाणी पोहचायचं.
भिवाला स्वत: चा फार अभिमान होता. तो मन लावून काम करायचा. सगळ्यांच्या उपयोगाला पडावं, असा त्याचा खासा स्वभाव होता.त्याच्या मनात दया, करुणा होती.  फुटलेल्या घागरीला मात्र आपल्याकडून घडत असलेल्या कृत्याची शरम वाटायची. तिला आपल्यातल्या कमीपणा जाणवायचा. तिला ठाऊक होतं, जितकं काम आपल्याला करायचं आहे, तितकं तिच्या हातून घडत नाही.  ती लाचार होती. त्यामुळे ती डोळ्यांतून आसवं  गाळायची. ती दु: खी आणि उदास  राहायची.
एक दिवस फुटक्या घागरीने मनाचा हिय्या केला. आणि  ती भिवाला म्हणाली," मला माझी स्वत: ची शरम वाटते. मी अपूर्ण आहे. मी आपली क्षमा मागते."
भिवानं विचारलं, म तुला कशाची शरम वाटते?"
" तुम्ही  किती कष्टानं पाणी आणता. मी ते थांबवू शकत नाही.रस्त्यात ते गळून जातं. त्यामुळे तुम्ही मालकाला पूर्ण घागरभर पाणी देऊ शकत नाही."फुटलेली घागर म्हणाली.
भिवाला फुटक्या घागरीची दया आली. तिला म्हणाला,"आता पुन्हा आपण पाणी आणू ना तेव्हा तू रस्त्यांवरच्या सुंदर  फुलांकडे लक्षपूर्वक पहा. चढत्या उन्हात ही फुलं मनाला किती तजेला देतात."आणि खरोखरच त्या दिवशी फुटक्या घागरीनं पाहिलं की, रस्त्याकडेला किती सुंदर आणि रंगी-बेरंगी फुलं फुलली आहेत.
त्या लाल, निळ्या, पिवळ्या फुलांना पाहून काही काळ ती आपलं दु: ख विसरून गेली. परंतु, मालकाच्या घराजवळ आल्यावर ती पुन्हा उदास झाली. तिला वाईट वाटलं, पुन्हा इतकं पाणी वाया गेलं. नम्रपणे तिने भिवाची क्षमा मागितली. तेव्हा तो फुटक्या घागरीला म्हणाला, "तू वाटेने येताना तुझ्या बाजूला ध्यानपूर्वक  पाहिलंस का? वाटेत ती सुंदर सुंदर फुलं तुझ्याच बाजूला फुललीत ना? मला तुझ्यातल्या कमतरतेची जाणीव होती. आणि मी त्याचा फायदा उठवला. मी फुलांच्या बिया फक्त तुझ्या बाजूलाच लावल्या होत्या. मग आपण रोज सकाळी या वाटेनं यायचो ना, तेव्हा तू या रोपांना पाणी द्यायचीस."
" गेल्या दोन वर्षांपासून ही फुलं मालकाच्या घराची शोभा वाढवत आहेत. तू जशी कशी आहेस, पण मोठ्या कामाची आहेस. तुझ्यामुळेच तर मालकाच्या घरी जाणारी वाट या सुंदर, तजेलदार  फुलांनी बहरून टाकली आहेस."
परमेश्‍वरानं आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही कमी दिलं आहे. आपण सगळे या फुट्क्या घागरीसारखे आहोत. जर आपली इच्छा असेल तर आपण या कमजोरीवर मात करू शकतो. आपण कधीही आपल्या कमीपणाला घाबरून जायचं नाही. आपल्यात काय कमी आहे, याची जाणीव आपल्याला हवी. मग त्या कमीपणाशिवाय आपण आपल्या  चोहोदिशा सौंदर्याची उधळण करू शकतो. आनंद वाटू शकतो. आपल्या कमीपणात आपण आपली मजबुती शोधू शकतो. 

मोफत एप घेताना काळजी घ्यावी


मोबाईल, इंटरनेट आज काळाची गरज झाली आहे. मोबाईलसह कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्सच्या वापराने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बहुतेकांचे आयुष्यच ऑनलाईन झाले आहे. अशावेळी सायबर गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे. या ऑनलाईन उपकरणांवर हजार दोन हजार नव्हे तर ३३ कोटी व्हायरसचा दर महिन्याला हल्ला होत असल्याची धक्कादायक माहिती  उपलब्ध झाली आहे. इंटरनेटच्या प्रवेशाने संपूर्ण जग मोबाईलमध्ये सामावले आहे. फेसबुक, व्हॉट्स अँपसारख्या हजारो अँप्सने एक वेगळीच दुनिया निर्माण केली आहे. मात्र याचा आतोनात आणि असुरक्षितपणे केलेला वापरही मोठय़ा धोक्याचे कारण ठरले आहे. वर्तमान काळात बहुतेकांचे आयुष्यच ऑनलाईन झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बसता-उठता आयुष्यातील कोणत्याही गोष्टी सोशल साईटवर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी खासगी गोष्टीही बिनदिक्कतपणे सोशल साईटवर अपलोड केल्या जातात. याचाच फायदा सायबर जगातले गुन्हेगार घेत आहेत. तुमची खासगी माहिती हॅक करण्यासाठी सिस्टिममध्ये व्हायरस टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून अनेकांना आर्थिक आणि सामाजिक नुकसान सहन करावे लागते.ऑनलाईन सिस्टिममध्ये दररोज तीन लाख व्हायरस डिटेक्ट केले जातात. यातील ८0 टक्के व्हायरस धोकादायकच असतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना मोफत मिळणार्‍या अँप्ससारख्या वस्तू तपासूनच डाऊनलोड कराव्या. शक्यतो खासगी माहिती सोशल साईटवर अपलोड करण्याचे टाळावे

आकाशात घर

बालकथा                                                          
     एक गरीब माणूस होता. पण होता मोठा हुशार.तो नेहमी श्रीमंतांची टर उडवायचा. त्यांची चेष्टा करायचा. कधी कधी राजालादेखील सोडायचा नाही. राजाची टर उडवताना तो कशाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही. त्याचा हा कारनामा राजापर्यंत पोहचला होता. त्यामुळे तोदेखील नाराज होता.
     एक दिवस राजाने त्याला आपल्या दरबारत बोलावून घेतले. म्हणाला, ‘ मी ऐकलंय की तू फार हुशार आहेस. मग माझ्यासाठी तीन दिवसांत आकाशात घर बांधून दाखव बरं. तुला किती माणसं लागतील तितकी मिळतील. पण लक्षात ठेव. तीन दिवसात आकाशात घर बांधले नाहीस तर तुला माझे सैनिक शिक्षा देतील.
  ‘महाराज, मी नक्की आकाशात घर बांधून देईन. इतके म्हणून तो माणूस घरी आला. पण त्याला प्रश्‍न पडला. आकाशात घर कसं बांधायचं?त्याने रात्रभर विचार केला. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक मोठा पतंग बनवला. त्याला एक घंटी बांधली. एका झाडाच्या शेंड्यावर गेला आणि त्याने तो पतंग उडवला. त्याची दोरी तिथेच बांधून खाली आला. 
    दुसर्‍यादिवशी लोकांना घंटीचा आवाज ऐकू येऊ लागला. राजानेदेखील तो आवाज ऐकला. आता तो माणूस राजाजवळ गेला. म्हणाला, ‘महाराज, आकाशात घर बांधण्याचं काम मी  सुरू केलं आहे.आपल्याला घंटीचा आवाज ऐकू येतोच आहे. आकाशातले मजूर घंटी वाजवून काही तरी मागत आहेत. आपण आपल्या सिपायांना सांगून तेवढ्या वस्तू आकाशात पोहोचत्या  करा.
    राजाने विचारले, ‘ माझे शिपाई आकाशात कसे चढतील?’
    माणूस म्हणाला,‘ तिथंपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग आहे.
     राजाच्या आदेशावर सिपाई त्याच्यासोबत निघाले. माणसाने त्यांना पतंग ज्या झाडाला बांधला होता, त्या झाडाजवळ आणले. व त्यांना ती दोरी दाखवत म्हणाला,‘ हाच तो रस्ता. यावरून तुम्ही आकाशात जाऊ शकता.
     सिपायांनी दोरीवर चढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना काही वर चढता येईना. शेवटी वैतागून शिपाई राजाजवळ आले आणि म्हणाले, ‘महाराज, आकाशात कुठल्याच  माणसाला  चढून  जाता येत  नाही.
     राजा म्हणाला, ‘ तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आकाशात माणसाला कसं बरं चढता येईल?.’
    तेवढ्यात तो माणूस म्हणाला, ‘ हो का, महाराज! आपल्याला ही गोष्ट माहित होती तर मला आकाशात घर कसे बांधायला सांगितलंत?’ राजाजवळ याचं उत्तर नव्हतं. पण त्याच्या हुशारीची  राजाने  दाद दिली. शिवाय  आपल्या दरबारात मोठ्या  पदावर त्याची नियुक्ती केली. साहजिकच तेव्हापासून  त्याने श्रीमंतांची टर उडवायचे सोडून दिले.