Wednesday, October 11, 2017

'स्टॉप कॅन्सर'ची जनजागृती

     कर्करोग अर्थात कॅन्सर आपल्या देशात थैमान घालायला लागला आहे. 2008 मध्ये हा आपल्या देशात आठव्या क्रमांकावर होता, आज तो दुसर्या स्थानावर आहे. 200 प्रकारचे कर्करोग लोकांना होतात. प्रत्येक तिसर्या माणसाला कर्करोग गाठत असून सगळ्यात वेगाने हा रोग आपल्या देशात फैलावत चालला आहे. वेळीच याला आवर घातला नाही आणि जनजागृतीबरोबरच अॅक्शन प्लॅन राबवला गेला नाही तर घरटी एक-दोन रुग्ण कर्करोगाचे दिसतील. स्टॉप कॅन्सर मिशन मल्टीपर्पज सोसायटीचा कॅन्सर समुपदेशक विजय मानकर सांगत होता, तेव्हा जिरग्याळ(ता.जत) मधल्या प्राथमिक शाळेत कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले शिक्षक अगदी जीव कानात आणून ऐकत होते.नागपुरातली ही सामाजिक संस्था सध्या राज्यभरातल्या शाळांमध्ये जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कर्करोगाबद्दल जागृतीचे काम करत आहे. मानकर सांगत होता, आम्ही आतापर्यंत राज्यातल्या 30 जिल्ह्यांमधल्या शाळांमध्ये जाऊन कॅन्सरबाबत जागृती करण्याचे काम केले आहे. साम्गली जिल्हा हा शेवटचा जिल्हा राहिला आहे. 13 तारखेला हाही जिल्हा पूर्ण होणार आहे. मात्र तो जी कॅन्सरची आपल्या देशातली भयावस्था सांगत होता, तेव्हा उपस्थितांमध्ये एक प्रकारची भितीची लकेर उमटत होती. शेवटी सर्व शिक्षकांनी आपले कुटुंब या भयानक आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या शाळेतल्या मुलांना, त्यांच्या पालकांना जागरूक करू, असाही त्यांनी निश्चय केला.

     मानकरच्या बोलण्यातून आणखी एक माहिती उघड झाली ती म्हणजे या रोगाविषयीचा जनजागृतीचा अभाव! त्यांचे म्हणणे 0.1 टक्का फक्त जनजागृती केली जाते.ही आकडेवारी म्हणजे काहीच नाही.म्हनजे आपल्या जागृती पातळीवर फार मोठी मोहीम राबवण्याची गरज आहे. शिवाय ही जागृती केल्यानंतर जी अॅक्शन घ्यायला हवी ती घेतली जात असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. 10 टक्के जनजागृती झाली तर प्रत्यक्ष कार्यवाही ही 90 टक्के व्हायला हवी कॅन्सर आटोक्यात येणार आहे. मुळात हा रोग होऊ नये,यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजे. यासाठी वेळोवेळी आपल्या शरीराची संपूर्ण तपासणी करून घ्यायला हवी. कारण या तपासणीमुळे आपल्या शरीरात प्राथमिक अवस्थेत कोणकोणते आजार,रोग आहेत,याची कल्पना येते नी आपण त्याच्यापासूनच्या बचावासाठी प्रयत्न करायला लागतो. कॅन्सर म्हणजेच कर्करोग हादेखील प्राथमिक अवस्थेत असेल तर तो बरा करता येतो. प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराजसिंग, अभिनेत्री मनीषा कोईराला यांना तो बरा करता आला,त्याला कारण म्हणजे हा रोग प्राथमिक अवस्थेत असल्याचे निदान त्यांना लवकर कळले. दुसर्या-तिसर्या टप्प्यात हा रोग गेल्यास वाचण्याचे चान्सेस फारच कमी आहेत.त्यामुळे हा रोग होऊ नये,यासाठी आपली जीवनशैली सुधारली पाहिजेच पण वेळोवेळी तपासण्या या करायलाच हव्यात.
    वर आपण पाहिले की, जवळपास 200 प्रकारे कर्क रोग जगभरातल्या लोकांना होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तो  क्लिष्ट आहेच आणि त्यावरचा उपचारही कठीण आणि महागडा आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून सावध राहणे,हेच आपल्या भल्याचे आहे. साधारणत: कर्करोग (कॅन्सर) हा धुम्रपान केल्याने आणि तम्बाकूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो. मद्यपान केल्याने, शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याने होतो.खाण्या-पिण्याच्या सवयीदेखील कारणीभूत आहेत.मानसिक तणाव,ॅसिडीटी, अतिप्रखर सूर्य किरणे अशा किती गोष्टींमुळे लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडतात.या गोष्टी टाळल्या तर आपन यापासून बचावू शकतो.यासाठी आपल्याला महत्त्वाचे म्हणजे आपली जीवनशैली बदलली पाहिजे. शरीर सतत क्रियाशील ठेवण्याबरोबरच आपल्या शरीराला घातक ज्या गोष्टी आहेत,त्या टाळल्या पाहिजेत. त्यापासून दूर राहिले पाहिजे.फास्टफूडला रामराम ठोकला पाहिजे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नघटक आपल्या शरीरात जायला हवेत, अशी व्यवस्था करायला हवी. योगा,व्यायाम याकडे लक्ष द्यायला हवे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला विचार सकारात्मक ठेवला पाहिजे. चांगला विचार केला पाहिजे, आपल्यासह दुसर्यांचे चांगले चिंतले पाहिजे.निरपेक्ष भावनेने काम करत राहिल्यास चांगला फायदा होतो.
     आपल्या देशातील सर्वच वयोगटातील लोकांना कॅन्सर (कर्करोग) होतो. स्त्रिया याला अधिक बळी पडत आहेत.छातीचा,फुफ्फुसाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर महिलांमध्ये अधिक प्रमाणात होत आहे. लहान मुलांनाही तो होत आहे. हा रोग काही प्रमाणात अनुवंशिकही आहे. मात्र प्राथमिक अवस्था आपल्या लक्षात आली तर आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो.त्यामुळे आपल्या शरीराच्या वेळच्यावेळी तपासण्या करायला विसरू नका. आनंदी राहा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वागा, शरीराला घातक असणार्या गोष्टींपासून दूर राहा, म्हणजे हा भयानक कॅन्सर तुमच्या आसपासही फिरकणार नाही.

Tuesday, October 10, 2017

अंधश्रद्धा जाता जात नाही

     महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला.पण माणसाच्या डोक्यातील अंधश्रद्धा जाता जायला तयार नाही. करणी करते म्हणून आपल्याच आईला मारहाण करून तिला ओढ्यात फेकून दिल्याची घटना सांगली जिल्ह्यातल्या कुंभारगावात घडली आहे. ही घटना जितकी संतापजनक आहे,तितकीच आईला मारहाण करणार्या मुलाच्या आणि सुनेच्या विचाराची कीव करायला लावणारी आहे. अनेकांनी करणी-बिरणीच्या नादाला लागून आपली स्वत:ची घरेच उदवस्त करून टाकली आहेत.यामुळे आपण स्वत:ही शांततापूर्ण आयुष्य जगू शकत नाहीत आणि दुसर्यालाही जगू देत नाहीत. त्यामुळे शेवटी इथे कायदा कमी पडतो. अजून आपण समाजातून अंधश्रद्धा घालवण्यासाठी बराच पल्ला घाठावयाचा आहे,हेच आपल्याला जाणवत राहते. जनजागृतीच्याबाबतीत आपण अद्याप खूप मागे आहोत. कायदे करून काही होत नाही,ते कागदावरच राहतात,याचा प्रत्यय आपल्याला जागोजागी येत आहे. आपल्या राज्यात तंबाकूजन्य पदार्थ,गुटखा,मावा यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आहे. गावठी दारू, मटका, बेकायदा प्रवासी वाहतूक अशा कितीतरी गोष्टींवर बंदी आहे, मात्र ही बंदी फक्त कागदावर आहे. सगळे काही अलबेल सुरू आहे. आपण जोपर्यंत जनजागृतीमोर्चावर अधिक काम करत नाही,तोपर्यंत प्रत्यक्षात आपल्याला सकारात्मक चित्र दिसणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलनबाबतीतही हेच म्हणावे लागेल.
     आईला मारहाण करणारा नाथा नामदेव माने याच्यावर आणि त्याच्या बायकोवर-सुमनवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नाथाची आई तुळसाबाई आपल्या दुसर्या मुलाकडे-संजयकडे शिरोळला राहते. नाथाच्या मुलाचे परवा निधन झाले म्हणून तुळसाबाई आपल्या मुलासह कुंभारगावला गेल्या होत्या. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यावर मुलगा संजय हा तिच्या आईला तिथेच सोडून शिरोळला गेला. दरम्यान दुसर्यादिवशी रात्री नाथा आणि त्याच्या बायकोने तुळसाबाई यांच्याबरोबर भांडण काढायला सुरुवात केली. तुझ्यामुळेच माझा मुलगा गेला म्हणत नाथा आणि सुमन यांनी आईला मारहाण केली.पट्ट्याने आणि काठीने मारहाण केल्याने त्या बेशुद्ध झाल्या. अशा बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत त्यांनी तुळसाबाई यांना कुंभारगावच्या ओढ्यात नेऊन टाकले. त्यांना सकाळी शुद्ध आली. त्या कशाबशा जयसिंगपूरला गेल्या आणि तिथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्या.
     आईला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करणार्या आणि तशाच अवस्थेत ओढ्यात फेकून देणार्या निर्दयी पुत्राचा संताप येणं साहजिक आहे. अर्थात अजूनही असेच चित्र कमी-जास्त प्रमाणात आपल्या आजूबाजूला आहे.ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत,त्या गोष्टी आपण मनावर घेऊन आपण आपली रक्ताची नाती तोडत आहोत. आजकाल शिकलेली माणसेदेखील अशा गोष्टींवर विश्वास ठेवून आपलेच नुकसान करून घेत आहेत. या अडाणीपणाचा फायदा मात्र बुवा-बाबा घेऊन आपली घरे भरत आहेत. अजूनही आपल्या गावच्या गल्ली-बोळात देव-देवर्षी कराणार्या बायका-पुरुष देवाच्या नावावर आपले दुकान चालवताना दिसत आहेत. बाबा रहिमसारखा भोंदू माणूस त्यांच्या या अडाणीपणाचा लाभ उठवत स्त्रियांच्या इज्जतीवरच हात घालतो,तेव्हा अशा लोकांच्या विचाराची, अडाणीपणाची कीव आल्याशिवाय राहत नाही. शाळेतल्या पहिल्या धड्यापासून आपण मूल्ये,श्रद्धा-अंधश्रद्धा शिकत आलो तरी आपण बुवा-बाबाच्या मागे लागतो,हेच मोठे दुर्दैव आहे. आपल्या देशात गरीबी सगळ्यात मोठी आहे. या गरिबीमुळे माणूस पार पिचला आहे,गंजला आहे. दारिद्ˆय घालवू, नोकर्या देऊ असे राज्यकर्ते कितीही म्हणत असले तरी त्यांच्याकडून ही गरिबी काही हटत नाही. उलट राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळे गरीब हा आणखी गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला आहे. याच गरिबीच्या साखळदंडातून मुक्त होण्याची धडपड करणारा माणूस श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला कवटाळून बसतो, आणि अशी काही कृत्ये करतो की, त्याचे पाय आणखी खोलात जातात. सरकार चालवणार्यांनी कितीही कायदे केले तरी त्याचा उपयोग होत नाही. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्यांच्या हातात काठी दिली आहे,त्यांची नीतीमत्ताही ठीक नाही. मग कायदा हा फक्त कागदावरच राहतो.

Monday, October 9, 2017

गुंडगिरी बोकाळली

     सांगली किती चांगली, असे एकेकाळी म्हटले जायचे.पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेली सांगली गुंडांच्या तावडीत सापडली आहे. इथे दिवसा-ढवळ्या मुडदे पडत आहेत. खून,मारामार्या, चोर्या या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. गुंडांची वर्चस्वासाठी टोळीयुद्धे होऊ लागली आहेत.त्यामुळे पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हान होऊन बसले आहे. पिस्तूल तर आता लहान मुलांच्या हातातल्या खेळण्यासारखे युवकांच्या हातात दिसायला लागले आहे. त्याची तस्करी जोमात सुरू आहे. परवाच सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सातारा जिल्ह्यातल्या दोघांना अटक करताना त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि 27 काडतुसे जप्त केली होती. यावरून आता पोलिसांनी पिस्तुलांची तस्करी करणार्या टोळीचा पर्दापाश करण्याचा विढा उचलला आहे,त्यातून सांगलीचे एक पथक मध्यप्रदेशातल्या तस्करांना पकडायला तिथे गेले होते. तिथे त्यांनी दोघा तस्करांना पकडले मात्र कारवाई करताना तस्करांनीच या पथकावर हल्ला केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला तरीही पोलिसांनी दोघा तस्करांना पकडण्यात यश मिळवले, यासाठी सांगली पोलिसांचे अभिनंदन करायला हवे.

     पिस्तुलांची तस्करी फक्त सांगली जिल्ह्यातच होत नाही तर त्याची पाळेमुळे कोल्हापूर,सोलापूर आणि सातारा जिल्ह्यापर्यंत पोहचली आहेत.त्यामुळे राज्यातला पश्चिम महाराष्ट्र पिस्तूल तस्करीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या भागात ऊसक्षेत्र अधिक आहे, तशी श्रीमंतीही बहरली आहे.त्यामुळे साहजिकच गुंडगिरी यान त्या कारणाने पोसली जात आहे. राजकीय आश्रय त्यांना मिळत असल्याने त्यात सातत्याने वाढ होत आहे. मात्र यामुळे क्रातिकारकांचे हे जिल्हे आता गुंडांच्या तावडीत सापडले आहेत.ही खरे तर मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हटली पाहिजे.राजकीय वर्चस्व, अवैध धंदे पोसण्यासाठी गुंडांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढायला लागला आहे. सावकारीतही आता यांच्याशिवाय चालत नाही, अशा परिस्थितीमुळे गावागावात गुंड निपजायला लागले आहेत. माणसांचा जीव स्वस्त झाला आहे. काही हजार ते काही लाखासाठी माणसांचे खून व्हायला लागले आहेत. माणसाच्या जीवाला जनावरापेक्षाही कवडीमोलाची किंमत आली आहे. छोट्या-मोठ्या कामांसाठी गुंडांचा वापर मोठा धक्कादायक असून यामुळे अशांतता तर नांदत आहेच,पण याकडे आजची तरुण पिढीही आकर्षित होत आहे, ही मोठी चिंताजनक गोष्ट आहे. या तरुणांना भविष्य काय आहे, याची चिंताच नाही.
आजकाल काम करून पोट भरण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. सहजासहजी सगळे कसे मिळेल,याकडे तरुणपिढी आकर्षित होत आहे. चैनीत गुरफटलेल्या तरुणांना हेरून काही लोक (यात राजकीय लोक आघाडीवर आहेत)त्यांचा वापर आपल्या स्वार्थासाठी करत आहेत. चैनीला चटावलेल्या तरुणांना दुसर्यांवर दमबाजी करणे, मारहाण करणे,खून करणे अशा गोष्टी सोप्या वाटत आहेत. कारण त्यांचा गॉडफादर त्यांना सोडवायला बसला आहे. त्यामुळे पुढची कसलीच चिंता अशा तरुणांना राहिलेली नाही. गुंडगिरीचे लोण पार आता ग्रामीण स्तरावर पोहचले आहे. गावागावात अशा लोकांकडून दहशत माजवली जात आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यकाळ मोठा कठीण आहे,एवढेच म्हणावे लागेल.
     सांगली पोलिसांनी या आठवड्याभरात तब्बल 16 पिस्तूल जप्त केले आहेत. अशी किती तरी हत्यारे बिनधास्त वापरणारे असतील.कारण गेल्या काही वर्षात सातत्याने विनापरवाना पिस्तूल, हत्यारे बाळगणार्यांना पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. आठवड्यात एक-दोन सारख्या घटना घडतान दिसत आहेत. मग न सापडलेल्यांची संख्या किती असेल? विशेष म्हणजे ही हत्यारे सहजासहजी कशी मिळतात, हेच मोठे कोडे आहे. हत्यारे बाळगणे हा काहीजणांच्या हातचा मख झाला असावा, असेच सध्याच्या परिस्थितीवरून वाटत राहते. विनापरवाना हत्यार हाताळणे,हा गुन्हा असताना सहजासहजी लोक ही हत्यारे वापरत आहेत.अशा लोकांना पोलिसांचा नव्हे कशाचाच धाक राहिलेला नाही, हेच यावरून दिसते.खंडण्या, अपहरण,खून आदी गुन्ह्यांची वाढ चिंताजनक असून कायद्याच्या माध्यमातून अशा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
     चैनीखोरवृत्ती,काम करण्याची सवय संपलेली आणि त्यात वाढती बेरोजगारी यामुळे आजची तरुण भरकटत चालली आहे.घरचे संस्कार संपले आहेत. आज आई-बापाचे मुले ऐकत नाहीत. छोट्या-छोट्या गोष्टीतून या तरुणांची माथी भडकत आहेत. सहनशील देशातील या पिढीला सहनशीलताच राहिली नाही.साधे केस का कापले नाहीस,म्हणून विचारणार्या शिक्षकावरच चाकू हल्ला करणारे विद्यार्थी पुढे आपले भविष्य काय घडवणार आहेत, असा प्रश्न आहे.संस्कार,मूल्ये ही फक्त शाळेत वाचण्यापुरती राहिली आहेत. ही मूल्ये घराघरात रुजायला हवीत,तरच संस्कारशील पिढी घडणार आहे, अन्यथा सरळ नाकासमोर चालणार्यालाही चाकूच्या धाकाखाली जगावे लागणार आहे.

Sunday, October 8, 2017

पर्यटन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

     आज जगभरात रोजगाराच्या पारंपारिक संधी कमी होत चालल्या आहेत. या परिस्थितीत आता अशा नव्या क्षेत्रांचा शोध सुरू आहे,ज्या फक्त रोजगारच देणार नाहीत,तर जगभरात ओढवलेल्या आर्थिक संकटातूनदेखील बाहेर काढू शकेल. असेच एक क्षेत्र आहे, ते म्हणजे पर्यटन. हे क्षेत्र फक्त रोजगारच देत नाहीत तर श्रमशक्तीचे स्थलांतरदेखील थांबवते. पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यास प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या मोठ्या संख्याने रोजगाराची निर्मिती होईल, यात शंकाच नाही. कारण यातून प्रवास, परिवहन, हॉटेल,रेस्टॉरंट, आतिथ्य, मोन्यूमेंटल संरक्षण, गाइड, स्थानिक व्यवसाय,हस्तशिल्प, वस्त्र उद्योगसह पर्यटकांच्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. एका अंदाजानुसार पर्यटन क्षेत्रात प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 78 नव्या संधी उत्पन्न होतात.इतकीच गुंतवणूक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात केली तर रोजगाराच्या 45 संधी निर्माण होतात.

     राज्यांमधला या उद्योगाचा विस्तार पाहता ट्रॅव्हल, टुरिझ्म आणि हॉस्पिटॅलिटीचे कोर्स सुरू करायला हवेत.कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. हा उद्योग जेंडर सेंसेटिव्हिटीलादेखील प्रोत्साहन देतो आणि मुले किंवा मुली दोघांसाठी समान संधी उपलब्ध करून देतो. म्हणजेच या उद्योगात जितकी गरज मुलांची आहे, तितकीच आवश्यकता मुलींची आहे. राज्यांची परंपरा, संस्कृती, शैली, लोकनृत्य, पक्वान इत्यादी गोष्टींमध्ये इतकी विविधता आहे की, यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी फारच गरजेचा आहे. या अभ्यासामुळे विद्यार्थी यात विशेष नैपुण्य मिळवू शकतील आणि येणार्या पाहुण्यांना आपल्या देशातील, विविध राज्यांमधील इतिहासाची ओळख करून देऊ शकतील. त्याचबरोबर आपल्या येथील शिल्प आणि स्थापत्यकला याबाबतीत पर्यटकांना सांगू शकतील, त्यांचे स्वागत करू शकतील.
पर्यटन कोर्सेजची गरज
     पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र,राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसारख्या राज्यांची एक विशिष्ट छबी विश्व मानचित्रावर उमटली आहे. पण अडचण अशी आहे की आपल्या इथल्या विद्यापीठांमध्ये टुरिझ्मसंबंधातील मोठ्या प्रमाणात कोर्सेज उपलब्ध नाहीत. आणि जे काही आहेत, त्यामध्ये टुरिझ्म, ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगासारखे उद्योगसंबंधीत  कोर्सेज आपल्या इथल्या बहुतांश विद्यापीठांमध्ये उपलब्ध नाहीत.टुरिझ्म,ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटीसारखे उद्योग सातत्याने वाढत आहेत.यांमध्ये मंदीची शक्यता फारच कमी आहे.
योग्यता
     ट्रॅव्हल,टुरिझ्म आणि हॉस्पिटॅलिटीचे कोर्सेस डिझाइन करताना काही गोष्टींचा विचार करणे फारच आवश्यक आहे. राज्यांच्या विशेषतेबरोबरच नवे तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी यांची विद्यार्थ्यांना ओळख असायला हवी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल्स फारच चांगले असायला हवे आणि त्यांना एखाद्या परदेशी भाषेचे ज्ञान असायला हवे.
प्रमुख अभ्यासक्रम
एमबीए (ट्रॅव्हल अँड टुरिझ्म मॅनेजमेंट),
डिप्लोमा (ट्रॅव्हल,टुरिझ्म अँड हॉस्पिटॅलिटी)
बीबीए (ट्रॅव्हल अँड टुरिझ्म)

स्वतः ला बनवा एक थॉट लिडर

     जेव्हा एखाद्या खास विषयावर एखाद्या व्यक्तीच्या विचाराने अनेक लोक प्रभावित होतात,तेव्हा त्या व्यक्तीला थॉट लिडर म्हटले जाते. एक थॉट लिडर अशी व्यक्ती असते,ज्याच्या विचाराने,बोलण्याने अधिक माणसे प्रभावित आणि प्रेरित होतात.मात्र थॉट लिडर बनणं तसं सोपं नाही.यासाठी खूप कष्ट,निष्ठा आणि रचनात्मकता असण्याची गरज आहे.एक चांगला थॉट लिडर बनायचे असेल तर काय करावे लागेल, ते जाणून घेऊ या.

आपल्या विषयावर प्रेम करा 
एक चांगला थॉट लिडर बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयावर लिहायला लागेल ,बोलायला लागेल. त्याच्या व्हिडिओज तयार कराव्या लागतील.त्याचबरोबर नवनवीन कल्पना शोधाव्या लागतील.  तुम्हाला विषयाबाबतीत आसक्ती असायला हवी. असा विषय असायला हवा की ज्याची प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी मनापासून जाणून घ्यायला उत्सुक असाल.
नेहमी विश्वासपात्र राहा 
एक लक्षात ठेवा,जोपर्यंत तुम्ही जे काही लिहीत आहात किंवा बोलत आहात,त्यावर तुमचा विश्वास बसत नाही,तोपर्यंत दुसरा कोणीही विश्वास ठेवणार नाही.त्यामुळे जे काही तुम्ही लिहाल किंवा सांगाल त्याविषयी तुम्ही स्वतः विश्वसनीय राहा.असे झाले तर तुमचा  ओडीयंसदेखील त्यावर विश्वास ठेवेल.
नेटवर्क वाढवा 
कोणत्याही विषयावरील अधिकाधिक माहिती जमा केल्यानेच तुम्ही एक चांगला थॉट लिडर बनू शकता.यासाठी आवश्यकता आहे ती तुम्ही तुमचा नेटवर्क वाढवण्याची.यामुळे तुम्हाला नवनव्या कल्पना आणि विचार ऐकायला मिळतील.
एक चांगला थॉट लिडर बनण्यासाठी सगळ्यात अगोदर स्वतः ला हा प्रश्न विचारा की ,कोणती गोष्ट  आणि तुम्हाला ती  किती मनापासून आवडते. त्या विषयावर तुम्ही अधिक  लक्षकेंद्रित करू शकता. थॉट लिडर बनून तुम्ही दुसऱ्यांना योग्य सल्ला देऊ शकता किंवा मार्ग दाखवू शकता.

(बालकथा) आजीचा वाढदिवस


आज शाळा सुटल्यावर अंकिता घरी जायला बसमध्ये बसली,तेव्हा ती फार खुशीत होतीकारणही तसंच होतंउद्या आजीकडे जायचं होतंदोन दिवसांनी आजीचा वाढदिवस होता.तिने विचार केला होताआजीला आपल्या पॉकेटमनीतून काही तरी भेटवस्तू द्यायचीआईला सांगितल्यावर ती आपल्याला एकाद्या चांगल्या दुकानात घेऊन जाईलजिथे आजीसाठी एक चांगली सुंदर साडी घेऊ.पण तिच्याजवळ तर फक्त 95 रुपयेच होतेया 95 रुपयांमध्ये साडी येईलती तिच्या आईला विचारेलनाही ... ती आजीसाठी एक चप्पल जोड घेईल.नाही...नाही...वुल्फची जोडी ठिक राहील...गरम वुल्फची जोडी...आजीला थंड वाजत असेल नानाही ... नाही... कोणती तर चांगली वस्तू घेण्याचा विचार करूया गोंधळातच तिचे घर कधी आले,तिला कळलेच नाहीबसमधून उतरून ती दप्तर सावरत घराच्या दिशेने निघालीघरात जाताच आपला इरादा पक्का करण्यासाठी तिने आईला विचारले, “आईमग उद्या आपण आजीकडे जायचं ना? ”
“ हो बाळा,नक्की जायचं आहे. ”आई लगेच होकार देत म्हणाली. “ आता लवकर जाऊन कपडे बदल आणि  खाऊन घेमला खूप कामं आहेत. ”

अंकिता जेवणाच्या टेबलवर येऊन बसत म्हणाली, “ आईतुझ्या लक्षात आहे ना,परवा दिवशी आजीचा वाढदिवस आहे तोमी काय गिफ्ट देऊ? ”
“ अगं,मुलांनी गिफ्ट द्यायची नसते. ”  आई हसत म्हणाली.
“ पण मी तर देणार!” अंकिता काहीशा लाडिवाळ्पणे हट्ट धरत म्हणाली.
“ मी आजीलाच विचारते. ”  अंकिताने खाता खाताच आजीला फोन लावलाआणि म्हणाली,ङ्घ आजीआम्ही येतोय तुमच्या वाढदिवसालातुमच्यासाठी काय आणू? ”
आजी हसली आणि म्हणाली, “ शहाणी गं माझी छकुलीआण होपण मी सांगेल ते आणायचं! ”
“ काय? ”  अंकिता डोळे मोठे करून म्हणाली.
“ अंकितातू गेल्या दोन-तीन वर्षात जे कपडे वापरले नाहीसआणि पुढेही कधी वापरणार नाहीसअसे कपडे घेऊन येहांआणखी एकटीव्ही बघण्यातला काही वेळदेखील तुला द्यावा लागेल माझ्यासाठी! ” आजी तिकडून फोनवर मोठ्या प्रेमाने बोलत होती.
पण आजीमाझ्याजवळ तर 95 रुपये आहेतमी त्यातून तुम्हाला काही तरी आणू इच्छितेसांगा ना काय आणू? ”  अंकिताने आपली इच्छा प्रकट केली.
“ माझी सुंदर बाहुलीमी अशी कुठलीच वस्तू घेणार नाही,ज्याच्याने तुझे पैसे खर्च होतील. ”  आजी मोठ्या प्रेमाने म्हणाली.
“ का...का...? आजी! ”  अंकिता लाडाने म्हणाली.
“ काही नाहीतुम्ही फक्त लवकर यामी तुमची वाट पाहतेय. ”  आजी बोलली.
अंकिताने आपल्या आईजवळदेखील आजीला गिफ्ट देण्याचा हट्ट धरला,पण तीही समजावत म्हणाली, “ जसं आजी सांगते तसंच करती जे काही सांगतेते खूप विचारपूर्वक सांगते. ”
अंकिताने आपल्या कपाटातले सगळे कपडे खाली काढलेखाली कपड्यांचा ढिग लागलात्यातून तिला दोन जिन्स,दोन फ्रॉकचार शर्ट्सतीन स्कर्ट-टॉप आणि दोन स्वेटर मिळालेजे तिने गेल्या वर्षभरात कधीच घातले नव्हते.घालणार तरी कशीतिला ते लहान पडत होतेतिने ते कपडे कपाटाच्या खालच्या कप्प्यातल्या एका कोपर्यात ठेवून दिलेउद्या आजीकडे जाताना ते एका बॅगेत भरून घेऊन जायचेअसा तिने विचार केला.
आता तिने आपल्या ड्राइंग फाईलमधून दोन पाने काढली आणि आजीचे काही फोटो तिच्या अल्बममधून काढलेत्याचे सुंदर ग्रिटिंग कार्ड बनवलेअंकिताने ते आईची नजर चुकवून तिच्या सॅकच्या एका कप्प्यात ठेवून दिलेती  संध्याकाळी गाडीत बसून आईसोबत जतसाठी रवाना झालीबाबा त्यांना बस स्टॉपवर सोडायला आले होतेजतला पोहचल्यावर तिला आजीला भेटल्यावर फार आनंद झालाअंकिताची संगीतामावशी आणि तिचा मुलगा आशुतोषदेखील आला होता.
दुसर्यादिवशी आजीचा वाढदिवस होतासगळ्यांनी सकाळी उठल्यावर आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याआजोबांनी सगळ्यांना आपापले गिफ्ट आणायला सांगितले.  अंकिता आपल्या आणलेल्या बॅगेतून जुने कपडे  घेऊन आलीतिने विचार केला मावशीच्या मुलाने आशुतोषने नक्कीच आजीसाठी छानसे तसेच महागडे गिफ्ट आणले असतीलपण त्याच्याही हातात जुन्या कपड्यांची पिशवी होतीआजीने थँक यू म्हणत हातातून गिफ्ट घेतले आणि टेबलावर ठेवले.
तेवढ्यात अंकिता मागे वळाली आणि पळत जाऊन आपल्या सॅकमध्ये ठेवलेले कार्ड घेऊन आली. “हॅप्पी बर्थ डेआऽऽ ज्जी. ” ती ओरडून म्हणाली.
पण मी तुला नको म्हटले होते ना गिफ्ट आणायला... ” आजी रागात आल्यासारखे करत बोलली.
“ पण यात माझा एक पैसादेखील खर्च झाला नाहीआजीहे तर मी माझ्या हाताने बनवले आहे. ”  हे ऐकाताच आजीने अंकिताला आपल्या पुढ्यात घेतले आणि तिच्या कपाळाचा पापा घेतला.
“ पण आजीतू या कपड्यांचे काय करणाराहेस? ”  आशुतोष अगदी उतावीळपणे म्हणाला.
“ हो आजीसांग ना! ” अंकिताही म्हणाली.
“ आपण हे सगळे कपडे गरजूगरीब मुलांना वाटून येऊचला , फटाफट तयार व्हा आणि नाश्ता करून घ्या. ”  आजी म्हणाली.
“ मग एक तास स्वयंपाकासाठी द्याआपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी खायलाही करू. ”  आजोबा म्हणाले.
सगळ्यांनी नाश्ता केलाआता अंकिताआशुतोषसंगीतामावशीआजी आणि आजोबा सगळ्यांनी मिळून बटाटे वडे बनवले.सगळ्यांनी या कामाला हात लावलाअंकिता आणि आशुतोष दोघांनी वडा-पावची पाकिटे बनवलीहे सगळे घेऊन अंकिताआशुतोषआजीआजोबांसोबत विठ्ठलनगर वस्तीमध्ये गेलेआजीआजोबांनी तिथल्या काही  मोठ्या लोकांशी चर्चा केली आणि तिथल्या मुलांना कपडे वाटलेसोबत आणलेली वडा-पावची पाकिटेही वाटलीकपडे आणि खाऊ पाहून मुलांना झालेला आनंद पाहण्यासारखा होताआजी म्हणाली, “ बघितलंतजे कपडे तुम्ही न वापरता विनाकारण तुमच्या कपाटात ठेवत होतातते कुणाच्या तरी उपयोगाला आलेही किती आनंदाची गोष्ट आहे. ”
“ शिवाय तुम्ही तुमचा टीव्ही बघण्याचा वेळदेखील खाऊ बनवण्यासाठी दिलात आणि यांचे पोट भरले. ”  जवळच उभे असलेले आजोबा म्हणाले.
अंकिता आणि आशुतोष मान डोलावत होतेअंकिता विचार करत होती, “ आजीचा वाढदिवस किती वेगळ्याप्रकारे आणि छान साजरा केला आम्ही. ” 

Saturday, October 7, 2017

डिझाइन क्षेत्रात करा करिअर

     इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,मुंबई ( आयआयटी)ने कॉमन एंट्रेंस एग्जाम फॉर डिझाइन (सीईईडी) साठी इच्छूक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.या परीक्षांचे आयोजन आयआयएसी बंगळुरू, आयआयटी,मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी हैद्राबाद, आयआयआयटीडीएम जबलपूर, आयआयटी कानपूरचे मास्टर ऑफ डिझाइन प्रोग्रॅम (एमडीईएस) आणि आयआयएससी बंगळुरू, आयआयटी मुंबई, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी हैद्राबाद,कानपूरच्या पीएचडी प्रोग्रॅम इन डिझाइनमध्ये प्रवेश मिळू शकतो. फक्त सीईईडीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच उमेदवारांना या कार्यक्रमामध्ये प्रवेशाची गॅरंटी मिळेल, असे नाही. या परीक्षेबरोबरच उमेदवारांना संस्थांद्वारा आयोजित परीक्षा,मुलाखती इत्यादी गोष्टींमध्येदेखील उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.सीईईडी परीक्षेचे जाहीर झालेले गुण निकालापासून एक वर्षापर्यंत वैध मानले जाते. सीईईडी 2018 चे इच्छूक उमेदवार 10 नोव्हेंबर 2017 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

योग्यता आणि परीक्षा केंद्र
     कॉमन एंट्रेंस एग्जाम फॉर डिझाइनसाठी उमेदवारांना 4 किंवा 3+2 वर्षांची डिग्री/डिप्लोमा/पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री उत्तीर्ण आवश्यक आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जुलै 2018 पर्यंतच्या अंतीम परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अर्ज करता येतो. त्याचबरोबर जुलै 2017 पर्यंत जीडी आर्टस डिप्लोमा प्रोग्रॅम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांदेखील अर्ज करता येतो. अर्ज करणारा उमेदवार कितीही वेळा अर्ज करू शकतो.उमेदवारांना वयाची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. शिवाय अर्ज करणारा कितीही वेळा सीईईडीसाठी अपियर असू शकतो. देशभरातल्या 20 शहरांमध्ये सीईईडीची परीक्षा आयोजित करण्यात येते. अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगढ, हैद्राबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई,नागपूर,पाटणा,मुणे, रायपूर,तिरुवनंतपुरम, त्रिशूर आणि विशाखापट्टनम या शहरांचा समावेश आहे. उमेदवारांना यापैकी कोणत्याही तीन शहरांची निवड करून अर्ज भरावा लागणार आहे.
असा करा अर्ज
     आयआयटी मुंबईद्वारा आयोजित कॉमन एंट्रेंस एग्जाम फॉर डिझाइन 2018 साठी इच्छूक व योग्य उमेदवार ऑफिशल वेबसाइट www.ceed.iitb.ac.in  वर जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. याचबरोबर उमेदवारांना नोंदणी फीदेखील जमा करावी लागणार आहे. सगळ्या महिला उमेदवारांना 1100 रुपये नोंदणी फी द्यावी लागणार आहे. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी संवर्गातील उमेदवारांनादेखील 1100 रुपयेच जमा करावे लागणार आहेत.उर्वरित सगळ्या संवर्गासाठी 2200 रुपये नोंदणी फी जमा करावी लागेल. नोंदणीची अंतीम तारीख म्हणजेच 10 नोव्हेंबर 2017 नंतर लेट फी भरून अर्ज करता येते.
परीक्षेचा पॅटर्न काय असेल?
     कॉमन एंट्रेंस एग्जाम फॉर डिझाइनमध्ये परीक्षेचे ए आणि बी असे दोन भाग असतील. भाग ए ची परीक्षा 1 तासाची तर भाग बी ची परीक्षा 2 तासांची असेल. उमेदवारांना या दोन्ही भागात प्रश्न सोडवावे लागणार आहेत. भाग ए चे आयोजन सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर भाग बीचे आयोजन 11 ते दुपारी 1 पर्यंत असेल. भाग ए मध्ये वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न असतील.यात मल्टीपल चॉइस प्रश्, मल्टीपल सिलेक्ट प्रश्न आणि न्यूमेरिकल प्रश्-उत्तर असतील. उमेदवारांना विभाग ए च्या प्रश्नांची उत्तरे संगणकावर द्यावी लागतील.तर भाग बीमध्ये असे प्रश्न विचारले जातील, ज्यात उमेदवारांच्या डिझाइन, ड्रॉइंग आणि रायटींग स्किल पाहिले जाईल.
या आहेत आवश्यक तारखा
     कॉमन एंट्रेंस एग्जाम फॉर डिझाइन(सीईईडी) साठी उमेदवार 9 ऑक्टोबर 2017 पासून ऑनलाइन नोंदणी करू शकतात. नोंदणीची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2017 आहे. शिवाय उमेदवार 11 नोव्हेण्बर 2017 ते 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत लेटफी भरून नोंदणी करू शकतात. उमेदवार 25 डिसेंबर 2017 पासून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. सीईईडी 2018 च्या परीक्षेचे आयोजन 20 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत केले जाईल.भाग ए साठीची ड्राफ्ट आंसर की 27 जानेवारी 2018 ला प्रसिद्ध केली जाईल. उमेदवार 31 जानेवारी 2018 पर्यंत भाग ए च्या ड्राफ्ट आंसर कीबाबत कॉमेंट्स पाठवू शकतात. भाग ए साठी फायनल आंसर की 4 फेब्रुवारी 2018 ला प्रसिद्ध केली जाईल. सीईईडी परीक्षेचा निकाल 5 मार्च 2018 ला जाहीर केला जाईल. उमेदवार 5 मार्च 2018 पासूनच आपले गुणपत्रक डाऊनलोड करू शकतात.