शहरांमध्ये बंगल्यांसमोर, सोसायट्यांमध्ये झाडे लावण्याचा
छंद एक चांगला संदेश देतो. झाडे लावा, झाडे
जगवा, या आवाहनाला प्रतिसाद देत लोक शहरांमध्ये आपापल्या परीने
झाडे लावतात. त्यांची काळजी घेतात. त्यामुळे
शहरांमधल्या कॉलन्या, सोसायट्यांना एक प्रकारचा हिरवा टच येतो.
मात्र या झाडांमुळे एक समस्याही निर्माण होते. ती म्हणजे वाळलेल्या पानांचा कचरा. बंगलेमालकांना अथवा
सोसायट्यांच्या नोकरांना ही वाळलेली पाने गोळा करून जाळून टाकण्याचे एक कामच लागते.
त्यामुळे कधी कधी लोकांना का झाड लावले, असे वाटणे
साहजिकच आहे. शिवाय वारंवार हा झाडांच्या वाळलेल्या पानांचा कचरा
गोळा करून जाळल्याने धूर होतो. लोकांच्या नाका-तोंडात जातो. लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे पाला-पाचोळा गोळा करून कंपोस्ट खत करायला शेतकर्यांना दिला तर! हाच विचार पुण्याच्या आदिती देवधर यांच्या
मनात आला आणि त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून शेतकर्यांना फुकट द्यायला सुरुवात केली. यामुळे प्रदूषणापासून
मुक्तता झाली आणि शेतकर्यांना कंपोस्ट खतासाठी कच्चे मटेरिअल
मिळाले. कुठल्याही मोबदल्याशिवाय एक समाजसेवा म्हणून आदिती हे
काम करत आहेत.
आदिती यांचे शिक्षण
एम.ए. पर्यंत
झाले आहे. पर्यावरण राखण्यासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा
होती. नदी वाचवण्यासाठी त्यांनी 2014 मध्ये
जिवंत नदी नावाची एक संस्था उभी केली. दरम्यानच्या काळात झाडांखाली,
घर,बंगल्यांसमोर पडणारा पालापाचोळा जाळल्याने प्रदूषण
वाढत असल्याने त्यांनी आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करण्याचे काम करत होत्या.पण त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा होता,
तो म्हणजे या पालापाचोळ्याचे करायचे काय? दरम्यान
त्यांना पालापाचोळा गोळा करून त्याचे कंपोस्ट खत तयार करून आपल्या शेतात, बागेत घालणार्या सुजाता नफाडे यांच्याशी त्यांची ओळख
झाली. यावेळेला त्यांना या पालापाचोळ्याचे महत्त्व समजले.
शहरातले लोक पालापाचोळा
टाकाऊ पदार्थ आहे, असे समजून जाळून टाकतात, यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते.
अर्थात निसर्गातील कुठलीच वस्तू बेकार किंवा टाकाऊ नाही, याची त्यांना कल्पना आली. साधारण नोव्हेंबर ते एप्रिल
काळात पानगळती सुरू असते.जमिनीचा ओलावा राखण्याचे काम या पानांमुळे
होते. विविध प्रकारचे किडे-कीटक या वाळलेल्या
पानांच्या ढिगाच्या आश्रयाला येतात. मान्सून काळात हीच पाने कुजून
त्याचे खत तयार होते. त्यामुळे जमिनीचा कस वाढण्यास मदत होते.
अशा प्रकारे पालापाचोळ्याचे महत्त्व समजल्यावर त्यांनी ब्राऊन लिव्स
नावाची वेबसाइट सुरू केली. यात पालापाचोळ्याची उपयोगितता आणि
कंपोस्ट खत बनवण्याच्या विविध पद्धती याबाबतीत माहिती देण्यात आली आहे. या मोहिमेशी जोडले गेलेल्या आणि जोडले जाणार्या लोकांना
याची माहिती व्हावी, हा उद्देश त्यामागे आहे. शिवाय अन्य गरजू लोकांनाही यामुळे माहिती मिळणार आहे.
वेबसाइटबरोबरच
त्यांनी एक फेसबूक पेजदेखील बनवले आहे. शिवाय वॉट्स अॅप ग्रुपसुद्धा बनवण्यात आला
आहे.ग्रुपशी दोनशेपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. फक्त पुण्यातच नाही तर देशातल्या वेगवेगळ्या भागात पालापाचोळा वाचवण्यासाठी
एक मोहीमच उघडली गेली आहे. अर्थात हे लोक पैशांसाठी काम करत नाहीत. आर्थिक हितसंबंध
यात नाहीत. प्रामाणिकपणे पर्यावरण वाचवण्याचे काम या ग्रुपच्या
माध्यमातून होत आहे. या मोहिमेशी जोडलेले गेलेले लोक आजूबाजूचा
पालापाचोळा गोळा करतात आणि ते पोत्यात भरून जे कंपोस्ट खत बनवतात,त्यांना नेवून देतात. यासाठी त्यांच्याकडून एक पैसाही
घेतला जात नाही. या माध्यमातून लोकांना पाचोळा जाळण्यापासून परावृत्त
केले जाते. सुखलेली पाने (पाचोळा)
जाळल्याने दोन प्रकारचे नुकसान होते. एक म्हणजे
विषारी धूर हवेत पसरतो. आपल्यासाठी ते धोकादायक आहे. आणि दुसरे म्हणजे जमिनीचा ओलावा कमी होतो. दुष्काळ पडण्याला
अथवा तापमान वाढायला हेदेखील एक कारण आहे, असे आदिती देवधर यांना
वाटते.
एकट्या पुण्यात
पालापाचोळा गोळा करणे आणि तो घेणे अशाप्रकारचे एक मोठे नेटवर्क तयार झाले आहे. काही शेतकरी किंवा बागायतदार त्यांच्याकडून
हा गोळा केलेला पालापाचोळा घेऊन जातात. कित्येक हाऊसिंग सोसायट्या,काही कंपन्या आणि एक शाळा त्यांना हा कचरा गोळा करून देते. आता आदिती देवधर यांचे हे नेटवर्क निर्माल्यही गोळा करतं. देवाच्या पुजेसाठी वापरण्यात येणारे
फूल,फळ,पाने व अन्य साहित्य एकत्र गोळा
करून त्याचेही कंपोस्ट खत बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे अभियान इतके
पुढे गेले आहे की,हैद्राबाद,बंगळुरू,
नाशिक आणि दिल्लीसारख्या ठिकाणी सुरू आहे. तेथील
लोक एकत्र येऊन पालापाचोळा गोळा करण्याचे काम करत आहेत. पुण्यातल्या
महापालिकेच्या अधिकार्यांनीही त्यांच्याकडे पालापाचोळा गोळा
करण्यासंदर्भात मदत मागितली आहे. ही चळवळ लोकप्रिय होत आहेच शिवाय
याचे नेटवर्क जाळेही हळूहळू इतर शहरांमध्ये पसरत आहे. लोकांना
योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांची चांगली मदत पर्यावरण रक्षण करण्यास होते.
No comments:
Post a Comment