महाराष्ट्र सरकारने
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला.पण माणसाच्या डोक्यातील अंधश्रद्धा जाता जायला तयार नाही.
करणी करते म्हणून आपल्याच आईला मारहाण करून तिला ओढ्यात फेकून दिल्याची
घटना सांगली जिल्ह्यातल्या कुंभारगावात घडली आहे. ही घटना जितकी
संतापजनक आहे,तितकीच आईला मारहाण करणार्या मुलाच्या आणि सुनेच्या विचाराची कीव करायला लावणारी आहे. अनेकांनी करणी-बिरणीच्या नादाला लागून आपली स्वत:ची घरेच उदवस्त करून टाकली आहेत.यामुळे आपण स्वत:ही शांततापूर्ण आयुष्य जगू शकत नाहीत आणि दुसर्यालाही
जगू देत नाहीत. त्यामुळे शेवटी इथे कायदा कमी पडतो. अजून आपण समाजातून अंधश्रद्धा घालवण्यासाठी बराच पल्ला घाठावयाचा आहे,हेच आपल्याला जाणवत राहते. जनजागृतीच्याबाबतीत आपण अद्याप
खूप मागे आहोत. कायदे करून काही होत नाही,ते कागदावरच राहतात,याचा प्रत्यय आपल्याला जागोजागी येत
आहे. आपल्या राज्यात तंबाकूजन्य पदार्थ,गुटखा,मावा यांच्या खरेदी-विक्रीवर
बंदी आहे. गावठी दारू, मटका, बेकायदा प्रवासी वाहतूक अशा कितीतरी गोष्टींवर बंदी आहे, मात्र ही बंदी फक्त कागदावर आहे. सगळे काही अलबेल सुरू
आहे. आपण जोपर्यंत जनजागृतीमोर्चावर अधिक काम करत नाही,तोपर्यंत प्रत्यक्षात आपल्याला सकारात्मक चित्र दिसणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलनबाबतीतही हेच म्हणावे लागेल.
आईला मारहाण करणारा
नाथा नामदेव माने याच्यावर आणि त्याच्या बायकोवर-सुमनवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नाथाची आई तुळसाबाई आपल्या दुसर्या मुलाकडे-संजयकडे शिरोळला राहते. नाथाच्या मुलाचे परवा निधन झाले
म्हणून तुळसाबाई आपल्या मुलासह कुंभारगावला गेल्या होत्या. अंत्यविधीचा
कार्यक्रम आटोपल्यावर मुलगा संजय हा तिच्या आईला तिथेच सोडून शिरोळला गेला.
दरम्यान दुसर्यादिवशी रात्री नाथा आणि त्याच्या
बायकोने तुळसाबाई यांच्याबरोबर भांडण काढायला सुरुवात केली. तुझ्यामुळेच
माझा मुलगा गेला म्हणत नाथा आणि सुमन यांनी आईला मारहाण केली.पट्ट्याने आणि काठीने मारहाण केल्याने त्या बेशुद्ध झाल्या. अशा बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत त्यांनी तुळसाबाई यांना कुंभारगावच्या ओढ्यात
नेऊन टाकले. त्यांना सकाळी शुद्ध आली. त्या
कशाबशा जयसिंगपूरला गेल्या आणि तिथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्या.
आईला बेशुद्ध होईपर्यंत
मारहाण करणार्या आणि तशाच
अवस्थेत ओढ्यात फेकून देणार्या निर्दयी पुत्राचा संताप येणं
साहजिक आहे. अर्थात अजूनही असेच चित्र कमी-जास्त प्रमाणात आपल्या आजूबाजूला आहे.ज्या गोष्टी अस्तित्वात
नाहीत,त्या गोष्टी आपण मनावर घेऊन आपण आपली रक्ताची नाती तोडत
आहोत. आजकाल शिकलेली माणसेदेखील अशा गोष्टींवर विश्वास ठेवून आपलेच नुकसान करून घेत आहेत. या अडाणीपणाचा
फायदा मात्र बुवा-बाबा घेऊन आपली घरे भरत आहेत. अजूनही आपल्या गावच्या गल्ली-बोळात देव-देवर्षी कराणार्या बायका-पुरुष
देवाच्या नावावर आपले दुकान चालवताना दिसत आहेत. बाबा रहिमसारखा
भोंदू माणूस त्यांच्या या अडाणीपणाचा लाभ उठवत स्त्रियांच्या इज्जतीवरच हात घालतो,तेव्हा अशा लोकांच्या विचाराची, अडाणीपणाची कीव आल्याशिवाय
राहत नाही. शाळेतल्या पहिल्या धड्यापासून आपण मूल्ये,श्रद्धा-अंधश्रद्धा शिकत आलो तरी आपण बुवा-बाबाच्या मागे लागतो,हेच मोठे दुर्दैव आहे. आपल्या देशात गरीबी सगळ्यात मोठी आहे. या गरिबीमुळे माणूस
पार पिचला आहे,गंजला आहे. दारिद्य घालवू, नोकर्या देऊ असे राज्यकर्ते
कितीही म्हणत असले तरी त्यांच्याकडून ही गरिबी काही हटत नाही. उलट राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळे गरीब हा आणखी गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत
हा अधिक श्रीमंत होत चालला आहे. याच गरिबीच्या साखळदंडातून मुक्त
होण्याची धडपड करणारा माणूस श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला कवटाळून बसतो,
आणि अशी काही कृत्ये करतो की, त्याचे पाय आणखी
खोलात जातात. सरकार चालवणार्यांनी कितीही
कायदे केले तरी त्याचा उपयोग होत नाही. कायद्याची अंमलबजावणी
करण्यासाठी ज्यांच्या हातात काठी दिली आहे,त्यांची नीतीमत्ताही
ठीक नाही. मग कायदा हा फक्त कागदावरच राहतो.
No comments:
Post a Comment