आज कुठल्याही ठिकाणी
योग्यता महत्त्वाची आहे. योग्यता असल्याशिवाय कुणी कुणाला आपल्या सावलीला उभे करू देत नाही.त्यामुळे योग्यता बनवायला लागते.ती सहजासहजी प्राप्त
होत नाही.त्याच्यासाठी अपार कष्ट करायला लागतात.फक्त वय वाढून चालत नाही, तशी तुमच्यात योग्यताही यायला
हवी.त्यामुळे आपल्या आयुष्यात योग्यतेला सर्वात वरचे स्थान आहे.
आज योग्यता असल्याशिवाय नोकरी आणि छोकरीदेखील मिळत नाही. योग्यता असल्यावर मतदान करता येईल, ते कुणाला करायचे,ही योग्यता तुमच्या अंगी यायला हवी आहे. यासाठी आपला
समाज,देश आणि समस्या समजून घेण्याची जाण आली पाहिजे. आपली योग्यता ओळखू न शकलेले आपल्या आयुष्यात कधीच काही ध्येयप्रेरित करू शकत
नाही. अशांचे जीवन कुत्र्या-मांजरांसारखे
आहे.
योग्यता असलेली
माणसे संधी शोधतात. ज्यांच्याकडे योग्यता आहे,तेच फक्त विशेष संधी आणि परिवर्तनासाठी
नेहमी सज्ज असतात. त्यामुळे तुमच्याकडे चांगली योग्यता असेल,तर तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न तिला सर्वोत्तम करतात. तुमच्याकडे साधारण योग्यता असेल तर तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न त्यात सुधारणा
करून तिचे विशेष योग्यतेत रुपांतर करतात. अशी प्रयत्नवादी
माणसे कधीच मागे पडत नाहीत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली असो किंवा आजही पंच्याहत्तर वर्षे पार केलेले अँगी यंग मॅन अमिताभ बच्चन असो,
त्यांनी सातत्याने आपल्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला म्हणून इथवर
पोहचले.
ऑफिसात अथवा अन्य
कुठेही योग्यता असलेला माणूस असेल तर त्याचे वरिष्ठ बिनधास्त असतात. अशा माणसाकडे एक भरवशाचा व्यक्ती
म्हणून पाहिले जाते. त्यामुळे योग्यता किती महत्त्वाची आहे,
हे ध्यानात घ्यायला हवे. जर समजा आपल्या देशाचे
लष्कर जर अयोग्य व्यक्तीच्या हातात दिले तर काय होईल? आज उत्तर
कोरियाच्या हरकतीमुळे संपूर्ण जग चिंतेत पडले आहे. सनकी माणसाच्या
हातात सत्ता गेल्यावर काय होते,याची कल्पना आपल्याला आली असेल.
त्यामुळे योग्य माणसाच्या हातात सत्ता, जबाबदारी
गेल्यास त्याच्यावर अवलंबून असलेली मानसे बिनघोरी असतात. योग्यता
असलेला माणूस स्वत:बरोबरच जिथे कार्यरत असतो, तिथलीही प्रगती करत असतो. त्याच्या हातात कुणाचेही भवितव्य
अंधारात असणार नाही. तो जिकडे जाईल,तिकडे
आसमंत उजाळून टाकील, प्रकाशून टाकेल.
आणखी एक गोष्ट
लक्षात घेतली पाहिजे, संधी योग्य व्यक्तीसाठीच असते. योग्य व्यक्तीच संधीचा
लाभ घेऊ शकते,ते वेळेचा दुरुपयोग करीत नाहीत आणि नेहमी यशस्वीही
होतात. योग्यता निर्माण करता आली की, पुढच्या गोष्टी सहजसाध्य आहेत. योग्यता असलेली व्यक्ती
संयमी असायला हवी. योग्यता सिद्ध करावी लागते. आपली योग्यता इतरांसमोर जाहीर करायची असेल आणि इतरांनी आपल्या योग्यतेचा सन्मान
करावा, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आधी इतरांकडे
असलेल्या योग्यतेचा सन्मान केला पाहिजे. आयुष्यात यश
मिळवायचे असेल तर त्याच्याकडे योग्यता असणे महत्त्वाचे आहे, हे
धान्यात ठेवले पाहिजे.
जाता जाता आणखी
एक गोष्ट सांगावीशी वाटते, योग्यता असलेल्या माणसाकडे फार मोठी जबाबदारी येते.कारण
तो त्याचा हक्क आहे. म्हणून तो काही बेजबाबदार वागत नाही.
एकवेळ तो स्वत: काही बालंट अंगावर घेईल,पण दुसर्यावर ती जबाबदारी टाकणार नाही. एक लक्षात घ्या, योग्य व्यक्ती समाजाच्या आदराला
पात्र ठरते, कारण योग्यता देश आणि समाजासाठी अतिशय उपयुक्त आहे.
No comments:
Post a Comment