Sunday, October 22, 2017

'अंतर्नाद'च्यानिमित्ताने...

     'अंतर्नाद' हे निव्वळ साहित्याला वाहिलेले नियतकालिक बंद करण्याचा निर्णय त्याच्या संपादकांनी घेतला असल्याची बातमी वाचनात आली. आणि हे नियतकालिक बंद होणार म्हणून हळहळ व्यक्त करणार्या प्रतिक्रियाही वाचायला मिळत आहेत. अर्थात हे नियतकालिक आर्थिक अडचणीमुळे बंद होत नाही तर, त्याला चांगले लेखक आणि लेखन न मिळणे हे असल्याचे वाचल्यावर मला थोडा धक्काच बसला. अंतर्नादचे एक-दोन दिवाळी अंक मी विकत घेऊन वाचले आहेत. त्यात लिहिणारे लेखक काही नवे तर काही जुने आहेत. असे असले तरी नव्या पिढीतल्या वाचकाला आणि लेखकांना हे नियतकालिक कितीसे माहित आहे? बरे या नियतकालिकेसाठी कोण कोण लिहितात,त्यांनी तरी आपल्या वाचकाला हे मासिक वाच, असे सांगितले आहे का? कुणा साहित्यिकाने यातल्या प्रकाशित साहित्यावर कुठे लिहिले अथवा बोलले आहे का? ठराविक लेखकांनी लिहायचे आणि ठराविक लोकांनीच वाचायचे का? खरे तर अंतर्नादच्या संपादकांना भानू काळे यांना दर्जेदार लिखाण आणि साहित्य मिळाले नाहीत, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आज चांगलं लिहिणारी खूप लेखक आहेत. मात्र त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला नाही. वृत्तपत्रांनी तर कथा,कविता आपल्या रविवारच्या पुरवणीत छापायचेच बंद केले आहे.त्यामुळे अशा साहित्यिकांची कोंडी झाली आहे.

     वृत्तपत्रांचे दिवाळी याशिवाय लिहिणार्या साहित्यिकाला अन्य मार्ग नाहीत. काही अंतर्नादसारखे नियतकालिक आहेत.ते तळागाळापर्यंत पोहचले नाहीत. त्यामुले त्यांना चांगले साहित्यिक आणि लिखाण भेटले नाहीत, यात दोष कोणाचा? या नियतकालिकांना चांगले साहित्यिक अथवा लिखाण हवे असेल तर त्यांनी का विशेष प्रयत्न केले नाहीत. का त्यांनी नवोदित लेखकांना शोधून त्यांचे साहित्य मागवले नाही? ठराविक लेखकांच्या भरवशावर आपले दुकान चालवणार्या या नियतकालिकांनी का दर्जेदार साहित्यिक तयार करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत? का त्यांनी आपले नियतकालिक सर्वदूर जावे म्हणून प्रयत्न केले नाहीत? नवोदितांना खरे तर मार्गदर्शांची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी कार्यशाळा वेगैरे का ठेवल्या गेल्या नाहीत. आजचे प्रकाशक किती नव्या साहित्यिकांना संधी देतात? आज तर प्रकाशकांनी अनुवादावर अधिक जोर दिला आहे. त्यामुळे अनुवादकांचे दिवस चांगले आले आहेत. अर्थात तीही एक कला आहे. शिवाय आज वाचकाची रुची बदलली आहे. त्यानुसार प्रकाशक पुस्तकांचा बाजार मांडत आहेत. स्पर्धा परीक्षा, अनुवाद साहित्य, प्रेरणा देणार्या लिखाणाला मागणी वाढत आहे. साहजिकच कथा, कादंबर्या आणि कविता कोण वाचणार? वाचक निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी प्रयत्न व्हायला नको का?
     आज फेसबूक, वॅट्स अप वर येणारे काही काही लिखाण अगदी भन्नाट असतात. सोशल मिडियावरचे लिखाण टाकाऊ, उथळ आहे, असे म्हणता येत नाही. यातल्या चांगल्या लिखाणाचा शोध घ्यायला हवा, संबंधित लेखकाला लिहिते करायला हवे. असे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. मग अंतर्नादसारखी नियतकालिके वाचणार कोण आणि त्याला लेखक कसा भेटणार? आज सगळे व्यावसायिक झाले आहे.त्यामुळे अशा नियतकालिकांनी आपले जुनेच धरून चालणार कसे? त्यांनासुद्धा या क्षेत्रात येऊन आपली जाहिरातबाजी करावी लागणार आहे. आज झीटीव्हीने दिवाळी अंक काढला. त्याची दुसरी आवृत्तीसुद्धा हातोहात खपली. मग झीटीव्हीने ज्या लेखकांना घेऊन दिवाळी अंक काढला, ते लेखक अथवा त्यांचे लिखाण चांगले नाही का? इतकी वर्षे झाली तरी आवाज,जत्रा,मेनकासारखी दिवाळी अंक चालतात. वाचक वाचतात. असे असताना नियतकालिक लोक वाचत नाहीत कशावरून म्हणायचे किंवा त्यांना लिखाण मिळत नाही, कशावरून म्हणायचे? धनंजयसारख्या रहस्यकथांनी भरलेला अंकदेखील लोक शोधून काढून विकत घेतात.वाचतात. शेवटी आर्थिक अडचणी या सगळ्यांना आहेतच.त्यातूनही प्रयत्न करून सर्वांपर्यंत पोहचण्याची जबाबदारी आपली स्वत:ची आहे. एकादे प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत पोहचवायचे असेल तर जाहिरातबाजी करणे ओघाने आलेच. आजच्या काळात जाहिरातबाजी महत्त्वाची आहे.
     आज जग फास्ट झाले आहे. हातात मोबाईल नव्हे स्मार्ट फोन आला आहे.अनेकजण ई- आवृत्त्या काढत आहेत. ग्राहकांपर्यत पोहचण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यायला हवा आहे.खरे भानू काळे यांनी थोडा काळ विश्रांती घ्यावी आणि पुन्हा मोठ्या जोमाने, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नियतकालिकेला सुरुवात करावी. खरे तर आज नवीन लेखकाला मार्गदर्शनाची गरज आहे.संपादकाची जाणीव करून द्यायची गरज त्याशिवाय दर्जेदार साहित्य येणार कसे? आज जी पिढी लिहित आहे, ती जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या लिखाणाची उंची गाठू शकली आहे.त्यामुळे अंतर्नादसारखी नियतकालिके प्रकाशित होत राहणे,काळाची गरज आहे. मोठमोठी इंग्रजी आणि हिंदी नियतकालिके ई-पुस्तक स्वरुपात येत आहेत. मराठीतल्या अशा नियतकालिकांनीही याचा स्वीकार करायला हवा.   मुलांसाठी लिहिणारी काही मासिके आहेत,तीही अजून आपलीच पाठ थोपटत कोशात अडकून पडली आहेत, त्यांनीही आता बाहेर येण्याची गरज आहे. आपल्या नियतकालिकांमध्ये बदलत्या जगाबरोबर बदलत राहिले पाहिजे. साहित्यात काही नवे प्रकार येत आहेत. लघुकथा वाचकाला भावत आहेत. थोडक्यात पण गहन विषय मांडणारे लिखाण आज स्वीकारले जात आहे. अशा लिखाणाचा मराठी साहित्यात अंतर्भाव व्हायला हवा आहे. फक्त चांगले लेखक आणि लिखाण मिळत नाही,म्हणून नियतकालिक बंद करणे हा खरे तर लेखकांचा अपमान आहे. असे कुणावर तरी खापर फोडून पळून जाता येणार नाही. अंतर्नादच्या संपादकांना आपण साहित्यिक निर्माण करण्यासाठी, त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि वाचक,लेखकांपर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्न केले, हे सांगावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment