Wednesday, October 11, 2017

ऑनलाईन शॉपिंग आणि व्यावसायिक

     आजच्या धकाकीच्या जीवनात अडकलेला माणूस वेळेसाठी तरसतोय.वेळच मिळत नाही, अशी त्याची तक्रार असते.त्यामुळे दोन पैसे जास्त गेले तरी चालतील,पण वस्तू फार झिगझिग न करता मिळाली पाहिजे आणि  काम झटक्यात झाले पाहिजे, असे त्याला वाटत असते.सगळे घरच्याघरी बसल्या जागेला मिळाले तर सोन्याहून पिवळे! या माणसाच्या ऐतवृत्तीमुळे ऑनलाईनचा बाजार आज चांगलाच फोफावला आहे. ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी आपले जाळे ग्रामीण भागातही विणायला सुरुवात केल्याने त्यांची तर भरभराटच सुरू आहे,मात्र स्थानिक व्यावसायिकांपुढे अडचणी निर्माण झा
ल्या आहेत. आपल्या दुकानापर्यंत येणारा ग्राहक आता या ऑनलाईन शॉपिंगमुळे घरातच अडकून पडला आहे.त्यामुळे त्याला आपल्या दुकानापर्यंत कसे आणायचे, याचा विचार त्यांना करावा लागणार आहे.
     मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू,कपडे या वस्तूंना ऑनलाईन मागणी वाढली आहे. साहजिकच व्यावसायिकांचा धंदा बसला आहे. ऑनलाईनवर अनेक व्हरायटी पाहायला मिळतात.त्यांच्या फिक्स किमती असतात.त्याच वस्तू बाजारात चढ्या दराने विकल्या जातात. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा ओढा ऑनलाईन शॉपिंगकडे वाढला आहे.शिवाय ऑनलाईन कंपन्या वेगवेगळ्या सणा-उत्सवाला ऑफर द्यायला लागल्या आहेत. शिपिंग मोफतपासून 20 ते 60 टक्क्यांपर्यंत वस्तूंवर सवलती द्यायला लागल्या आहेत.या ऑफर्सची भूरळ पडणार नाही तर काय? परवा एका ऑनलाईन कंपनीने तर वेगवेगळ्या वस्तूंवर तब्बल पन्नास टक्के सवलतीची ऑफर दिली. या काळात मोठी उलाढाल झाल्याचे सांगितले जाते.हे असेच चालले तर स्थानिक व्यावसायिकांना आपले दुकान बंदच करावे लागणार आहे.यासाठी स्थानिक व्यावसायिकांना ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सवलतीचा भडिमार तर करावा लागणारच आहे, पण आणखीही काही योजना राबवाव्या लागणार आहेत.कदाचित उद्या घरपोच सेवा राबवावी लागेल.
     ग्राहकांचा प्रतिसाद पाहून आज ऑनलाईन क्षेत्रात अनेक कंपन्या उतरत आहेत.सध्या स्नॅपडील,  फ्लिपकार्ड,  शॉपक्लूज,    ॅमेझान,  जर्बींग,   अजिओलाइमरोडशॉपिंग डॉट कॉमयाहू मंत्राझोवी डॉट कॉमजंगली डॉट कॉम,अलेक्सा अशा अनेक कंपन्या ग्राहकांना सेवा देत आहेत. आणखी एक म्हणजे ब्रँडेड वस्तू ग्राहक नेटवर किंमत तापसून घेतो.स्थानिक बाजारात जर तीच वस्तू महाग मिळत असेल तर ग्राहक ते घ्यायला धजावत नाही. तो थेट ऑनलाईन कंपन्यांच्या बेवसाइटवरून मागवून घेतो. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मन मानेल तसा दर आकारून ग्राहकांना लुटता येत नाही. आजपर्यंतची परिस्थिती अशीच होती, मात्र ऑनलाइन शॉपिंगमुळे मोठ्या प्रमाणात या गोष्टीला आळा बसला आहे. ऑनलाइन कंपन्या आता मोठ्या शहरांमध्ये आपली दुकाने थाटत आहेत,ग्रामीण भागापर्यंत त्या पोहचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे व्यावसायिकांना कमी नफ्यावर काम करावे लागणार आहे.
     ग्राहक ऑनलाईन बाजाराकडे वळला असला तरी त्याला आपली फसवणूक होणार नाही,याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.परवा नाशिकमधील एक युवक ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने जबर जखमी झाला आहे.संबंधित कंपनीच्या लोकांनी त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला,मात्र त्याने कंपनीने आपली चूक मान्य यासाठी आग्रह धरला आहे. त्याचे कौतुक करायला हवे. ग्राहकांनीही आपली फसवणूक झाल्यास ठाम राहून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.पुढच्यास ठेस मागचा शहाणा, या युक्तीप्रमाणे इतरांना त्यापासून सावध राहायला संधी मिळेल आणि कंपन्याही बेजबाबदारपणे वागणार नाहीत
(संकेत टाइम्स-संपादकीय)

No comments:

Post a Comment